कच्छ ओसाड माळावरचं नंदनवन

कच्छचं रण हे ‘घुडखरा’चं म्हणजेच रानगाढवाचं एकमेव आश्रयस्थान आहे. (छायाचित्र : श्रीनिवास घैसास)
कच्छचं रण हे ‘घुडखरा’चं म्हणजेच रानगाढवाचं एकमेव आश्रयस्थान आहे. (छायाचित्र : श्रीनिवास घैसास)

शेकडो मैल खारट दलदलीचा वैराण प्रदेश... नजर जावी तिथपर्यंत पसरलेली सपाट, मुर्दाड जमीन... मधूनच एखाद्या ठिकाणी उगवलेली बाभळीसारखी काटेरी झाडं... थंडीच्या दिवसांत मी म्हणायला लावणारी थंडी आणि उन्हाळ्यात काहिली करणारं ऊन्ह... मूड बदलावा तसं बदलणारं हवामान... मध्येच उठणारी धुळीची वादळं आणि तरीही पक्ष्यांसाठी जणू नंदनवनच... अशी अनेक वैशिष्ट्यं सामावलेला भारतातील भूभाग म्हणजे कच्छचं रण. नभ-धरणीचं मीलन व्हावं अशा क्षितिजाचं जिथं तिथं दर्शन घडणाऱ्या ओसाड रणात पर्यटन ही कल्पनाच अनेकांना हास्यास्पद वाटते; पण अनेक पक्ष्यांचं नंदनवन आणि घुडखर म्हणजेच रानगाढव या प्राण्याचं एकमेव आश्रयस्थान असणाऱ्या या रणानं गुजरातच्या पर्यटनात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. गुजरात राज्यात स्थित या रणाचे ‘कच्छचं छोटं रण’ आणि ‘कच्छचं मोठं रण’ असे दोन भाग पडतात. यांपैकी छोट्या रणात भारतातील सर्वात मोठं वन्यजीव अभयारण्य आहे. सन १९७२ मध्ये अस्तित्वात आलेलं हे वन्यजीव अभयारण्य सुमारे ५००० चौरस किलोमीटर क्षेत्रफळात पसरलेलं आहे. 

रानगाढवाच्या संरक्षणासाठी या अभयारण्याची निर्मिती करण्यात आली. या अभयारण्यात अनेक प्रकारचे सरपटणारे प्राणी, सस्तन प्राणी, उभयचर आणि अनेक प्रजातींचे पक्षी आढळतात. रानगाढवाबरोबरच अनेक स्थलांतरित पक्षीही इथं आढळतात. इथलं रानगाढव हे ‘गुजरातचं जंगली गाढव’ किंवा ‘बलुची जंगली गाढव’ म्हणूनही ओळखलं जातं. हा प्राणी अंगापिंडानं अत्यंत मजबूत आणि अतिशय वेगानं धावणारा म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांची कमी होत असलेली संख्या पाहून गुजरात सरकारनं त्यांना विशेष संरक्षण दिलं. 

सन १९७२ च्या वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार ‘शेड्युल १’ मध्ये या प्राण्याचा समावेश करण्यात आला. या प्राण्याला पळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मोकळी जमीन लागते. त्याचा वेगही ताशी ७० ते ८० किलोमीटर इतका जास्त असतो. ही जमीन कमी होणं हा त्याच्यासमोरचा सर्वात मोठा धोका आहे. इथल्या भागात मिठागरांची संख्या वाढत चालली आहे. लोकांकडून अभयारण्याच्या क्षेत्रात होत असलेलं अतिक्रमण या प्राण्याच्या संख्येला मारक ठरत आहे. त्यामुळे ही मिठागरं अभयारण्याच्या बाहेर कशी जातील यादृष्टीनं वन विभागानं प्रयत्न सुरू केले आहेत.

शेकडो प्रजातींचे दुर्मिळ पक्षी एकाच भागात पाहायला मिळणं ही पक्षीप्रेमींसाठी मेजवानीच. इथलं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे ‘मॅक्विन्स बस्टर्ड’ नावाचा पक्षी. माळढोक पक्ष्याच्या जातीचा हा पक्षी. हा पक्षी हिवाळ्याच्या ऋतूत भारतात स्थलांतर करतो. मुख्यत्वे पाकिस्तानात याची वीण होते आणि मग हा पक्षी त्यानंतर रणात दाखल होतो. नेहमीच्या माळढोकापेक्षा छोटा असणारा हा पक्षी निसर्गप्रेमींना छोट्या रणाकडे अक्षरशः खेचून आणतो. भारतातील प्रसिद्ध व्याघ्रप्रकल्पांत जसे वाघ बघायला निसर्गप्रेमी जातात त्याचं ओढीनं ते छोट्या रणात ‘मॅक्विन्स बस्टर्ड’ हा पक्षी पाहायला जातात. याशिवाय अनेक पक्षी या भागाला हिवाळ्यात भेट देतात. इथं त्यांची वीणही होते. या भागात अनेक पक्ष्यांची असंख्य घरटी आहेत. इथं ‘नया तालाब’ नावाचा तलाव आहे. या तलावावर विविध प्रजातींच्या पक्ष्यांची अगदी रेलचेल असते. याशिवाय शिकारी पक्ष्यांची संख्या हेही रणाचं मोठं वैशिष्ट्य म्हणावं लागेल.

इथं मेढक नावाची एक जागा आहे. इथं एक अत्यंत दुर्मिळ पक्षी हमखास बघायला मिळतो. त्याचं नाव Greater hoopoe-lark. उडताना Common Hoopoe ची आठवण करून देणारा पक्षी म्हणून या पक्ष्याला हे नाव पडलं. या मेढकला जायचं म्हणजे आपल्या सहनशक्तीची कसोटी लागते. अनेकदा आपल्याला रणात एकही माणूस दिसत नाही. दिशा पटकन ओळखता येत नाहीत. इथं जायचं म्हणजे सोबत निष्णात गाईड आणि परिसराची इत्थंभूत माहिती असणारा चालक न्यायला मात्र विसरायचं नाही. नाहीतर रणाच्या मायाजालात तुम्ही केव्हा हरवून जाल, तुम्हाला कळायचंदेखील नाही. 

इथं जाताना अनेक ठिकाणी पाकिस्तानची सीमा अगदी लगतच आहे, त्यामुळे गाईड आणि चालक नेणं अत्यावश्यकच आहे. वाटेत वेणूदादाचं म्हणजे कृष्णाचं मंदिर लागतं. इथं आपल्याला अनेक बैल नजरेस पडतात. हे बैल देवाला सोडलेले आहेत. इथं त्यांच्या राहण्याची, खाण्याची, पाण्याची चोख व्यवस्था ठेवलेली आहे. तिथून आणखी पुढं गेल्यावर मेढकची टेकडी लागते. वर उल्लेखिलेला दुर्मिळ पक्षी आपल्याला इथं बघायला मिळतो. एवढ्या लांबवरचा प्रवास करून आल्यावर एकदा का हा ऐटबाज पक्षी दिसला आणि आपण त्याचं मनसोक्त निरीक्षण केलं की प्रवासाचा शीण लगेच निघून जातो.

अहमदाबादपासून सुमारे १०४ किलोमीटरवर असणाऱ्या झैनाबाद या गावात धनराज मलीक नावाच्या माणसाचं ‘डेझर्ट कोर्सर’ नावाचं हॉटेल आहे. इथं पर्यटन चालू करणाऱ्यांत धनराजच्या वडिलांचा म्हणजेच शब्बीर यांचा सिंहाचा वाटा आहे. अत्यंत उबदार झोपड्यांच्या स्वरूपातील इथल्या खोल्या आहेत. या हॉटेलच्या भागात दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचतं आणि संपूर्ण हॉटेल पाण्याखाली जातं, त्यामुळे दरवर्षी खोल्यांची डागडुजी करावी लागते. कधी कधी तर काही खोल्या पूर्णपणे बांधाव्या लागतात. खोल्यांच्या भिंती माती आणि शेण यांनी तयार केल्या जातात. या भागातली बहुतेक घरं अशीच शेण आणि माती यांची आहेत. या घरांना ‘बुंगा’ असं म्हणतात. आमिर खानच्या ‘लगान’ चित्रपटाचं चित्रीकरण या रणच्या भागातलंच आहे. या चित्रपटात दाखवलेली घरं याच पद्धतीनी तयार केलेली होती. बाकी दुर्लक्षित राहिलेल्या रणाचं सौंदर्य चंदेरी दुनियेनं मात्र अचूक टिपलं. ‘रेफ्युजी’, ‘लगान’, ‘मगधीरा’ अशा अनेक प्रसिद्ध चित्रपटांचं चित्रीकरण इथं झालेलं आहे.                           
कासवासारख्या आकारामुळे नावं मिळालेल्या या कच्छच्या रणाचं सौंदर्य अफलातून आहे. अनेक प्रजातींचे पक्षी, सपाट मोकळी जमीन, रानगाढवासारखा प्राणी,  hoopoe-lark सारखा दुर्मिळ पक्षी, मॅक्विन्स बस्टर्डसारखा स्थलांतरित माळढोक, लक्षणीय संख्येनं असलेले शिकारीपक्षी या सगळ्यांमुळे रणा मोठं वैशिष्ट्यपूर्ण ठरलं आहे. या सगळ्यांची सुरक्षितता आपल्यावर अवलंबून आहे. पौर्णिमेच्या रात्रीत तर रणाचं सौंदर्य अधिकच खुलतं. चांदण्यात चमकणारी पांढरीशुभ्र जमीन पहिली की असं वाटतं की चंद्रच जमिनीवर उतरला आहे. आयुष्यात एकदा तरी कच्छला भेट द्यायलाच हवी. 

अमिताभ बच्चन यांच्याच शब्दात सांगायचं झालं तर, ‘आपने कच्छ नही देखा तो कुछ नही देखा! कुछ दिन तो गुजारो गुजरात में!’

कसे जाल? - पुणे/मुंबई-अहमदाबाद-विरंगाम-झैनाबाद

भेट देण्यासाठी उत्तम कालावधी - ऑक्टोबर ते मार्च

काय पाहू शकाल? 
सस्तन प्राणी - चिंकारा, रानगाढव, कोल्हा, लांंडगा, तरस.
पक्षी - सुमारे २१० हून अधिक प्रजातींचे पक्षी : मॅक्विन बस्टर्ड, ग्रेटर हूपी लार्क, आखूडकानी घुबड, फ्लेमिंगो, हंस, बदक, हुदहुद, सारस,  गरुड, ससाणा.
सरपटणारे प्राणी - सुमारे २० प्रजात : कासव, सरडा, पाल, सापसुरळी, धामण, सापांचे विविध प्रकार.

(सदराचे लेखक वनपर्यटक आणि ‘महाराष्ट्र राज्य वन्यजीव सल्लागार मंडळा’चे सदस्य आहेत.)

(शब्दांकन : ओंकार बापट)

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com