कान्हा : संवर्धनाची नवी ओळख

अनुज खरे informanuj@gmail.com
Sunday, 7 February 2021

रानभूल
सन १९७३ मध्ये व्याघ्रसंरक्षणासाठी ज्या नऊ जंगलांना सर्वप्रथम व्याघ्रप्रकल्पाचा दर्जा देण्यात आला, त्यापैकी एक म्हणजे मध्य प्रदेशातला ‘कान्हा व्याघ्रप्रकल्प’ होय. मंडला आणि बालाघाट या दोन जिल्ह्यांत पसरलेल्या या सुंदर व्याघ्रप्रकल्पात प्रशासनानं वाघांबरोबरच इतरही काही वन्यजीवांच्या संरक्षणासाठी केलेल्या प्रयत्नांनी इतर जंगलांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे असं म्हटल्यास वावगं नाही.

सन १९७३ मध्ये व्याघ्रसंरक्षणासाठी ज्या नऊ जंगलांना सर्वप्रथम व्याघ्रप्रकल्पाचा दर्जा देण्यात आला, त्यापैकी एक म्हणजे मध्य प्रदेशातला ‘कान्हा व्याघ्रप्रकल्प’ होय. मंडला आणि बालाघाट या दोन जिल्ह्यांत पसरलेल्या या सुंदर व्याघ्रप्रकल्पात प्रशासनानं वाघांबरोबरच इतरही काही वन्यजीवांच्या संरक्षणासाठी केलेल्या प्रयत्नांनी इतर जंगलांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे असं म्हटल्यास वावगं नाही. ता. एक जून १९५५ रोजी राष्ट्रीय उद्यान म्हणून मान्यता मिळालेला हा व्याघ्रप्रकल्प प्रामुख्यानं ‘हलून’ आणि ‘बंजर’ या भागांमध्ये विभागलेला आहे. मैकल पर्वतरांगांमध्ये उगमस्थान असणाऱ्या या दोन्ही नद्या नर्मदा नदीच्या उपनद्या असून जंगलातल्या सर्व जीवांची तहान भागवतात.

उष्ण कटिबंधीय शुष्क पानगळी जंगलप्रकारात मोडणाऱ्या या जंगलात साल या वृक्षांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. साल या वृक्षाबरोबर इतर झाडांचीही मोठ्या प्रमाणावरची संख्या, उंच-सखल प्रदेश, नद्या, बांबूचं प्राबल्य, सुंदर तळी आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर असलेली गवताळ कुरणं...असं सगळं वातावरण म्हणजे वन्यजीवांसाठी पूरकच परिस्थिती. जवळपास नष्ट होण्याच्या मार्गावर असताना योग्य नियोजन आणि संरक्षणासाठी केलेले अथक् प्रयत्न यांमुळे बाराशिंगा/बाराशिंग्या हे सारंगवर्गातलं वैशिष्ट्यपूर्ण हरीण कान्हामध्ये पाहायला मिळतं. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कान्हामध्ये सन १९७० मध्ये बाराशिंग्यांची संख्या केवळ ६६ होती; पण वन्यजीव संरक्षण कायद्याची निर्मिती आणि कान्हामध्ये संवर्धनासाठी झालेले विशेष प्रयत्न यांमुळे आज ही संख्या ८०० च्याही पुढं गेली आहे.

जगभरात वन्यजीवांच्या संरक्षणासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांपैकी यशस्वी झालेल्या काही मोजक्या प्रयत्नांत कान्हामधल्या या प्रयत्नांचा समावेश होतो. बाराशिंगा हा मध्य प्रदेशचा राज्यप्राणीही आहे. महाराष्ट्रातही विदर्भात पूर्वी हा प्राणी मोठ्या प्रमाणावर आढळून येत असे; पण मोठ्या प्रमाणावर झालेल्या शिकारीमुळे हा प्राणी महाराष्ट्रातून नष्ट झाला. बाराशिंगा हे तसं मोठं हरीण आहे. याची खांद्यापर्यंत उंची सव्वा ते दीड मीटरपर्यंत भरते व मोठ्या नराचं वजन दीडशे किलोंपेक्षाही जास्त भरू शकतं. याच्या शिंगांचा आकर्षक डोलारा ७५ सेंटिमीटरपर्यंत असतो. वीणीचा हंगाम सप्टेंबर ते एप्रिलपर्यंत असतो. इतरवर्गीय बहुतेक हरिणांप्रमाणेच बाराशिंग्याची मादीही एका वेळी एकाच पिल्लाला जन्म देते. नर व माद्या हे कळप करून राहतात. एका कळपात आठ ते २० हरणं असतात. एकटे नर तसे कमी असतात. नराला दरवर्षी नव्यानं शिंगं येतात आणि गळून पडतात.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

डाव्या बाजूच्या शिंगांना आणि उजव्या बाजूच्या शिंगांना मिळून एकंदरीत १२ किंवा त्यापेक्षा जास्त असलेल्या फाट्यांमुळे या प्राण्याला बाराशिंगा असं नाव पडलं आहे. भारत आणि नेपाळमध्ये या हरणांच्या तीन उपजाती आढळून येतात. पैकी कान्हा व्याघ्रप्रकल्पात आढळून येणारी उपजात भारतात केवळ कान्हा या जंगलातच आढळून येते. दुधवा व्याघ्रप्रकल्प आणि काझीरंगा व्याघ्रप्रकल्प या जंगलांत इतर दोन उपजाती आढळून येतात. आज कान्हामधून सातपुड्यासारख्या मध्य प्रदेशातल्या इतर जंगलांत बाराशिंगा नेले जात आहेत आणि त्या जंगलांतही त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न केले जात आहेत. याशिवाय कान्हामध्ये काळवीट या कुरंगवर्गातल्या हरणांच्या संवर्धनासाठीही विशेष प्रयत्न करण्यात आले. 

गव्यांची मोठ्या प्रमाणावर असलेली संख्या हे कान्हाचं आणखी एक वैशिष्ट्य. या तृणभक्षक वन्यप्राण्यांमुळे कान्हामध्ये असलेल्या गवताळ कुरणांचं आणि वृक्षसंपदेचं महत्त्व अधोरेखित होतं. मध्य प्रदेशातल्या बांधवगड व्याघ्रप्रकल्पातून गव्यांनी अनेक वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणात स्थलांतर केल्यामुळे तिथं गवे शिल्लक राहिले नाहीत, त्यामुळे कान्हामधून काही वर्षांपूर्वी ५० गवे बांधवगड इथं नेण्यात आले आणि त्यांच्या संवर्धनाचे प्रयत्न करण्यात आले. आज बांधवगडमध्ये गव्यांची जी वाढलेली संख्या दिसते, तिच्यात कान्हाचा अशा प्रकारे मोठा वाटा आहे. एकंदर अनेक वन्यजीवांच्या संरक्षणासाठी केलेल्या विशेष प्रयत्नांमुळे कान्हाचं नाव वन्यजीवसंवर्धन या विषयात प्रामुख्यानं घ्यावं लागेल.

पूर्वी अनेक कारणांमुळे मोठ्या प्रमाणावर झालेल्या शिकारीमुळे इथली वाघांची संख्या कमी झाली होती. मात्र, व्याघ्रप्रकल्पाचा दर्जा आणि वन्यजीव संरक्षण कायद्याची निर्मिती यामुळे वाघांना संरक्षण मिळालं आणि हळूहळू वाघांची संख्या वाढू लागली. आज सुमारे १०० पेक्षा जास्त वाघ कान्हामध्ये आहेत. व्याघ्रप्रकल्प होण्यापूर्वी या जंगलात बैगा जमातीचे अनेक लोक वास्तव्याला होते. इथं खेड्यांना ‘टोला’ असं म्हटलं जातं. व्याघ्रप्रकल्पाच्या निर्मितीनंतर जंगलाच्या आतल्या गावांचं पुनर्वसन जंगलाबाहेर करण्यात आलं. आजही हे लोक त्यांची संस्कृती टिकवून आहेत. या लोकांचं वैशिष्ट्यपूर्ण असं ‘बैगानृत्य’ हे अनेक पर्यटकांचा आकर्षणबिंदू असल्यामुळे त्याद्वारे या लोकांमध्ये रोजगारनिर्मितीसाठी वनविभागानं विशेष प्रयत्न केले आहेत.

जंगलात असलेली खेडी जंगलाबाहेर गेल्यावर व्याघ्रप्रकल्पात मोठ्या प्रमाणावर गवताळ प्रदेश निर्माण झाले आहेत. काही पठारांवर तर सुमारे १० ते १२ चौरस किलोमीटरचे सपाट गवताळ प्रदेश आहेत. या प्रदेशांना ‘दादर’ असं म्हणतात. ‘बमनी दादर’ हा यांपैकीच एक प्रसिद्ध भाग. हा भाग इतका मोठा आहे की सन १९७६ पर्यंत या भागाचा उपयोग विमानाचा रन-वे म्हणून केला जाई. सुमारे ९१७.४३ चौरस किलोमीटरचा कोअर-भाग आणि सुमारे ११३४.३६ चौरस किलोमीटरचा बफर-भाग मिळून सुमारे २०५१.७९ चौरस किलोमीटर एवढ्या मोठ्या भागात पसरलेल्या या जंगलानं गेली अनेक वर्षं मला वेड लावलं आहे. इथले वाघ, मोठ्या प्रमाणावर असलेली गवताळ कुरणं, श्रवणतालसारखी असंख्य छोटी-मोठी तळी, इथलं पक्षीवैभव, आपल्या डौलदार श्रृंगसंभारानं आकर्षित करणारे बाराशिंगे, उंच-सखल पठारं, त्यांवर तयार झालेल्या मोठमोठ्या दगडांच्या रचना, मुक्कीमधले भूलभुलैया वाटणारे रस्ते, नकटी घाटीसारखे घाटरस्ते यांमुळे कान्हाला भेट देणारा माणूस  या जंगलाच्या प्रेमात आपोआपच पडतो आणि निसर्गाशी त्याचं घट्ट नातं तयार होतं.

कसे जाल?
पुणे/मुंबई-जबलपूर-कान्हा किंवा पुणे/मुंबई-नागपूर-कान्हा
भेट देण्यासाठी उत्तम कालावधी : ऑक्टोबर ते मे

काय पाहू शकाल? 
सस्तन प्राणी :
वाघ, बिबट्या, अस्वल, उडणारी खार, बाराशिंगा, सांबर, चितळ, काळवीट, गवा, मुंगूस, वानर, लालतोंडी माकडं, रानकुत्रे, नीलगाय.
पक्षी : तुरेबाज व्याध, शिक्रा, मोहोळघार, कापशी घार यांसारखे शिकारी पक्षी, मत्स्यघुबड, कंठेरी शिंगळा घुबड (इंडियन स्कॉप्स आउल), गव्हाणी घुबड, ठिपकेदार पिंगळा, मोर, राखी धनेश, छोटा क्षत्रबलाक, कोतवाल, स्वर्गीय नर्तक.
सरपटणारे प्राणी : मगर, कासव, पाल, गेको, सरडा, घोरपड, धामण, कवड्या, गवत्या, पाणदिवड, नानेटी, मांजऱ्या, नाग, फुरसे, मण्यार, घोणस.
वृक्ष : साल, साजा, करू, ऐन, तेंदू, सालई, मोवई, चार, जांभूळ, पिंपळ, उंबर, अर्जुन, धावडा, रोहन, धामन, बहावा, शाल्मली.

(सदराचे लेखक वनपर्यटक आणि ‘महाराष्ट्र राज्य वन्यजीव सल्लागार मंडळा’चे सदस्य आहेत.)
(शब्दांकन : ओंकार बापट)

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anuj Khare Writes about kanha tiger project Promotion