कृत्रिम बुद्धिमत्तेची गर्भश्रीमंती!

२०२३ मध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे दूरदृष्टी आणि योग्य गुंतवणुकीच्या बळावर सधन व्यक्ती अधिक गर्भश्रीमंत झाल्या.
artificial intelligence
artificial intelligencesakal

- मालिनी नायर

२०२३ मध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे दूरदृष्टी आणि योग्य गुंतवणुकीच्या बळावर सधन व्यक्ती अधिक गर्भश्रीमंत झाल्या. एआय क्रांतीमुळे कृत्रिम बुद्धिमत्तायुक्त वातावरणात राहण्यासाठी कामगारांच्या पुढच्या पिढीला एआयचे बोट धरूनच चालावे लागणार आहे.

२०२३ मध्ये स्टॉक मार्केटमध्ये सर्वाधिक चर्चिला गेलेला मुद्दा होता, कृत्रिम बुद्धिमत्तेचा. अर्थात ‘एआय’चा. त्या काळात आपली दूरदृष्टी आणि योग्य गुंतवणुकीच्या बळावर सधन व्यक्ती अधिक पैसेवाल्या झाल्या. २०२३ मध्ये श्रीमंत व्यक्तींच्या एकूण संपत्तीत १५० बिलियन डॉलरपेक्षा जास्त वाढ झाल्याचा अंदाज ‘इनसायडर’ने व्यक्त केला आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता बाजारात येण्याच्या पार्श्वभूमीवर मोठ्या गुंतवणूकदारांनी शेअर्स खरेदी करण्यावर भर दिला. एआय क्रांतीमुळे ‘मेटा’ आणि ‘नविदिया’ (Nvidia) कंपन्यांना तीन अंकी नफा झाला. ओरॅकल, मायक्रोसॉफ्ट आणि अल्फाबेट (‘गुगल’ची पालक कंपनी) यांनाही चांगलाच फायदा झाला. त्यामुळे त्या कंपन्यांच्या संस्थापकांच्या संपत्तीत भर पडली. २०२३ च्या सुरुवातीला जगातील श्रीमंत व्यक्तींमध्ये ते गणले गेले.

एआयचा उदय आणि मार्क झुकेरबर्ग यांच्या खर्चात कपात करण्याच्या ‘इयर ऑफ इफिशियन्सी’ धोरणामुळे ‘मेटा’चे शेअर्स आजपर्यंत १३४ टक्क्यांनी वाढले. त्यामुळे झुकेरबर्ग यांची संपत्ती जवळपास ५७ बिलियन डॉलरने वाढली, असे ‘ब्लुमबर्ग इंडेक्स’मध्ये नमूद करण्यात आले आहे. त्याच काळात ‘ओरॅकल’चा टेक स्टॉक ५५ टक्क्यांनी वाढला. त्यामुळे लॅरी एलिसन यांची संपत्ती ४७ बिलियन डॉलरने वाढली आणि ते पहिल्यांदाच बिल गेट्स यांच्या पुढे गेले. गेट्स यांची संपत्तीही २४ बिलियन डॉलरने वाढली.

रेडमंडस्थित मायक्रोसॉफ्टमध्ये गुंतवणूक करण्यास स्टॅनली ड्रकनमिलर यांच्यासारख्या अब्जाधीशाने पसंती दिली. त्याचप्रमाणे नविदिया कंपनीचे संस्थापक जेन्सन हुआंग यांची संपत्तीही २४ बिलियन डॉलरने वाढली. चीपची निर्मिती कंपन्यांचे बाजार भांडवल एक ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचले. हुआंग यांच्या शेअर्सचे मूल्य १९२ टक्के वाढण्यासाठी ती गोष्ट कारणीभूत ठरली.

नविदिया कंपनीच्या विस्तारामध्ये संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) जेन्सन हुआंग यांनी निर्णायक भूमिका निभावली. कृत्रिम बुद्धिमत्तेशी निगडित उत्पादनाच्या वाढत्या मागणीमुळे नविदिया कंपनीचे बाजारमूल्य गगनाला भिडले. कंपनीचे बाजारमूल्य अभूतपूर्वरीत्या दोन ट्रिलियन अमेरिकन डॉलरपर्यंत पोहोचले. ते जवळपास कॅनडाच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेइतके आहे.

त्यामुळे नविदियाने मायक्रोसॉफ्ट आणि ‘अॅपल’सारख्या महाकाय कंपन्यांनाही मागे टाकले. कंपनीच्या सेमीकंडक्टर आणि चीपसाठीची मागणी आकाशाला गवसणी घालत होती. पीसीसाठी ग्राफिक कार्ड बनवण्याचे आणि ‘निन्तेन्दो स्विच’सारखे इतर गेमिंग कन्सोल बनवल्यानंतर नविदिया पहिल्यांदा प्रकाशझोतात आली.

नविदियाच्या ग्राफिक हार्डवेअरसोबत एआय आणि मशीन लर्निंग अल्गोरिदमचा चांगला मेळ बसतो, असे संशोधकांना आढळून आले. त्या प्रोसेसरमुळे नविदिया कृत्रिम बुद्धिमतेच्या क्षेत्रात दाखल झाली. आज जनरेटिव्ह एआयचा ती एक महत्त्वाचा घटक आहे. ज्या ग्राफिक चीप्स भूतकाळात नविदियाच्या मुख्य आधार होत्या, त्या आज एआय अल्गोरिदम चालवण्यासाठी महत्त्वाच्या ठरत होत्या.

परिणामी, जगभरातील एआय प्रणाली या कंपनीच्या वस्तूंवर अवलंबून झाल्या. हुआंग असे म्हणतात, की नविदियाच्या एआय संसाधनांचा वापर भविष्यात जगातील प्रत्येक कंपन्यांकडून केला जाईल. फक्त कृत्रिम बुद्धिमतेच्या बाबतीतच बोलायचे झाले, तर नविदिया सर्व प्रकारच्या स्पर्धेच्या वर पोहोचली आहे.

एका गेमिंग केंद्रित कंपनीपासून एआय विकसक महाकंपनी होण्यापर्यंतचा प्रवास नविदियाने जेन्सन हुआंग यांच्या नेतृत्वाखाली केला आहे, हाच याचा पुरावा आहे. कृत्रिम बुद्धिमतेचा विचार केला, तर या कंपनीचे सेमीकंडक्टर्स आणि प्रोसेसर्स अतिशय महत्त्वाचे बनले आहेत.

एआयमुळे ज्यांच्या संपत्तीत वाढ झाली आहे, असे दुसरे उद्योगपती आहेत एलन मस्क. माणसाचा मेंदू संगणकाला जोडण्यासाठी ‘न्यूरॉलिंक’ ही त्यांची कंपनी ब्रेन कॉम्प्युटर इंटरफेसवर (बीसीआय) सध्या काम करत आहे. प्रत्यारोपित करता येऊ शकणारी वायरलेस चीप त्यांनी तयार केली आहे. उघड्या डोळ्यांनी न दिसणाऱ्या चीपचा वापर करत वापरकर्ते संगणक किंवा मोबाईल नियंत्रित करू शकतील.

अनेक प्रकारच्या न्यूरॉलॉजिकल विकारांचा मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. या प्रकारच्या समस्यांचे निराकरण करणे हे ‘न्यूरॉलिंक’चे उद्दिष्ट आहे. उदाहरणार्थ, पक्षाघात झाल्यानंतर रुग्णाच्या हालचालींवर निर्बंध येतात. अशा वेळी मेंदूच्या सिग्नलचे रूपांतर कृत्रिम हाता-पायांना दिल्या जाणाऱ्या सूचनांमध्ये करण्याची क्षमता या चीपमध्ये असेल.

‘अॅव्हेंजर’ चित्रपटात टोनी स्टार्क त्याच्या पक्षाघात झालेल्या मशीनला पुन्हा चालवण्यासाठी कुठले तंत्रज्ञान वापरतो, हे तुम्हाला आठवत असेल. थोडक्यात सांगायचे झाले, तर एलन मस्क यांचा हेतू हाच आहे. त्यापुढे जात बीसीआय मानवी संवाद, स्मरणशक्ती आणि आकलनशक्ती वाढवण्यात मदत करू शकणार आहे. ‘न्यूरॉलिंक’चा प्रकल्प यशस्वी झाला, तर अपंगांसाठी सुविधा, आरोग्य आणि मानव-संगणक संवादात मोठी क्रांती घडू शकते. त्यामुळे असे दिसते, की एआय ही केवळ भविष्यात घडणारी गोष्ट नाही, तर ती आपला वर्तमानकाळ आहे.

‘आयडीसी’च्या अंदाजानुसार कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील २०२२ मधील गुंतवणूक ४३२ बिलियन डॉलर होती. ती त्याआधीच्या वर्षाच्या १९.६ टक्के जास्त होती. २०२३ मध्ये ती ५०० बिलियनच्या पुढे गेली. २०२१ च्या पहिल्या सहामाहीत कृत्रिम बुद्धिमत्ता सेवेवरील खर्च १८.४ बिलियन डॉलर होता. वर्षामागून वर्षे जात असताना त्यात २०.४ टक्के वाढ झाली. त्यापुढे ही वाढ २२ टक्के असेल, असे ‘आयडीसी’च्या अहवालात सांगण्यात आले आहे.

जनरेटिव्ह एआय तंत्रज्ञानामध्ये (चॅटजीपीटी, बिंग इत्यादी) मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. एआय साधने येऊन काही दिवसच झाले आहेत; पण सध्या प्रत्येक तिसरी कंपनी आपण जनरेटिव्ह एआयचा वापर करत असल्याचे सांगत आहे.

एका सर्वेक्षणात एक चतुर्थांश अधिकाऱ्यांनी सांगितले, की ते कामासाठी जेन एआय साधनांचा वापर करतात. २५ टक्क्यांपेक्षा जास्त एआय वापरणाऱ्या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की त्यांच्या संचालक मंडळात त्यावर आधीच चर्चा झालेली आहे.

त्या सर्वेक्षणात ४० टक्के लोकांनी सांगितले, की त्यांची कंपनी एआयमध्ये गुंतवणूक वाढवण्याचा विचार करत आहे. पन्नास टक्क्यांपेक्षा कमी जणांनी सांगितले, की चूक होण्याची जोखीम कमी करण्याचा प्रयत्न ते करत आहेत. त्यावरून असे दिसून येते, की एआयसंबंधित जोखमीचे व्यवस्थापन हे पहिल्या टप्प्यातच आहे.

एआयच्या वाढत्या प्रभावामुळे श्रमशक्तीमध्ये बरेच बदल होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. आपल्या कामगारांना पुनर्प्रशिक्षित करण्याची आणि कामगार कपात करण्याची योजना कंपन्या आखत आहेत. बाल्यावस्थेत असूनही एआयचा वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. हे आता स्पष्ट झाले आहे, की एआयने व्यावसायिकांना आकर्षित केले आहे.

सर्व वयोगट, पार्श्वभूमी आणि सर्व स्तरातील लोक आता त्यांच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक कारणांसाठी एआयचा वापर करू लागले आहेत. जवळपास तीन चतुर्थांश लोकांचा कामामुळे किंवा इतर कारणांमुळे एआयशी संबंध आला आहे. एक चतुर्थांश व्यक्ती दररोज एआयचा वापर करतात. जे उत्तर अमेरिकेत राहतात आणि टेक इंडस्ट्रीत आहेत, ते एआयचा सर्वाधिक वापर करतात.

जेन एआयचा वापर सध्या अनेक संस्था मोठ्या प्रमाणात करत आहेत. ज्यांनी एआयच्या वापरास सुरुवात केली आहे. त्यांपैकी साठ टक्के कंपन्या जनरेटिव्ह एआय वापरतात. या सर्व्हेतील एक तृतीयांश प्रतिसादकर्त्यांनी सांगितले की, त्यांची संस्था किमान एका कामासाठी तरी एआयचा वापर करत आहे. ४० टक्के कंपन्या सांगतात, की त्या एआयचा वापर वाढवण्यास इच्छुक आहेत.

२८ टक्के कंपन्यांनी त्यासंबंधी कंपनीअंतर्गत चर्चा केली आहे. सध्या त्या साधनांचा वापर विक्री व विपणन, उत्पादन आणि सेवा अन् इतर सेवांसाठी (ग्राहक सेवा, कार्यालय अंतर्गत काम) केला जातो. त्यावरून असे दिसते, की ज्या क्षेत्रात जास्त गरजेचे आहे तिथे कंपन्या एआयचा वापर करत आहेत.

त्या तीन कार्यक्षेत्रांशिवाय सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग क्षेत्रामध्येही जनरेटिव्ह एआय अॅप्लिकेशनच्या सहाय्याने वार्षिक मूल्याच्या ७५ टक्क्यांच्या आसपास उत्पादन करण्याची क्षमता आहे. भारतात कृत्रिम बुद्धिमत्तेत क्रांती होण्याची अफाट क्षमता आहे. एआयमध्ये गुंतवणूक करण्याची भारताची क्षमता ३०.८ टक्के सीएजीआरपर्यंत (Compound Annual Growth Rate) वाढली आहे. २०२३ मध्ये ती ८८१ मिलियन डॉलरपर्यंत जाण्याची अपेक्षा होती.

‘स्टॅटिस्टा’ संकेतस्थळावरील जानेवारीतील अहवालानुसार कृत्रिम बुद्धिमत्तेच्या बाजाराचा आकार भारतात २०२३ पर्यंत ४.१ बिलियन अमेरिकन डॉलरपर्यंत पोहोचला आहे. त्यात मशीन लर्निंगचा वाटा सर्वाधिक म्हणजे २.७ बिलियन डॉलरपर्यंत आहे. कृत्रिम बुद्धिमतेमुळे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आमूलाग्र बदल घडून येत आहेत. प्रक्रिया सोपी आणि स्वयंचलित झाल्याने उत्पादकता सुधारत आहे. ‘इंडस्ट्री ४.०’चा हा एक अविभाज्य आणि मूलभूत भाग आहे.

माहिती आणि तंत्रज्ञान (आयटी) हा भारतातील प्रचंड मोठा उद्योग आहे. त्यात माहिती तंत्रज्ञान सेवा, सल्लामसलत सेवा आणि आऊटसोर्सिंगचा समावेश होतो. भारत आयटी आऊटसोर्सिंगसाठी प्रसिद्ध आहे. शासकीय आणि परकीय गुंतवणुकीच्या साह्याने आयटी क्षेत्र एआय आणि आयओटी (इंटरनेट ऑफ थिंग्ज) यांच्याशी संबंधित तंत्रज्ञानाचा विकास करत आहे.

थोडक्यात काय, तर आता एआय आपला पिच्छा सोडणार नाही. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तायुक्त वातावरणात राहण्यासाठी कामगारांच्या पुढच्या पिढीला एआयचे बोट धरूनच चालावे लागणार आहे. काळासोबत चालण्यासाठी आजच्या काळातील कामगारांनाही एआय संबंधित कौशल्यांचा विकास करण्याची गरज आहे. गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोनातून कृत्रिम बुद्धिमत्ता हे महत्त्वाचे क्षेत्र आहे.

त्या क्षेत्राची प्रगती आणि क्षमता बघता नजीकच्या काळात गुंतवणूकदारांना आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. व्यक्तिशः बोलायचे झाले, तर नेदरलँडने आपले स्वयंचलित एआय वाहन बनवण्याची मी आतुरतेने वाट पाहत आहे. जेणेकरून माझे संशोधन करता करता मी आरामात प्रवास करू शकेन!

nairmalini2013@gmail.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com