Asha Bhosle Birthday : बहिणीचे प्रेम व आईचे आशीर्वाद

आशाताई आणि लतादीदी या दोघींनी भारतीय संगीताला समृद्ध केले आहे. आशाताईंनी प्रत्येक प्रकारची गाणी गायली आहेत.
asha bhosle 90th birthday wish by suresh wadkar lata didi music singers india
asha bhosle 90th birthday wish by suresh wadkar lata didi music singers indiaesakal

- सुरेश वाडकर, प्रसिद्ध गायक

आशाताईंचा मोठा गुण म्हणजे त्या खूप मोकळ्या मनाच्या असल्यामुळे त्यांना जे चांगले वाटते त्याचे त्या कौतुक करतील; पण काही चुकत असेल तर त्या रागावतील. समजावून सांगतील.

आशाताई आणि लतादीदी या दोघींनी भारतीय संगीताला समृद्ध केले आहे. आशाताईंनी प्रत्येक प्रकारची गाणी गायली आहेत. नाट्यसंगीत, शास्त्रीय संगीत, चित्रपटसंगीत अशा अनेक प्रकारची गाणी आजपर्यंत गायली आहेत.

वयाच्या ९० वर्षापर्यंत संगीत क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या आशाताई हे एक आदर्श उदाहरण आहे. आशाताईंनी त्यांचे संपूर्ण आयुष्य संगीतासाठी अर्पण केले. संगीत हा त्यांचा श्वास असावा, असे त्या गातात. त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी दुबईला एक मोठा समारंभ होत आहे, यातूनच त्यांनी भारतीय संगीत किती समृद्ध केले हे समजते.

आशाताईंनी प्रत्येक ‘स्टाइल’चे गाणे गायले आहे. त्यांनी कॅब्रे गायले, दुःख मांडणारे, सुखाचे वर्णन करणारे गाणे गायले आहे. देशभक्तिपर गीते गायली आहेत, गझला व भजनेही म्हटली आहेत. गाण्याचा असा एकही प्रकार नाही की तो आशाताईंनी गायला नाही.

त्यांची गाण्याची पद्धत आणि आवाज वेगळा आहे. त्यांच्या गाण्याची पट्टीदेखील वेगळी होती. असे बहुरूपी गाणे ऐकायला मिळणे कठीण आहे. त्यामुळे त्यांची ‘स्टाइल’ ही नेहमीच लोकांच्या हृदयात राहणारी आणि आठवणीत रुजणारी आहे. त्यांनी सर्व प्रकारची गाणी अगदी यशस्वीरीत्या गायली आहेत आणि ती अतिशय लोकप्रिय झाली आहेत.

आशाताईंबरोबरील एक किस्सा मला आठवतो. माझे आशाताईंसोबतच पहिलेच गाणे होते आणि मला ते गाणं देखील त्यांच्यामुळेच मिळाले होते. ‘धाकटी मेहुणी’, असे त्या मराठी चित्रपटाचे नाव होते. त्यावेळी माझे वय २२ वर्षांचे असेल.

मी जेव्हा ते गाणे गायला गेलो, तेव्हा आशाताई मला म्हणाल्या ‘‘सुरेश एक काम कर.. हे गाणे बाबूजींच्या म्हणजेच फडके साहेबांच्या ‘स्टाइल’चे आहे. तर तू त्यांच्यासारखे गाण्याचा प्रयत्न कर.’’ त्यानंतर त्यांनी माझा कागद हातात घेतला आणि मला ते गाणे गाऊन दाखवले. तेव्हा मला त्यांच्याकडे बघताना असे वाटत होते की सुधीर फडके समोर गात आहेत. इतके ते गाणे त्या मनापासून आणि बाबूजींची गाण्याची पद्धत आत्मसात करून गात होत्या.

दीदींच्या मनातील गैरसमज दूर

माझे जे काही या संगीत क्षेत्रातील आयुष्य आहे, या आयुष्यामागे लतादीदी आणि आशाताई या दोन बहिणींचा खूप मोठा हात आहे. आशाताईंची आणखी एक गोष्ट मी कधीच विसरणार नाही. तो एक किस्सा असा आहे की, लतादीदींना माझ्याबद्दल एक गैरसमज झाला होता. त्यामुळे माझ्याबरोबर त्या आठ-दहा वर्षे गात नव्हत्या.

त्या दरम्यान आशाताई माझ्या स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंगला आल्या होत्या. तेव्हा त्या मला म्हणाल्या, की अरे तू काय केलेस... काय झालं तुझं आणि दीदीच, दीदी तुझ्याबद्दल चांगले बोलत नाही. रागावली आहे दीदी तुझ्यावर.

मी म्हटले, ‘‘असे काही मी केलेले नाही.’’ तेव्हा त्यांनी मला स्वतःच्या गाडीतून लतादीदींकडे पाठवले आणि म्हणाल्या, ‘‘जा आधी.. काय गैरसमज आहे तो मिटवून ये.’’ मग मी गेलो. दीदींना भेटलो, गैरसमज दूर केला.

यातून मला हेच सांगायचे आहे की आशाताई नेहमी माझ्यापाठी एका मोठ्या बहिणीसारख्या उभ्या राहिल्या आहेत. आपुलकी, प्रेम त्यांनी भरभरून दिले. भावापेक्षा जास्त त्या मला त्यांच्या मुलाप्रमाणे मानत असल्यामुळे,दीदी माझ्यावर रागावली आहे, या गोष्टीचे त्यांना वाईट वाटले होते. आमच्यातला हा गैरसमज दूर व्हावा म्हणून त्यांनी पुढाकार घेतला हे मी कधीच विसरू शकणार नाही. हे त्यांचं प्रेम आणि आशीर्वाद माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.

आशाताईंचा सर्वांत मोठा गुण म्हणजे त्या खूप मोकळ्या मनाच्या असल्यामुळे त्यांना जे चांगले वाटते त्याचे त्या कौतुक करतील; पण काही चुकत असेल तर त्या रागावतील. समजावून सांगतील. हा फार मोठा गुण आशाताईंमध्ये आहे.

त्या गोष्टी बोलून टाकतात. मनात काहीही ठेवत नाहीत. चुकत असेल तर लगेच बोलून दाखवतात. त्यांचे गाणे देखील तसेच मोकळे आहे. त्या त्यांच्या स्वभावाच्या मालकीण आहेत. त्यामुळे त्यांचे गाणे तेवढंच निर्मळ, चांगले आणि मनाला भावणारे आहे.

त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी मी परमेश्वराचरणी हीच प्रार्थना करीन की त्या निरोगी राहाव्यात, नेहमी हसत खेळत राहाव्यात आणि अशाच गात राहाव्यात. त्यांनी आम्हाला आणखी चांगली चांगली गाणी द्यावीत आणि त्यांचे पुढील आयुष्य सुखी व समाधानात जावे, याच शुभेच्छा. आशाताई तुमचं आमच्यावरचे प्रेम नेहमी असेच राहू दे हीच इच्छा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com