''राजं, बघताय नव्हं काय चाललंय ते''

आशिष नारायण कदम
Tuesday, 26 November 2019

महाराज, अहो कैक मावळ्यांनी स्वराज्य उभं करण्यासाठी आपल्या जीवाची फिकीर केली नाही, एक एक गड-किल्ला मिळवण्यासाठी स्वतः मृत्यूशी दोन हात केले.

प्रति,
राजमान्य राजेश्री छत्रपती शिवाजी महाराज

मुजरा राजं,

लई दिस झालं थोडं बोलीन म्हणतो तुम्हांसनी, पर काय बोलावं न काय न्हाई ते कळणा झालंय बघा. पर आज बोलूनच टाकतो.

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आज महिना उलटला, पण राज्यात अजून स्थिर सरकार स्थापन झालं नाही. या साऱ्या राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणूक तुमच्या नावाचा उदो उदो करून लढवली, महाजनादेश यात्रा, जन आशीर्वाद यात्रा, शिवस्वराज्य यात्रा अशी भली-थोरली नावं त्यांच्या प्रचार यात्रांना दिली. राज्यात पुन्हा एकदा स्वराज्य आणण्यासाठी आम्हाला मत द्या, अशी भीक मागत निवडणुका लढवल्या. पण आपण या प्रचारावेळी जनतेला काय शब्द दिला होता, याचा त्यांना निवडणुकीनंतर विसर पडला बहुतेक. 

- भाजपचं ठरलं! ...तरच विश्‍वासदर्शक ठराव मांडणार

कारण काहीही असो, आपली काही चूक झाली की, ती झाकून टाकण्यासाठी नेत्यांना तुमची आठवण होते महाराज. 'छत्रपतींचा आशीर्वाद, जनतेचं सरकार' हे शब्द सोयीनुसार वापरले जातात हल्ली. तुमच्या पुतळ्याला हार घातला, 'शिवाजी महाराज की जय' अशा घोषणा दिल्या, की आपलं काम झालं यातच धन्यता मानतात हे सगळे नेते. 

''शिवरायांचे आठवावे रूप। शिवरायांचा आठवावा प्रताप।।'' हे आम्ही चौथीच्या पुस्तकात वाचलं होतं राजं, पण या सरकारनी तो इतिहासच अभ्यासक्रमातून काढून टाकण्याची हिंमत केलीय. आता इथून पुढची पिढी काय अन कुठला इतिहास वाचणार ते आई जगदंबेलाच ठावं. आम्हाला तुमचं रूप फक्त जाहीर सभेच्या ठिकाणी स्टेजवरच दिसतं. तुमच्या प्रतिमा आणि पुतळा या समारंभाला शोभा यावी, यासाठीच ठेवल्या जातात सर्वत्र. ना तुम्ही केलेला कोणता पराक्रम आम्हाला आठवायचायं, ना आम्हाला पुन्हा तसा कोणता प्रताप घडवायचायं. 

महाराज, अहो कैक मावळ्यांनी स्वराज्य उभं करण्यासाठी आपल्या जीवाची फिकीर केली नाही, एक एक गड-किल्ला मिळवण्यासाठी स्वतः मृत्यूशी दोन हात केले. आणि ते किल्ले आता लग्न कार्यासाठी अन हॉटेल म्हणून वापरण्याचा फतवा या सरकारने काढलाय. राजं, अहो तुम्ही नाच-गाण्याच्या कार्यक्रमाला जाणं कधी पसंत केलं नाही, पण तुमच्याच या किल्ल्यावर उद्या लग्न व्हायला लागल्यावर नाच-गाण्याच्या मैफिली रंगतील. 350 वर्षांनंतर तुमच्या गडकोटांची झालेली पडझड रोखून त्यांना पहिल्यासारखं रुपडं द्यायचं सोडून राज्यकर्त्यांना पुतळे आणि स्मारकं उभारण्यातच जास्त रस वाटतोय. आणखी एक गोष्ट म्हणजे, 'स्वच्छ भारत अभियाना'चा टेंम्भा मिरवणाऱ्या एखाद्या नेत्यानं तुमच्या कोणत्या किल्ल्यावर जाऊन एक दिवस का होईना, पण स्वच्छता अभियानाची मोहीम राबवल्याचं काही ऐकिवात नाही. 

- महाविकास आघाडीच्या आमदारांना संबोधित करतानाचं शरद पवार यांचं संपूर्ण भाषण

एवढं कमी होतं म्हणून या सरकारनं तुमच्या शेतकरी राजाला पहिल्यांदा नोटबंदीच्या त्यानंतर कर्जमाफीसाठीच्या रांगेत उभं राहायला लावलं. अहो महाराज, गेल्यावर्षीचा दुष्काळ अन् यंदा झालेल्या पावसानं शेतकरी पुरा खचलाय. गेल्या हंगामात त्याच्या हाती जेवढं काही आलं, तेवढं यंदाच्या पावसात वाहून गेलं. शेतकरी संकटात असताना तुम्ही त्याचा शेतसारा माफ केला, पण आता सरकारकडून मदत मिळण्यासाठी आमच्या बापाला शेतीची काम सोडून ऑनलाइन फॉर्म भरावा लागतोय. आणि त्यासाठी 7-8 कागदपत्रं घेऊन दिवसभर रांगेत उभं राहायला लागलं या सरकारमुळं. सरकारला काय जातंय ते हजार कोटी रुपयांची मदत जाहीर करतंय, पण शेतकऱ्यांच्या हातात किती नुकसान भरपाई पडते, याचा कुणी विचारच करत नाही. शेतकरी अस्मानी संकटात सापडला असताना आता त्याला सुलतानी संकटाचा पण सामना करावा लागतोय. आणि हे राज्यकर्ते सत्तेचा मेवा खाण्यातच दंग आहेत. 

तुमचे मावळेही आता, मावळे नाही राहिले राजे, ते पैशापाई बावळे झालेत. सुपारीच्या खांडाचं व्यसन नव्हतं तुम्हांला, पण तुमचे मावळे ढाबा पार्टी, खायला चिकन-मटण अन् प्यायला दारू मिळाली, की कोणताही झेंडा हातात घेऊन फिरायला तयार होतात. तुमची आठवण येते त्यांना जयंती-पुण्यतिथीच्या दिवशी, पण ती तेव्हढ्यापुरतीच. तुमच्यासारखी दाढी वाढवली, कपाळी चंद्रकोर अन् टिळा लावला, गाडीच्या पुढंमागं तुमचं नाव नाहीतर फोटो चिकटवला, की आम्ही शिवभक्त झालो. आम्हाला फक्त तुमच्यासारखं दिसायचंय, तुम्ही सांगितलेले विचार-नियम याच्याशी आम्हांला काही देणंघेणंच राहिलं नाही. 

महाराज, तुम्ही स्वराज्य उभं केलं. त्याचा कारभार कसा करावा, याचे धडे दिले. मात्र, ह्या सरकारचा कारभार किती पारदर्शी आहे, हे महा-पोर्टलच्या वादातून कळालं. देशभरात गाजलेल्या मध्यप्रदेशच्या 'व्यापम' घोटाळ्यात ज्या कंपनीचा सहभाग होता, त्याच कंपनीला परीक्षा घ्यायचं कंत्राट आपल्या राज्य सरकारनं दिलं, तेही केंद्रातील एका बड्या मंत्र्याच्या सांगण्यावरून. आता यात महत्त्वाची गोष्ट ही की, जे विद्यार्थी या परीक्षेला अनुपस्थितीत होते, त्यांचीच नावे गुणवंतांच्या यादीत होती. याहून आणखी किती पारदर्शी कारभार पाहायचा, महाराज. 

- अजितदादांची क्‍लीनचिट की तडजोडींचा 'घोटाळा'

दिल्ली दरबारात एका राजाला शोभेल अशी मनसबदारी मिळाली नाही, म्हणून तुम्ही औरंग्याचा दरबार सोडून निघून गेला होता. पण तुमचा आशीर्वाद घेऊन सत्तेत आलेले नेते दिल्लीकरांना विचारूनच हल्ली सगळे निर्णय घेतात, हा तुमच्या आशीर्वादाचा अपमान तर नाही? महाराज, तुमच्या महाराष्ट्रात फक्त तिघेच निर्धास्त फिरू शकतात, वारा, वाघ आणि मराठे. मराठ्यांनी अटकेपार झेंडा रोवला असतांना आता तुमच्या मावळ्यांना गुजरातचे व्यापारी 'स्वाभिमान' आणि 'राष्ट्रवाद' या गोष्टी शिकवू लागले आहेत, राजं. त्यामुळं खरंच कुठं नेऊन ठेवलाय हा नाही, तर कुठं नेऊन टाकणार आहेत महाराष्ट्र? याचीच भीती मला वाटू लागलीय. 

महाराज, तुमचं नाव घेऊन रयतेची फसवणूक करणाऱ्या नेत्यांना जर टकमक टोकावरून कडेलोट करण्याची शिक्षा द्यायची ठरवलं, तर तिथं नेत्यांच्याही रांगा लागतील हेही तितकंच खरं आहे. सगळेच राजकीय नेते वाईट आहेत असं नाही, पण नालायक नेत्यांची संख्या वाढू लागलीय. तुमच्या नावाच्या जयघोषाबरोबर दंगली घडवणाऱ्या आणि तडीपार असलेल्या नेत्यांचाही उदो-उदो केला जातो. त्यामुळं राहून राहून वाटतं की, तुम्ही आता असायला हवे होता, पण नंतर वाटतं की, तुम्ही नाही आहात तेच बरं आहे. कारण आम्हा मावळ्यांना जिथं तुमचा कुणी एकेरी उल्लेख केलेला खपत नाही, तिथं तुम्ही कुणामुळे अस्वस्थ झालाय, हे कसं खपलं असतं?

कळावे, 
तुमचाच एक मावळा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ashish Kadam write an article about Maharashtra Politics and Chhatrapati Shivaji Maharaj