रफी, नौशाद आणि ओपी

‘हिंदुस्तान के हम है, हिंदुस्तान हमारा है’ हे तीन कडव्यांचं गाणं होतं. नौशाद ह्यांनी तीन कडव्यांसाठी तीन गायक वापरले, त्यांतला एक होता श्याम कुमार, दुसरा अल्लादिन आणि तिसरं कडवं रफीला दिलं.
best music pair rafi mohammed naushad ali op nayyer combination shaped hindi film music
best music pair rafi mohammed naushad ali op nayyer combination shaped hindi film musicsakal

संगीतकार नौशाद अली यांच्या वडिलांचं शिफारसपत्र घेऊन रफी नौशाद यांच्याकडे गेला, त्यांनी त्याला उर्दू शिकवलं. त्याच्या गळ्यातला पंजाबी हेल काढला. ‘पहिले आप’ नावाच्या सिनेमात त्यांनी रफीला पहिली संधी दिली.

‘हिंदुस्तान के हम है, हिंदुस्तान हमारा है’ हे तीन कडव्यांचं गाणं होतं. नौशाद ह्यांनी तीन कडव्यांसाठी तीन गायक वापरले, त्यांतला एक होता श्याम कुमार, दुसरा अल्लादिन आणि तिसरं कडवं रफीला दिलं. या तिघा गायकांनी सैनिकी बूट घालून गाणं गायलं, तेही लेफ्ट राइट करत. ही कल्पना यशस्वी झाली.

स्थळ - लाहोर ! तारीख - १४ डिसेंबर १९३८ कुंदनलाल सैगल यांचा कार्यक्रम होता. सैगल रंगमंचावर आले आणि लाउड स्पीकर बंद पडला. तो सुरू व्हायला कमीत कमी पाऊण तास तरी जाणार होता. लोक आरडाओरड करायला लागले.

कार्यक्रमाच्या आयोजकांना काय करावं ते कळेना. त्यांनी एका छोट्या मुलाला गायला उभं केलं. त्याला माईकशिवाय गायचं होतं. त्याचं पहिलं गाणं संपलं आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. सैगलने त्या मुलाला कवेत घेऊन आशीर्वाद दिले.

एवढंच नाही, तर आणखी चार गाण्यांची फर्माईश केली. त्या मुलाने सैगलसमोर चार गाणी म्हटली. त्यावेळेला सैगल त्याला म्हणाले, ‘‘तुम आगे चलकर बहुत बडे गायक बनोगे।’’ सैगल यांचे शब्द खरे ठरले. त्या मुलाने हिंदी चित्रपटसृष्टी आपल्या गाण्याने गाजवली. त्या मुलाचं नाव होतं मोहम्मद रफी.

त्याच रफीने मग सैगलबरोबर शहाजहान चित्रपटात एक गाणं म्हटलं. पुढे ‘लव्ह मॅरेज’ सिनेमात, ‘तीन कनस्तर पिट पिट कर गला फाडकर चिल्लाना, यार मेरे मत बुरा मान ये गाना है ना बजाना है’ या गाण्यात तो सैगलबद्दल म्हणतो, ‘‘भूल गया तू, मरके अमर है सैगल, जिसका हर कोई दिवाना है।’’ सैगल रफीसाठी देव होता.

नौशाद आणि रफी यांचं नातं हे गळा आणि सूर इतकं जवळचं होतं; पण १९४४ ते १९५२ पर्यंत रफी नौशादचा लाडका गायक झाला नव्हता. अगदी दिलीप कुमारनेसुद्धा रफीला त्याचा गळा म्हणून स्वीकारलं नव्हतं.

नौशादनी ‘अंदाज’मध्ये दिलीप कुमारला मुकेशचा आवाज दिला आणि राज कपूरला रफीचा. श्याम नावाच्या नटाला रफीचा आवाज फिट होता; पण नौशादने त्याच्यासाठीही तो वापरला नाही. दिलीप कुमार त्या वेळेला तलतवर खूष होता.

रफी ‘सुहानी रात ढल चुकी’ हे गाणं गायला आणि नौशादला रफी खऱ्या अर्थाने गवसला. पुढे ‘बैजू बावरा’नंतर रफी नौशादच्या गळ्यातला ताईत झाला आणि ‘दिदार’मधल्या ‘मेरी कहानी भुलनेवाले’ ह्या गाण्यानंतर रफी दिलीप कुमारचा आवाज झाला.

या गाण्याची कथा ऐकण्यासारखी आहे. सुरुवातीच्या काळात रफी इतर गायकांप्रमाणे सैगलची कॉपी करत होता, कारण सैगल हे सर्वांचंच दैवत होतं. एके दिवशी नौशादने रफीला सांगितलं, ‘‘तुला काहीतरी स्वतःचं असं वेगळं करायला लागेल, तरच तुझा इथे टिकाव लागेल.’’

रफी म्हणाला, ‘‘मला तुम्ही वेगळी धून दिलीत, तर मी माझ्या पद्धतीने गाण्याचा प्रयत्न करेन.’’ नौशादनी त्याला एक धून दिली. त्या गाण्यावर रफीने खूप मेहनत घेतली. ते गाणं रेकॉर्ड झालं. दिलीप कुमार रेकॉर्डिंगला होता. ते गाणं ऐकून दिलीप कुमारने रफीला कडकडून मिठी मारली. तिथं जी. एन. जोशी हे गायक होते, ते रफीचा आवाज ऐकून नौशाद यांना म्हणाले, ‘‘ये नवजवान गायक कोहिनूरसेभी ज्यादा चमक पैदा करेगा और खूब कामयाबी हासिल करेगा।’’

रफीचा शास्त्रीय संगीताचा अभ्यास पक्का होता. शास्त्रीय संगीतावर आधारित गाणी तो लिलया गायचा. त्याचा रोजचा रियाज कधीही चुकला नाही. सुरुवातीच्या काळात रफी रोज दहा-बारा तास रियाज करत असे; पण शिखरावर असतानासुद्धा पहाटे तीन ते सात वाजेपर्यंत त्याचा रियाज सुरू असायचा.

गार पाणी, वातानुकूलित खोली, तेलकट पदार्थ ह्या कशाचाही त्याच्या गळ्यावर परिणाम झाला नाही. बडे गुलाम अली खाँ एकदा म्हणाले होते, ‘‘रफी सिनेसंगीतात आहे तेच बरं आहे. तो जर शास्त्रीय संगीतामध्ये आला असता, तर आम्ही कंगाल झालो असतो.’’

best music pair rafi mohammed naushad ali op nayyer combination shaped hindi film music
Music: तुम्हालाही आहे गाणी ऐकायची आवड? हे प्रोडक्ट्स नक्कीच तुमच्याकडे हवेत!

रफीने शास्त्रीय संगीतावर आधारित अनेक गाणी म्हटली. त्यातल्या एका सर्वांत जास्त गाजलेल्या गाण्याचा एक किस्सा मी तुम्हाला सांगतो. ते गाणं होतं अर्थात ‘मधुबन में राधिका नाचे रे’. ‘कोहिनूर’ सिनेमातलं हे गाणं आहे.

त्या सिनेमाचे दिग्दर्शक होते, एस. डी. सनी. हे गाणं ऐकल्यावर त्यांचं असं म्हणणं पडलं की, पडद्यावर हे गाणं सुरू झालं की, लोक बोअर होऊन बाहेर सिगारेट प्यायला जातील. त्यामुळे सनींनी ठरवलं की, सिनेमातून हे गाणं उडवायचं. त्यांनी तसं रफी आणि नौशादला कळवलं.

रफी अर्थातच हादरला. त्यांनी सनीला सांगितलं, ‘‘तुम्ही हे गाणं चित्रपटात ठेवा. तुम्हाला असं दिसलं की, लोक गाण्यासाठी बसत नाहीत, तर तुम्ही ते सिनेमातून खुशाल काढा. मला त्या गाण्याचे पैसे लोकांना ते गाणं आवडलं तरच द्या.’’ सनी या गोष्टीला तयार झाले. सिनेमा लागला, गाणं सुपरहिट झालं, तेव्हा सनींनी रफीला फोन करून सांगितलं, ‘‘ये आणि तुझे गाण्याचे पैसे घेऊन जा.’’

रफी त्यांना म्हणाले, ‘‘मला पैसे मिळाले.’’ सनी बुचकळ्यात पडले. आपण तर रफीला पैसे दिले नाहीत, मग रफीला पैसे कसे मिळाले? रफी म्हणाला, ‘‘लोकांना गाणं आवडलं, यातच मला माझे पैसे मिळाले. तुम्हाला पैसे द्यायचे असतील तर ते नौशादना द्या. त्यांची किमया फार मोठी आहे.’’

best music pair rafi mohammed naushad ali op nayyer combination shaped hindi film music
Pune News : संततधार पावसामुळे रस्त्याच्या कडेने चिखल; सिंहगड रस्त्यावरील नांदेड-खडकवासला दरम्यानची स्थिती;अपघाताचा धोका

सनींनी हा किस्सा नौशादना सांगितला. नौशाद काय म्हणाले असतील? ते म्हणाले, ‘‘माझं यात काहीही क्रेडिट नाही. मी जुनी दारू नव्या बाटलीत घातली. ही सर्व किमया हमीर राग आणि रफीच्या गळ्याची आहे. त्याला देवाने असा कंठ दिला आहे की, तो कुठल्याही गाण्याचं सोनं करू शकतो.’’ या गाण्यात मुक्रीसाठी जे आलाप दिले आहेत, ते निआज अहमद खाँ साहेबांचे आहेत. नौशादप्रमाणेच ओपी-रफी जोडीने अनेक सुंदर सुंदर गाणी दिली.

ओपी म्हणायचा, ‘‘नौशादनी रफीला रडका केला होता. मी त्याला हसरा आणि खेळकर केला.’’ गुरुदत्तच्या ‘बाज’मध्ये रफीने ओपीसाठी पहिलं गाणं म्हटलं आणि मग ‘आरपार’पासून रफी-ओपीच्या गाण्याने कधी आपल्याला रोमँटिक मूडमध्ये नेलं, तर कधी देशप्रेम जागृत केलं; कधी नाचायला लावलं, तर कधी रागदारीवर आधारित ‘मनमोरा बावरा’सारखं गाणं गुणगुणत बसवलं.

हे गाणं पडद्यावर किशोर कुमार गातो. किशोर शास्त्रीय संगीतावर आधारित गाणं गाऊ शकणार नाही म्हणून ओपीने रफीकडून गाऊन घेतलं. आणि विक्षिप्त किशोर कुमारने तथास्तु म्हटलं. पण ओपी हा माणूस तर रफीसारख्या सज्जन माणसाशीसुद्धा भांडायचा. तो भांडकुदळ होता.

‘काश्मीर की कली’ सिनेमामधलं, ‘तारीफ करू क्या उसकी’ हे गाणं तुफान गाजलं. शम्मी कपूर ते पडद्यावर अभिनित करतोय. शम्मीला वाटलं की ‘तारीफ करू क्या उसकी’ हे धृपद शेवटी तीन-चार वेळा पुनःपुन्हा म्हटलं, तर गाण्यात धमाल करता येईल. शम्मीने ओपीला तसं सांगितलं. ओपीचा इगो दुखावला. ‘‘शम्मी कोण मला सांगणार? मला गाण्यातलं कळतं की त्याला?’’ ओपीने थेट सुनावलं, ‘‘माझ्या गाण्याच्या सिस्टीममध्ये ते बसत नाही.’’

best music pair rafi mohammed naushad ali op nayyer combination shaped hindi film music
Mumbai : मुंबईतील 'या' महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी; 5 किलोमीटर पर्यंत लागल्या वाहनांच्या रांगा

शेवटी रफी मध्ये पडला. तो ओपीला म्हणाला, ‘‘अरे तो म्हणतोय तर कर ना तसं. मला त्याची सूचना चांगली वाटतेय. गाणं मी गाणार, पडद्यावर तो अभिनय करणार, तू का विरोध करतोस?’’ शेवटी ओपी कसाबसा तयार झाला. शम्मी शेवटी गात गात बोटीत पडताना वेगवेगळ्या प्रकारे पडतो. त्याने त्या गाण्याचं सोनं केलं.

रफी हा खरंतर अगदी वेळेवर येणारा माणूस, म्हणजे रफी आल्यावर घड्याळ लावावं इतका तो वेळेच्या बाबतीत पक्का होता. पण, रफी एकदा शंकर - जयकिशनकडे रेकॉर्डिंगमध्ये अडकला. तिथून त्याला निघायला उशीर झाला, त्यामुळे तो ओपीकडे रेकॉर्डिंगसाठी वेळेवर पोहोचला नाही. ओपीची तळपायाची आग मस्तकात गेली.

रफीकडून वेळेच्या बाबतीत हा पहिला प्रमाद झाला होता. त्यापूर्वी त्याने कधीही वेळ चुकवली नव्हती. केवळ शंकर- जयकिशनमुळे त्याला उशीर झाला, रफीची यात काही चूक नव्हती; पण नेमका त्याचवेळी ओपी आणि शंकर-जयकिशन यांच्यातून विस्तवही जात नव्हता.

रफीने क्षमा मागूनसुद्धा ओपीचा राग गेला नाही आणि त्याने रफीला सांगून टाकलं, ‘‘मला तू पार्श्वगायक म्हणून नकोस’’ आणि चक्क प्रतिज्ञा केली, ‘यापुढे एकही गाणं मी रफीकडून गाऊन घेणार नाही.’ त्याने महेंद्र कपूरला हाताशी घेतलं.

शंकरने लताऐवजी शारदाला हाताशी धरल्यावर शंकरची जी अवस्था झाली, ती ओपीची झाली. महेंद्र कपूर हा काही रफीच्या तोडीचा गायक नाही. रफीचं फार नुकसान झालं नाही, ओपीचं मात्र झालं. पुढे ओपीला त्याची चूक कळली, त्याने रफीला परत बोलावलं. रफी मोठ्या मनाने ओपीकडे परतही गेला; पण तोपर्यंत ‘ओपी’ नावाचा सूर्य मावळतीकडे झुकला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com