मुंबापुरीचा मुकुटमणी ‘ताज’

‘गेट वे ऑफ इंडिया’समोर मोठ्या दिमाखात उभ्या असलेल्या आयकॉनिक ‘ताजमहाल पॅलेस हॉटेल’ला नुकतीच १२० वर्षे पूर्ण झाली.
Taj Mahal Palace Hotel
Taj Mahal Palace Hotelsakal

- भरत गोठोसकर

‘गेट वे ऑफ इंडिया’समोर मोठ्या दिमाखात उभ्या असलेल्या आयकॉनिक ‘ताजमहाल पॅलेस हॉटेल’ला नुकतीच १२० वर्षे पूर्ण झाली. ‘२६/११’च्या दहशतवादी हल्ल्यानंतर नव्या रुबाबात उभे राहिलेले ‘ताज’ हाॅटेल भारतीय आदरातिथ्य क्षेत्रात देशाचा लोकप्रिय ब्रॅण्ड आहे. देश-विदेशांतील पाहुण्यांची पहिली पसंत ‘ताज’च आहे. खऱ्या अर्थाने मुंबापुरीचा मुकुटमणी असलेल्या ‘ताज’च्या लोकप्रियतेची बरोबरी इतर कुठलेही हॉटेल करू शकलेले नाही.

माझे वडील म्हणायचे की ‘ताज’च्या प्रवेशद्वाराबाहेर उभ्या असलेल्या पीळदार मिशांवाल्या दरबानांची भीती न बाळगता ज्या दिवशी एखादा सामान्य माणूस आत शिरतो, तो क्षण त्याच्यासाठी आपण आयुष्यात खऱ्या अर्थाने काहीतरी सिद्ध केल्याची खूण असते. ते ज्या ‘ताज’चा उल्लेख करत होते तो आग्य्राचा ताजमहाल नसून मुंबईच्या अपोलो बंदरचे ‘ताजमहाल पॅलेस हॉटेल.’ गेल्या १२० वर्षांपासून दिमाखात उभी असलेली ही वास्तू भारतातील विलासी जीवनाचा मापदंड आहे.

...पण ‘ताज’ हे मुंबई शहरातील पहिले आलिशान हॉटेल होते का? तर नाही. त्या काळी शहरातील बहुतांश हॉटेल्स ही काळा घोडा परिसरातील गल्ल्यांमध्ये होती. याचीच एक आठवण म्हणून तिथल्या एका गल्लीला अजूनही ‘ब्रिटिश हॉटेल लेन’ असे नाव आहे. ही सराईवजा हॉटेल्स ‘पोचखाना’ (मूळ फारसी शब्द ‘पोसखाना’) या नावाने ओळखली जात आणि म्हणूनच त्यांना चालवणाऱ्या पारशी व्यावसायिकांना ‘पोचखानावाला’ हे आडनाव पडले. ही हॉटेल्स खलाशी आणि अविवाहित पुरुषांसाठी होती जिथे स्त्रियांची जायची हिंमत होत नसे.

‘होप हॉल’ हे कदाचित मुंबईतील पहिले ‘फॅमिली हॉटेल’ असावे, जे साधारण दोन शतकांपूर्वी सुरू झाले. ते फोर्ट-कुलाबा प्रभागात नसून या शहराच्या पहिल्या उपनगरात म्हणजे माझगावला होते. त्याच ठिकाणी आज ‘राजे शिवाजी संकुल’ नावाचे गृहसंकुल उभे आहे. याच्या काही दशकांनंतर मुंबईतील पहिले आधुनिक आलिशान हॉटेल हे काळा घोडा परिसरात उघडले, ज्याचे नाव होते ‘वॉटसन्स.’

आता ‘वॉटसन्स’ हे ऐषोआरामाच्या तत्कालीन मानांकांनुसार अगदी सुसज्ज असे हॉटेल असले तरी तिथे भारतीयांना मात्र प्रवेश दिला जात नसे. तिथे राहून गेलेल्या अनेक प्रतिष्ठित पाहुण्यांमध्ये प्रसिद्ध अमेरिकन लेखक मार्क ट्वेन यांचा समावेश होता. तसेच आशियातील पहिला चित्रपट शोदेखील लुमियर ब्रदर्सने येथे आयोजित केला होता.

असे मानले जाते, की हे तेच हॉटेल होते जिथे जमशेदजी टाटा यांना प्रवेश नाकारण्यात आला आणि म्हणूनच त्यांनी ‘ताजमहाल पॅलेस’ हॉटेल बांधले जिथे भारतीयांना हमखास प्रवेश मिळू लागला.

जमशेदजींचा मूळ व्यवसाय कापड बनवण्याचा होता, ज्याला प्रतिष्ठा होती. हॉटेल उघडणार हे ऐकल्यावर त्यांच्या बहिणींनी नाक मुरडून म्हटले ‘हे कसलं भटियारखाना सुरू करण्याचं खूळ चालू केलेत?’ कुटुंबात असे समज असले तरी जमशेदजींच्या या हॉटेलने मात्र मुंबईतील पाहुणचाराची व्याख्याच कायमची बदलून टाकली.

अमेरिकन पंख्यांपासून ते जर्मनीहून आणलेल्या लिफ्टपर्यंत आणि तुर्की शैलीच्या स्नानगृहापासून ते ब्रिटनच्या बटलरांच्या नियुक्तीपर्यंत, ‘ताज’ हे जगभरातील सर्वोत्कृष्ट सुविधांनी परिपूर्ण असेल याची जमशेदजींनी काळजी घेतली. मुख्य म्हणजे या हॉटेलने १६ डिसेंबर १९०३ रोजी जेव्हा आपले दरवाजे जगासाठी उघडले तेव्हा विश्‍वास ठेवा किंवा नका ठेवू, तिथल्या एका खोलीत राहण्याचा दर होता फक्त ८ रुपये!

नुकताच ‘ताज’च्या १२० व्या वर्षपूर्तीचा उत्सव साजरा करण्यात आला. त्यात लाईट आणि साऊंड शोद्वारे हॉटेलचा वारसा अन् इतिहास उलगडून दाखवण्यात आला. हॉटेल पर्यटकांसाठी खुले झाले तेव्हा पहिल्याच दिवशी १७ पाहुणे तिथे राहिले. त्या वेळी ‘गेट ऑफ इंडिया’चे बांधकामही सुरू झाले नव्हते. १६ डिसेंबरला ‘ताज’ खुले झाले त्याच दिवशी जमशेदजी टाटा यांनी संचालक मंडळाचे अध्यक्ष म्हणून आपली शेवटची बैठक घेतली.

बैठकीत जे. आर. डी. टाटा यांची कंपनीचे अतिरिक्त संचालक म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर जमशेदजी टाटा वैद्यकीय उपचारासाठी युरोपला निघून गेले. ते कधीच परत आले नाहीत. १९ मे १९०४ रोजी त्यांचा मृत्यू झाला.

‘ताज’ हॉटेलशी संबंधित रूढ झालेल्या अनेक दंतकथांपैकी एक सामान्य समज असा आहे, की ते एका अशा युरोपियन वास्तुविशारदाने डिझाइन केले होते ज्याने कधीही मुंबईला भेट दिली नव्हती. तसेच असाही समज रूढ आहे की तो नकाशावर उत्तर दिशा दाखवायला विसरला आणि म्हणून हॉटेल चुकून समुद्राला पाठ करून बांधले गेले.

काही जण या कथेला आणखी मसाला लावत म्हणतात, की जेव्हा आर्किटेक्टने बांधून तयार झालेल्या हॉटेलला भेट दिली तेव्हा तो झालेली ‘ही’ चूक पाहून निराश झाला. मग त्याने घुमटावरून उडी मारून आत्महत्या केली आणि त्याचे भूत आजपर्यंत हॉटेलमध्ये वावरते, अशी शेपूट त्या कथेला जोडली जाते; पण त्यात काही तथ्य नाही.

कारण या हॉटेलची रचना करणारा एक मुंबईतच राहणार मराठी माणूस होता, राव बहादूर सीताराम खंडेराव वैद्य. त्यांचे नियोजन असे होते, की हॉटेल शहराकडे तोंड करणार आणि जास्तीत जास्त खोल्यांतून समुद्राचे दृश्य दिसेल. २०१७ मध्ये, वैद्यांची ही निर्मिती भारतातली पहिली इमारत ठरली जिच्या रचनेला ट्रेडमार्क मिळाला. याचा अर्थ कोणीही परवानगी घेतल्याशिवाय या रचनेची कॉपी करू शकत नाही.

वर्षानुवर्षे दिमाखात उभे असलेले ‘ताज’ हॉटेल अनेक बाबतींत सर्वश्रेष्ठ ठरले. विजेचा वापर करणारे हे भारतातील पहिले हॉटेल होते. शहरातील पहिला परवाना असलेला बार ‘हार्बर बार’ (त्याचा परवाना क्रमांक ००१ आहे) जो १९३३ मध्ये उघडला, तिथे अजूनही त्याची आठवण म्हणून ‘फ्रॉम द हार्बर सिन्स १९३३’ या नावाची कॉकटेल पाहुण्यांना दिली जाते. तसेच, शहरातील हे पहिले २४ तास उघडे असणारे कॉफी शॉप आणि ‘ब्लो अप’ नावाचे पहिले डिस्कोथेक इकडेच होता.

मुंबईत जॅझ संगीताने मुळे धरली असतील तर ती ‘ताज’मध्ये! १९३० आणि १९५० च्या दरम्यान जॅझ संगीत शहरात लोकप्रिय होते आणि ‘ताज’च्या बॉलरूममध्ये हे सर्व सुरू झाले. या जॅझ युगाचा अंत होत होता तेव्हा हे संगीत आणि इतर पाश्‍चिमात्य प्रभाव बॉलीवूडच्या संगीतामध्ये शिरले.

भव्य ‘ताजमहाल’ हॉटेलच्या शेजारी ‘ग्रीन्स’ नावाचे आणखी एक हॉटेल होते, जे टाटा समूहाने विकत घेतले होते. त्यांनी १९७० च्या दशकात ते पाडले आणि त्या ठिकाणी नवीन ‘ताजमहाल’ टॉवर उभा राहिला; परंतु आधुनिक टॉवरच्या तुलनेत पाहुणे अजूनही जुन्या हॉटेलमध्ये राहणे पसंत करतात. शतकाहून अधिक काळ हे राष्ट्रप्रमुख आणि सेलिब्रिटींसाठी पसंतीचे ठिकाण राहिले आहे.

बराक ओबामा, टोनी ब्लेअर, दलाई लामा, बिल आणि हिलरी क्लिंटन, द बिटल्स आणि अगदी चंद्रावरचा पहिला माणूस नील आर्मस्ट्राँग यांनीही इथेच मुक्काम केला होता. शहरातील नामांकित लोकांसाठी विवाह समारंभाकरिता ही पसंतीची वास्तू आहे.

दुर्दैवाने, श्रीमंत आणि प्रसिद्ध लोकांचे आवडते हॉटेल असल्यामुळे, शहरातील ‘२६/११’च्या दहशतवादी हल्ल्यांदरम्यान त्याला लक्ष्य करण्यात आले. आपल्या एनएसजी कमांडोंनी त्यांचा खात्मा करण्यापूर्वी चार पाकिस्तानी दहशतवाद्यांनी ६० तासांहून अधिक काळ इथे वेढा घातला होता. येथे एनएसजी अधिकारी मेजर संदीप उन्निकृष्णन यांच्यासह ३७ जणांचा मृत्यू झाला होता.

या घटनेचे नायक इथले कर्मचारीच ठरले. त्यांनी स्वतःच्या जीवाची उपेक्षा केली आणि आपल्या पाहुण्यांची प्रथम सुटका होईल, याची खात्री केली. मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना आजही त्यांचे दरमहा वेतन मिळते. हॉटेलच्या लॉबीमध्ये ‘ट्री ऑफ लाइफ’ नावाचे एक स्मारक आहे, ज्यावर इथल्या प्रत्येक हुतात्म्याचे नाव कोरण्यात आले आहे.

१९७० पासून ‘ताजमहाल’ हॉटेलची मालकी असलेल्या ‘इंडियन हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीने केवळ देशभरातच नव्हे; तर जगभरात इतर हॉटेल्स उघडण्यास सुरुवात केली. त्यामध्ये ‘ताज’ ब्रॅण्डअंतर्गत केवळ भव्य पॅलेस आणि आलिशान रिसॉर्ट्सचा समावेश नाही; तर ‘विवांता’ आणि ‘जिंजर’ या ब्रॅण्ड नावाखाली परवडणारी हॉटेल्सदेखील समाविष्ट आहेत.

एका भारतीयाचा ‘वॉटसन्स’ हॉटेलमधील अपमान म्हणून जे सुरू झाले ते आता मुंबईचाच नव्हे; तर भारताचा शिरोमणी ठरले आहे. अगदी आग्य्राच्या मूळ ताजला टक्कर देण्याइतपत!

ceo@khakitours.com

(लेखक खाकी टूर्स आणि खाकी हेरिटेज फाऊंडेशनचे संस्थापक आहेत. मुंबईचा इतिहास आणि वारसा याबाबत ते सातत्याने लिखाण करत असतात.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com