esakal | पक्षीदर्शन: भिगवणला भेटला कलहंस! । Bird
sakal

बोलून बातमी शोधा

पक्षीदर्शन: भिगवणला भेटला कलहंस!

पक्षीदर्शन: भिगवणला भेटला कलहंस!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

डॉ. सुधीर गायकवाड इनामदार

त्याला शोधून सहा तास झाले होते. थकलो होतो. माघारी निघालो. थोडे पुढे आलो आणि वळून पाहिले तर काही छायाचित्रकार टापूवर आले आणि थव्यातला कलहंस विचलित झाला. तिथून उडाला. दुसऱ्या एका टापूवर उतरला. आम्ही होतो तिथेच. काही मिनिटांत तिथून उडाला. त्या क्षणांत काही अप्रतिम छायाचित्रे टिपून, आम्ही समाधान कमावले होते.

मुंबईपासून २५० व पुण्यापासून १०० किलोमीटर अंतरावर असलेले भिगवण हे पक्षी छायाचित्रकारांचे आवडीचे ठिकाण. येथे काढलेल्या छायाचित्रांचे बॅकग्राऊंड शेतातील हिरवळीमुळे खूप सुंदर दिसते. उजनी धरणाच्या कोंडपाण्यामुळे परिसर सदाहरित असतो. वास्तविक मुंबईहून भिगवणला बाय रोड जाणे त्रासदायकच. मुंबई-बेंगळूरु महामार्गातून पुणे शहरात प्रवेश करून लांबच्या लांब पसरलेले पुणे शहर ओलांडून पुणे-सोलापूर महामार्ग गाठावा लागतो. तब्बल सहा तासांचा प्रवास घडतो; पण येथे टिपलेली छायाचित्रे फेसबुकवर पाहिली की भिगवणला जाण्याची ओढ जरा जास्तच लागते.

हेही वाचा: मुलीच्या आईस्क्रीमसाठी त्याने लोअर परेल ब्रिजवर अचानक गाडी वळवली आणि...

२०१५ च्या जानेवारी महिन्यात पांढऱ्या माथ्याचा मोठा कलहंस (ग्रेटर व्हाईट फ्रण्टेड घुझ) भिगवणला दिसल्याची बातमी कळली. छायाचित्र नीटसे नव्हते; पण बातमी खात्रीशीर होती. उत्तर ध्रुव, उत्तर अमेरिकेत आढळणारा हा बदक प्रजातीचा पक्षी यापूर्वी महाराष्ट्रात केवळ दोनदाच दिसला होता. भिगवण परिसरात प्रथमच दिसत होता. छायाचित्रकार मित्र डॉ. अतुल देशपांडे यांच्याशी चर्चा करून लगेच दुसऱ्या दिवशी रात्री निघायचे ठरले. निघता-निघता रात्रीचे १० वाजले. पोहोचायला पहाटेचे साडेतीन. वाटेत चहा घ्यायला थांबलो, तेव्हाच प्रचंड थंडीचा अंदाज आला. भिगवण-बारामती परिसरात असलेली थंडी जरा जास्तच होती. पहाटे पोहोचल्यावर थोडा वेळ गप्पा मारल्या. नंतर फोटोग्राफीला निघायची तयारी केली. ५.३० वाजताच बोटीत शिरलो. कलहंसचा शोध सुरू झाला.

भिगवणला बोटीतून छायाचित्रण म्हणजे गंमतच असते. आपण असतो बोटीत व बहुतांश पक्षी असतात किनाऱ्यावर किंवा जमिनीवरील टापूवर. काही पक्षी मात्र पाण्यातच राहतात. ‘तो’ राजहंसांच्या थव्यातच राहतोय, असे आमचा मार्गदर्शक उमेशने सांगितले. २५-३० पक्ष्यांच्या थव्यात आणि लांबून साधारणतः तत्समच दिसणारा. त्यामुळे त्याचे छायाचित्रण नीट करता येत नाही असे समजले. कुडकुडणाऱ्या थंडीत भल्या सकाळी केवळ आम्हीच त्या जलाशयात कलहंसचा शोध घेत होतो. थोड्याच वेळात उजाडले तसे अजूनही काही पक्षीप्रेमी आले. सूर्यदेव वर आले तसे तिथे ३०-४० पक्षीप्रेमींचा ग्रुप गोळा झाला. राजहंस पक्ष्यांचे अंदाजे २५-३० चे तीनचार थवे त्या टापूवर विखुरले होते. त्यांमध्येच कुठे तरी आम्हाला हवा असलेला पाहुणा होता; पण अजूनही दर्शन होत नव्हते.

हेही वाचा: शाळेत जाताना ‘सावधान’!

आमच्या शोधमोहिमेला एव्हाना सहा तास झाले होते. पक्षी दिसेल या आशेने आम्ही नाश्तासुद्धा केला नव्हता. त्यातच उन्हामुळे व रात्रभराच्या प्रवासामुळे आम्हाला थकल्यासारखे जाणवत होते. भूकसुद्धा सपाटून लागली होती. इतर बोटीतील काही ओळखीचे, काही अनोळखी छायाचित्रकारांचा निरोप घेतला व दुपारी आराम करून नव्याने प्रयत्न करू, असे सांगून तिथून माघारी निघालो. परततानाही नजर मात्र टापूवरच खिळली होती. थोडे पुढे आलो आणि वळून पाहिले तर काही छायाचित्रकार बोटीतून उतरून टापूवर आले होते. काही जण उतरून पुढे गेले तसे त्या थव्यात कुठे तरी मागे असलेला पांढऱ्या माथ्याचा मोठा कलहंस गोंधळला. विचलित झाला आणि तिथून उडाला. दुसऱ्या एका टापूवर उतरला.

या वेळेस येथे असलेल्या राजहंसांच्या थव्याच्या मागे न राहता पुढे स्थिरावला... आम्ही नेमके त्या वेळेस तिथेच पोहोचलो होतो. अनपेक्षितपणे ज्याला आम्ही शोधण्याकरिता सहा तास प्रयत्न करत होतो, तो असा अचानक आमच्या समोर आला. पूर्णपणे स्थिरावण्यापूर्वीच आम्हाला तिथे पाहून काही मिनिटांत पुन्हा तिथून उडाला. तीच काही मिनिटे आम्हाला पुरेशी होती. काही अप्रतिम छायाचित्रे टिपता आली. आम्हाला छायाचित्रे टिपताना पाहून सर्व जण घाईगडबडीत तिथे आले; परंतु तोपर्यंत तो तिथून उडाला होता. कलहंस सापडल्याचे समाधान कमावले होते. दुपारी जेवण घेऊन दोन तास झोप काढली. त्यानंतर पुन्हा छायाचित्रणाला बाहेर पडलो. कलहंस मात्र पुन्हा दिसला नाही, सकाळी जणू केवळ आम्हाला छायाचित्रे काढू देण्यासाठीच आमच्या समोर येऊन थांबला होता.

दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही समाधानाने मुंबईच्या दिशेने कूच केले. काही दिवसांनंतर भिगवणला मात्र तो अजूनही पुन्हा दिसला नाही. इतकी वर्षे झाली तरी ते क्षण व तो कलहंस अजूनही डोळ्यासमोर तस्साच आहे.

sudhir_gaikwad03@yahoo.co.in

loading image
go to top