आज तो अपनी होली है..! (ब्रिटिश नंदी)

British Nandi
British Nandi

ज्या मुहूर्तावर शिवी हे ‘शुभवचन’ मानले जाते, अशा साडेतीन मुहूर्तांपैकी एक होळीचा मुहूर्त! आजमितीस (मध्यमवर्गीय) मराठी माणसे क्‍यालिंडरवाल्यांचे ऐकून निराळेच साडेतीन मुहूर्त साजरे करीत असत. तथापि, आमच्या सांस्कृतिक अभ्यासानुसार गटारी अमावस्या, होळी, एकतीस डिसेंबर आणि अर्धा पोळा हे साडेतीन मुहूर्त होत. पोळा हा अर्धा अशासाठी, की त्यातील अर्धा सण हा खऱ्याखुऱ्या चतुष्पाद बैलांसाठी सोडावा लागतो. उरलेला अर्धा पोळा आम्हासारख्या नंदींसाठी!....

बुधवारी (ता. वीस) आणि गुरुवारी (ता. एकवीस) अनुक्रमे साजऱ्या होणाऱ्या होळी आणि धुळवडीनिमित्त खुसखुशीत भाष्य. 


करो बुराई, बको गालियां आज तो अपनी होली है,
कहां गए साहब अब तुम बंदूक में अपनी गोली है!

-कवी : आम्हीच!

आमच्या लाखो लाखो वाचकांना होळीच्या पालथ्या मुठीनिशी शुभेच्छा देऊनच आम्ही लेखणी हाती घेत आहोत! आजचा आइतवार धरून पुढील आइतवाराच्या मधुमध फाल्मुग पौर्णिमेचा शुभमुहूर्त पडत असल्याने आम्ही एव्हांपासूनच कंबर कसून बसलो आहोत. देवी सरसुती आम्हावरी प्रसन्न आहे, हे आमच्या उपरोक्‍त काव्यपंक्‍तींवरून (सुज्ञ) वाचकांच्या लक्षात आले असेलच. सदरील होळीकाव्य आम्ही नुकतेच (काही मिंटापूर्वी) प्रसविले असून प्रतिभेचे असेच वरदान लाभले, तर इन्शाल्ला खंडकाव्य लिहून काढण्याचा मानस आहे. मराठी माणसाला होळीकाव्याची काय अडचण? आम्ही तर बसल्या बैठकीला असे रत्तलभर काव्य दळून काढू!! 

सदर काव्यपंक्‍तीबद्दल एका थोर काव्य समीक्षकाने व्यक्‍त केलेले मत पाहा : ‘‘उपरोक्‍त काव्यपंक्‍तींमध्ये होळीच्या सणाचा अस्सल रंग पकडण्याचा प्रयत्न प्रस्तुत कवीने केला असून त्यातील गडद भाव सांस्कृतिकतेचे पदर उलगडणारे आहेत. भावगर्भतेचा व्यामिश्र व्योमपट व्यापणाऱ्या ह्या भावकवितेत डोकावणारी ‘साहेब’ ही प्रवृत्ती होळीशी असलेले घट्‌ट नाते दर्शवितेच; परंतु त्यापाठोपाठ बंदुकीच्या गोळीचाही उल्लेख येत असल्याने त्यातील हिंसेचा एक अंतस्थ प्रवाह दृग्गोचर होतो...’’ 

ह्यावरून आम्ही वायफळ लिखाणासाठी इथे बसलेलो नाही, हे वाचकांना समजेल, अशी आशा आहे. उलटपक्षी अत्यंत महत्त्वाच्या अशा विषयाला आम्ही येथे हात घालत आहो! 

ज्या मुहूर्तावर शिवी हे ‘शुभवचन’ मानले जाते, अशा साडेतीन मुहूर्तांपैकी एक होळीचा मुहूर्त! आजमितीस (मध्यमवर्गीय) मराठी माणसे क्‍यालिंडरवाल्यांचे ऐकून निराळेच साडेतीन मुहूर्त साजरे करीत असत. तथापि, आमच्या सांस्कृतिक अभ्यासानुसार गटारी अमावस्या, होळी, एकतीस डिसेंबर आणि अर्धा पोळा हे साडेतीन मुहूर्त होत. पोळा हा अर्धा अशासाठी, की त्यातील अर्धा सण हा खऱ्याखुऱ्या चतुष्पाद बैलांसाठी सोडावा लागतो. उरलेला अर्धा पोळा आम्हासारख्या नंदींसाठी! असो.

सांप्रतकाळी देशभरात नकारात्मकता प्रचंड प्रमाणात वाढली आहे. पाहावे तेथे सारीजणे एकमेकांचा दुस्वास करून (होलिकोत्सव नसतानादेखील) मन:पूत शिवीगाळ करीत असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. वास्तविक आपण सारीजणे एकाच देवाची लेकरे; पण राजकारणाचा येळकोट एकदा चढला, की उतरणे इंपॉसिबल होत जाते. सोशल मीडिया ह्या लाडक्‍या नावाने जनमानसात घर करून राहणाऱ्या शक्‍तीमुळे शिवीगाळीला ऊत आला असून लोक एकमेकांच्या उरावर डिजिटली बसू लागल्याने आम्हास वेदना होतात. 

अशा नकारात्मक वातावरणातच काही ‘भक्‍त’ आणि ‘चमचे’ ह्यांचे जणू महायुद्ध पेटले असून एकमेकांवर सर्जिकल स्ट्राइकचा सपाटा सुरू आहे, हे पाहून आम्हाला अतीव दु:ख झाले. ह्यातील भक्‍त कोण, आणि ‘चमचे’ कोण, असा अज्ञानमूलक प्रश्‍न काही वाचक आम्हाला करतील. त्यांच्यासाठी सर्वप्रथम थोडासा खुलासा करणे उचित ठरेल. श्रीमान नमोजी ह्यांच्या चरणी लीन झालेल्यांना आम्हासारख्यांना सर्वसाधारणपणे भक्‍त असे म्हटले जाते, तर पूर्वापार ज्यांनी आपले जीवित दिल्लीस्थित एका राजपरिवाराला वाहियले, त्यांना ‘चमचे’ असे संबोधन आहे. बाकी सारे नगण्य ह्या सदरात मोडतात, हे उघड आहे. ते नगण्य असले, तरी होळीच्या दिवसात त्यांना गण्य मानावे लागेल. पुन्हा असो.

वाचकहो, सुमारे साडेचार वर्षांपूर्वी आपल्या देशात अच्छे दिन येण्यास प्रारंभ झाला, हे कोण अमान्य करील? हे अच्छे दिन आणण्यास कारणीभूत ठरलेले आपल्या सर्वांचे लाडके नेते श्रीमान नमोजी (‘मन की बात’ फेम आघाडीचे रेडिओस्टार) ह्यांनी सारा विरोध एकहाती परतविला, आणि सबका साथ देऊन सबका विकास साधण्याची त्यांची यात्रा अजूनही चालू आहे. त्यासाठी उभा भारत देश त्यांच्याप्रती कृतज्ञ असून सारा देश उभा राहून औंदा होलिकोत्सवाला त्यांस (पालथ्या मुठीनिशी) मानवंदना देईल, असा आमचा अंदाज होता. कारण आमच्या आळीच्या तोंडाशी दुकान घालून बसलेल्या ‘शा. शामळजी मंगळदासजी एंड सन्स’ (किराणा-भुसार बेपारी) ह्यांच्यासमोर ‘नोटाबंदी’चा नुसता उल्लेख केला तरी ते ज्या पद्धतीने शिमगा करतात, तो पाहून आम्ही ही अटकळ बांधली. तथापि, दरम्यानच्या काळात (नोटाबंदीमुळेच) उभा देश आडवा झाल्याने तो तूर्त रहित करण्यात आला आहे. ते काहीही असले, तरी श्रीमान नमोजी ह्यांच्या अच्छे दिन आरंभयात्रेचा एक यात्रिक म्हणून आम्ही व्यक्‍तिश: त्यांचे आभार मानीत आहोत. 

अच्छे दिन आले असले, तरी काही कारणाने देशाचे वर्तमान काही ठीक म्हणता येणार नाही. चोहीकडे विखार, द्वेष, आणि हिंसात्मक वर्तनाचा आगडोंब उसळला असून जणू बारोमास होलिकोत्सव सुरू असल्याचे चित्र दिसते आहे. बघावे त्या व्यक्‍तीची पालथी मूठ मुखावर जाताना पाहून आमची दातखीळ बसते. फार्फार पूर्वीचे काळी आम्ही व्हाट्‌सॲप आदी सोशल माध्यमे राजरोस उघडून त्यातील विनोदांचे यथेच्छ अनुपान करीत असू. क्‍वचितप्रसंगी दारे लावून व्हाट्‌सॅप उघडण्याची पाळी येत असे. नाही असे नाही! परंतु, आजकाल दिवसाढवळ्या, उघड्यावर फेसबुक, ट्विटरादी सोशल माध्यमे मोबाइलच्या स्फोटक ब्याटरीसारखी काळजीपूर्वक हाताळावी लागत आहेत. जो तो ठणाणा करीत असल्याचे पाहून आम्ही काळजीत पडलो असून हे सारे इलेक्‍शन नजीक आल्याचे चिन्ह आहे, हे आम्हाला (इलेक्‍शन नजीक आले, तेव्हाच) उमजले! असो.

परवाचे दिशी आम्हांस एक मेसेज आला. तो आमचे मितवा (मित्र, तत्त्वज्ञ, वाटाड्या) मा. रागा ह्यांचा होता. आम्ही प्रेमभराने तो संदेश वाचला. तो असा : 

‘‘हे माय फ्रेंड...जस्ट कॉल मी राहुल...(इथे आम्ही चेन्नैच्या पोरीसारखी हातभर जीभ काढून लाजलो!) गेले काही दिवस देशामध्ये नफरतीचे वातावरण पसरले असून, द्वेष, तिरस्कार, घृणा, सूड अशा भावनांनी साऱ्यांना ग्रासलेले आहे. हे सारे कोणामुळे झाले ते तुम्ही जाणताच. वास्तविक नफरत ही काही आपली संस्कृती नाही. प्रेम ही आहे! तेव्हा आपण यंदाच्या होलिकोत्सवात सारी नकारात्मकता जाळून टाकून प्रेमाची शिंपण करू या का? (अर्थ : कांग्रेसला आता तरी मत देऊ या का?) कळावे. आपला मित्र. रागा.’’

सदरील मेसेज वाचून आम्ही मोहरलो. नाहीतरी होलिकोत्सवाचा अर्थ काय असतो? नकारात्मकतेचे दहन करून प्रेमाचे खोबरे खायचे हाच ना? आम्ही ‘रागां’च्या प्रेमभावनेला साद घालून सर्वपक्षीय होलिकोत्सवासाठी आवाहन केले. त्यासाठी एक सर्वपक्षीय बैठक ठरविली. त्या बैठकीचाच संक्षिप्त वृत्तांत येथे देत आहोत!

आम्ही बैठकीला सुरवात केली.

आम्ही : ‘‘सज्जनहो...(इथे उपस्थितांनी आश्‍चर्यचकित होऊन एकमेकांकडे पाहिले!) नफरतीची नकारात्मकता जाळून सकारात्मकतेची भावना देशभर रुजवण्यासाठी सर्वपक्षीय होलिकोत्सवाची संकल्पना पुढे आली आहे. फक्‍त ती कोठे आणि कशी साजरी करावी, हे ठरवण्यासाठी आपण सारे येथे जमलो आहोत. सर्व उपस्थितांचे स्वागत!’’

राजनाथजी : (‘चिंता करितो विश्‍वाची’ मुद्रेत) ‘‘वास्तविकता में कहें तो देश में नफरत और घृणा की भावना चरम पर है, ऐसा कहना उचित नहीं! हम बंधुभावसेही काम चला रहे हैं...मोदीजी के समर्थ नेतृत्व में राष्ट्र प्रगती की नई छोर को छू रहा है! इस परिस्थिती में होली जैसे हिंसात्म एवं अपशब्दों के प्रयोग को अनुचित प्रोत्सान देनेवाले त्योहारोंका आयोजन ठीक न रहेगा!’’ (इथे दोघे-चौघे पाणी पितात.)

रागा : (त्वेषाने पुढे येत) ‘‘इसका मतलब साफ है! चौकीदार चोर है!’’ (इथे भक्‍त पार्टीतले पंधरावीस हसतात, आणि चमचे पार्टीतील तीन-चार घोषणा देतात.)

मोटाभाई ऊर्फ अमितभाई शहा : (खाकरून) ‘‘जुओ, मतलब एटलाज छे के ऑल पार्टी होलीच्या आयोजनाच्या प्लान च्यांगला हाय! पण तो अजून च्यांगला होयाला पायजेल. आमची पार्टी इव्हेंट मेनेजमेंटमधी एकदम सरस हाय! एटले आम्हीच आयोजन करते!’’

रागा : (चिडून) ‘‘आणि स्पॉन्सर कोण करणार? तुमचे नेहमीचे यशस्वी उद्योजक मित्र वाटतं!!’’

आमआदमी केजरीवाल : (थोडंसं खोकत) ‘‘ये भ्रष्ट लोगोंकी होली है! होळीसाठी लाकडं कुठून आणणार, ते सांगा आधी!!’’ 

अरुण जेटलीजी ऊर्फ वकीलसाहेब : (पटकन उभे राहत) ‘‘कोर्टात खेचीन हां! जपून बोला!!’’

गडकरीजी : (खुर्चीत ऐसपैस बसून पाय हलवत) ‘‘हॅ!...कोण खेळतं बे हल्ली होळीबिळी? जमाना आहे का हा आता? पाच-दहा लाख मेसेज पाठवून द्या, होऊंजाईले काम!! त्यापेक्षा रस्ते बांधून दिले तं लोक भाईचाऱ्याने येजा करतील!!’’ 

सुश्री सुषमाबेन स्वराज : (नेहमीप्रमाणे गोडगंभीर हसत) ‘‘युनोतल्या माझ्या भाषणात दहशतवाद संपविण्यासाठी मी असाच कार्यक्रम सुचवला होता! पण माझ्या भाषणातला तो परिच्छेद कोणीतरी कापला!!’’ 

सुश्री मायावतीदेवी : (समजुतीनं) ‘‘म्हणून स्वत:चं भाषण स्वत:च लिहून काढावं आणि वाचावं! मी कुणाच्याही हातात कागद पडू देत नाही! दुसऱ्यानं लिहून दिलेलं भाषण वाचलं की असं होणारच!’’ 

वकीलसाहेब : (पटकन उठून उभे राहत) ‘‘कोर्टात खेचीन हां!’’

सुश्री ममतादीदी : (नेहमीप्रमाणे संतप्त आविर्भावात) ‘‘ते सगळं जाऊ दे! वेगळी होळी साजरी करण्याची वेळ कोणी आणली आपल्यावर? त्यांना इथे आत्ताच्या आत्ता हजर करा!!’’

वकीलसाहेब : (तारस्वरात) ‘‘कोर्टात खेचीऽऽन!!’’

अखिलेशभैय्या : (अनुमोदन देत) ‘‘अगदी खरं आहे तुमचं! पुढल्या पंतप्रधान तुम्हीच होणार, बुवाजी!’’

रागा : (कोपराने ढोसकत) ‘‘ए...बुवाजी काय म्हणतोस त्यांना तोंडावर!’’

अखिलेशभैय्या : (खुलासा करत) ‘‘वो मेरी बुवाही तो है! और मैं उनका भतीजा!!’’

रागा : (उत्साहात) ‘‘तो मतलब साफ है...चौकीदार चोर है!’’

वकीलसाहेब : (खचून) ‘‘कोर्टात खेचीन रे!!’’

ममतादीदी : (नेहमीप्रमाणे संतप्त अवस्थेत) ‘‘मी इथे असताना शिमगा साजरा करण्याची तुमची हिंमत होतेच कशी? काय हो चंद्राबाबूमोशाय!!’’

चंद्राबाबू नायडू : (गोंधळून) ‘‘कुठं काय...मी तर केव्हापासून गप्प बसून आहे!!’’

मोटाभाई : (निर्वाणीने) ‘‘सांभळ्यो! होळीच्या इव्हेंट करायच्या असेल तर आमची पार्टी सतप्रतिसत रेडी छे! इव्हेंट नाय, तो होळी पण नाय!!’’

रागा : (दोन्ही हात पसरत) ‘‘लो, इसका मतलब साफ है! चौकीदार चोर है!!’’ (इथे प्रचंड आरडाओरडा होतो, आणि बैठक बरखास्त होते.)

...वाचकहो, सर्वपक्षीय होळीचे आयोजन करून नकारात्मकता जाळून टाकण्याचा आमचा बेत पहिल्या बैठकीतच होरपळला. त्यामुळे हा बेत आम्ही तूर्त रहीत केला असून धुळवडीलाच प्राधान्य देण्याचे ठरवतो आहोत. यंदाची धुळवड येत्या गुरुवारी सुरू होईल, ती थेट २३ मे पर्यंत चालू राहील, ह्याची धुळवड कलावंतांनी नोंद घ्यावी! 

तळटीप : उपरोक्‍त काव्यपंक्‍तींचा समावेश असलेले होळीकाव्य आम्ही तूर्त पुरे करायला घेतले आहे.

वानगीदाखल त्यातल्या आणखी चार ओळी पुढे पेश करत आहोत! त्यावरून आमच्या होळीप्रतिभेची चुणूक आपल्याला दिसेल. अर्ज किया है...

क्‍यों करते हो सवाल इतने, कौन यहां हमजोली है
मत पूछो राफेल की कीमत, इतनी सी तो बोली है!
कौन यहां पर चौकीदारसे करता आंखमिचौली है
बुरा ना मानो साहेब तुम भी आज हमारी होली है!


...धुळवडीच्या दिवशी शांभवीचे प्राशन व गोळीसेवन झाले, की पुढल्या काही तासात आमचे ते दीर्घकाव्य पूर्ण होईल, असा विश्‍वास आहे. यथावकाश आम्ही ते प्रसिद्ध करूच. (त्याची होळी करू नये, ही एक विनंती!) दरम्यान देशभर साजऱ्या होणाऱ्या राष्ट्रीय होळीपर्वात सर्वांनी सहभागी व्हावे, व यथाशक्‍ती किमान आपापल्या बोटांना, तरी काळा रंग लावून घ्यावा, अशी अखेरची विनंती आहे. इत्यलम.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com