Vidhan Sabha 2019 : टीका करा पण...

कृपादान आवळे
मंगळवार, 15 ऑक्टोबर 2019

चंद्रकांत पाटील हे मूळचे कोल्हारपूरचे असल्याने बाहेरून आणलेला उमेदवार म्हणून त्यांच्यावर विरोधकांकडून टीका केली जात आहे.

विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजले. त्यानंतर विविध पक्षांच्या नेतेमंडळींनी प्रचारसभांचा धडाका लावला. या प्रचारसभांमधून नेतेमंडळी एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. त्यातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भाजप-महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी प्रचारसभांमध्ये खालच्या पातळीवरून वक्तव्ये करणं सुरु केलं आहे. 

भाजपसाठी 'सेफ' समजल्या जाणाऱ्या कोथरूडमधून विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांना डावलून चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. चंद्रकांत पाटील हे मूळचे कोल्हारपूरचे असल्याने बाहेरून आणलेला उमेदवार म्हणून त्यांच्यावर विरोधकांकडून टीका केली जात आहे. त्यावरून चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांवर टीका करताना ते म्हणाले, मी पुणे पदवीधर मतदारसंघातून आमदार झालेलो असून, इतकी वर्षे मी या भागाचे प्रतिनिधित्व केलं आहे. त्यामुळे मी काय गोट्या खेळल्या का? असा सवाल केला. 

Vidhan Sabha 2019 : मुख्यमंत्री म्हणतात, नितेश राणेंना आमच्या शाळेत संयम शिकवू

खुद्द भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी अशाप्रकारचे विधान करणे हे कितपत योग्य आहे. चंद्रकांत पाटील हे भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. त्यांच्याकडे सध्या राज्याचे महसूलमंत्रिपदाची जबाबदारीही आहे. त्यांच्यावर विरोधकांकडून टीका करणं ही राजकीयदृष्ट्या चालणारी बाब असली तरीदेखील गोट्या खेळणं म्हणणं हे काही केल्या पटणारं नाही. कारण ते आजच्या घडीला भाजपच्या प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. राजकारणात आरोप-प्रत्यारोप होत असतात मात्र, नेतेमंडळींनी टीकाटिप्पणी करताना खबरदारी घेणे गरजेचे आहे.

Vidhan Sabha 2019 : तुळशीच्या लग्नासाठी ऊस मागण्याची शेतकऱ्यांवर वेळ : हर्षवर्धन पाटील

तर दुसरीकडे अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अहमदनगरचे पालकमंत्री राम शिंदे यांचं नाव न घेता निशाणा साधला. त्यावेळी अजित पवार म्हणाले, आम्ही काय असं-तसं इथं आलं आहोत का? आम्ही काय बांगड्या घातलेल्या नाहीत. ज्या गावच्या बोरी असतात, त्याच गावच्या बाभळी असतात हे दादागिरी, गुंडगिरी करणाऱ्यांनी विसरु नये, असे म्हटले. अजित पवार हेदेखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. अजित पवार यांचे हे वक्तव्य म्हणजे एकप्रकारे राजकीय संतापातून व्यक्त झाल्याचे दिसत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chandrakant Patil and Ajit Pawar react after criticism himself Maharashtra Vidhan Sabha 2019