हा तर रिॲलिटी शो

चौकार-षटकारांची तुफानी आतषबाजी... अडीचशे पार धावांचे डोंगर आणि अखेरच्या चेंडूपर्यंतचा थरार... ही आयपीएल आपण जेवढी पाहतो किंवा अनुभवतो तेवढीच ती मर्यादित राहिलेली नाही.
sunil gavaskar and virat kohli
sunil gavaskar and virat kohlisakal

चौकार-षटकारांची तुफानी आतषबाजी... अडीचशे पार धावांचे डोंगर आणि अखेरच्या चेंडूपर्यंतचा थरार... ही आयपीएल आपण जेवढी पाहतो किंवा अनुभवतो तेवढीच ती मर्यादित राहिलेली नाही, किंबहुना ठरावीक चौकटीत ठेवण्यात आलेली नाही. २००८ मध्ये जेव्हा या ‘आयपीएल’ची पहिली पताका झळकावण्यात आली तेव्हा पैसा, क्रिकेटचा थरार आणि मनोरंजन असं समीकरण होतं.

या पहिल्याच ‘आयपीएल’मध्ये हरभजनने श्रीशांतच्या श्रीमुखात भडकवली तेव्हापासून होणारे वाद हे आयपीएलचा घटक बनले, स्पॉटफिक्सिंग असो वा सट्टेबाजी... सुपर डुपर हिट चेन्नई सुपर किंग्ज आणि त्या वेळी सहमालकी असलेल्या अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या राजस्थान रॉयल या संघांना दोन वर्षांच्या बंदीलाही सामोरे जावे लागले. थोडक्यात काय, तर ‘बदनाम हुआ तो क्या हुआ नाम तो हुआ, ’ असंही या आयपीएल बाबत म्हटलं जात होतं. पण आता बघता बघता त्याच्याही पलीकडे आयपीएल गेलीय, हे कोणाला उमगलेही नसेल.

अमाप पैसा असलेली श्रीमंती-क्रिकेट-मनोरंजन-वाद यातून आता रिॲलिटी शोचं स्वरूप असलेली ही स्पर्धा झालीय. टेलिफोनच्या क्षेत्रात जसं ‘२ जी’, ‘४ जी’ आणि आता ‘५ जी’ या पद्धतीनं सारं काही झपाट्यानं बदललं तसं स्थित्यंतर होणं ही काळाची गरजच.

`ते खेळणारे अमाप पैसा कमवतात तुम्हाला टीव्हीसमोर बसून काय मिळतं ?` असा सूर जवळपास प्रत्येक घरातून कधी ना कधी आलाच असेल. पण काळ कसा बदलला पाहा, ड्रीम इलेव्हनसारखी अनेक ऑनलाइन आमिषं आली आणि ऑनलाइन आपापली टीम लावून कोटी रुपये कमावल्याची उदाहरणे आहेत. त्यासाठी क्रिकेट कळायलाच हवे असे नाही. खेळणाराही लखपती आणि पाहणाराही करोडपती या स्तरावर आयपीएल आली. पण आता त्याच्याही पलीकडे आणि सहजासहजी जाणीव न होणारा बदल घडतोय.

mahendra singh dhoni
mahendra singh dhonisakal

आज काल टीव्हीवरील रिॲलिटी शोचं महत्त्व आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचा प्रकार आयोजक, संयोजक खुबीनं करतात, सर्वच काही स्क्रिप्टेट नसतं, पण एखादा भावनिक, तणावाचा आणि एकमेकांवर चिखलफेकीचा प्रकार घडला, की त्याचं अवडंबर माजवलं जातं आणि मग त्यातून टीआरपीची गणिते अधिक व्यावसायिक केली जातात. आता तुम्ही म्हणाल याचा आणि आयपीएलचा काय संबंध ? अगदी थेट संबंध काहीच नाही. काही घटना जरूर विचार करायला लावणाऱ्या आहेत.

सुनील गावसकर आणि विराट कोहली यांच्यातील आरोप-प्रत्यारोप आणि धोनी एके धोनीचं प्रमोशन ही त्याची दोन उदाहरणं. गावसकर-कोहली वादानं ड्रामा मिळाला आणि धोनीच्या रूपानं इमोशन मिळालं, हीच खरी या रिॲलिटी शोची गंमत आहे. समालोचन करताना गावसकर यांनी विराट कोहलीच्या स्ट्राइक रेटबाबत भाष्य केलं. विराट भले यंदाच्याही स्पर्धेत सर्वाधिक धावा करून ऑरेंजकॅप धारक खेळाडू असेल, पण समालोचक म्हणून कोणीही आकडेवारी समोर ठेवून विश्लेषण करू शकतो.

बरं गावसकर काही सामान्य खेळाडू नाहीत. क्रिकेटच्या मैदानाप्रमाणे समालोचनातही त्यांचा अनुभव दांडगा आहे. त्यामुळे त्यांची केलेल्या टीकेला राग आणि संताप म्हणून पाहायचे की त्याहून आपण अधिक चांगल्या कामगिरीचे प्रत्युत्तर द्यायचे हा ज्याच्या त्याचा प्रश्न. पण पण... सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू हा पुरस्कार स्वीकारतानाचा अपवाद वगळता विराट कॅमेरा आणि माइकसमोर येत नाही.

पण गावसकर यांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी विराटने ऑन कॅमेरा प्रत्युत्तर दिले. इतपतही ठीक होते. असे प्रकार या अगोदर घडलेले नाहीत असे नाही. `हिट ऑफ दि ॲक्शन` या उक्तीप्रमाणे असे प्रकार होतात. पण गावसकर जेव्हा जेथे समालोचन करत आहोत त्याच ब्रॉडकास्टरला सुनावतात तो प्रसंग भुवया उंचावणारा होता.

बॉक्समध्ये बसून केल्या जाणाऱ्या बडबडीला मी महत्त्व देत नाही. अशांना माझ्या खेळीचे महत्त्व कळणार नाही. मैदानावर खेळणे आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये बसणे यात मोठा फरक आहे. गेली १५ वर्षे मी संघाला जिंकून देत आहे हेच माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. अशी खरमरीत टीका कोहलीने केली. पण गावसकरांचा मुद्दा वेगळाच होता. कारण सामन्यानंतरचे कोहलीचे हे भाष्य ब्रॉडकास्टर्स रिॲ लिटी शोमध्ये दाखवले जाते त्याप्रमाणे सातत्याने दाखवत होते.

त्यामुळे गावसकर यांचा संताप तीव्र झाला होता. ज्या दिवशी बंगळुरु संघाचा सामना सुरू होणार होता. विराटसह त्याचे इतर सहकारी मैदानात सराव करत होते त्याच वेळी मैदानातून प्रीव्ह्यू करताना गावसकर यांनी ब्रॉडकास्टरलाच धारेवर धरले. विराटने तुमच्या समालोचकावर टीका केलीय आणि तुम्ही तीच क्लिप वारंवार काय दाखवताय? तुम्हाला काय साध्य करायचे आहे?

गावसकर आपला त्रागा व्यक्त करत असताना बाजूला उभा असलेला दुसरा समालोचक आणि ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज फलंदाज मॅथ्यू हेडन तसेच निवेदिका मयांती लँगर अचंबित होऊन केवळ ऐकत होते... म्हणूनच स्क्रिप्टेट नसलेला हा ड्रामा आयपीएलला रिॲलिटी शोचे स्वरूप देणारा आहे का, असा संशय येणे स्वाभाविक आहे.

धोनी माहात्म्य

रिॲलिटी शोमध्ये सहभागी असलेले कलाकार त्यांच्या भावनिक कहाण्या ऐकवून डोळ्यात येणारे पाणी टीव्हीवर पाहणाऱ्यांच्या काळजाला हात घालणारे असते. त्यांना एक हीरो लागतो तसा आयपीएलच्या ब्रॉडकास्टरनी ना कोहली, ना रोहित... ४२ वर्षांचा महेंद्रसिंग धोनीच हाच आपला हीरो आहे हे ठरवून टाकले आहे. किमान दोन दिवस वेगळ्या नजरेतून टीव्हीवर सामने पाहा... धोनीच्या चेन्नईचा सामना नसला तरी कसे ना कसे तरी धोनी दर्शन व्हायलाच हवे.

बॉलिवूड असो वा टॉलिवूड रजनीकांतची जेवढी क्रेज तेथे नाही तेवढी धोनीची क्रेज आयपीएलमध्ये निर्माण करण्यात आली आहे. अखेरचे काही चेंडू खेळण्यासाठी तो मैदानात येतो काय पण अख्खा माहोल बदलला जातो. सामना नसला तरी धोनी सराव करतानाचे फुटेज दाखवले जातात. धोनी गया नही और भी खेल रहा है ! असेच जणू काही बिंबवले जातेय. सत्य परिस्थिती अशी आहे, धोनी जोरात धावू शकत नाही त्याच्या पायाचा स्नायू फाटला आहे.

डॉक्टरांनी मनाई करूनही तो संघासाठी खेळतोय. गेल्या वर्षी गुडघा दुखावलेला असतानाही तो खेळत राहिला. आता वय वर्षे ४२ कदाचित ही त्याची अखेरची स्पर्धा असेल आणि तसे झाले तर नवा हीरो शोधावा लागेल... रिॲलिटीचा शो मस्ट गो ऑन...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com