स्पर्धा परीक्षांसाठी परिपूर्ण मार्गदर्शक

Sakal-Sanyukt Combined
Sakal-Sanyukt Combined

पोलिस उपनिरीक्षक, विक्रीकर निरीक्षक, कक्ष अधिकारी आदी पदांकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणार्‍या पूर्व आणि मुख्य परीक्षांसाठी सकाळ प्रकाशनानं ''सकाळ संयुक्त (Combined) PSI-STI-ASO पूर्व आणि मुख्य परीक्षा'' हे परिपूर्ण मार्गदर्शक प्रसिद्ध  केले आहे. हे पुस्तक स्पर्धापरीक्षार्थींकरिता एक दीपस्तंभ आहे ! सर्व जहाजांना योग्य दिशेने, नियोजित ठिकाणी पोहोचण्यासाठी ज्याप्रमाणे दीपस्तंभ अविरत मदत करतो, अगदी तसेच ‘सकाळ संयुक्त’ स्पर्धा परीक्षार्थींना त्यांच्या उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यासाठी खचितच उपयुक्त ठरेल, असे जाणवल्याशिवाय राहत नाही.

या पुस्तकाची रचना अतिशय विचारपूर्वक केली असून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिलेल्या अभ्यासक्रमाबरहुकूम सर्व विषयांची मांडणी ही त्या त्या विषयातील तज्ज्ञ, नामवंत व्यक्तींकडून विशेषत्वाने करून घेण्यात आली आहे. ज्ञानाधारित परीक्षा विभागाव्यतिरिक्त पोलीस उपनिरीक्षक पदासाठी लागणार्‍या शारीरिक तंदुरुस्तीची मानके, त्यासंबंधी गुणवितरणाचा पुरुष व महिला उमेदवारांकरिताचा तक्ता,  गुण वितरण पद्धती व त्यात प्रावीण्य मिळविण्यासाठी करावयाच्या सरावासंबंधी अत्यंत मुद्देसूद व ओघवत्या भाषेतील परिशिष्ट हे या पुस्तकाचे एक वैशिष्ट्य मानता येईल. याचा उमेदवारांना नक्कीच फायदा होऊ शकतो. 

या पुस्तकात अभ्यासक्रमानुसार मराठी, इंग्लिश, महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचा भूगोल, अर्थशास्त्र, अंकगणित,  सामान्य विज्ञान, मानवी हक्क व जबाबदार्‍या, भारतीय राज्यघटना,  पंचायत राज या दहाही विभागांत त्या त्या विषयाची अतिशय सुसंगत मांडणी केलेली आहे. प्रत्येक विषयातील महत्त्वाचे घटक योग्य तर्कानुसार क्रमवार लावून प्रत्येक घटकाची संरचना समजावयाला सोप्या अशा पद्धतीने करून दिलेली आहे. उदाहरणच  द्यायचे तर अंकगणित या विभागाची एकूण ३८ घटकांत विभागणी केलेली आहे व प्रत्येक घटकाची संकल्पना, उपयोग, उदाहरणे, सरावासाठीची उदाहरणे, गणितीय रीतीपद्धती यांचा सांगोपांग ऊहापोह करून स्वतंत्रपणे सरावप्रश्‍न अशी मांडणी केली आहे. सर्व विभागांतील सराव प्रश्‍नांच्या उत्तरपत्रिका पुस्तकाच्या अखेरच्या भागात दिल्या आहेत. एखादा विभाग अभ्यासताना त्या त्या विषयाच्या सततच्या वाचनाने येणारा काहीसा ताण कमी करण्याच्या हेतूने पुस्तकात सरकारनं नजीकच्या भूतकाळात घेतलेले महत्त्वाचे निर्णय, विविध निवडणुकांचे निकाल, आदी विषयांची माहिती मोठ्या खुबीने वेगवेगळ्या विभागांत, आकर्षक चौकटींच्या माध्यमातून सादर केली आहे, जेणेकरून परीक्षार्थी विषयाचा सखोल अभ्यास तर करतीलच, पण त्याचबरोबर अन्य महत्त्वाच्या बाबीसुद्धा त्यांच्या वाचनात येऊन एकाच वेळी अनेक बाबींचा अभ्यास करण्याची सवयही सहजतेने साध्य होईल. परीक्षार्थींकरता हे एक उपयुक्त कौशल्य ठरू शकते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

इंग्लिश विभागात सामान्य शब्दसंपत्तीचे महत्त्व, इंग्लिश शिकण्याची पद्धती, इंग्लिश भाषेचे माहात्म्य येथून सुरुवात करून वाक्यरचना, Active /Passive Voice अशा विविध नऊ घटकांत सोदाहरण विवेचन केले आहे. वास्तविक पाहता अशा मांडणीचा उपयोग स्पर्धापरीक्षार्थीला तर होईलच, परंतु माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांनाही याचा खूप फायदा होऊ शकेल व त्या भाषिक कौशल्यात मोलाची भर पडण्यास मदत होईल. सामान्य विज्ञान विभागात भौतिक शास्त्रातील चुंबकत्व, ध्वनी, प्रकाश, उष्णता आदी घटक, रसायनशास्त्रातील आम्ल/आम्लारी पदार्थ, संयुगे/मिश्रणे/क्षार, मूलद्रव्ये आदी घटक, तसेच जीवशास्त्र, सूक्ष्म जीवशास्त्र यांतील महत्त्वाचे घटक रोचक पद्धतीने मांडले आहेत.

नागरिकशास्त्र या विभागांतर्गत त्रिस्तरीय पंचायत संस्था, राज्यघटना, मानवी हक्क व जबाबदार्‍या यासंबंधी सविस्तर विवरण देण्यात आले आहे. त्यातील बारकावे व कळीचे मुद्दे उत्तमरीत्या समजावून देण्यात आले आहेत. महाराष्ट्राचा इतिहास व महाराष्ट्राचा भूगोल या विभागांत नेमकेपणाने महाराष्ट्राची ऐतिहासिक व भौगोलिक पार्श्वभूमी व त्यांतील विविध घटकांचे महत्त्व योग्यरीतीने अधोरेखित केले आहे.

अर्थशास्त्र विभागात अर्थशास्त्रातील राष्ट्रीय उत्पन्न, दारिद्य्ररेषा, चलनवाढ इत्यादी मूलभूत संकल्पना यांसंबंधीची अद्ययावत आकडेवारी व त्यांचा दैनंदिन जीवनाशी येणारा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध परिणामकारकरीत्या उलगडून दाखविला आहे. याप्रमाणे विविध अभ्यासविषयांच्या मांडणीव्यतिरिक्त महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम, संगणक, माहिती व तंत्रज्ञान, माहितीचा अधिकार अधिनियम या सर्वसामान्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या बाबींवर कलमवार माहिती संकलित स्वरूपात परिशिष्टात देण्यात आली आहे.

तसेच पोलिस उपनिरीक्षकांच्या व अन्य परीक्षार्थींकरिता पोलीस अधिनियम, भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता, भारतीय पुरावा कायदा यांसंबंधी सविस्तर माहितीही समाविष्ट करण्यात आली आहे. या मार्गदर्शकाच्या साहाय्याने स्पर्धापरीक्षार्थी यशाचा सोपान सोपेपणाने सर करू शकतील असा विश्वास वाटतो.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com