धसुडी : इथं आहेर द्यायलाच हवा...

कष्ट करून करून काळवंडलेल्या त्याच्या चेहऱ्यावर कर्जाच्या चिंतेला गाडून लेकीच्या लग्नाचं समाधान दिसत होतं.
धसुडी : इथं आहेर द्यायलाच हवा...
धसुडी : इथं आहेर द्यायलाच हवा...esakal

प्रा.विशाल गरड vishalgarad.18@gmail.com

एका शेतकऱ्याच्या मुलीचं लग्न होतं. बापाची ऐपत नव्हती तरीही पाहुणे रावळ्यांना उसनेपासने मागून, पीक कर्ज घेऊन त्यानं लग्नाची तयारी केली. मंडपानं अंगण सजलं, लेकीला रुखवत देण्यासाठी बापाच्या घरात ज्यातली एकही वस्तू नव्हती ती त्यानं लेकीसाठी आणली. मिळेल ते काम करण्यासाठी, रोजंदारीवर जाणारा कष्टकरी बाप लग्नात मात्र नव्या कपड्यांनी सजला. कष्ट करून करून काळवंडलेल्या त्याच्या चेहऱ्यावर कर्जाच्या चिंतेला गाडून लेकीच्या लग्नाचं समाधान दिसत होतं. लग्नाला आलेल्यांचं तो हात जोडून स्वागत करत होता. जेवणासाठीही आदल्या रात्रीच बुंदी पाडून ठेवली होती, गल्लीतल्या आयाबायांनी मिळून पाचसहाशे चपात्या लाटल्या होत्या. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर भात, भाजी करून जेवण तयार झालं होतं. आता वऱ्हाडी मंडळींना फक्त मंगलाष्टकांच्या शेवटच्या ओळीची उत्कंठा लागून राहिली होती. मंगलाष्टकांच्या ओळी संपल्या आणि बसल्या ठिकाणी लगेच चार ओळीत पंगती बसल्या.

धसुडी : इथं आहेर द्यायलाच हवा...
Nashik News : जिल्ह्यात एक हजार 73 उद्योजकांना उभारी; उद्योग केंद्राच्या माध्यमातून 50 कोटींची गुंतवणूक

मुलीच्या बापाच्या मित्रानं लगबगीनं खिशातला कागद काढला. सोबतीला अजून एक जण घेऊन त्यांनी रुखवतातला एक डबा उचलला आणि मंडपाच्या एका खांबाजवळ मुलीकडचा आहेर स्वीकारण्यासाठी यादी करायला बसला. सर्वांनी आहेर करण्यासाठी त्यांच्याजवळ गर्दी केली. मुलीचा बाप पंगतीत फिरत होता, कुणाला काय हवं नको विचारत होता. माणसांच्या दोन आणि बायांची एक अशा तीन पंगती उठल्या. लग्नाचे सगळे विधी उरकले.

धसुडी : इथं आहेर द्यायलाच हवा...
Nashik News : जिल्ह्यात एक हजार 73 उद्योजकांना उभारी; उद्योग केंद्राच्या माध्यमातून 50 कोटींची गुंतवणूक

पाठवणीच्या क्षणाला हुंदका गिळून धीरोदात्त बापानं लेक सासरी पाठवली. पाहुणे-रावळे निघून गेले, मंडप रिकामा झाला. त्याच मंडपातल्या स्टेजच्या पायरीवर बसून त्यानं सुटकेचा निःश्वास सोडला. खिशातली देणेकऱ्यांची यादी काढली आणि त्यांचे राहिलेले पैसे कधी आणि कसे फेडायचे याचा विचार करत बसला. एवढ्यात त्याचा मित्र आहेराचा डबा घेऊन आला आणि त्याच्या हातात आहेराची यादी टेकवत म्हणाला, ‘‘हा घ्या तुमचा आहेर, हिशोब करून दिलाय. मोजून घ्या,’’ पैशाची नितांत गरज असतानाच आहेररूपी आलेल्या या धनाची घोडेवाला, बँडवाला, मंडपवाला, किराणावाला आणि फर्निचरवाल्याचे पैसे चुकते करायला मोठी मदत झाली. सर्वांच्या थोड्या थोड्या मदतीनं शुभ कार्य पार पडलं. एक गरिबाची पोर सुखानं नांदायला गेली.

धसुडी : इथं आहेर द्यायलाच हवा...
Dhule Drought News : यंदा 1972 च्या दुष्काळाची आठवण होतेय ताजी; चाऱ्यासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर

काही श्रीमंत मंडळी ‘आहेर देणं-घेणं नाही’, ‘उपस्थिती हाच आहेर’, असं अभिमानानं पत्रिकेवर छापतात, ते योग्यही आहे. परंतु गरीब शेतकरी कुटुंबाच्या अशा लग्नात मात्र आपण आवर्जून आहेर करायलाच हवा. मुलीच्या बापानं अतिशय काबाडकष्ट करून पै पै गोळा केलेली असते. पोरीच्या सुखासाठी हा शेतकरी बाप त्याच्या आयुष्यातली बहुतांशी मुद्दल खर्च करीत असतो. अशावेळी आहेर संस्कृतीमुळे त्यांना वऱ्हाडी मंडळींचा थोडाफार आर्थिक हातभार लाभतो. लग्न, दवाखाना आणि बांधकाम या तीन गोष्टींत प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीच्या आर्थिक परिस्थितीवर ताण येत असतो.

धसुडी : इथं आहेर द्यायलाच हवा...
Nashik News : कोट्यधीश माजी आमदार गावितांच्या संपत्तीत अल्पशी वाढ; 5 वर्षांत अवघ्या 13 लाखांची भर

त्यात आता दवाखान्यासाठी मेडिक्लेम आलंय, तर घर बांधण्यासाठी होमलोन आहे पण अजून तरी कोणतीच बँक मुलीचं लग्न करण्यासाठी कर्ज देत नाही म्हणून बहुतांशी ग्रामीण भागातील शेतकरी बापाला शेतावर कर्ज काढून मुलीचे लग्न करावं लागतं, हे कटू सत्य आहे.आजही ग्रामीण भागात लग्नानंतर आहेराची यादी वाचून दाखवण्याची पद्धत आहे. कधी काळी अकरा रुपयाचा आहेर आता महागाईच्या काळात एकशे एक रुपयांपर्यंत येऊन ठेपलाय, अशातही आपला शे-पाचशे रुपयांचा आहेर एखाद्याचा संसार उभा करण्यासाठी कारणीभूत ठरू शकतो. म्हणूनच ज्या लग्नात लाखो-करोडोंची उधळपट्टी होते, अशा लग्नात आहेर देणं आवर्जून टाळा पण गोरगरीब शेतकरी जर त्याच्या मुलीचं लग्न करत असेल, तर त्या लग्नात आवर्जून आहेर करा.

एकीकडं अंबानीच्या मुलीच्या लग्नाची एक पत्रिका तीन लाख रुपयांची असते. तर दुसरीकडं पोरीचं लग्न उरकण्यासाठी एक शेतमजूर बाप पन्नास-साठ हजार रुपयांवर सालगडी म्हणून वर्षभर काम करत असतो. हेच आपल्या भारताचं वास्तव आहे. गरिबी आणि श्रीमंतीतली ही दरी आपण बदलू शकत नाही, फक्त योग्य ठिकाणी योग्य वेळी केलेली आपली छोटीशी मदत एखाद्याचा संसार उभा करू शकते, हे नक्की.

(लेखक हे प्रसिद्ध व्याख्याते आणि इतिहासाचे व विविध सामाजिक घडामोडींचे अभ्यासक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com