esakal | ‘ट्रीपल टी’ : कोरोनाला रोखण्याचा 'जळगाव पॅटर्न'!
sakal

बोलून बातमी शोधा

Coronavirus

कोरोनाची दुसरी लाट उग्र रुपात थैमान घालत असताना त्याला तोंड देण्याचे काही प्रयत्न स्थानिक पातळीवर चांगल्या रीतीने होत आहेत. जळगाव जिल्ह्यातील अशा प्रयत्नांची ही माहिती प्रेरक आणि अनुकरणीय ठरू शकते.

‘ट्रीपल टी’ : कोरोनाला रोखण्याचा 'जळगाव पॅटर्न'!

sakal_logo
By
देवीदास वाणी

कोरोना महासाथीविरुद्धच्या युद्धात कोरोना बाधितांच्या शोध घेवून त्यांना लवकरात लवकर उपचार करणे अर्थात ‘ट्रेस, टेस्ट आणि ट्रीट’ ही त्रिसूत्री अवलंबिल्यानेच बाधितांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढता येणे शक्य झाले. जिल्हा रुग्णालयाची नकारात्मक प्रतिमा दूर करून आता अत्याधुनिक सुविधा देणारे सरकारी कोविड रुग्णालय असे नावारूपास आणले आहे.

गतवर्षी कोरोना महासाथीसोबत जोरदार युद्ध सुरू झाले. त्यावेळी जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णांची झालेली फरफट, वृद्धेच्या सात दिवसांनी रुग्णालयातील स्वच्छतागृहात सापडलेल्या मृतदेहामुळे रुग्णालयाची लक्तरे देशाच्या वेशीवर टांगली गेली. साथीच्या काळात कोरोना बाधितांचे सर्वाधिक मृत्यू जळगाव जिल्ह्यात झाले. वैद्यकीय महाविद्यालयाच्या तत्कालीन अधिष्ठातांसह पाच डॉक्टर निलंबित झाले.

हेही वाचा: 'व्हेंटिलेटरपेक्षा मास्क बरा'; अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितला फंडा!

तत्कालीन जिल्हाधिकाऱयांची बदली झाली. त्यानंतर सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत यांनी जिल्हाधिकारीपदाची सूत्रे स्वीकारली. आता कोरोनाला तोंड देण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम आहे, यंत्रणेकडे पुरेशा सुविधाही आहेत, कमतरता आहे ती मनुष्यबळाची. राऊत यांनी रुग्णालयात अचानक तपासणी करणे, रुग्णांना योग्य उपचार (ट्रीटमेंट), जेवण-नाश्‍ता, इंजेक्शन मिळाले की नाही याची विचारपूस करण्याचा धडाका लावला. त्यामुळे रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱयांत धाक निर्माण होऊन सुविधा देण्यात तत्परता आली.

मृत्यूदरावर नियंत्रण

रुग्णांसह खासगी, सरकारी डॉक्टरांना विश्वासात घेत, प्रत्येक समस्येवर नावीन्यपूर्ण उपाय शोधत मृत्युदरावर नियंत्रण मिळवले. या उपाययोजना सध्याच्या लाटेतही दिलासादायक आहेत. जूनमध्ये जिल्ह्यातील कोरोना मृतांचा आकडा धक्कादायक होता. वेळेवर उपचाराअभावी रुग्ण दगावायचे. जिल्हाधिकारी राऊत यांनी तज्ज्ञांचा टास्क फोर्स बनवला. वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा रुग्णालयातील डाॅक्टर्स, खासगी रुग्णालये आणि स्वयंसेवी संस्था अशा सगळ्यांशी संवाद, समन्वयातून मृत्युदर घटवण्यात यश मिळविले.

हेही वाचा: महाराष्ट्रात कोरोनाचं तांडव, प्रत्येक तीन मिनिटाला एकाचा बळी

जळगावातील डॉ. उल्हास पाटील रुग्णालय, इकरा युनानी महाविद्यालय, देवकर महाविद्यालय कोरोना बाधितांसाठी अधिग्रहीत केले. जिल्हा कोविड रूग्णालयात बेड फुल्ल झाल्यानंतर इतर अधिग्रहीत रुग्णालयात उपचार सुरू झाले. खासगी रूग्णालयांनाही कोरोनाच्या रूग्णांवर उपचारास परवानगी दिली. त्यामुळे जिल्हा रुग्णालयावरील ताण काहीसा घटला. जिल्हा पातळीवर तज्ज्ञ डॉक्टरांचा टास्क फोर्स नेमला. दररोज त्यांच्याकडून अभ्यासपूर्ण, व्यवहार्य उपाय मिळाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनाही त्यानुसार तात्काळ निर्णय घेता आले. समस्यांचे निराकरण अचूक व वेगवान झाले.

‘बेडसाइड असिस्टंट’ उपक्रम

रुग्णाचे अपघात टाळण्यासाठी बेडसाइड असिस्टंट ही नवी कल्पना जिल्ह्यात राबविली. कंत्राटी स्वरूपात ही विशेष टीम कोरोना रुग्णालयांमध्ये तयार करण्यात आली. त्यातून रुग्णांना अडचणी आल्यास त्याचे जागेवरच निराकरण व्हायचे किंवा तात्काळ डॉक्टरांना माहिती देवून उपचार सुरू केले जायचे.

हेही वाचा: 'देशात युद्धासारखी स्थिती...' संजय राऊतांनी केली मोठी मागणी

खासगी डॉक्टरांचा सहभाग

खासगी डॉक्टरांशी बोलून त्यांच्याकडून संशयित असलेल्या रुग्णांची माहिती घेतली गेली. त्यामुळे त्यांची चाचणी करून ते बाधीत आढळले तर त्यांना दाखल करून उपचार करण्यात आले. एक रुग्ण आढळला तर त्याच्या संपर्कातील २० जणांची तपासणीची मोहीम राबवल्याने अनेक रुग्ण सापडले. रुग्णांना आवाहन केले की ‘लक्षणे दिसताच चाचणी करा, दाखल व्हा, उपचार करा व लवकर बरे होवून घरी जा.’ दुसरीकडे, ‘लवकर आले तर बरे व्हाल, उशिरा आले तर उपचारास उशिर झाल्याने काहीही होऊ शकते,‘ अशी जाणीव करून दिली. दुसऱ्या लाटेत जिल्ह्यातील बंद केलेली सर्व सीसीसी, डीसीएचसी, डीएससी सेंटर सुरू झाली. सर्व ठिकाणी ऑक्सीजन, औषधांचा साठा वाढविला.

मोहाडीत पाचशे खाटांचे रुग्णालय

जळगावजवळील मोहाडी येथे ५०० खाटांचे रुग्णालय तयार होत आहे. त्यात २०० बेड ऑक्सिजनचे तर ३०० बेड सीसीसी सेंटरचे असतील. तूर्त ८० ऑक्सिजनचे बेड कार्यान्वीत आहेत. १०० बेड सामान्य रुग्णांसाठी आहेत. जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्लांटच उभारल्याने स्वस्तात रुग्णांच्या बेडसपर्यंत अल्पदरात ऑक्सिजन पोचत आहे. आरेाग्य यंत्रणा सक्षमीकरणासाठी आतापर्यंत दीडशे कोटीवर खर्च सरकार, जिल्हा नियोजन समिती व लोकसहभागातून केला. आता वाढत्या रुग्णसंख्येमुळे कर्मचारी वर्गाची कमतरता जाणवते आहे. तथापि, तालुकास्तरावर सीसीसी सेंटर, डीसीसीसी सेंटर सुरू केले. तेथे लोकसहभागातून ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर, सॅनिटायझर, पीपीई किट उपलब्ध केले. जेणेकरून तालुक्यातील रुग्णांवर तालुक्यातच उपचार होतील.

Abhijit Raut, अभिजीत राऊत, जिल्हाधिकारी, जळगाव

Abhijit Raut, अभिजीत राऊत, जिल्हाधिकारी, जळगाव

टास्क फोर्स, जिल्हा परिषद सीईओ, जिल्हा शल्यचिकित्सक, जीएमसीचे अधिष्ठाता, डॉक्टर्स, सामाजिक संघटना, आयएमए यांचे योगदान मोलाचे आहे. ‘ट्रीपल टी’ हेच सूत्र रुग्णांच्या शोधापासून तातडीचे उपचारापर्यंत लागू केल्याने परिस्थितीवर मात करता आली.

- अभिजीत राऊत, जिल्हाधिकारी, जळगाव