आपला अमूल्य वारसा

आरोग्य क्षेत्रामध्ये रोज नवीन बदल होत असतात. नवनवीन उपकरणे येत असतात. नवीन सुविधा व वाढत्या रुग्णांच्या सोयीसाठी व अशा विकासकामांसाठी नव्या इमारतींची उभारणी काळाची गरज आहे.
Hospital
Hospitalsakal

- डॉ. अविनाश सुपे

आरोग्य क्षेत्रामध्ये रोज नवीन बदल होत असतात. नवनवीन उपकरणे येत असतात. नवीन सुविधा व वाढत्या रुग्णांच्या सोयीसाठी व अशा विकासकामांसाठी नव्या इमारतींची उभारणी काळाची गरज आहे. अर्थात, जुन्या वास्तूंचे ऐतिहासिक महत्त्व जपून. लंडन, जर्मनी अशा मोठ्या प्राचीन शहरांमध्ये वारसा उत्तम प्रकारे जतन केला आहे. त्याप्रमाणे आपण परळ भागातल्या केईएम, वाडिया रुग्णालय, तसेच जे. जे. रुग्णालय या आपल्या ऐतिहासिक वास्तूंचे मोल जाणले पाहिजे.

के. ई. एम. रुग्णालयात अधिष्ठाता पदावर काम करत असताना वैद्यकीय महाविद्यालय आणि १९५० बेड्सचे रुग्णालय आणि त्याअनुषंगाने येणाऱ्या नानाविध जबाबदाऱ्या सांभाळताना एक आणखी आणि अत्यंत महत्त्वाची जबाबदारी म्हणजे के. ई. एम. रुग्णालयाच्या एकूण १०५ लहान-मोठ्या वास्तूंची देखभाल.

केईएमसारख्या कॅम्पसमध्ये एकूण १०५ छोट्या-मोठ्या वस्तू आहेत, हे मला २००५ मध्ये कळले. या इमारती १९२५ पासून २०१५ पर्यंतच्या अशा विविध काळातील आणि वेगळे बांधकाम साहित्य वापरून तयार केलेल्या आहेत.

१९७४ मध्ये वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेताना के. ई. एम.च्या प्रवेशद्वाराशी थांबून या पवित्र वास्तूचे भव्य रूप पाहून भारावून गेलो होतो. दगडी इमारती, उंच छत त्या वास्तूंची प्रसन्नताच तुमचे मन मोहून टाकते.

खरे तर के. ई. एम. रुग्णालय १९२५ मध्ये सुरू झाले, म्हणजे या वास्तू त्यापूर्वीच्या. मालाड क्वारी स्टोन या अग्निजन्य खडकापासून बनवलेल्या लोड बेअरिंग इमारती आहेत. इंडो सरकासेमिक वास्तुशास्त्र यात आहे. युरोपमध्ये थंडी असते, गरमी नसते. तिथल्या इमारती उंच असतात व त्यांना एक प्रकारचा कोन असतो.

या वास्तुशास्त्रानुसार बांधलेल्या इमारती समशीतोष्ण असतात, परंतु इस्तंबूल, तुर्कस्तान किंवा उत्तर भारतात किल्ले, ताजमहाल यावर घुमट असते, त्याला इंडो रोमन पद्धती म्हणतात. त्यामुळे तेथील गर्मी कमी होते.

१९२६ च्या चित्रांप्रमाणे वैद्यकीय महाविद्यालयाची इमारत तळमजला + २ मजले आणि रुग्णालय इमारत तळमजला + १ मजला अशी होती. त्यावर घुमट होते. १९५० च्या आसपास जेव्हा गरज वाढू लागली तेव्हा घुमट काढून वर मजले वाढवण्यात आले. घुमट काढले तरी इमारती उंच आणि प्रशस्त असल्यामुळे या पवित्र वास्तूमध्ये कधीही गरम होत नाही.

महाविद्यालयात व्याख्यानांसाठी-लेक्चर थिएटर ही वेगळी इमारत आहे. ती उंच छत असलेली इमारत अत्यंत हवेशीर आणि प्रसन्न आहे. या भव्य वास्तूचेसुद्धा आर्किटेक्चर फार उत्तम आहे. जेव्हा या वास्तूंना ७५ वर्षे झाली, तेव्हा लक्षात आले, की या वारसावास्तूंची जपणूक योग्य पद्धतीने होत नाही.

या इमारतींच्या आजूबाजूची जागा, वसतिगृहे याच पद्धतीने बांधलेली आहेत. या वास्तूंची देखभाल हे एक जिकिरीचे काम आहे. हा अमूल्य वारसा आहे आणि याची एका ठराविक पद्धतीने दुरुस्ती करावी लागते. केईएमच्या वास्तू या हेरिटेज इमारती आहेत, त्यामुळे त्यांना हात लावण्याआधी हेरिटेज समितीकडे जावे लागते.

त्यामुळे त्या वेळचे अधिष्ठाता हेरिटेज समितीकडे योग्य दुरुस्तीसाठी परवानगी मागण्यासाठी गेले आणि सर्व प्रक्रिया पूर्ण करून दुरुस्ती काम २००५ मध्ये सुरू झाले. आमच्याकडे भट्टी लावण्यात आली आणि २००६ मध्ये पुनर्बांधणी व दुरुस्ती सुरू झाली. आज २०-२२ वर्षे झाली तरी ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे.

आरोग्याच्या औषध आणि शस्त्रक्रिया या सर्व क्षेत्रांमध्ये मूलभूत काळजी आणि प्रगत उपचार सुविधा प्रदान करणाऱ्या या दोन्ही संस्थांमध्ये रुग्णांचा इतका जास्त ओघ असतो, की कुठलाही वॉर्ड रिकामा करणे अत्यंत कठीण होते.

मधला भाग पडून वजन सहन करणारी रचना करणे, भिंतीमधला चुना काढून पुनर्बांधणी करणे मोठे जिकिरीचे काम आहे. त्यामानाने महाविद्यालय आणि वसतिगृहाचे काम लवकर झाले.

मला आठवते हेरिटेज समितीच्या परवानगीने एक जुने वसतिगृह आम्ही तोडले आणि अत्यंत गरज असलेले मोठे वसतिगृह बांधण्यासाठी परवानगी नाकारण्यात आली. आम्ही खूप पर्याय सुचवले. हेरिटेज लुक तसाच ठेवण्याचाही विश्वास दिला.

सतत वाढणाऱ्या विद्यार्थीसंख्येमुळे भेडसावणारी वसतिगृहाची समस्या मांडली. आजूबाजूच्या जागा उपलब्ध नसल्यामुळे केईएम रुग्णालय फक्त उंच वाढू शकते. मग पाच उंच मनोरे बनवायचे ठरले. त्यातील एक पूर्ण झाला आणि दुसरा होऊ घातला आहे.

केईएमच्या अधिष्ठात्यांच्या कार्यालयातील दरवाजे भव्य आहेत व त्याला पूर्वीच्या काळातील पितळेच्या कड्या व कुंड्या आहेत. पॉलिश केल्यानंतर त्या अजूनही मोहक दिसतात. मी असताना कार्यालयात सुंदर मोठे टेबल होते.

१९२५ मध्ये रॉबर्टस नावाच्या ब्रिटिश इंजिनिअर्सने ते टिक लाकडापासून बनवले होते व ते खूप जड होते. असे अजून काही टेबल रुग्णालयात होते. पुनर्बांधणी करताना हे टेबल काढले गेले. त्याऐवजी तकलादू टेबल आले. मला याचे खूप दुःख आहे. या वास्तूमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने या ऐतिहासिक वारशांचे भान ठेवले पाहिजे.

आरोग्य क्षेत्रामध्ये रोज नवीन बदल होत असतात. नवनवीन उपकरणे येत असतात. नवीन सुविधा व वाढत्या रुग्णांच्या सोयीसाठी व अशा विकासकामांसाठी नव्या इमारतींची उभारणी काळाची गरज आहे. अर्थात, जुन्या वास्तूंचे ऐतिहासिक महत्त्व जपून.

लंडन, जर्मनी अशा मोठ्या प्राचीन शहरांमध्ये आपण पाहतो त्यांनी आपला वारसा उत्तम प्रकारे जतन केला आहे. त्याप्रमाणे आपण परळ भागातल्या केईएम, वाडिया रुग्णालय, तसेच जे. जे. रुग्णालय या आपल्या ऐतिहासिक वास्तूंचे मोल जाणले पाहिजे.

डॉ. मनू कोठारी यांच्यापासून प्रेरणा घेऊन आमच्या हॉस्पिटलने, हॉस्पिटलचा इतिहास जतन करण्यासाठी एक लहान खोली तयार केली आहे, जिथे सर्व मौल्यवान, ऐतिहासिक कागदपत्रे आणि उपकरणे जतन केली आहेत. डॉ. लोपा मेहता यांनी हे सर्व कष्ट करून उभे केले आहे. त्यांचे किती आभार मानावे तेवढे थोडेच.

(लेखक केईएम रुग्णालयातून अधिष्ठाता पदावरून निवृत्त झाले असून, त्यांचे ‘सर्जन’शील हे पुस्तक प्रकाशित झाले आहे.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com