Latest Marathi Article | पंख सकारात्मकतेचे : जगण्याचा आनंदोत्सव! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Family

पंख सकारात्मकतेचे : जगण्याचा आनंदोत्सव!

लेखक : डॉ. हेमंत ओस्तवाल

आपल्या स्वतःचे आरोग्य ही प्रत्येक मानवाची अनमोल अशी संपत्ती आहे. जी एकदा हरवली तर आयुष्यच अवघड होऊन बसते. मग एक तर तडजोड करीत आयुष्य जगायला लागते. दुर्दैवाने काही प्रसंगांमध्ये तर आपण आपल्या जिवालादेखील मुकतो. मागच्या लेखामध्ये आपण अनुभवले, की सकारात्मकतेने सुयश जीवघेणा हार्टअॅटॅक येऊनदेखील अगदी व्यवस्थित निरोगी निरामय आयुष्य आनंदाने जगतो आहे.

त्याच वेळी नकारात्मकतेमुळे गौतम शेवटी मृत्युमुखी तर पडलाच; परंतु शेवटची दोन-तीन वर्षे तडजोड करीत जेमतेम त्याने काढली. सकारात्मकता आणि नकारात्मकता आपल्या आयुष्यावर अप्रत्यक्षपणे खूपच जास्त प्रभाव टाकत असते. आज आपण तेच कसे घडते याचा आपण अनुभव घेणार आहोत.

अनेक लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे आजार होत असतात. त्यातील काही प्रासंगिक असतात. जसे की अपघात, जळीत, व्हायरल असे असतात, काही वयोमानाप्रमाणे होत असतात, काही संसर्गजन्य रोग्यांच्या संपर्कात आल्याने, तर काहींना कॅन्सरसारखे आजारदेखील होत असतात; परंतु या आजारांमधून जेव्हा रिकव्हरी होते ती सर्वांचीच सारखे असते का? नाही! सारखी होत नाही हे अगदी खरे आहे; परंतु असे का? Why?? हा जो ‘का’ आहे किंवा why आहे याच्या मुळाशी आपण गेलो तर मला विश्वास नव्हे, तर खात्री आहे, की आपल्याला जणू काही सुखी, आनंदी, निरामय आरोग्याचे रहस्यच उलगडेल! (Dr Hemant Ostwal saptarang Latest Marathi Article on Celebration of Life Nashik News)

हा सर्व विषय समजून घेण्याकरिता आपण काही उदाहरणे घेऊ या. त्यात पहिले उदाहरण म्हणजे वय वर्षे ५६ असलेल्या मंजिरी नावाच्या महिलेचे. हे सर्व प्रकरण समजून घेण्याकरिता आपल्याला मंजिरीचा पूर्वेतिहासदेखील जाणून घ्यायला लागेल. मंजिरीचे लग्न झाल्यापासून तर आजतागायत सारखे काही ना काही आजार तिला होतच आले; परंतु त्यातल्या त्यात गेल्या तीन वर्षांत आजारांचा विक्रम जो मंजिरीने केला आहे तो समजून घ्यायला लागेल.

गेल्या तीन वर्षांपासून असा क्वचितच एखादा आजार कोविडसह की जो मंजिरीला झाला नाही. गेल्या तीन वर्षांत प्रत्येक महिन्यामध्ये मोजूनमापून दोन ते चार दिवस मंजिरीची प्रकृती चांगली असते, अन्यथा रोजच काही ना काही तिचे दुखत असते. मंजिरी येथून लांब म्हणजे जवळपास २०० किलोमीटरवर राहते; परंतु तिचे माहेर नाशिकला असल्याकारणाने आणि माहेरीच घरचे डॉक्टर असल्याकारणाने बहुसंख्य वेळा तिचे संपूर्ण उपचार नाशिकमध्येच होत असतात. मग बऱ्याच वेळेला हे उपचार टेलिफोनिक ट्रीटमेंट देऊनदेखील होत असतात.

मंजिरी गेल्या तीन वर्षांत हायपरटेन्सिव झाली आहे. साखरेने तर मंजिरीच्या शरीरात कधीच पदार्पण केले आहे. नुसतेच पदार्पण नव्हे, तर साखरेची मजबूत हजेरी ज्या ज्या वेळी रक्ततपासणी केली असेल त्या वेळी मिळून आलेली आहे. विषय फक्त ब्लडप्रेशर किंवा साखर इतकाच मर्यादित नव्हता. साथीचे येणारे कुठलेही आजार असो जसे की व्हायरल फीव्हर त्यामध्ये स्वाइन फ्लू, कोविड-१९ असे सर्व आजार तिला झालेच होते आणि आजही होत असतात.

कित्येक वेळा मंजिरीला दरदरून थंडगार घाम, छातीमध्ये दुखणे, सोबत हातांमध्ये दुखणे, जी लक्षणे हृदयविकाराचीदेखील असू शकतात अशी लक्षणेदेखील कित्येक वेळा आली. मोठा हार्टअॅटॅक सुदैवाने आतापावेतो तरी आलेला नाही. गेल्या तीन ते पाच वर्षांत तपासण्यांचादेखील अखंड मारा सुरूच आहे. कित्येक वेळा काहीही आजार सापडत नाही. मग हे सर्व प्रकरण मंजिरीच्या भावाकडून म्हणजे भालचंद्रकडून माझ्याकडे आले.

ही सर्व माहिती मी मंजिरीशी बराच वेळ बोलून घेतली. मग बोलता बोलता मी ‘असे का why’ च्या खोलात जाण्याचा प्रयत्न केला. पहिल्या प्रयत्नात फारसे यश आले नाही. मग मी माझा नेहमीचा वेगळा फॉर्म्युला वापरला. मंजिरीला घेऊन मी लॉँग ड्राइव्हला गेलो. पावसाळा या वेळेला भरभरून चाललेला होता. निसर्गाने चहूबाजूला मुक्तहस्ते अप्रतिम उधळण केलेले होती. त्यामुळे मूड आपोआपच प्रसन्न झालेला होता आणि तेथेच सर्व उलगडा झाला.

वर वर दिसताना मंजिरी एकदमच सुखी-समाधानी होती. मंजिरीला एक मुलगा, एक मुलगी आहे. दोघांचीही लग्ने झालेली आहेत. मंजिरी कधीच आजीदेखील झालेली आहे. दोघांनाही एक मुलगा, एक मुलगी अशी एकूण छान चार नातवंडे मंजिरी खेळवत होती. तिचे पतिदेव एकनाथराव एक यशस्वी व्यापारी होते. शून्यातून जम बसवून ते चांगला नावलौकिक कमवून होते; परंतु जसे ते व्यापारउदिमात नाव कमवून होते तसेच आपल्या स्वभावाच्या तिरसटपणाबद्दल, जिद्दीपणाबद्दल, विक्षिप्तपणाबद्दलही नाव चांगलेच कमावून होते.

हेही वाचा: सात पिढ्या बसून खाण्याची गोष्ट...

कोणीही एखाददोन वेळेला भेटले किंवा थोड्या वेळाकरिता भेटले तर त्यांना मात्र एकनाथराव अगदी देवमाणूसच वाटायचे; परंतु त्यांचा खरा स्वभाव त्यांच्याबरोबर राहणाऱ्यांना बरोबर कळायचा. त्या स्वभावाशी मंजिरी लग्न झाले त्या दिवसापासूनच तडजोड करीत इथपर्यंत पोचली होती. एकनाथरावांचा स्वभाव हा पहिल्या दिवसापासूनच असा होता. मग असे काय नवीन झाले, की ज्यामुळे मंजिरी वारंवार आजारी पडायला लागली, हा मोठा प्रश्न मला पडला.

मग मी तिला अजूनच जास्त विश्वासात घेऊन बोलते केले आणि एक भलतेच परंतु अप्रिय असे सत्य बाहेर पडले. झाले असे होते की जोपर्यंत तिचा मुलगा वेदांत लहान होता तोपर्यंत फारशी काही अडचण येत नव्हती. आता मात्र काय झाले होते तर वेदांतही मोठा झाला होता आणि एकनाथरावांबरोबरच व्यापार करू लागला होता. जनरेशन गॅप आपण नेहमीच सगळीकडे अनुभवतो. तो तर येथे होताच; परंतु त्याही पलीकडे वेदांतने सबकॉन्शस माइंड लर्निंगने म्हणजेच जिद्दीपणा, विचित्रपणा, विक्षिप्तपणा इत्यादींचे जे बाळकडू घेतले होते ते त्याला पुरेपूर पचनी पडून मूळ एकनाथरावांच्या स्वभावाच्या दुपटीने वेदांतच्या स्वभावामध्ये उतरले होते.

आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास ही आपल्या वाडवडिलांची जुनी म्हणदेखील येथे कमी पडत होती. एक वेळा एकनाथराव ऐकून घेतील; परंतु वेदांत मात्र काही केल्या कोणाचेही ऐकत नव्हता. दिवसेंदिवस त्याचा स्वभाव प्रचंड हट्टी, जिद्दी होत चालला होता. त्यामुळेच एकनाथराव आणि वेदांत यांची जोरदार भांडणे व्हायला लागली. या सर्व गोष्टींचा कळत नकळत स्ट्रेस मंजिरीवर यायला लागला होता. नकळत म्हणजे इकडे वेदांत त्याच्या वडिलांबद्दल रागात, संतापात धुमसत सर्व काही कल्पनाला सांगायचे आणि इकडून एकनाथरावदेखील अगदी तसेच करायचे. त्यांचा आणि वेदांतचा वाद झाला, की तेही सर्व काही रागाने धुमसत.

सर्व मंजिरीला सांगायचे; परंतु दोघांनाही मंजिरीने काही समजावून सांगण्याचा प्रयत्न जरी केला तरीही दोघेही मंजिरीवरच प्रचंड संताप करायचे. तिच्याशी भांडायचे. म्हणजे मंजिरीने कधी एकनाथरावांचे ऐकायचे, कधी वेदांतचे यामध्ये कुठलीही गोष्ट सकारात्मकता नव्हती, कुठलीही गोष्ट मनाला आनंद देणारी नव्हती. याउलट या प्रत्येक गोष्टीने मंजिरीच्या अंतर्मनावर खोलवर परिणाम होत होता. मंजिरी जणू काही प्रत्येकासाठी शॉकअब्सोर झालेली होती. सुरवातीला हे प्रमाण नगण्य होते. हळूहळू यामध्ये वाढ आणि तीव्रता वाढत गेली.

गेल्या तीन वर्षांपासून हे नको तितक्या जोरदारपणे चाललेले होते. मंजिरीला तोंड दाबून बुक्क्यांचा मार चाललेला होता. ती प्रचंड त्रस्त झालेली होती; परंतु आपलेच दात अन्‌ आपलेच ओठ सांगायचे तरी कुणाला आणि कसं? सांगितलं तर घराची इज्जत जाते. मंजिरी तर याबाबतीत फारच सेन्सिटिव्ह असल्याने तिने अगदी माहेरी भावालासुद्धा काहीही सांगितले नव्हते; परंतु मंजिरीच्या माहेरी हे लक्षात आले होते. त्यांनाही मंजिरीचा स्वभाव किती स्वाभिमानी, सेन्सिटिव्ह आहे याची पुरेपूर कल्पना होती. ती सांगणार नाही हे त्यांना माहिती होते.

म्हणूनच त्यांनी त्यांच्या घरातील एका फॅमिली मेंबरलाच म्हणजेच मला यामध्ये डॉक्टर अधिक काउन्सिलर म्हणून समाविष्ट करून कामाला लावले होते. आता माझ्यातला डॉक्टर तर जागा झालाच होता त्या बरोबरीनेच जो माझा आवडता विषय आहे मानसशास्त्र त्याचा आणि आजारपणाचा संबंध असे मानसशास्त्रदेखील जागे झाले. आता सर्व काही सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ झाले होते की मंजिरीला कुठलाही आजार खऱ्या अर्थाने नव्हता.

जो काही आजार होता अगदी त्यामध्ये आयुष्यभराकरिता जडलेला मधुमेह असो की रक्तदाब असो या रोजच्याच सर्व नकारात्मक गोष्टींनीच मंजिरीला हतबल करून टाकले होते. असहाय्य करून टाकले होते. तिला काय करावे हेच सुचत नव्हते. मन कुणाकडेही मोकळे करता येत नव्हते आणि त्यामुळे शेवटी व्हायचा तोच परिणाम मंजिरीच्या शरीरावर दिसत होता. सकारात्मक आणि नकारात्मक या दोन्ही गोष्टींचा परिणाम आपल्या मनावर फार मोठ्या प्रमाणात होत असतो याचे हे फार मोठे उदाहरण आहे.

याच विषयावर डॉ. बर्नी सीगल यांचा खूप सुंदर वाचनीय शोधनिबंध प्रसिद्ध आहे ‘LOVE MEDICINE AND MIRACLE’ या नावाने हा शोधग्रंथ प्रसिद्ध आहे. हजारो कॅन्सर रुग्णांवर डॉ. सीगल यांनी हा शोध घेतला आहे. डॉक्टर सीगल कॅन्सरवरील जगप्रसिद्ध डॉक्टर आहेत. त्यांनी हजारो कॅन्सर पेशंटमध्ये एक गोष्ट शोधायचा प्रयत्न केला. या सर्वांना ज्या वेळेला कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराचे निदान झाले त्या वेळेला सर्वांत जास्त सारखी आढळणारी कुठली गोष्ट सापडते याचा शोध घेतला आणि आपणास आश्चर्य वाटेल अशी गोष्ट या सर्व रुग्णांमध्ये सापडली, ती म्हणजे, ताणतणाव.

ज्याला आपण इंग्रजीमध्ये डिप्रेशन किंवा काही वेगवेगळ्या नावाने संबोधतो. डॉक्टर सीगल येथेच नाही थांबले. हे ठीक आहे की ताणतणावांमध्ये या सर्व रुग्णांमध्ये कॅन्सरची सुरवात सापडली; परंतु असे का घडले याचा शोध त्यांनी लावला. या शोधामध्येच आपणा सर्वांना सर्व उत्तर मिळून जाईल. त्यांचा शोधनिबंध असे सांगतो आहे, की आपण आपले जीवन जगत असताना श्वासोच्छ्वासातून अनेक प्रकारचे व्हायरस रोजच घेत असतो. आपण जे काही खातपीत असतो, या खानपानातून अनेक प्रकारचे बॅक्टेरिया आपण पोटात घेतच असतो.

हेही वाचा: सुमन कल्याणपूर भेटल्या अन्‌ आयुष्याचं भलं झालं!

तरीही आपण रोजच आजारी पडतो का? नाही. कारण जसे आपण सकारात्मक असतो तशीच आपली रोगप्रतिकार करणारी पेशीदेखील तेवढीच सकारात्मक असते. आपल्या शरीरामध्ये अशा व्हायरस म्हणजे विषाणू आणि बॅक्टेरियांबरोबर अखंड म्हणजे २४×३६५ लढाई सुरूच असते आणि आपली प्रतिकारशक्ती मजबूत असल्याने, सकारात्मक असल्याने आपण प्रत्येक वेळा आजारी पडत नाही; परंतु ज्या वेळी हवेतून विषाणूंचा, व्हायरसचा लोड जास्त होतो त्या वेळी आपण व्हायरल फीव्हरने आजारी पडत असतो किंवा पाण्यातून पसरणाऱ्या बॅक्टेरियाचा लोड जर जास्त झाला तर आपण पाण्याने पसरणाऱ्या आजारांनी ग्रस्त होतो.

त्यातही आपण डॉक्टरांची थोडी मदत घेतली, अँटिबायोटिक्स घेतले की पटकन बरेही होतो; परंतु ज्या वेळी आपण मनाने निराश असतो, खिन्न असतो, ताणतणावात असतो त्या वेळी मात्र जी आपली मानसिकता असते तीच मानसिकता या आपल्या प्रतिकार करणाऱ्या पेशींचीदेखील असते. मग डॉक्टर सीगल यांनी कॅन्सरच्या रुग्णांवर जो शोध घेतला तो सर्वच आजारांना लागू पडत असतो. म्हणजे जी मानसिकता आपली असते तीच मानसिकता आपल्या रोगप्रतिकार करणाऱ्या पेशींची असते. जसे की ताणतणावामध्ये आपली मानसिकता असते की आता आपले काही खरे नाही. आपल्याने आता काही होत नाही.

आपण काय करणार? माझे तर हेच होतेय, माझे तर तेच होते. आता माझे काही खरे नाही. माझ्यात ताकद नाही. माझ्यात हिंमत नाही वगैरे वगैरे. या प्रकारची आपली मानसिकता असते आणि बरोबर तीच मानसिकता आपल्या प्रतिकार करणाऱ्या पेशींची होते. मग त्याही म्हणायला लागतात येतो स्वाइन फ्लू येऊ दे, येतो कॅन्सर येऊ दे, येतो कोविड-१९ येऊ दे, येतो ट्युबरक्युलोसिस येऊ दे, येतो मलेरिया येऊ दे, येतो टायफॉइड येऊ दे, येते कावीळ येऊ दे. डॉ. सीगल यांचा शोधप्रबंध हा कॅन्सरवरचा आहे; परंतु ही बाब, सकारात्मकता आणि नकारात्मकताही सर्वच आजारांना लागू होत असते यात तिळमात्र शंका नाही.

असेच एक अजून उदाहरण आपण बघू या. आता आपण आजारांच्या बाबतीतील सकारात्मकता, नकारात्मकता बघितली; परंतु ही सकारात्मकता, नकारात्मकता फक्त आजारांच्याच बाबतीत असते का? नाही. परंतु त्याचा परिणाम तसा सर्व गोष्टींमध्ये कमी-अधिक प्रमाणात होत असतो; परंतु आजारांच्या बाबतीत मात्र शंभर टक्के होतो आणि होतच असतो. अशीच एक माझी पेशंट गेल्या ३०-३५ वर्षांपासून जिला मी बघतोय तिच्यावर उपचार करतोय. अशा एका रुग्णाची ही गोष्ट. शुभांगी तिचे नाव. शुभांगी माझ्या संपर्कात नव्वदीच्या दशकात आली.

माझा एक जवळचा मित्र अरुण. ही अरुणची सौभाग्यवती. अरुण आणि त्याचा परिवार माझे अगदी पहिल्या दिवसापासूनचे पेशंट आणि अत्यंत पारिवारिक घरोब्याचे संबंध. त्यामुळे लग्न झाले त्या दिवसापासूनच शुभांगी माझ्या संपर्कात होती, आहे. तरुण वयाच्या मानाने शुभांगी जास्त आजारपण काढत होती. मोठा आजार कधीही, कुठलाही आजतागायत नाही. तिचा स्वभाव सर्वच गोष्टींमध्ये कायम नकारात्मक.

घरामध्ये सर्वांत जास्त सिन्सिअर, पंक्चुअल, सत्यवादी, सगळ्यांसाठी झटून करणारी शुभांगीच; परंतु तोंडाने मात्र काहीतरी नकारात्मक बोलून केलेल्या सर्व कामांचे श्रेय घालवून बसणारीदेखील शुभांगी. इतरांनी केलेल्या प्रत्येक कामामध्ये चुका काढण्यामध्येदेखील शुभांगी कुशल. अशा पद्धतीने शुभांगी आयुष्यात पहिल्यापासूनच नकारात्मक विचारांमध्ये वावरली, वावरते आहे. शुभांगीच्या व्यक्तिमत्त्वाचा मला पहिल्या सहा-आठ महिन्यांमध्येच अंदाज आला होता. मी या विषयावर अनेक वेळेला शुभांगीचे अयशस्वी समुपदेशन केलेले आहे.

ध्यानधारणा, योगा, प्राणायाम यांचे कोर्सेसदेखील दोन-तीन वेळेला करून घेतले आहेत. कदाचित सबकॉन्शस माइंड लर्निंगमध्येच शुभांगीची नकारात्मकता असावी आणि म्हणून एवढे असंख्य प्रयत्न करूनही आजही शुभांगी नकारात्मकच वागते आहे. आज मात्र अशी परिस्थिती आहे की खरा गंभीर आजार कुठलाही नसताना रोज काही ना काही दुखतेच आहे. अनेक वेळा अनेक प्रकारच्या तपासण्या, अनेक वेळा वेगवेगळे स्पेशालिस्ट, सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर हे सर्व वारंवार लागतच असतात. अगदी यामध्ये मुंबईचे सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरदेखील झाले.

एवढे करून कुठल्याही गंभीर आजाराचे निदान आजतागायत तरी झालेले नाही. दुखणे मात्र रोजचेच आहे. याचा अर्थ शुभांगी नाटक करते आहे असा आहे का? नक्कीच नाही. तिला खरोखर काही ना काही दुखतच आहे; परंतु तिच्या लक्षात मात्र आजही हे येत नाही आणि ती आजही सर्वच गोष्टी नकारात्मकतेने घेते आहे. या सर्व दुखण्यांनादेखील ती नकारात्मकतेनेच सामोरे जात आहे. त्यामुळेच कितीही उपचार केले, कितीही तज्ज्ञ आणले, कितीही महागडी औषध दिली तरीही शुभांगीचा आजार मात्र बरा होण्याचे नाव घेत नाही आणि कसा बरा होईल? शुभांगीचे आजाराचे कारण जशी शुभांगीची मानसिकता नकारात्मकतेची आहे तीच मानसिकता तिच्या शरीरातील रोगजंतूंना प्रतिकार करणाऱ्या सर्व पेशींची आहे.

नकारात्मकतेमुळे रोग लवकर बरे होत नाहीत असे नाही तर त्यामुळे अनेक प्रत्यक्षात नसलेले परंतु प्रत्यक्षात त्यांचा त्रास मात्र होतोच असे अनेक रोगदेखील जडू शकतात. नव्हे जडतातच. या नकारात्मकतेमुळे या स्वभावाची माणसे फार कमी वेळ आनंदी राहतात. समाधानी राहतात. बहुसंख्य वेळा ही माणसे संतापात, दुःखात, रागात असतात आणि म्हणूनच अशा व्यक्तींना अनेक प्रकारचे आजार होतच असतात जे की लवकर बरे ही होत नसतात. आपण मागच्याच रविवारच्या ‘जैसा भाव मनी तैसा रोग तनी’ लेखामध्ये बघितल्याप्रमाणे आलेला प्रत्येक क्षण सकारात्मकतेने स्वीकारलाच पाहिजे तो कितीही नकारात्मक असला तरीही.

कारण नकारात्मक क्षण काही कोणीही स्वतःहून आमंत्रित करीत नाही. कोणालाही ते आवडत नाहीत; परंतु हे नकारात्मक क्षणदेखील आपल्या आयुष्याचा भागच आहेत. यालाच तर आपण सुख-दुःख म्हणतो. प्रारब्ध ज्याला इंग्रजीमध्ये डेस्टिनी म्हणतो. आपण कितीही टाळू म्हटले तरी टाळता येत नाही. मग याही क्षणांना आनंदाने, सकारात्मकतेने स्वीकारायला हवे. जीवनातला प्रत्येक क्षण असा जगला पाहिजे, की जणू तो शेवटचा क्षण ठरला तरी चालेल पण मी तो क्षण अगदी आनंदात जगेन. या सकारात्मकतेने आयुष्य जगायला शिकलो तर आपण मुळात आजारीच पडणार नाही किंवा पडलो तरी लवकर बरे होऊ. चला, तर साजरा करू या आजपासूनच नव्हे या क्षणापासून जीवनाचा ‘आनंदोत्सव’!

(लेखक नाशिकमधील प्रथितयश सुयश हॉस्पिटलचे संचालक आहेत.)

हेही वाचा: मोरपिसांची काळी बाजू

Web Title: Dr Hemant Ostwal Saptarang Latest Marathi Article On Celebration Of Life Nashik News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..