पंख सकारात्मकतेचे : मधमाश्यांचा ‘प्रसाद’!

ही जीवघेणी, अत्यंत थरारक, अंगावर काटे उभे करणारी व काळजाचा ठोका चुकविणारी घटना आहे
 bee
beeesakal
Updated on

लेखक - डॉ. हेमंत ओस्तवाल

ही जीवघेणी, अत्यंत थरारक, अंगावर काटे उभे करणारी व काळजाचा ठोका चुकविणारी घटना आहे, ज्या घटनेबद्दल मी लिहितो आहे. अशा प्रकारच्या घटनांमध्ये कित्येक वेळा अनेकांचे जीवदेखील गेलेले आहेत आणि म्हणूनच आज ही घटना लिहिताना तो थरारपट जसाच्या तसा समोर उभा राहिला आहे. सकारात्मकतेमुळे निव्वळ माझाच नव्हे तर माझ्यासहित अजून चार जणांचा जीव कसा वाचला, हे बघू या.


ही घटना आहे, २००१ च्या उन्हाळ्यातील. आमच्या सुयश हॉस्पिटलचे उद्‌घाटन ३ फेब्रुवारी २००१ ला झाले. आम्हाला वाटले होते त्यापेक्षा कितीतरी पट सर्व गोष्टी चांगल्या घडल्या होत्या. अगदी अपेक्षेपेक्षा खूपच चांगली मोठी प्रशस्त अशी जागा जी अत्यंत मोक्याच्या ठिकाणी होती. आम्हाला अपेक्षित असलेल्या २० ते २५ बेडच्या ठिकाणी ५५ बेड झालेले होते. ठरविल्यापेक्षा भरपूर जास्त लाइफ सेव्हिंग मशिनरीदेखील आणल्या होत्या. उद्‌घाटनाच्या कार्यक्रमाला आम्ही अपेक्षित केले होते, पंधराशे ते दोन हजार लोक आणि प्रत्यक्षात मित्रांनी, शुभचिंतकांनी भरभरून प्रतिसाद देत दहा हजारांपेक्षा जास्त लोकांनी उद्‌घाटनाच्या कार्यक्रमास उपस्थिती लावली होती. हॉस्पिटलचे उद्‌घाटन श्री स्वामी समर्थ केंद्र, दिंडोरी दरबाराचे प्रमुख गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांच्या हस्ते झाले होते.
अगदी पहिल्याच दिवशी सुयश हॉस्पिटल हे उत्तर महाराष्ट्रातील एक चांगले हॉस्पिटल म्हणून प्रस्थापित झाले होते. अगदी अल्पावधीतच सुयश हे क्रिटिकल केअर हॉस्पिटल (अतिशय गंभीर रुग्णांसाठीचे हॉस्पिटल) म्हणून अगदी उत्तर महाराष्ट्राच्या तळागाळात प्रसिद्ध झाले होते. एवढे सर्व अगदी व्यवस्थित झाले म्हणून आमच्या हॉस्पिटलच्या काही संचालकांच्या (डॉ. प्रशांत पाटील, ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. भास्कर शेलार, जनरल फिजिशियन आणि मी स्वतः) मनामध्ये आले, की एवढे सर्व व्यवस्थित झाले आहे. सुरवात अतिशय छान झाली आहे, तर आपण सप्तशृंगीमातेच्या दर्शनाला जाऊ या. मनामध्ये असा विचार आल्यानंतर आम्ही तिघे अधिक कुटुंबीय त्यामध्ये डॉ. प्रशांत पाटलांच्या सुविद्य पत्नी डॉ. सौ. सोनिया, तसेच त्यांची छोटीशी लाडकी कन्या म्हणजे टीना, डॉ. भास्कर शेलारांबरोबर त्यांच्या पत्नी सौ. प्रतिभा, तसेच दोन्ही चिरंजीव म्हणजे तुषार आणि नीलेश होते. मात्र माझ्याबरोबर पत्नी सुरेखा आली नव्हती; परंतु तिच्याऐवजी माझी छोटी कन्या शलाका, तसेच माझी पुतणी आणि पुतण्या म्हणजेच जागृती आणि आनंद आले होते. असे एकंदरीत छोटे-मोठे मिळून ११ जण होतो. तीन कार घेऊन आम्ही सकाळी सकाळी रवाना झालो.

 bee
‘आत्मविश्वास महत्त्वाचा’

अगदी छान दर्शन गडावर झाले. आम्ही सगळे भगवतीच्या चरणी नतमस्तक झालो. जी काही सुंदर अशी सुरवात झाली होती त्याबद्दल मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली होती आणि भगवतीच्या चरणी आम्ही प्रार्थना केली, ‘आमच्या हातून पीडित रुग्णांची वैद्यकीय सेवा अतिशय चांगली सायंटिफिक पद्धतीने कमी दरामध्ये होऊ दे, त्यांना जीवनदान मिळू दे!’ तेथेच आम्ही प्रसादरूपी भोजन केले आणि अंदाजे साडेअकरा ते बाराच्या दरम्यान आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. ओझरखेड डॅमजवळ आल्यानंतर डॉ. प्रशांत पाटलांच्या मनात आले, की आपल्याबरोबर बरीच बच्चेकंपनी आहे. त्यांना छानपैकी धरणाच्या भिंतीवर असलेल्या विश्रामगृहाजवळील बागेमध्ये फिरवून आणू या आणि खरे सांगायचे तर बच्चेकंपनी सकाळपासून तशी नाही म्हटली तरी कंटाळली होती. त्या वेळी ओझरखेड धरणावर असलेला बगीच्या छानच मेंटेन केलेला होता आणि समोर पाण्याचा अथांग असा नजारा सगळ्यांनाच सुखावणारा होता.

आम्ही सगळे अंदाजे दुपारी एकच्या सुमारास ओझरखेडला पोचलो. बच्चेकंपनीचा खुशीचा पारावार नाही राहिला. त्यांनी उतरल्या उतरल्या धम्माल-मस्ती सुरू केली. आमच्या आधीच तेथे काही मुले क्रिकेट खेळत होती. आम्ही अजून उतरतच होतो. बच्चेकंपनी आधी उतरली होती तेवढ्यात क्रिकेट खेळणाऱ्या एका बॅट्समनने चेंडू उंच तडकावला आणि येथेच गडबड झाली. ज्या झाडाखाली आम्ही पण होतो आणि ही मुले पण खेळत होती त्या झाडावर एक भरपूर मोठे असे मधाचे पोळे लटकलेले होते. अजूनही दोन पोळी थोडी बाजूला होती. नेमका या बॅट्समनने तडकावलेल्या चेंडूबरोबर त्या मोठ्या मधाच्या पोळ्यावर जाऊन आपटला आणि काय सांगावे ‘न भूतो न भविष्यती’ असा कधीही न आलेला अनुभव आम्हा सगळ्यांना आला. अनुभव सांगायला शब्द नक्कीच थिटे पडणार, तरीही मी सांगायचा प्रयत्न करतो आहे. आम्ही जणू साक्षात मृत्यूच्या गुहेतून त्या दिवशी बाहेर पडलो होतो, एवढे मात्र नक्की. तर झाले असे होते, की तो चेंडू मधाच्या पोळ्याला तडकला आणि एकच गोंधळ उडाला. मधाचे पोळे फुटले. त्याच्या बरोबर खाली मी व माझी कन्या शलाका, डॉ. प्रशांत पाटील, सोनिया वहिनी आणि छोटी टीना एवढे आम्ही बरोबर त्या पोळ्याच्या खाली साधारणतः पंधरा ते वीस फूट त्रिज्येच्या वर्तुळात होतो आणि या वर्तुळाच्या अगदी थोडे बाजूला डॉ. भास्कर शेलार आणि कुटुंबीय, माझी पुतणी जागृती आणि पुतण्या आनंद हे उभे होते.

काहीही कळायच्या आत वरतून एखाद्या बॉम्बसारख्या सुटलेल्या मधमाश्यांनी वर्तुळाच्या आतील म्हणजेच शलाका, डॉ. प्रशांत व डॉ. सोनिया वहिनी आणि टीना व माझ्यावर जबरदस्त हल्ला चढविला. आमच्या शरीराच्या उघड्या असलेल्या सर्व भागांवर त्या शेकडो मधमाश्यांनी हल्ला चढविला. अगदी कुठेही हात लावायचे आणि मुठीच्या मुठी भरभरून चावत असलेल्या मधमाश्या फेकायच्या. गालावर, डोक्यावर, हातांवर, कानावर व आमच्या शरीराचा जो भाग उघडा सापडेल त्यावर या मधमाश्यांनी जबरदस्त हल्ला चढविला होता. प्रचंड वेदना सुरू झालेल्या होत्या. टीना छोटी असल्याने तिला डॉ. प्रशांत पाटलांनी आपल्या कवेत घेऊन अक्षरशः शर्टाच्या आतमध्ये घेण्याचा प्रयत्न केला. एकच हलकल्लोळ तेथे माजला होता. चावणाऱ्या माश्‍या कितीही वेळा काढून फेकल्या तरी जास्तच पण कमी नाही अशा माश्यांचा थवा परत चावा घ्यायचा. शलाका आणि टीनाने अक्षरशः हंबरडा फोडलेला होता. जवळ उभे असलेले म्हणजे डॉ. शेलार कुटुंबीय आणि जागृती, आनंदने मदत करण्याचा खूप प्रयत्न केला. काहीही उपयोग होत नव्हता. आम्हाला काहीच कळेनासे झाले होते. काय करावे सुरवातीला आम्ही सैरावैरा धावत होतो. आम्ही जिकडे जाऊ तिकडे आमच्याबरोबरच मधमाश्यांचा थवा आमच्यावर हल्ला करण्यासाठी येतच होता. मग आम्ही हल्लाग्रस्त मंडळींनी ओझरखेड धरणाच्या पाण्याकडे म्हणजे पाण्यात जाण्याचे ठरविले. पाण्याकडे गेलोही. पाण्यात पाय टाकलेही मग विचार आला, आपण असे किती वेळ पाण्यात राहू शकणार आणि बच्चेकंपनी कसे करणार? पाण्यात डुबकी मारू तोपर्यंत ठीक आहे. बाहेर निघालो, की परत हल्ला आहेच. अशा अत्यंत भयावह जीवघेण्या परिस्थितीमध्ये आम्ही सापडलो होतो. आश्चर्य असे होते, की आम्ही पाच जण वगळता मधमाश्या इतर कोणावरही हल्ला करीत नव्हत्या. आतापर्यंत वर्तमानपत्रांमध्ये वाचलेल्या अनेक बातम्या, कानोकानी ऐकलेल्या मधमाश्यांच्या हल्ल्याच्या गोष्टी आठवायला लागल्या. कितीतरी लोकांचे मधमाश्यांच्या हल्ल्यात जीव गेलेले आठवले. अगदी त्याच परिस्थितीमध्ये आम्ही सापडलो होतो. यात तिळमात्रही शंका नव्हती. क्षणाक्षणाला मधमाश्यांचे हल्ले आमच्यावर तीव्र होत होते. वेदनांचा अक्षरशः आगडोंब उसळलेला होता. आम्ही कुठल्याही क्षणाला बेशुद्ध पडू शकत होतो. शॉकमध्ये जाऊ शकत होतो. आमच्याकडे फारच थोडा वेळ होता. आम्ही पाण्याकडून परत एकदा विश्रांतिगृहाकडे धूम ठोकली. अर्थातच मधमाश्यांचे हल्ले अजूनच जास्त तीव्रतेने होतच होते. क्षणा क्षणाला वेदनांची तीव्रता देखील तेवढीच वाढत होती आणि शलाका, टीना यांचा आक्रोशदेखील तेवढाच वाढत होता. विश्रामगृहाकडे पोचलो तर खरे, परंतु पुढे काय, हा प्रश्न अजूनच जास्त तीव्रतेने आमच्यासमोर ‘आ’ वासून उभा झाला होता.

 bee
नात्यांची रेशीमवीण...

आम्ही प्रत्येक जण आमच्या अंगावरच्या माश्‍या मुठी मुठी भरून काढून फेकतच होतो. त्या बरोबरीने शलाकाच्या आणि टीनाच्या अंगावरून काढून फेकतच होतो आणि पुन्हा एकदा आयुष्यात आमच्या जीव वाचवायला मदतीला कोण आले असेल, तर ती म्हणजे, फक्त सकारात्मकता. सकारात्मकता आणि सकारात्मकता. मधमाश्यांचा हल्ला झाल्यापासून प्रत्येक क्षण आम्ही सकारात्मकतेनेच घेतला होता आणि म्हणूनच त्या क्षणापर्यंत आम्ही किल्ला लढवत आणला होता. खरी कसोटी मात्र आता आमची आणि आमच्या सकारात्मकतेची लागलेली होती. कारण आम्ही पाच आणि मृत्यू यामध्ये जास्तीत जास्त अर्ध्या ते एक तासाचे अंतर असावे. इतका समीप मृत्यू आल्याचे दिसत होते. इथेच खऱ्या अर्थाने आता सकारात्मकतेची परीक्षा चालली होती. क्षणार्धात आम्हाला सुचले, की आमच्या कार जवळच उभ्या होत्या. क्षणाचाही विलंब न लावता आम्ही आमच्या गाडीमध्ये बसण्यासाठी धाव घेतली. शलाका व मी एका कारमध्ये, डॉ. प्रशांत, सोनिया वहिनी, टीना एका कारमध्ये, डॉ. भास्कर, प्रतिभा वहिनी, तुषार, नीलेश, जागृती, आनंद म्हणजेच ज्यांच्यावर मधमाश्यांचा हल्ला झाला नव्हता ही सर्व मंडळी एका कारमध्ये बसलो. आपणा सर्वांना आश्चर्य वाटेल, कारमध्ये बसण्यासाठी म्हणून जे काही दोन-पाच सेकंद दरवाजा उघडला तेवढ्या वेळातदेखील कारमध्ये असंख्य मधमाश्या घुसलेल्या होत्या; परंतु आमच्याकडे तेथून पळ काढण्याव्यतिरिक्त दुसरा कोणताही मार्ग नक्कीच उपलब्ध नव्हता. आम्ही कार वळविण्याच्या फंदातदेखील पडलो नाही. विश्रांतिगृहापासून अगदी बाहेरच्या रस्त्यापर्यंत कार रिव्हर्स गिअरमध्ये अतिशय जोरात पळवत आणली. पहिले दोनशे-अडीचशे मीटर म्हणजेच साधारणतः आम्ही वणी-दिंडोरी रस्ता लागेपर्यंत, गाडी रिव्हर्स आणेपर्यंत मधमाश्या आमच्या कारवर पुनःपुन्हा हल्ला चढवीतच होत्या आणि अर्थातच आधीच आमच्या कारमध्ये शेकडोंनी घुसलेल्या मधमाश्या आमचा पुरता खिमा करीतच होत्या. त्या बाहेर निघून जाव्यात म्हणून आम्ही काचा उघड्या ठेवलेल्या होत्या आणि त्यातूनच या नवीन हल्लेखोर मधमाश्या आमच्यावर नव्या दमाने हल्ला चढवीत होत्या. एकदाचे आम्ही वणी-दिंडोरी रस्त्याला लागलो. आता कुठे जरा जिवात जीव आला. कारण आता आम्ही गाडी वेगात पळवू शकत होतो. त्याच्याने काय फरक पडत असेल बरं? तो फरक फारच महत्त्वाचा होता. आता आम्ही मधमाश्यांच्या गतीपेक्षाही जास्त गतीने चाललेलो होतो, म्हणजेच आता नवीन नवीन मधमाश्यांचे हल्ले थांबले होते; परंतु तरीही आमचे संकट पूर्ण टळले होते का? नाही!

कारमध्ये आधीच शेकडो मधमाश्या आमच्या जिवाचा अंत बघतच होत्या. अत्यंत वाईट अवस्था खासकरून माझ्या कारमध्ये माझ्या लेकीची आणि डॉ. प्रशांत यांच्या कारमध्ये छोट्या टीनाची होती. आम्ही दोघेही आमच्या स्वतःच्या अंगावर चावत असलेल्या मधमाश्‍यांना सोडून शलाका आणि टीनाच्या अंगावरच्या मधमाश्‍या काढून गाडीच्या बाहेर फेकत होतो. आता मात्र फरक पडू लागला होता. हळूहळू मधमाश्‍यांचे प्रमाण कमी होत होते. दिंडोरी येईपर्यंत चांगलेच कमी झाले होते. आता माश्यांच्या चावण्याचा परिणाम चांगलाच जाणवायला लागला होता. एक संकट टळले होते, तर दुसरे संकट आता आमच्यापुढे ‘आ’ वासून उभे होते, ते म्हणजे, मेडिकल इमर्जन्सी. सगळ्यात आधी दिंडोरी आल्यानंतर काय काम केले असेल, तर ते म्हणजे औषधाचे दुकान शोधून त्यातून आणीबाणीच्या परिस्थितीतील औषधांचा डोस माझ्यासहित आम्ही सर्वांनी घेतला आणि सुसाट वेगाने आमचे हॉस्पिटल म्हणजे सुयश हॉस्पिटल गाठले आणि त्वरित हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होऊन लाइफ सेव्हिंग ड्रग्स सुरू केली. आता कुठे आमच्या जिवात जीव आला होता.
एवढ्या भयावह जीवघेण्या परिस्थितीतून आम्ही कसे वाचलो असू तर त्याचे उत्तर म्हणजेच फक्त सकारात्मकता. हा जवळपास मृत्यूच्या अगदी समीप असलेला आमच्या आयुष्यातील अत्यंत नकारात्मक जीवघेणा असा क्षण सकारात्मकतेने स्वीकारल्याने आम्ही कुठेही आमची हिंमत हरलो नाही. त्यामुळे आम्हाला क्षणा क्षणाला पुढचा रस्ता सुचत गेला आणि त्याचीच फलनिष्पत्ती म्हणून आमचा सर्वांचा जीवही वाचला, अन्यथा जसे आजपर्यंत मधमाश्‍यांच्या हल्ल्यामध्ये शेकडोंनी, हजारोंनी लोक मृत्युमुखी पडलेले आहेत, त्यामध्ये आमचाही नंबर नक्कीच लागला असता!

(लेखक सुयश या प्रथितयश हॉस्पिटलचे संचालक आहेत.)

 bee
इतके अनर्थ हवामान बदलाने केले...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.