पंख सकारात्मकतेचे | नवरदेवाने विघ्नाला दाखवला कसारा घाट

ही गोष्ट आहे, नाशिकची वधू आणि मुंबईच्या वराची.
Marriage
Marriageesakal

लेखक : डॉ. हेमंत ओस्तवाल

ही गोष्ट आहे, नाशिकची वधू आणि मुंबईच्या वराची. मुंबईहून मर्सिडीजने निघालेला वर चालत, मोटारसायकलीने महत्प्रयासाने नाशिकमध्ये पोचला खरा; परंतु त्याला आपल्या जोडीदाराशी चक्क दोनदा लग्न करावे लागले; एकदा विजय व एकदा गोरज मुहूर्तावर. येथे नवरदेव व नातेवाइकांची सकारात्मकता कामी आली.

साधारणतः २००० मधील ही घटना आहे. त्यावेळी मुंबई-आग्रा महामार्ग दुपदरी पण सिंगल होता. माझा एक मित्र, प्रकाशच्या बहिणीचे, कांचनचे लग्न ठरले होते. प्रकाशच्या घरची परिस्थिती ठीकठाक होती. वडिलांचा छोटासा व्यापार होता. प्रकाशचे अजून शिक्षणच सुरू होते. कांचन नुकतीच पदवीधर झालेली होती. पण शिकता शिकता मुला-मुलींकडून ज्या चुका घडतात तशीच चूक कांचनकडून झाली होती. कांचन दिसायला अत्यंत देखणी होती. लहानपणापासूनच हुशार, सुसंस्कृत मुलगी होती.

Marriage
गारगोटीचा संग्रह बघून परदेशी दांपत्य म्हणाले ‘ओ माय गॉड’

म्हणता म्हणता कांचन बारावी पास होऊन कॉलेजला जायला लागली. दुर्दैवाने कांचनच्या मैत्रिणी चांगल्या नव्हत्या. शिक्षण सोडून नको त्या भलत्याच विषयांमध्ये त्यांची प्रगती चांगलीच होती. आपले वाडवडील नेहमी सांगत असतात, की चांगली संगत अत्यंत महत्त्वाची असते. चांगली संगत मिळाली तर उभ्या आयुष्याचे कल्याण होऊ शकते आणि तीच संगत चुकीची मिळाली, तर उभ्या आयुष्याची होरपळ होऊ शकते. अगदी तशीच परिस्थिती कांचनवर ओढवली होती. तिला कुठल्याही अँगलने न शोभणाऱ्या अशा एका फडतूस, फालतू, चरित्रहीन अशा इतर समाजाच्या मुलाशी तिने पळून जाऊन नोंदणी विवाह करून टाकला. बऱ्याचशा घटनांमध्ये नेहमी घडते तसेच याही घटनेमध्ये घडले. कांचन पहिल्यांदा सासरी नांदायला गेली आणि दुसऱ्याच दिवशी जी परत आली ती कधीच पुन्हा नांदायला गेली नाही. त्या एकाच दिवसामध्ये तिला तिने आयुष्यात किती मोठी घोडचूक केली हे सकारात्मकरीत्या समजले होते.

सकारात्मकरीत्या समजले म्हणजे काय, तर तिने जो काही लग्नाचा निर्णय घेतला होता त्याप्रमाणे लग्न करून ती सासरी गेली त्या वेळी अगदी पहिल्याच दिवशी असे म्हणण्याऐवजी खरेतर पहिल्या काही तासांमध्येच तिला पूर्णतः कळून चुकले होते, की तिचा निर्णय कसा शंभर टक्के चुकीचा होता. तिने तिची ती चूक सकारात्मकरीत्या स्वीकारली म्हणजे जे काही घडले होते त्याला बाजूला ठेवून अगदी सेकंदांमध्ये परत सासरी न जाण्याचा निर्णय कांचनने घेतला. कांचनच्या आयुष्यातील ही सर्वांत मोठी नकारात्मक वाईट घटना होती. तिला ती सकारात्मकतेने सामोरे गेली. तिने आयुष्यभराकरिता परत न जाण्याचा निर्णय घेतला आणि ती कायमची माहेरी परतली.
ज्या सकारात्मकतेने कांचनने हा निर्णय घेतला होता तेवढ्याच सकारात्मकतेने कांचनच्या पूर्ण परिवारानेदेखील ही घडलेली अत्यंत दुःखद, वाईट, नकारात्मक गोष्ट सकारात्मकतेने घेतली. सगळ्यांना समजून चुकले होते, की कांचनला आपली चूक पूर्णपणे उमगली आहे. म्हणून घरी परतल्यानंतर तिला कुठल्याही प्रकारे न दुखावता सगळ्यांनी तिचे स्वागतच केले. तिला भरभक्कम मानसिक आधार दिला आणि सगळ्यांनी मिळून जणू तिच्या आयुष्याला नवसंजीवनीच दिली.

Marriage
विविधता हीच शक्ती बनवली पाहिजे...

आयुष्यात पुन्हा एकदा कांचन व्यवस्थितरीत्या स्थिरावली. म्हणता म्हणता कांचन पदवीधर झाली आणि लग्नासाठी मुलाची शोधमोहीम सुरू झाली. या वेळी तिचा योग चांगला होता. मुंबईतील एक प्रथितयश उद्योजक, ज्याचा स्वतःचा एवढ्या कमी वयामध्ये छोटासा कारखाना होता. त्याच्याबरोबर स्वतःचे प्रॉडक्ट्स आणि इतर कंपन्यांचे प्रॉडक्ट्स याचे एक शोरूमदेखील दक्षिण मुंबईमध्ये होते, आहे. अशा या दिनेशला कांचन प्रथमदर्शनीच पसंत पडली, नव्हे दिनेश कांचनसाठी अगदी वेडा झाला. कांचनलाही दिनेश पसंत पडला. सर्व काही अगदी व्यवस्थित असल्याने घरच्यांनीही होकार दिला. दिनेशला कांचन खूपच आवडल्याने त्याच्यासह घरच्यांनी आग्रहपूर्वक एक महिन्याच्या आतलीच तारीख धरायला सांगितले. कांचनच्या घरच्यांची तेवढी तयारी नव्हती. तरीही आपण सर्व मिळून करून घेऊ, असे सांगून दिनेश आणि त्याच्या घरच्यांनी जवळचीच तारीख पकडली. म्हणता म्हणता लग्न एक दिवसावर आले. २१ डिसेंबरला लग्न होते. लग्न दुपारचे होते. वऱ्हाड आदल्या दिवशी रात्रीच मुक्कामी येणार असे ठरले होते. २० डिसेंबरला रात्री मुक्कामी शंभर माणसांचे वऱ्हाड येणार, असे ठरले होते. त्याप्रमाणे दोन लक्झरी बस आणि नवरदेवाची मर्सिडीज कार असे वऱ्हाड मुंबईहून सायंकाळी अंदाजे पाचच्या सुमारास निघाले. हसतखेळत, धमाल, मस्ती करत वऱ्हाड निघाले होते.

दुपारी निघतानाच सर्वांना छान हाय टी दिला होता. बसमध्ये प्रवासात खाण्यासाठी सुकामेवा, फरसाणाची पाकिटेसुद्धा दिली होती. अशारीतीने दिनेश स्वप्नातल्या कांचनशी लग्न करण्यासाठी मोठ्या उत्साहाने वऱ्हाड घेऊन नाशिकला निघाला. लवकरच निघालेले असल्याने दिनेश आणि कंपनीने साडेसातच्या सुमारास खर्डी सोडले. खर्डी सोडताना एसटीडी-पीसीओवरून दूरध्वनी करून ‘वाहनाने नऊच्या आत पोचतो’ असा निरोपदेखील दिला. खर्डी सोडून दहा-बारा मिनिटेच झाली असतील, तोपर्यंतच ट्रॅफिक ब्लॉक झाली. मुंगीच्या गतीने हळूहळू ट्रॅफिक कसारा गावाच्या जवळ आली. तेथून पुढे मात्र मुंगीलाही फिरायला जणू काही वाट नव्हती, इतकी ट्रॅफिक ब्लॉक झाली. त्या काळी अशी ट्रॅफिक ब्लॉक होणे, जाम होणे अगदी सर्रास होते. बहुसंख्य वेळा ही ट्रॅफिक हळूहळू का होईना दोन-तीन तासांत पूर्वपदावर येत असे; परंतु क्वचित प्रसंगी अशा प्रकारचा जाम अगदी रात्र रात्रभर, कधी-कधी तर त्याहूनही जास्त १६, १८ आणि २४ तास असेदेखील व्हायचे. दिनेशच्या दुर्दैवाने तो जामदेखील तसाच मोठा लागला; परंतु कुठलाही जाम किती वेळ चालणार आहे हे फार क्वचितच कोणाला समजते. मात्र प्रत्येकाची आशा असते लवकरच जाम सुटावा.

दिनेश आणि मंडळी साधारणतः आठच्या आसपास जाममध्ये फसली. सुरवाती-सुरवातीला तर त्यांचे बाहेर लक्षही नव्हते. आतमध्येच त्यांची धमाल मस्ती सुरू होती. असाच काही वेळ गेला, मग मात्र त्यांच्या लक्षात आले, की आपली गाडी केव्हाचीच एकाच जागी उभी आहे. एक इंचदेखील पुढे सरकत नाही. हळूहळू त्यांच्या जवळचे खाण्याचे सुके पदार्थ, सुकामेवा सर्व काही संपून गेले. त्या वेळी आजच्यासारखे एवढी सारी हॉटेल्स, रिसॉर्ट, खाण्याचे छोटे-छोटे धाबे नव्हते. ते जेथे अडकले होते तेथून जवळचा धाबादेखील दोन-अडीच किलोमीटर लांब होता. वेळ रात्रीची. ट्रॅफिक जाम एवढा भयानक होता, की मागेसुद्धा जायची सोय नव्हती.

Marriage
कोळीवाड्यात काही परंपरा कायम...

इकडे व्याही मंडळी म्हणजे कांचनच्या घरची सर्व मंडळी खूप परेशान झाली होती. शे-सव्वाशे माणसांचा स्वयंपाक त्यांनी करून ठेवला होता. संगीताचा एक छोटेखानी कार्यक्रम आयोजित केलेला होता, मात्र वऱ्हाडी मंडळींचा पत्ता नव्हता. समजायला काहीही मार्ग नव्हता. रात्र डोक्यावरती चढत होती. इकडे आपल्या भारतीयांच्या वाईट सवयींमुळे ट्रॅफिक जाम अजून जास्त वाढलेला होता. कारण अशा वेळी आपण भारतीय मंडळी जिकडून घुसायला जागा मिळेल तिकडून तिकडून गाडी घुसविण्याचा प्रयत्न करीत असतो आणि आहे ती परिस्थिती अत्यंत भयंकर बनवत असतो. येथेही काहीसे असेच झाले होते, होत होते. अगदी मोटारसायकलसुद्धा निघणार नाही इतकी वाईट परिस्थिती उद्‌भवलेली होती. म्हणता म्हणता रात्रीचे बारा साडेबारा, एक-दीड, दोन वाजून गेले. परिस्थिती अजूनच बिघडत चालली होती. वऱ्हाडी मंडळी उपाशी-तापाशी बसमध्ये सीटवरच झोपण्याचा प्रयत्न करीत होती.

दिनेश मात्र प्रचंड अस्वस्थ झालेला होता. त्याला जाम टेन्शन आले होते, की आता पोचायचे कसे? शेवटी त्याने धाडसी निर्णय अत्यंत सकारात्मकतेने घेतला. त्याने आणि त्याच्या तीन मित्रांनी नाशिकच्या दिशेने पायी पायी निघण्याचा निर्णय घेतला. ते लगेचच निघालेदेखील. सात-आठ किलोमीटर चालल्यानंतर कसारा घाट लागला. त्या चारही पठ्ठ्यांनी कसारा घाट सकाळी सहापर्यंत चढून पार केला. ट्रॅफिक जाम मात्र संपायचे नाव घेत नव्हता. सात-सव्वासातला ते इगतपुरी गावात पोचले. सर्वांत पहिले त्यांनी तेथून एक चांगले काम केले ते म्हणजे कांचनच्या घरच्यांना प्राप्त परिस्थिती दूरध्वनी करून कळविली आणि सर्व मंडळी उपाशी असल्याचे पण कळविले. सुदैवाने कांचनचे काही नातेवाईक, काही तिच्या वडिलांचे मित्र इगतपुरीत असल्याने तेथून पुढची कामे सोपी झाली. तोपर्यंत मोटारसायकली घुसण्याइतपत ट्रॅफिक थोडी मोकळी होत होती. इगतपुरीतील मंडळींनी मग सर्वांत आधी दिनेश आणि त्याच्या मित्रांना भरपेट खायला दिले. दोन मोटारसायकली दिल्या. नाशिकला जाण्यासाठी आणि वऱ्हाडींच्या पोटापाण्याची सोय करण्याच्या प्रयत्नांना ही मंडळी लागली.

नाशिकहून टेम्पोमध्ये सर्व जेवण घोटीपर्यंत आले आणि तिथून मोटारसायकलींवर वऱ्हाडी मंडळींपर्यंत पोचविण्याचे काम सुरू झाले. सर्वांच्याच जिवात जीव आला होता. इकडे दिनेश अगदी ऐतिहासिक काम करून म्हणजे जवळजवळ कसारा घाटासह २०-२२ किलोमीटर अंतर पायी चढून आणि मग इगतपुरी ते नाशिक मोटारसायकलवर आला होता, कांचनच्या प्रेमासाठी. ट्रॅफिक जाम अजूनही सुटलेला नव्हता. सकाळचे अकरा-साडेअकरा वाजले होते आणि मग कांचनच्या वडील व दिनेश अशा सगळ्यांनी एक छान सकारात्मक निर्णय घेतला, तो म्हणजे, लग्न दुपारीच लावण्याचा; परंतु दिनेशला एवढे पायी पायी यायचे असल्यामुळे त्याने कुठल्याही प्रकारचे त्याचे व्यक्तिगत सामान जसे की लग्नाचे ड्रेस, इतर महत्त्वाचे सामान काहीही बरोबर आणलेले नव्हते.

Marriage
बलसागर भारत होवो...

प्रकाश आणि त्याच्या मित्रांची म्हणजेच आमची टीम कामाला लागली. नवरदेवाचे कपड्यासहित सर्व सामान नवीन घेऊन आलो आणि दुपारी बरोबर विजय मुहूर्तावर दिनेश अधिक तीन मित्र आणि कांचनच्या नातेवाइकांमध्ये लग्नसोहळा पार पाडण्यात आला. अडकलेली वऱ्हाडी मंडळी दुपारी साडेतीन-चारच्या दरम्यान नाशिकला पोचली. सर्वांना भरपेट जेवू घालण्यात आले. खरेतर परत जायच्या वेळी ही मंडळी नाशिकला पोचली होती; परंतु रात्रभर आणि अगदी दुपारपर्यंत बसमध्ये बसून काढल्याने सर्व वऱ्हाडी मंडळींचे अंग खूप दुखत होते. जेवल्या जेवल्या मंडळी झोपी गेली. सायंकाळी उठल्यानंतर कांचनच्या वडिलांशी सल्लामसलत करून वऱ्हाडी मंडळींसाठी लग्नसोहळा गोरज मुहूर्तावर परत एकदा साजरा करण्यात आला. कदाचित दिनेशच्या या भीमपराक्रमामुळेच दिनेश आणि कांचनचे एकाच दिवशी दोन वेळेला ऐतिहासिक, मेमोरेबल लग्न लागले, फारच क्वचितप्रसंगी असे घडत असेल. हे असे घडले ते फक्त आणि फक्त दिनेशच्या अत्यंत धाडसी अशा सकारात्मक निर्णयामुळे. आज दिनेश आणि कांचनचा संसार अत्यंत सुखाचा आणि निर्विघ्नपणे सुरू आहे.
(लेखक नाशिकमधील प्रथितयश सुयश हॉस्पिटलचे संचालक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com