
अश्रू इवलासा दिसत असला तरी तो तुच्छ, हिणविण्यासारखा नाही तर संसारात त्याचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. खरेच जर अश्रू नसते, तर संसार उभा तरी राहिला असता का? आणि उभारलेला संसार टिकला तरी असता का? अश्रूरूपी सुख-दुःखाच्या भावनात समान व्यथेचे नि ध्येयाचे सिमेंट कालविले की जीवनाची इमारत भक्कम झालीच, म्हणून समजावी म्हणूनच माझा अश्रू तसाच आहे, माझे सारे भाग्य त्याच्यातच साठवलेले आहे, असे कवी सांगतो. (Dr Neeraj Deo Latest Saptarang Marathi article on sane guruji marathi poetry nashik news)
साने गुरुजी अर्थात, पांडुरंग सदाशिव साने (१८९९-१९५०) यांचा जन्म पालगड (ता. दापोली, जि. रत्नागिरी) येथे झाला. त्यांचे वडील न्याय विभागात नोकरीला होते, तरी घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. आईचे संस्कार नि विचार हेच साने गुरुजींच्या जीवनाला आकार देणारे ठरले. मुंबई विद्यापीठातून एम. ए. (इंग्रजी) झाल्यानंतर ते अमळनेर येथील प्रताप विद्यालयात शिक्षक म्हणून रुजू झाले. तेथे ते वसतिगृहाचे काम पाहात.
तेथे त्यांनी विद्यार्थ्यांना दिलेले स्वावलंबनाचे पाठ त्याकाळी कौतुकाचा विषय ठरले होते. त्यांनी राष्ट्र सेवा दलाची स्थापना केली होती. साने गुरुजी हे देशभक्त, विचारवंत, संपादक, लेखक नि कवी म्हणून महाराष्ट्राला ज्ञात आहेत. त्यांच्या ‘श्यामची आई’ या कादंबरीवर निर्मित चित्रपट राष्ट्रपती पदक विजेता ठरला होता. त्यांनी लिहिलेला भारतीय संस्कृती हा ग्रंथ त्यांच्या चिंतनशीलतेची खोली दाखविणारा आहे, त्यांनी एकूण ८० पुस्तके लिहिली. त्यांचे सर्व साहित्य अंतरताना संस्करणात मोफत उपलब्ध आहेत.
कवितांचा विचार करता त्यांचा ‘पत्री’ हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला असून, त्यात सुमारे ९९ कविता आहेत. यातील कित्येक कविता वीर रसाचा प्रसार करणाऱ्या आहेत. कवी स्वतःला अभिमानाने गांधीवादी संबोधितो, पण प्रस्तुत कवितात श्रीराम, श्रीकृष्णा सोबत पृथ्वीराज, शिवाजी, बाजी, प्रताप आदी वीरांचे तो करत असलेले उल्लेख, त्याची महाराष्ट्र रसाशी जुळलेली नाळच अधोरेखित करते. याचीच प्रचीती त्याच्या ‘भारत माता माझी लावण्याची खाण’ या कवितेच्या पहिल्याच कडव्यात येते तो लिहितो.
माझ्या महाराष्ट्रभूमींत मोठे
प्रतापी पुन्हा वीर निर्मी विभो
शास्त्रज्ञ, यंत्रज्ञ, वागीश,शिल्पी,
कलाविद् खरे थोर निर्मी प्रभो
धी, नीति, संपत्ति, सद्बुध्दि, सहकार्य
आरोग्य, ऐकयादि येथे रुजो
धावो यशोगंध देवा ! दिगंतात
माझा महाराष्ट्र भाग्यें सजो ।।
कवीची हा महाराष्ट्र धर्मच त्याच्या मुखातून ‘बलसागर भारत होवो!’ ची विशाल भावना व्यक्तवित होता. त्यामुळेच असेल ‘देशभक्त किती ते मरती!’ ची उर्जस्वल तरी पीडादायी जाणीव तो व्यक्त करत जातो, पण त्याचा खरा भाव त्याच्या ‘खरा धर्म’ या कवितेतून पाझरताना दिसतो प्रेममय होणे हाच खरा धर्म ही त्याची धारणा तो या कवितेतून व्यक्तवितो या धारणेसाठी उपयुक्त गोष्ट म्हणजे अश्रू होत असा त्याचा दृढ भाव आहे. त्यामुळेच अर्पणपत्रिकेत तो लिहितो,
मदंतरातील उदंड पाणी
अखंड देतो नयनी भरोनी
ही कवीची ही जाणीवच त्याच्या लेखी अश्रूंचे बळ वाढवित नेते. याचेच दर्शन ‘कवीच्या अश्रू’ या कवितेत आपल्याला घडते कवितेच्या आरंभीच देवाला याचना करताना कवी म्हणतो,
नको माझे अश्रू कधी नेऊ देवा
हाचि थोर ठेवा माझा एक
बाकी सारे नेई धन सुख मान
परी हे लोचन राखी ओले
अश्रू मानवाला मिळालेली मोठी देणगी आहे, मानवी मनातील सहृदय भावनाच अश्रू व्यक्तवित असतात. सुख नि दुःख दोन्ही ठिकाणी ते सहज प्रकटतात. दुःखाच्या ठिकाणी तर त्यांची दाटी होते. कवीला स्वतःचे नाही, तर जगाचे दुःख आहे. ‘जग जसे दिसते तसे नाही’ यामुळे तो व्यथित आहे. त्यामुळेच तो म्हणतो, ‘मयसभा राहिली भरून’ मयसभा याचा अर्थच मुळी जे जसे नाही तसे दिसणे होय या व्यथेमुळेच त्याला मानवी भावनांचे नि सहृदयतेचे मोल अधिक वाटते.
तेच अश्रूंच्या रूपात परिवर्तित होताना दिसते तो देवाला म्हणतो, ‘‘तुला माझ्याकडून जे घ्यायचे असेल ते घे. पण माझे अश्रू घेऊ नकोस, माझी सदयता, सहृदयता घेऊ नकोस तेच मला माझे मायबाप वाटतात, ज्ञानदाते गुरू वाटतात. कारण तेच जाणीव देतात, दायित्वाची आठवण देतात, मानवतेची ओढ लावतात. त्यामुळे ते त्याला हसविणारे वाटतात त्यामुळेच तो गातो,
अश्रू वांचवीती अश्रू हांसविती
माझा फुलवीती जीवनतरु
अश्रूच्या बिंदूंत माझा सुखसिंधु
म्हणजे त्याचे अश्रू हे केवळ दुःखाचे, व्यथेचेच नाहीत तर ध्येयपरिपूर्तीतून येणाऱ्या सुखाचे, तृप्तीचे आहेत, याचाच अर्थ ते दुःखात जाणीव देतात, कर्तव्यप्रवण करतात तर ध्येयपूर्तीत साफल्याचा अनुभवही देतात. त्यामुळेच त्याला ते सुखसिंधू वाटतात.
इवलासा असणारा अश्रू पर्वत बुडवू शकतो, जीवाला मोक्षपदी चढवू शकतो, कठीण वज्राचे चूर्ण करु शकतो, दगडाला लोण्याहून कोमल बनवू शकतो, इवलासा अश्रू मळे पिकवू शकतो, तो खारट आंबट असला तरी तो अवीट सुधा निर्माण करतो अशी अश्रूची महती कवी गातो कवीने गायिलेल्या या महतीत चुकीचे काय आहे? सीतेच्या अश्रूंनी सोन्याची लंका दहन झालेली पाहिली नाही का? मार्केंडेयाच्या अश्रूने मिळालेले मोक्षपद कोणी विसरू शकेल काय? किंवा विपन्न अश्रूतून उभारलेले धृवाचे अढळपद कशाची साक्ष देते जिजाईच्या अश्रूतूनच स्वराज्याचे मळे पिकले होते हे आपल्याला दिसत नाही काय? हे अश्रू खारट-आंबट असले तरी तेच ध्येयाची पूर्तता करीत अवीट गोडीची सुधा उत्पन्न करतात हे कसे विसरता येईल, हे सारे कथन करत कवी सांगतो,
इवलासा अश्रू परी त्याच्या पोटी
कोट्यवधि गोष्टी सांठलेल्या
इवलासा अश्रू परी बोले किती
देवी सरस्वती तेथे मूक !
रसिका! या काव्यपंक्ती उच्च मानसिक अनुभवाचे बोलच दाखवितात. आपण जेव्हा म्हणतो, ‘बोलायला शब्दच नाहीत’ तेव्हा आपण तो भाव शब्दात पकडू शकत नाही, असे सांगत असतो. जे शंभर भाषणांनी साधणार नाही, ते काम अश्रूंच्या दोन धारांनी साधले जाते, किती तरी जागी शब्द उसणे अन् उपरे पडतात, तेथे अश्रू सारे काही सांगून जातात. याच भाषातीत अनुभवाला शब्दबद्ध करताना कवी सांगतो, तेथे देवी सरस्वतीसुद्धा मुकी होते. हा भाव केवळ कवीनेच अनुभवला, असे नसून वेदकालापासून सर्वच कवींचा नि ऋषींचा अनुभव असाच आहे, त्यामुळेच तो सांगतो-
इवलासा अश्रु नका मानूं तुच्छ
संसारी महोच्च स्थान त्याचें
अश्रू इवलासा दिसत असला तरी तो तुच्छ, हिणविण्यासारखा नाही, तर संसारात त्याचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे खरेच जर अश्रू नसते, तर संसार उभा तरी राहिला असता का? आणि उभारलेला संसार टिकला तरी असता का? अश्रूरूपी सुख-दुःखाच्या भावनात समान व्यथेचे नि ध्येयाचे सिमेंट कालविले की जीवनाची इमारत भक्कम झालीच म्हणून समजावी अश्रूची हीच महती सांगताना कवी म्हणतो, की आकाशात दूरुन दिसणारा इवलासे तारे पहा ते कधी मोजता येतील का? बाळकृष्णाने प्रसाद उष्टा केला की नाही हे पाहायला यशोदेने त्याला त्याचे इवलेसे मुख उघडायला सांगितले तेव्हा तिला त्या इवल्याशा मुखात ब्रह्मांड दिसले. किंबहुना इवल्याशा वामनाची तीन पाउले कितीशी पडणार असे बळीराजाला वाटले.
पण बुटकया वामनाच्या तीन पाऊलांनी त्र्यैलोकय व्यापले, भगवान श्रीकृष्णांची न शमणारी भूक द्रौपदीने दिलेल्या इवल्याशा तुलसीपत्राने शमली, तीच गोष्ट भगवंताच्या तुळेची कितीही वजन टाकले तरी न भरणारी ती तुळा रुख्मिणीने इवलेसे पान टाकताच पूर्णत्वास गेली अशी उदाहरणे देत तो पुन्हा मूळपदावर येत सांगतो, माझा अश्रू तसाच आहे. माझे सारे भाग्य त्याच्यातच साठवलेले आहे. येथे भाग्य म्हणण्याचे कारण आधीचे सर्व प्रयत्न साधल्यावर शेवटी सर्व प्रयत्न करून श्रमलो तरी पूर्तता का होत नाही, असा विचार करताच येणाऱ्या अश्रूंनी पूर्तता होऊन जाते हे आहे.
कवीला वाटते, की इवलासा अश्रू अपूर्णाला पूर्ण करतो, जीवनग्रंथाला पूर्णविराम देतो, त्याचा वियोग म्हणजे माणुसकीचा, सदयतेचा वियोग तो आपल्याला कधीच घडू नये, असेच कवीला वाटते. त्याचा अश्रू हीच त्याला आशा वाटते, बळ वाटते, तो जसा लहान आहे तसाच महान आहेसे वाटते, तोच त्याला त्याचा नारायण वाटतो तो सदा पोटात अर्थात, मनात नि डोळ्यात राहावा, ची आस व्यक्त करीत कवी काव्य संपवतो.
लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे कवितेतील अश्रू हे माणुसकीचे, मानवी मनाच्या ओलाव्याचे प्रतीक आहेत पण त्यांचे मोल आपल्या जवळच्या माणसांपुरते मर्यादित असते. फार फार तर माणुसकी असणाऱ्यांना असते. इतरांना नाही. तुम्ही पाषाणहृदयी शत्रूपुढे कितीही आर्जवं केलीत, तरी त्यांचे मोल शून्यच ठरते. कोमलहृदयी कवी सदय हृदयाने जगाकडे पाहत होता. जगाने तसेच असावे ही त्याची आस होती ती चुकीची नव्हती. पण अप्रशस्त होती. त्यामुळे त्याला सारे जग आधी उल्लेख केलेल्या मयसभेसारखे फसवे वाटत होते, याच व्यथेतून या करुणार्द्र कवीने स्वतः सोबत निष्करुण होत आत्महत्या केली. त्याची ती आत्महत्या आचार्य अत्रेंसारख्या साहित्यिकाला मृत्यूचे चुंबन घेणारी वाटली.
संक्षेपात अश्रूंचे मोल जीवनात कितीही मोठे असले तरी व्यक्तिगत जीवनाच्या समस्या सोडविण्यास क्षणिक उपयोगाचे ठरते. मात्र समाजजीवनात त्यांचे मोल चेतविण्याएवढेच असते. पुढील सारे काम चेतनेलाच करावे लागते. त्यामुळेच कर्तव्यबुद्धीची जोडच अश्रूंचे ध्येय साकारण्यासाठी गरजेची असते. सीतेच्या अश्रूंमागे श्रीरामांचा पराक्रम नसता वा इवल्याशा वामनामागे दैवी शक्तीचे पाठबळ नसते वा जिजाऊच्या व्यथेमागे शिवरायाचा पराक्रम नसता, तर ते दुबळे अश्रू काळाच्या गर्तेत कुठेतरी कायमचे विलीन झाले असते हे कधीही विसरू नये.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.