उत्तुंग प्रतिभेचा अजरामर आविष्कारः महाराष्ट्र गीत! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Saptarang

उत्तुंग प्रतिभेचा अजरामर आविष्कारः महाराष्ट्र गीत!

‘महाराष्ट्र’, ‘मराठी’ची ओढ वीतरागी ज्ञानेश्‍वराला वाटली, तर ‘महाराष्ट्र धर्म वाढवावा’ची आस निःसंग रामदासालाही वाटली. त्या महाराष्ट्राची गोडी येथील कवी, लेखक, साहित्यिकांना न लागती तरच आश्‍चर्य होते! मुस्लिम आक्रमणात सारा भारत हतवीर्य झाल्यानंतर अकेल्या महाराष्ट्राचा विजयी पराक्रम मोठमोठ्यांना विस्मित करू लागला. इंग्लिश पारतंत्र्यात जीवन जगताना तर अनेकांना तो पुनःपुन्हा स्मरू लागला. त्यातून अनेकांनी महाराष्ट्राला आपापल्या वाणीने आळविले. त्यात सर्वोत्तम महाराष्ट्र गीत होते ते श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांचे (१८७१-१९३४). त्यांचा जन्म नागपूरचा. शिक्षण वकिलीचे, वास्तव्य जळगाव जामोद या बुलढाणा जिल्ह्यातील छोट्या गावात; पण कीर्ती महाराष्ट्र व्यापणारी होती. मूलतः ते विनोदी लेखक व नाटककार म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी १२-१५ नाटके, दोन कादंबऱ्या, सुदाम्याचे पोहे हा प्रसिद्ध विनोदी लेखांचा संग्रह लिहिला. पुणे येथे भरलेल्या १३ व्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. महाराष्ट्र गीत या आपल्या प्रसिद्ध कवितेच्या धृपदातच ते रसिकांच्या हृदयाचा ठाव घेताना दिसतात.

बहु असोत सुंदर संपन्न की महा।

प्रिय अमुचा एक महाराष्ट्र-देश हा।।

कवितेच्या धृपदातील या ठेक्यावर कुणीही मराठी फिदा होईल, नव्हे; गेली शंभर वर्षे फिदा झालेला आहे. जगांत कितीही सुंदर संपन्न देश असोत, पण आम्हाला आमचा महाराष्ट्रच प्रिय आहे. ही करोडो मराठी जणांची भावनाच कवी धृपदातून व्यक्त करतो. येथील पर्वतरांगांप्रमाणेच महाराष्ट्राच्या आकांक्षादेखील गगनभेदी आहेत. त्यांच्यापुढे आकाशसुद्धा थिटे आहे, असे कवीला वाटते. त्याचे कारण पारतंत्र्यात असताना महाराष्ट्राने केवळ स्वतःचा विचार केला नाही, तर अखंड भारताचा विचार केला. महाराष्ट्र मुघलांच्या तावडीतून सुटतो न् सुटतो तोच मराठी सेना थेट काबुलपावेतो अर्थात अटकेपावेतो पोचल्या. जेथवर त्या पोचल्या तेथवरच आजचा स्वतंत्र भारत आहे. त्या पोचू शकल्या नाहीत, तो भाग भारतापासून वेगळा झाला, ही वस्तुस्थिती आहे. जरी मराठी सैन्य अटकेपर्यंतच पोचले, तरी येथील पौरुषाला-पराक्रमाला कोणतीच सीमा नाही. हे वर्णन करताना कवी म्हणतो,

हेही वाचा: जागतिक नवरचनेचं आव्हान

‘पौरुषासि अटक गमे जेथ दुःसहा’

असा अटक शब्दाचा श्‍लेष साधतो. तो सुजाण रसिकाला सहजच भावतो. जागतिक पराक्रम करून झोपड्यावजा घरात राहणाऱ्या महाराष्ट्राला मोठमोठ्या राजवाड्यांची आवश्यकता नाही. कारण येथील जनतेची हृदयमंदिरे त्याहून विशाल तर आहेत. खलांचा अर्थात् दुष्टांचा नाश करावा अशी वचने यच्चयावत धर्म ग्रंथात, सर्व देशात व जगातील सर्व भाषांत सापडतील. पण ‘खलांचे; दुष्टांचे नव्हे तर त्याच्यातील दुष्ट प्रवृत्तीचा नाश व्हावा.' अशी आंस येथील १६ वर्षांचा पोरगा व्यक्तवितो. हे ज्ञात असल्यानेच कवी 'सद्‌भावांचीच भव्य दिव्य आगरे’ असा महाराष्ट्र मातेचा गौरव करतो. इतकेच कशाला, इथल्या लोकांना खोट्या रत्नमाणकांची गरजच नाही; कारण येथील शीलवती मातांनी अनेक नररत्नांना जन्म दिलाय, अशी साक्ष कवी देतो.

हातात नग्न खड्ग घेऊन धावत येणारे उघडेवाघडे मावळे बघितल्यावर हत्ती, घोडे, तोफ गोळ्यांसह सज्ज असणाऱ्या चतुरंग सेनेचेही धैर्य मावळते. अगदी एकटा मराठा जरी दौडत येत असला, तरी तो शत्रूला शंभर जणांएवढा वाटतो आणि असे वीर चहूबाजूंनी धावत येताहेत हे ऐकूनच शत्रू गर्भगळीत होतो. कवीची ही उक्ती सार्थ आहे, कारण त्याकाळी भारतावर मुघल, तुर्क, अरब, इंग्रज, फ्रेंच, डच असे वेगवेगळ्या देशातील लुटारू आक्रमक राज्य करत होते अन् त्या साऱ्यांशी एकटा महाराष्ट्र समर्थपणे झुंजत होता, विजयी होत होता. महाराष्ट्रापासून दूर पानपतावर जाऊन एकहाती पराक्रम गाजवत होता. या साऱ्या ऐतिहासिक सत्याचे प्रतिबिंबच या कडव्यात आपल्याला सापडते. या दृगोच्चर होणाऱ्या पराक्रमाचे अंतरंग उलगडताना कवी गातो-

विक्रम वैराग्य एक जागिं नांदती ।

जरिपटका भगवा झेंडाहि डोलती ।।

धर्म राजकारण समवेत चालती ।

शक्ति-युक्ति एकवटुनि कार्य साधिती ।।

पसरे यत्कीर्ति अशी विस्मयावहा । प्रिय अमुचा...

महाराष्ट्राच्या ठायी निव्वळ पराक्रम नव्हता, तर त्याला वैराग्याची कोंदण होती. येथे स्थापन झालेले स्वराज्य हे श्रींच्या इच्छेचे प्रतीक होते. जिंकलेल्या राज्याच्या सनदा छत्रपतींनी समर्थांच्या झोळीत टाकल्या. छत्रपती शाहूंनी भारताचे कल्याण लक्षात घेऊन आपले राज्य स्वेच्छेने बाजीरावाच्या पराक्रमाला दान दिले. हा सारा भाव कवी ‘विक्रम वैराग्य’ या जोडशब्दांत वर्णन करतो. जरिपटका संपन्नतेचे, तर भगवा झेंडा विरक्तीचे प्रतीक आहे. त्यामुळेच तत्कालीन महाराष्ट्राचे संपन्न- वैराग्याचे दर्शन रसिकाला सहजी होते. येथील राजकारणाला धर्म आहे, धर्म म्हणजे नीतिमत्ता म्हणून शालिवाहन स्त्री-बालक सत्तेवर असलेल्या राज्यावर आक्रमण करीत नाही, तर बंदी म्हणून आणलेल्या स्त्रीला शिवाजी राजे साडीचोळी देऊन बोळवण करतात. महाराष्ट्र केवळ शक्तीने नाही, तर युक्तीनेही झगडतो. तो केवळ आक्रमणानेच नाही, तर नमते घेऊनही शत्रूचा कोथळा बाहेर काढतो. त्याच्या या अद्‌भुत पराकमाने सारे जग विस्मयचकित होते, यात शंकाच नाही.

हेही वाचा: प्रेमाचा विजय अन् दोनदा लागलं लग्न

अशा मराठ्यांचे गौरवगीत सदैव आळवीत राहावे, ऐकत राहावे असे कवीला वाटते. कारण या गीतात पारतंत्र्य नाशाची स्फूर्ती आहे, दिशा दाखविणारी दीप्ती आहे अन् यश मिळेपावेतो झगडण्याचे धैर्य आहे. या तीनही बाबी कवि स्फूर्ती, दीप्ती, धृती या तीनच शब्दांत व्यक्तवितो. आपल्या लिहिण्या-बोलण्यात मराठीचा मर्द बाणा राहावा, मनांत सतत स्वातंत्र्यप्रेमी महाराष्ट्र धर्म आणि त्यासाठी वापरली जाणारी युक्ती राहावी. त्यासाठीच आपला देह पडावा, अशी आस व्यक्त करीत कवी आपले काव्य शिखराला पोचवितो अन् ‘प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा’ गजर करीत रसिकांना आंदोलित करतो.

या कवितेत कवीने वापरलेली उत्कट नि समर्पक शब्दरचना, ठायी ठायी साधलेले यमक अन् उत्क्रांत होत जाणाऱ्या वस्तुस्थिती दर्शक कल्पना वाचताना, ऐकताना रसिक मंतरलेला होतो. हे पाहिले म्हणजे गोविंदाग्रजांनी श्रीमहाराष्ट्र गीतात ‘तिथेच खेळे श्रीपादाची कलावती वाणी’ असे कोल्हटकरांच्या वाणीचे केलेले वर्णन सार्थ वाटू लागते.

(लेखक प्रख्यात मनोविकारतज्ज्ञ आहेत.)

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Marathi Poetrysaptarang
loading image
go to top