अजुनि चालतोचि वाट!

‘अजुनि चालतोचि वाट’ ही रेंदाळकरांची कविता आपण पाहणार आहोत.
Poet Rendalkar
Poet Rendalkaresakal

रसिका! ‘अजुनि चालतोचि वाट’ ही रेंदाळकरांची कविता आपण पाहणार आहोत. त्यात कवी स्वतःची व्यथा मांडता मांडता नश्वरतेचा शाश्वत उद्घोष करणाऱ्या वैश्विक सत्याशी इतका एकरूप होतो, की रसिकाला त्याच्याशी तद्रुप होण्यावाचून विकल्पच शिल्लक राहात नाही.

ए कदा कवी रेंदाळकर कोल्हापूरवरून आपल्या रेंदाळ या गावी पायी चालले होते. रस्त्यात ओसाड माळ लागला. तसा तो नेहमीच लागायचा; पण आज मनांत काहीशी खळबळ चालली असावी. त्यामुळे तो माळ सरता सरत नाही, असे कवीला वाटू लागले. कोणत्याही विषयावर काव्य करू शकणारे रेंदाळकर गुणगुणू लागले,

अजुनि चालतोचि वाट ! माळ हा सरेना
विश्रांतिस्थल केव्हा यायचे कळेना !

खरेतर कोल्हापूर रेंदाळ अंतर जवळपास दोन-अडीच किलोमीटरचेच होते. पण मनात खळबळ चालल्याने ते अंतर फारच जास्त वाटू लागले. तसे पाहिले तर कवीचे गृहजीवन अस्ताव्यस्त होते. घरात शांतता, आराम बेताचाच असावा. त्यामुळे नकळत तो माळ, म्हणजे कवीचे खडतर जीवनाचे प्रतीक बनतो. परिणामी, विश्रांती स्थळ केव्हा येणार? हा कवीला पडलेला प्रश्न कवितेला बृहत् अर्थ प्रदान करतो. हा अर्थ प्रदान करतानाच कवी पुन्हा वास्तवाकडे वळत सांगतो, की ‘आता देहात पाय पुढे टाकण्याइतकेही त्राण उरलेले नाही. डोके गरगर फिरतेय. त्यामुळे पूर्ण दैना होते आहे.’ आणि पुन्हा गहनतेकडे वळत तो सांगतो,

सुखकर संदेश अमित पोचविले कोणा,
भार वाहुनी परार्थ जाहलो दिवाना!

Poet Rendalkar
धर्मभ्रष्टांचे संस्कारवर्ग

या ओळींचे रसग्रहण करताना ज्येष्ठ कवयित्री शांताबाई शेळक यांनी, ‘पोस्टमनचे प्रतीक येथे वापरले आहे.’ रानार अर्थात पोस्टमन नावाची बंगाली कविता होती. ती वाचून रेंदाळकरांना ही कविता सुचली असावी की काय, अशी शक्यता व्यक्त केली होती. येथे दोन बाबी स्पष्ट करणे गरजेचे आहे, की या ठिकाणी पोस्टमनचे प्रतीक चपखल बसत नाही. कारण पोस्टमन केवळ सुखकरच नाही तर दुःखदायी संदेशही निर्विकारपणे पोचवत असतो आणि ते देताना तो दिवानाही होत नाही. दुसरी बाब म्हणजे रेंदाळकरांना बंगाली येत होते व जर त्यांनी ती रानार अर्थात पोस्टमन कविता वाचून तेच प्रतीक वापरले म्हटले, तरी ती कविता ही नसून त्यांची ‘डाकवाला’ ही कविता असू शकते.

तीत-
लहानशी पिशवी चमड्याची
गळ्यात अडकवुनि डौलाने
दूत यमाचा, स्वर्गसुखाचा
रडवीं, हंसवीं पत्रवाहका !

कर जा अपुले कामअसे स्पष्टपणे म्हटले आहे. डाकवाला सुखाची वार्ता आणतो, तशाच दुःखाच्या, वेदनेच्याही वार्ता आणतो, हे कवीला चांगलेच ठाऊक आहे.
मला असे वाटते, रेंदाळकर जसे कवी होते तसेच संपादकही होते. अनेक कवींच्या अनेक कविता प्रकाशित करून त्यांनी त्यांना अमित सुख पोचविले होते. त्यांच्या काही कवितांचे तेही दिवाणे झाले होते. पण कवी म्हणून रेंदाळकरांना उपेक्षाच फार लाभली. त्यांच्या ‘डबक्यात पडलेले फूल’ या कवितेवर तर प्रचंड टीका झाली होती. आपले हे दुःख व्यक्तविताना कवीने बाभळीच्या उपेक्षित फुलाशी स्वतःचे साम्य असल्याचे म्हटले होते. त्यांच्या उदास जीवनात केव्हातरी कविवर्य लेंभयांनी रेंदाळकरांच्या कवितेच्या प्रशंसा करणाऱ्या चार ओळी लिहून पाठविल्या. त्या वाचून आपल्याला काय वाटले, हे सांगताना रेंदाळकरांनी लिहिले होते-

Poet Rendalkar
चरित्राने घडते चरित्र...


झालो विस्मित कौतुकस्तिमित मी, शंकाही आली मनी
प्रेमप्रेषित आपली कविवरा ! ही पत्रिका वाचुनी

कवीने वापरलेले ‘विस्मित’, ‘कौतुकस्तिमित’ व ‘शंका वाटणे’ हे
सारे शब्दप्रयोग त्याच्या काव्यगुणांना मिळणारा स्तुतिरुपी प्रतिसाद किती दुर्मिळ नि दुर्लभ होता, याचेच दर्शन घडवितात. त्यामुळेच वाटते, की या व्यथेला तर कवी या कडव्यात चित्रित करीत नसावा ना?


पुढे कवी सांगतो, ‘मी ज्यांच्यासाठी कष्टांत जीव घातला, ज्यांना सुखविण्यासाठी आटापिटा केला. हेच आपले घर म्हणून जीव कष्टविला. ते काहीच माझे नाही. हे समजल्याने कितीतरी अश्रू गळताहेत.’ आता कवी परिवाराकडे वळताना दिसतो. यात बहुधा पत्नी नि मुले असावीत. कवीच्या चरित्रकारांनी त्याच्या पत्नीला हिस्टेरिया होता, असे म्हटले आहे. हिस्टेरियाने पीडित व्यक्ती थोड्या थोड्या गोष्टीने भावना दुखवून घेणारी, इतरांचे लक्ष वेधून घेणारी, काहीशी हटवादी, छोट्या छोट्या गोष्टीचे भांडवल करणारी, वारंवार दवाखाने, बुवाबाजीकडे वळणारी असते. याचा विचार केला तर तुटपुंजी कमाई असणाऱ्या रेंदाळकरांची दैना चटकन ध्यानात येते. त्यामुळेच आटापिटा केलेले ते घर आपलेच का ? हा विचार कवीच्या मनांत डोकावतो. पण

दिन गेले मास गेले वत्सरेही गेली ।
निकट वाटते जीवनसंध्या ही आली ।।

या ओळी विचक्षण रसिकाला ‘पुनरपि रजनी पुनरपि दिवसः’ म्हणणाऱ्या आचार्य शंकराची आठवण करून देतील. कवी म्हणतो, ‘पाहता पाहता दिवस गेले, महिने, वर्षे गेली.’ कवीचे हे शब्द पन्नाशी-साठी उलटलेल्या कोणाही चिंतनशील वाचकाला अंतर्मुख करतील. कळत-नकळत वाचकाला या दोन कडव्यांना जीवनाच्या नश्वरतेचा स्पर्श झाल्यासारखा दिसेल. आपले खरे घर म्हणजे तुकोबांना गवसलेले ‘अमुचे गाव’ असावे, असेच वाटू लागेल. कवीने स्वदुःखाला दिलेली ही उंची कवीची तळमळ सहजपणे रसिकाप्रत पोचवून जाते. याच निराशामय विचारात कवीला वाटते, त्याची जीवनसंध्या आली. दुर्दैवाने पुढे काहीच वर्षांत ती खरीही ठरली. खरेतर तिशीत असलेल्या कवीची ही कल्पना त्याच्या तीव्र व्यथेचे दर्शन घडविते. याच तालात तो स्वतःलाच पुसतो ‘कुठून आलो नि कुठे जायचे काहीच ठाऊक नाही.’ अन् वेदनेचा तीव्र झटका बसावा; तसे उद्‍गारतो, की पोचण्याआधीच; मार्गातच माझी आयु सरून तर जाणार नाही ना? कवीच्या या ओळी सहृदय मनाला घायाळ करतात. पण ते कमी वाटून की काय, कवी गातो

काय निरुद्देश सर्व जीवन मम होते ।
मरुसरितेपरि अवचित झरून जायचे ते ।।


स्वतःचे सर्व जीवन कवीला निरुद्देश वाटू लागते. वाळवंटात झरून, आटून जाणाऱ्या नदीसारखे वाटते. त्याची ही उदास भावना चिंतनशील माणसालाही कधी कधी एखाद्या प्रसंगी जाणवते. मग हे आपले जीवन अर्थहीन वाटू लागते. ज्याला आपण मोठ्या गोष्टी म्हणतो, त्यातील हीनता जाणवू लागते. कवीला ती प्रकर्षाने बोचते. म्हणूनच वैतागाने तो सांगतो

Poet Rendalkar
सोनेरी स्वप्नं : डोळ्यांत दाटलेलं आभाळ

पुरे पुरे ही असली मुशाफरी आता ।
या धुळीत दगडावर ठेवलाच माथा ।।


जीवनाला अर्थच नाही, निरुद्देश आहे ते; हे ध्यानात आले, की आशा गळून पडते, मन झाकाळून जाते, जीवनरुपीयात्रा आता पुरे झाली, असे वाटू लागते. व्यक्ती आहे तेथेच गलितगात्र होऊन थांबून जाते, तेच कवी करताना दिसतो.
कवीची ही कविता ‘अंधाऱ्या रात्री पडक्या देवळाच्या उजाड गाभाऱ्यात, धुमसून पेटणाऱ्या धुनीसारखे त्यांच्या (रेंदाळकरांच्या) चरित्राचे अवलोकन मनाला अगदी उदास करून सोडते.’ या माडखोलकराच्या वक्तव्याची पुष्टी करणारीच ठरते. मात्र येथे हे विसरता कामा नये, की कवी स्वतःची व्यथा मांडता मांडता नश्वरतेचा शाश्वत उद्घोष करणाऱ्या वैश्विक सत्याशी इतका एकरूप होतो, की विचक्षण रसिकाला त्याच्याशी तद्रुप होण्यावाचून विकल्पच शिल्लक राहात नाही.

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com