
आत्मयज्ञाचे सूतोवाचः सांत्वन !
रसिका ! एखाद्या लोकोत्तर कर्तृत्वाच्या महापुरुषाच्या महोदार चरित्राला चित्रित करायला तितक्याच उच्च प्रतिभेचा साहित्यकार लागतो. योगायोगाने असा प्रतिभासंपन्न साहित्यकार लाभला तरी त्यात अडचण ही असते, की त्या प्रतिभावंताला त्या लोकोत्तर महापुरुषाचे केवळ बहिरंगच ज्ञात असतात. पण अंतरंग पूर्णतः माहीत नसतात. त्यामुळे त्या चरित्राचा बाज हा केवळ अन् केवळ बाह्य स्वरूपापुरताच मर्यादित राहतो. जर एखाद्या महापुरुषाने लोकोत्तर कार्य करतानाच सोबत आपल्या जीवनावर भाष्य केले, तर त्यात बहिरंगासोबत अंतरंगही दिसू लागतात. समाजजीवनासाठी तो दुर्लभ योग असतो अन् त्यातही ते भाष्य करताना तो लोकोत्तर महापुरुष उच्चकोटीचा प्रतिभावंत साहित्यकारसुद्धा असेल तर... तर तो योग देवदुर्लभ ठरतो. सावरकरांचे आत्मनिष्ठ काव्य याच देवदुर्लभ सदरात बसणारे आहे.
१९०९ च्या फेब्रुवारीत सावरकरांचा एकुलता मुलगा मरण पावला. त्यापाठोपाठ जून महिन्यात सावरकरांचे मोठे भाऊ बाबाराव सावरकरांना जन्मठेपेची शिक्षा झाली. धाकटा भाऊ बाळलाही इंग्रजी शासनाने अटक केली. घरात शिजत असलेल्या खिचडीच्या भांड्यासह सारे काही जप्त करण्यात आले. या साऱ्या वार्ता बाबारावांच्या पत्नी यशोदाबाईंनी विनायकरावांना कळविल्या. तेव्हा निराधार झालेल्या आपल्या वहिनीस सावरकरांनी घाईघाईत लिहून पाठविलेले पत्र म्हणजे ‘सांत्वन’ ही कविता होय.
पतीला जन्मठेप व दीराला अटक झाल्याने मातृतुल्य वहिनी तीव्र मानसिक ताणात आहेत. शिवाय इंग्रज सरकारचा कुटुंबावर रोष आल्याने समाजातील कोणीही वहिनीच्या सहाय्याला येणार नाही. त्यामुळे एकट्या पडलेल्या निराधार व अल्पशिक्षित वहिनीला हे विराट दुःख पचवून खंबीरपणे उभे राहाता यावे, यासाठी पाठवलेली ही पत्ररूप कविता असल्याने सावरकर तीसाठी शांतरसाचा परिपोष करणारी ज्ञानदेवाची ओवी वापरतात. पत्राच्या मायन्यात ते लिहितात-
जयासी तुवा प्रतिपाळिलें । मातेचें स्मरण होऊं न दिलें
श्रीमती वहिनी वत्सले । बंधु तुझा तो तुज नमीं
रसिका ! किती ओलावा आहे या मायन्याच्या पंक्तित ! खरंतर वहिनी नि विनायकरावांच्या वयात फारसे अंतर नव्हते, पण ते त्यांना मातेचे स्थान अर्पितात. येसू वहिनींना माता म्हणण्यामागे दोन कारणं आहेत. एक त्या मोठ्या भावाची पत्नी आहेत अन् दुसरे विनायकाच्या शिक्षणासाठी स्वतःच्या आईची शेवटची आठवण असलेली नथसुद्धा बाबारावांजवळ मोडायला देताना या साध्वीने कुरकूर केलेली नाही. असे वहिनींच्या आईसमान मायेचे खंडोगणती प्रसंग सावरकरांच्या डोळ्यांपुढे तरळत असतील. पण माता म्हणून ही मन न भरल्याने, पुन्हा ‘वत्सले’ असा शब्दप्रयोग करत सावरकर ‘मी तुझा लहान भाऊ आहे’ हे सांगायला विसरत नाहीत. हे सारे सांगण्यामागे एकच हेतू आहे, जेमतेम तिशीत असणाऱ्या येसूवहिनीतील मातृत्वाचा भाव जागा व्हावा. कारण मातृत्व सहनशील असते अन् ज्याकाळी सावरकर हे पत्र लिहित होते त्याकाळी त्यांच्या कुटुंबावर होत असलेले अन् होऊ घातलेले आघात सहन करण्याची अपरिमित ताकद एखाद्या महामातेतच असू शकणार होती. तीच वहिनीत उत्पन्न व्हावी व वाढावी याच भावाने ते लिहितात-
आशीर्वाद पत्र पावलें । जें लिहिलें तें ध्यानीं आलें
मानस प्रमुदित झालें । धन्यता वाटली उदंड
धन्य धन्य अपुला वंश । सुनिश्चयें ईश्वरी अंश
श्री-राम-सेवा-पुण्य-लेश ।
आपुल्या भाग्यीं लाधला
सुहृद रसिका ! काय पंक्ती आहेत या! सदैव मस्तकी धारण कराव्यात अशाच. सावरकर म्हणतात, ‘वहिनी आपण जे लिहिले ते माझ्या ध्यानात आले. खूप खूप संतोष वाटला, प्रसन्नता वाटली,
आनंद वाटला आणि धन्यता वाटली. ‘आनंदित व्हावं, प्रसन्न वाटावं, खूश व्हावं असं काय घडलं होतं? भाऊ कलेकटर झाला, डॉक्टर झाला, शासनाने सत्कार केला तर सामान्यलोक प्रमुदित होतात, खूश होतात. पण येथे तर एकाला जन्मठेप झालीय, दुसरा पकडला गेलाय, घरदार उद्ध्वस्त झाले नि हा प्रतिभावंत लोकोत्तर पुरुष म्हणतोय, ‘आनंद वाटला, धन्यता वाटली’. हे धन्यता वाटण्याचे कारण देशासाठी भोगलेल्या हालअपेष्टा, कष्टभोग हेच सच्च्या हुतात्म्याच्या मनाला प्रसन्नता देतात. एखाद्या हुतात्म्याचे मनोगत काय असते, ते या ओळी दाखवून जातात.
‘आपण भोगत असलेले कष्ट, दुःख हे देवासाठी आहेत’, ही भावना मनाला सुखवून जाते. दुःख पचविण्याचे सामर्थ्य देते. हे सावरकर पक्केपणाने ओळखतात. म्हणून तर हुतात्मा मदनलालला लिहून दिलेल्या अंतिम निवेदनात ते ‘माझ्या देशाचा अपमान; देवाचा अपमान आहे.’ असे संबोधतात. तोच देश-देव अभिन्नतेचा भाव आपल्या दुःखी, कष्टी वहिनीच्या ठायी आणखी बळावा म्हणून ते देशसेवेला रामसेवेचे रूप देतात.
पुढे ते वहिनींना सांगता सांगता स्वतःच्या मनाला समजावतात, ‘जगात अनेक फुले फुलतात अन् सुकतात. कोणी त्यांची नोंद ठेवीत नाही. पण जे देवासाठी मरते तेच फूल अमर होते. येथे कवी गजेंद्रमोक्षाचे उदाहरण देत त्या बलिदानी फुलाच्या गाथेचे स्मरण देतो. फुलाची ही उपमा स्पष्ट करताना पुढील कडव्यात तो
‘काही सार्थकता घडावी । या नश्वर देहाची’ असा निर्देश देतो.
त्याला सांगायचे असते, नश्वर देहाची सार्थकता सुखोपभोगात नसून उच्चतम ध्येयासाठीच्या त्यागात असते. हाच त्याग नश्वर देहाला कीर्तिरुपी अमरता प्रदान करतो.
अमर होय ती वंशलता । निर्वंश जीचा देवांकरिता
आपला वंश अखंड चालावा, ही इच्छा २१ व्या शतकातील सुशिक्षितालापण वाटते. त्यासाठी तो करत असलेले प्रकार आपणही पाहतो. मग हीच इच्छा १९ व्या शतकात जन्मलेल्या अडाणी वहिनींना वाटत असेल तर त्यात काय आश्चर्य? पण सावरकरांच्या स्वातंत्र्याच्या, देशभक्तीच्या ध्यासाने वेळ अशी येऊन ठेपली होती, की सावरकर घराण्याचा वंश चालवायला कोणीच उरलेले नव्हते. बाबाराव जन्मठेपेवर, नारायणाचे भविष्य कुमारवयात इंग्रजांनी दावणीस टांगलेले, विनायकरावांचा एकुलता एक पुत्र नुकताच वारलेला या पार्श्वभूमीवर वहिनींची मनोदशा ओळखून सावरकर सांगतात. ‘जी घराणी देश-धर्म-देव कार्यासाठी निर्वंश होतात. ती अमर होत असतात. लोकांच्या हितासाठी, मातृभूमीच्या काजासाठी सुकुमार युवकांनी बलिदानाचा असाच यज्ञ मांडला तर वेळ येताच ती स्वातंत्र्यलक्ष्मी प्रगटेल, असा आशावाद ते प्रकट करतात. सावरकरांच्या या ओळी हुतात्म्यांच्या मनातील भाव अधिकच ठळकपणे व्यक्त करतात. यानंतर पुन्हा वहिनींना संबोधून ते लिहितात-
तू धैर्याची अससी मूर्ति । माझे वहिनी, माझे स्फूर्ति
खरेतर केवळ वहिनीच नाही, तर तिच्या पतीचे बाबारावांचे देशकार्यातील स्फूर्तिस्थान विनायकरावच होते. पण येथे सावरकर वहिनींना माझे स्फूर्ती म्हणतात, त्यामागे दोन कारणे आहेत. पहिले विनायकाने घेतलेल्या व्रताला ज्यावेळी मूर्तरुप येण्याचे कोणतेही चिन्ह नव्हते, जाणते म्हणवणारे पोरकट, बालिश म्हणून सावरकरांना हीनवीत होते, त्याकाळी वहिनींनी नात्याचा मोठेपणा पुढे करत त्यांच्या कार्यात कधी खोडा घातला नाही. उलट त्या बिकट काळात हौसेने सर्व सहाय्य करत विनायकाच्या देशकार्याला बळ दिले आणि दुसरे जेव्हा एखाद्यापासून स्फूर्ती घेऊन दुसरा देशभक्त हुतात्मा होतो तेव्हा तो आपल्या कृतीने आपल्या प्रेरणापुरुषाचे स्फूर्तिस्थान बनतो. त्यामुळेच सावरकरांपासून स्फूर्ती घेऊन हुतात्मा होणाऱ्या मदनलालला सावरकर जेव्हा भेटायला गेले तेव्हा ते मदनलालला म्हणाले, ‘मी आज तुमच्या दर्शनाला आलोय.’ तसाच भाग वहिनींचा होता, बाबारावांच्या जन्मठेपेने न दिसणारी जन्मठेपीची शिक्षा वहिनींच्या भाळी आली होती. दीराला वा नवऱ्याला दुषणे न देता मूकपणाने ती ते सर्व भोगत होती. जणू काही कळत-नकळत सावरकरांच्या देशकार्याला ती चैतन्य पुरवित होती. त्यामुळे ती आता त्याची जिवंत स्फूर्तिच बनली होती. ती बळकटपणे टिकावी म्हणून सावरकर पुढे लिहितात-
महत्कार्याचे कंकण धरिले । आतां महत्तमत्व पाहिजे बाणले
ऐसे वर्तन पाहिजे केले । की जे पसंत पडेल संतांना
सावरकर कर्तव्य कठोर वर्तमानात उतरत वहिनींना जाणीव देतात, की आपण मोठ्या कामाचे व्रत हाती घेतलेले असल्याने आता आपण संतांना पसंत पडेल असेच वर्तन केले पाहिजे. रसिका ! लक्षात घे येथे सावरकर लोकांना पसंत पडेल असे वर्तन न म्हणता संतांना पसंत पडेल असे वर्तन म्हणतात. संत म्हणजे जे लोकांच्या जीवनात वसंत फुलावा म्हणून ग्रीष्मात विचरण करीत असतात तेच होत. स्वतः जळत दुसऱ्यांचे जीवन प्रकाशित करणे हेच त्यांचे ध्येय असते. त्याच असिधारा व्रताची सावरकर वहिनींना आठवण देतात. याच सूत्राचा पुनरुच्चार करताना ते लिहितात-
अनेक पूर्वज ऋपिश्वर अजात वंशजांचे संभार
साधू साधू गर्जतील ऐसे वर्तणे या काळा
भूतकाळातील महान त्यागवीर पूर्वजांना व अद्यापि जन्मालाही न आलेल्या भविष्यातील महान वंशजांना आपले आजच्या विपत्तिकाळातील वर्तन पाहून साधू साधू गर्जावे असेच वाटावे असे आपण वागावे, अशी विनंती वहिनींना करीत सावरकर आपले काव्यमय पत्र संपवतात. यात भूतकाळातील त्यागवीर पूर्वज म्हणजे सावरकर घराण्यातील पूर्वज नसून देशासाठी त्यागाची परिसीमा करणारे दधिचीपासून प्रताप, शिवाजी, गोविंद, बंदा बैरागी, वासुदेव बळवंत, चापेकरांपर्यंतचे अनेक ज्ञात-अज्ञात पूर्वज होत. तर भविष्यकाळातील अजात वंशज म्हणजे स्वतंत्र भारतात वावरणारे आपण सारे व आपल्याही पुढील पिढ्या होत. थोडक्यात, या पंक्तीत सावरकर ‘भारत हेच कुटुंब’ची भव्य भावना वहिनींसमोर ठेवतात.
नीट पाहिले तर या कवितेला कवी सांत्वन म्हणत असला तरी हे सांत्वन नसून पराकोटीच्या त्यागासाठी कवी आपल्या मातृतुल्य वहिनींना, पत्नीला व पर्यायाने देशभक्तांना सिद्ध करीत आहे. ही पृष्ठभूमी ध्यानांत घेतल्यानेच पुरोगामी विचारवंत नरहर कुरुंदकरांना, ‘या कवितेतून सावरकरांचे कठोर तप व उत्कट नि निरपेक्ष देशप्रेम दिसून येते’, असे वाटते. यावर अधिक भाष्य काय करावे.