देखणा आणि नशीबवान

भारतभूषण झाला, जॉय मुखर्जी झाला, प्रदीप कुमार झाला, आता विश्वजित कधी? असा प्रश्न हा स्तंभ नियमितपणे वाचणाऱ्या एका वाचकाने मला विचारला.
bishwajeet actor
bishwajeet actorsakal

भारतभूषण झाला, जॉय मुखर्जी झाला, प्रदीप कुमार झाला, आता विश्वजित कधी? असा प्रश्न हा स्तंभ नियमितपणे वाचणाऱ्या एका वाचकाने मला विचारला. विचार केला की चॉकलेट हिरोंची ही चौकट विश्वजितबरोबर संपवून टाकावी. चॉकलेट हिरोच्या अत्यंत योग्य अशा व्याख्येत विश्वजित बसायचा. तो कॅडबरी चॉकलेट नसेल; पण एक गोड चॉकलेट मात्र नक्की होता. तो कलकत्त्याचा.

त्याचे वडील डॉक्टर होते. त्याच्या वडिलांना विश्वजितचं अभिनयाचं प्रेम अजिबात आवडायचं नाही. त्यांनी विश्वजितला डेहराडून लष्करी अकादमीत पाठवण्याची तयारी केली होती. विश्वजित आणि लष्करात? कुछ तो गडबड है दया! पण विश्वजितला लक्षात आलं की, हे आपलं क्षेत्र नाही, बंदूक उचलून लढणं हे आपलं काम नाही. सिनेमातसुद्धा त्याने फार मोठी मारामारी कधी केली नाही. त्याच्या प्रकृतीला, शरीराला आणि प्रतिमेला जमेल इतपतच त्याने लढण्याची वृत्ती दाखवली. त्यामुळे त्याने थेट रंगमंच गाठला. कलकत्त्याच्या बहुरूपी संस्थेची नाटकं तो करायला लागला. एक दिवस तिथला एक दिग्दर्शक विश्वजितच्या वडिलांना सांगायला आला. त्याने काय सांगितलं असेल? ‘तुमचा मुलगा किती सुंदर अभिनय करतो पहा!’

एक तर बंगाली नाट्य अभिनयाची व्याख्या आपल्या व्याख्येपेक्षा वेगळी असावी किंवा आपल्याला काही कळत नसावं, कारण विश्वजितने पुढं सिनेमात त्याच्याकडे अविस्मरणीय अभिनयाची गुणवत्ता आहे, असा दाखला कधी दिला नाही. पण माझी खात्री आहे की, मलाच अभिनयातलं काही कळत नाही. कारण त्याचं एक नाटक पाहून गुरुदत्तने त्याला ‘साहेब, बीबी और गुलाम’मधली एक भूमिका देऊ केली होती. गुरुदत्तसारख्या मोठ्या दिग्दर्शकाला जर त्याच्यात अभिनय गुण दिसले असतील, तर आपण पामर त्याच्या अभिनयाबद्दल काय बोलणार!

मराठी नाटकामधल्या नटांबद्दल हिंदी सिनेमामध्ये प्रचंड आदर आहे, कारण मराठी नाटकातून हिंदी सिनेमात गेलेल्या नटांनी तिथं फार चांगला ठसा उमटवला आहे. विश्वजितच्या बाबतीत असं काही घडलं नाही; पण गुरुदत्त त्याच्या एवढ्या प्रेमात होता की, गुरुदत्तने त्याच्याबरोबर पाच वर्षांचा करार करायचा ठरवलं. त्या वेळी गुरुदत्त बंगाली सिनेमात काम करत होता. विश्वजितला हेमंत कुमारने सांगितलं, ‘तू गुरुदत्तवर विश्वास टाकू नकोस. तो चित्रपट काढेल की नाही याचा भरोसा नसतो. तू त्याच्याबरोबर पाच वर्षांचा करार करू नकोस.’

त्या वेळी हेमंत कुमार ‘बीस साल बाद’ हा चित्रपट काढत होते. त्या चित्रपटासाठी त्यांना आधी उत्तमकुमार हवा होता; पण उत्तमकुमार त्या वेळी बंगाली चित्रपटांत खूप बिझी होता, म्हणून त्यांनी आधी विश्वजितला घेतलं. विश्वजितला आपलं बंगाली हिंदी सुधारण्यासाठी शिकवणी ठेवावी लागली. विश्वजित म्हणतो ‘‘बेकरार करके हमे यू न जाईए’ या गाण्याच्या वेळी दिग्दर्शकाने मला सांगितलं, वहिदाला स्पर्श न करता रोमान्स कर. तो रोमान्स तुझ्या चेहऱ्यावर दिसायला हवा.

तुझ्या अभिनयातून तो व्यक्त व्हायला पाहिजे.’ त्या काळात दिग्दर्शकांच्या अपेक्षा केवढ्या हिमालयाएवढ्या असत हे आपल्या लक्षात येतं. हे म्हणजे सुरीकडून तलवारीची अपेक्षा ठेवण्यासारखं होतं. ते गाणं चांगलं आहे, विश्वजितने ते साकारही व्यवस्थित केलंय; पण त्यात तो काही रोमान्सचा देव वाटत नाही. हा सिनेमा सिल्व्हर ज्युबिली झाला आणि विश्वजित हिंदी सिनेमात स्थिरावला.

‘बीस साल बाद’ किंवा ‘कोहरा’सारख्या रहस्यमय चित्रपटांत त्याने चेहऱ्यावर रहस्य बऱ्यापैकी दाखवलं; पण त्याची कारकीर्द गाजली त्याला मिळालेल्या त्या काळातल्या टॉपच्या नायिका आणि संगीतामुळे. विश्वजितच्या यशाचं गमक तेच होतं. त्याला असं वाटतं की, आपली अॅक्टिंग हे आपल्या यशाचं गमक; पण मला तसं अजिबात वाटत नाही. तो चॉकलेट हिरो असला तरी त्याने देव आनंद, शम्मी कपूरकडून स्टाइल्स उसन्या घेतल्या नाहीत. त्याने स्वतःची एक स्टाइल निर्माण केली. ती फारशी आकर्षक नव्हती. तो जरा जास्त चिकना चोपडा होता.

विश्‍वजितच्या ‘बीस साल बाद’ सिनेमातलं संगीत प्रचंड गाजलं. मग ‘कोहरा’ आला. तो सिनेमा चालला नाही; पण त्यातली गाणी गाजली. ‘मेरे सनम’ची गाणी नुसती धमाल होती. तोच प्रकार ‘ये रात फिर न आयेगी’चा. ओपींचा रथ तेव्हा दोन अंगुल वरून जात होता. त्यात शंकर-जयकिशन आणि लक्ष्मीकांत-प्यारेलाल मिळवा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की, किती गाजलेली गाणी त्याला मिळाली.

उदाहरणार्थ - लाखों है निगाहमें, तुम्हारी नजर क्यू खफा हो गई, तेरा हुस्न रहे मेरा इश्क रहे, एप्रिल फूल बनाया, पुकारता चला हूँ मै... अशी कितीतरी श्रवणीय अत्यंत हिट अशी गाणी विश्वजितला मिळाली. त्यात त्याच्या हिरॉइन्स म्हणजे शर्मिला टागोर, बबीता, सायराबानो, आशा पारेख, माला सिन्हा... म्हणजे त्या काळातल्या सर्व टॉपच्या नायिका.

नवखी रेखासुद्धा त्याची हिरॉइन होती आणि त्याने तिचं घेतलेलं चुंबन प्रचंड गाजलं. त्या सिनेमाचं पहिलं नाव होतं ‘अंजाना सफर’. त्या सिनेमात विश्वजितने रेखाचं पाच मिनिटं चुंबन घेतलं. विश्वजित तेव्हा तिशीत होता आणि रेखा फक्त पंधरा वर्षांची. असं म्हणतात की, रेखाला त्याची कल्पना नव्हती. ती तसं तिच्या पुस्तकात म्हणते. सिनेमाचे दिग्दर्शक होते राजा नवाथे. या शूटिंगच्या प्रत्येक बारीकसारीक डिटेल्स ठरल्या होत्या.

रोमँटिक सीन करताना विश्वजितने रेखाला जवळ घेतलं. रेखाच्या ओठांवर ओठ ठेवले. त्यानंतर कॅमेरा सुरूच राहिला. ना दिग्दर्शकाने कट म्हटलं, ना विश्वजितने तिच्या ओठांवरून ओठ काढले. पाच मिनिटं हा शॉट सुरू होता. युनिटची मंडळी शिट्या मारत होती, प्रोत्साहन देत होती. त्यानंतर रेखा रडली. ते आनंदाश्रू नव्हते. रेखाला फसवलं गेल्याचं दुःख तिने व्यक्त केलं. विश्वजित म्हणतो त्यात त्याचा काहीही दोष नव्हता, तो दिग्दर्शकाच्या आज्ञा पाळत होता. रेखा त्यावेळेला मायनर गर्ल होती.

आजच्या काळात विश्वजित थेट तुरुंगात गेला असता. कदाचित विनयभंगाचाही आरोप त्याच्यावर झाला असता. तो चित्रपट दहा वर्षांनी पडद्यावर झळकला, त्या वेळी त्याचं नाव ‘दो शिकारी’ असं होतं. ते दोन शिकारी म्हणजे राजा नवाथे आणि विश्वजित एवढंच फक्त लिहिलं गेलं नव्हतं. गंमत म्हणजे त्यात चुंबनाचा सीनच नव्हता.

माणसं वयाने मोठी होत गेली की, त्यांचे स्वतःबद्दलचे गैरसमज वाढतात. एका मुलाखतीत विश्वजित म्हणतो, ‘मी चांगला नट झालो, कारण बंगाली स्टेजवर मी खूप काम केलं.’’ स्टेजच्या अभिनयाचा फायदा होतो याबद्दल दुमत नसावं; पण विश्वजित चांगला नट झाला याबद्दल मात्र माझे मतभेद आहेत. तो बरा होता. विश्वजित स्वतःला चांगला नट म्हणून घेऊ शकतो, तर सलमान खान स्वतःला नटसम्राटसुद्धा म्हणवून घेऊ शकेल. प्रत्येकाला काय वाटावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. देव आनंदला नाही का वाटायचं, की तो उत्तम दिग्दर्शक आहे.

पण विश्वजित त्याच्या मुलाखतीत आणखी एक विधान करून गेला. तो म्हणतो, ‘‘स्त्रीची भूमिका करणारा तो ट्रेण्ड सेटर होता. त्याने सुरुवात केली आणि मग त्या रस्त्यावरून अमिताभ बच्चन, कमलहासन, गोविंदा वगैरे चालत गेले. स्त्रीचा अभिनय विश्वजितने उत्तम केला याबद्दल मतभेद असू नये. कारण तो दिसला सुंदर. जी गोष्ट विश्वजितसाठी नैसर्गिक होती, ती इतरांसाठी नव्हती, त्यामुळेच काही वेळा विश्वजितच्या आशा पारेख किंवा माला सिन्हा हिरॉइन असलेल्या सिनेमाला दोन हिरॉइन्सचाचा सिनेमा असं कुत्सित थट्टेत म्हटलं जायचं. बालगंधर्वांनी रसिकांना नटणं मुरडणं शिकवलं असं म्हणतात. विश्वजितसुद्धा त्या गोष्टी अधिकारवाणीने करू शकला असता.

विश्वजित गातो चांगला. आजही तो स्टेजवरून अधूनमधून गातो. विश्वजितचे सिनेमे मी गाण्यासाठी पाहिले. खास त्याचे म्हणून नाही पाहिले. पण त्याचा तो लाइट अभिनय तशा सिनेमाला शोभायचा. तो महान नट; नसेल पण त्याचं काँट्रिब्युशन नाकारता येणार नाही.

(लेखक चित्रपट आणि क्रीडा क्षेत्राचे अभ्यासक असून, त्यांची या विषयांवरची अनेक पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com