ekla chalo re book
ekla chalo re booksakal

एका अभाग्याच्या भोगाची चित्तरकथा

महाराष्ट्र शासनाचा यशवंतराव चव्हाण राज्य वाङ् मय पुरस्कार मिळालेले ‘एकला चलो रे’ पुस्तक म्हणजे कौटुंबिक वाताहत झालेल्या व्यक्तीच्या जगण्याच्या संघर्षाची कथा आहे.

- माधव‌ दामले

महाराष्ट्र शासनाचा यशवंतराव चव्हाण राज्य वाङ् मय पुरस्कार मिळालेले ‘एकला चलो रे’ पुस्तक म्हणजे कौटुंबिक वाताहत झालेल्या व्यक्तीच्या जगण्याच्या संघर्षाची कथा आहे. वाचताना आपण व्याकुळ होत जातो. लेखक संजीव सबनीस यांचे अनुभव मन हेलावून टाकतात.

नुकतेच संजीव सबनीस लिखित ‘एकला चलो रे’ पुस्तक वाचनात आले. रवींद्रनाथ टागोर यांच्या स्वातंत्र्यसंग्रामातील कवितेच्या ओळी ‘एकला चलो रे’ इथे उद्‍धृत करण्यात आल्या आहेत. पुढे एका राष्ट्रीय नेत्याने तोच नारा दिला. साहजिकच शीर्षकामुळे कुतूहल चाळवले.

लेखकाला, नोकरीची निवृत्ती मार्च २०११ रोजी दहा दिवसांवर आलेली असताना जीवघेणा अपघात झाला. आजाराचे नाव पॅराप्लेजिया. जसलोक रुग्णालयात ४८ तासांनंतर शुद्धीवर आल्यावर अपघाताचे स्वरूप लेखकाच्या लक्षात आले. सुरुवातीलाच अपघातानंतर ४८ तासांनी आपण जिवंत असल्याबद्दल रुग्ण आश्चर्य व्यक्त करतो. त्या काळात मला जिवंत ठेवण्यासाठी स्वर्गात चर्चा झाली असावी, असा विनोदही त्याला सुचतो.

जसलोक रुग्णालयातून घरी आल्यावर नंतर हट्टाने स्थानिक लोकसेवेसाठी ठेवल्यावर थोडे दिवस जाताच त्यांची कामाची टाळाटाळ सुरू होते‌. शेवटी रुग्णाचे नातेवाईक परप्रांतीय नोकर ठेवतात. कष्ट करून चार पैसे गावाला पाठवता येतात ही त्यांची मानसिकता वाचकांनाही पटणारी आहे.

लेखकाचे वेगळे विलक्षण अनुभव थक्क करणारे आहेत. पुस्तक २१९ पानांचे असून त्यात सात प्रकरणे आहेत. प्रत्येक प्रकरणातील प्रसंग खूप थरारक आणि थक्क करणारे आहेत. ‘महालक्ष्मीचे दिवस’ या प्रकरणात लेखकाचा समुद्राच्या सान्निध्यातील एकतर्फी संवाद थक्क करणारा आहे.

येथील वास्तव्यात नामदेव पवार हा वीज कंपनीतील कामगार, आपल्या सहकाऱ्यांच्या कारस्थानामुळे अपंग होतो हे वाचून वाचकाच्या मेंदूच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडतात. सायन पोलिओ केंद्रात त्याला भेटलेले पेशंट - चाफा शांताराम यांच्या कथा मन हेलावून टाकतात. अपघाताआधीचे लेखकाचे निसर्गाच्या सान्निध्यात हिंडणे-फिरणे व त्याचे वर्णन कलंदरपणाचे दर्शन घडवते.

राजस्थानात ४६ अंश तापमानात रणथंबोरला दिसलेली वाघीण आणि तिचे‌ फक्त २० फुटांवरून‌ केलेले फोटोसेशन स्वप्नवत वाटते. अशा गोष्टी वाचल्यानंतर आपल्याला हे‌ कधी लाभेल, असा विचार मनात येतो. पुस्तकास मधु मंगेश कर्णिक यांची प्रस्तावना लाभली आहे हे विशेष.

गिरगावातील लेखकाच्या घराजवळ चणे विकणारा भैय्या, त्यांनी गायलेले पंचमदांचे गाणे ऐकून ते त्यांना पुन्हा पुन्हा गायला सांगे. अधिक चौकशी केली असता लेखकाला कळून चुकते की गाण्याचा अर्थ चणेवाल्याच्या बायकोच्या भावनांशी निगडित आहे. तो गावाला जेव्हा जेव्हा फोन करतो तेव्हा ती त्याच भावना गावरान शब्दात व्यक्त करीत असते.

लेखकाने लिहिलेल्या गोष्टी थक्क करणाऱ्या आहेत. प्रवासात सर्वतोपरी काळजी घेऊनसुद्धा जीवघेणा अपघात व्हावा, याचा अर्थ यामागे काही विधिलिखित असावे, या निर्णयाप्रत लेखक पोहोचतो. त्याचा मागोवा घेताना त्याला आठवते की, पुण्यातील एका ज्योतिषाने हात पाहून सांगितले होते की, तुमची आयुष्य रेषा तुटक आहे. त्याचबरोबर मार्च १९५१ साली केलेल्या जन्मपत्रिकेत हा धोका असल्याचे लेखकाला कळून चुकते.

लेखकाने गालिब, तुकाराम महाराज यांच्याबरोबर इंदिरा संत, गदिमा, मंगेश पाडगावकर, सुरेश भट, कुसुमाग्रज, आरती प्रभू, अरुणा ढेरे, शांता शेळके, कवी गोविंद यांच्या कवितांचे संदर्भ गरजेनुसार दिलेत जे पुस्तकाची शोभा वाढवतात.

हातात घेतलेले पुस्तक वाचून पूर्ण झाल्याशिवाय खाली ठेवायचे नाही, ही माझी चांगल्या पुस्तकाची सोपी सुटसुटीत व्याख्या. हे पुस्तक त्या कसोटीस पूर्णपणे उतरते. वाचक हे पुस्तक वाचून आपल्या आणखी दहा मित्रांना वाचा असे सांगतील, असा विश्वास व्यक्त करावासा वाटतो.

पुस्तक : एकला चलो‌ रे...

लेखक : संजीव सबनीस

प्रकाशक : मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस

पृष्ठससंख्या : २१९

किंमत : ३००

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com