...अन् आत्महत्येपासून एक कुटुंब वाचले

पैसे कमविण्याचा ध्यास आयुष्याला अगदी संपूर्ण कुटुंबाच्या आत्महत्येपर्यंत नेऊ शकतो, यातून सकारात्मकतेने कसे सहीसलामत कसे सुटू शकतो, हे आपण समजून घेवूया.
Life
Lifeesakal


लेखक - डॉ. हेमंत ओस्तवाल

ही घटना साधारणतः आजच्या पाच वर्षांपूर्वीची म्हणजे २०१७ मधील आहे. अतिशय थोड्या वेळामध्ये जास्त पैसे कमविण्याचा ध्यास आयुष्याला अगदी संपूर्ण कुटुंबाच्या आत्महत्येपर्यंत नेऊ शकतो आणि तीच गोष्ट सकारात्मकतेने घेतल्यास त्यातून सहीसलामत कसे सुटू शकतो, हे आपल्याला समजून येईल.

माझे एक अत्यंत जवळचे मित्र, स्नेही, फॅमिली पेशंट ज्यांचे माझे ३०-३५ वर्षांपासून घरगुती संबंध आहेत. अशा माझ्या मित्राच्या मुलाची ही गोष्ट... हा प्रवीण नावाचा मित्र, एक छोटा-मोठा व्यापार करतो. एक मुलगा, एक मुलगी असा हा सुंदर सुखी छोटासा परिवार. प्रवीण माझा १९९० पासूनचा पेशंट. पुढे त्याचे १९९२ मध्ये श्रद्धा या सुस्वरूप सुशिक्षित अशा मुलीशी लग्न झाले. त्यांना अंकुर आणि अंकिता ही अपत्ये. अंकुर पुढे इंजिनिअरदेखील झाला. अंकिता अकरावी सायन्सला होती. सर्व काही छान चाललेले असताना अचानक प्रवीणची आणि श्रद्धा वहिनींची तब्येत वारंवार बिघडायला लागली. सुरवातीला फारसे काही वाटले नाही; परंतु जेव्हा वारंवार बिघडायला लागली, तेव्हा मात्र मी प्रवीणशी आणि श्रद्धाशी बोलायचा प्रयत्न केला की नेमकं काय चाललं आहे? दोघांशीही बोलायचा बराच प्रयत्न केला; परंतु दोघेही तयार होईना. आजतागायत म्हणजे २०१७ पर्यंत असे कधी घडले नव्हते. जेव्हा प्रवीण, श्रद्धाची तब्येत वारंवार बिघडायला लागली, तेव्हा माझ्या लगेच लक्षात आले, की ही दोघेही खूपच तणावात आहेत. काहीतरी गडबड आहे. याबरोबरच अंकुर आणि अंकिताही. त्यातल्या त्यात अंकुरही जास्त तणावात दिसत होता आणि पहिल्यांदाच असे घडत होते, की मला कोणीही काहीही सांगायला तयार नव्हते. मला कळायलाही काहीही मार्ग नव्हता. असाच जवळपास सहा महिन्यांचा कालावधी गेला. एके दिवशी मी सायंकाळी प्रवीणला लॉँग ड्राइव्हवर जेवणासाठी सोबत घेऊन जायचे ठरविले. रात्री दहाला ओपीडी आटोपून मी प्रवीणला घेऊन लॉँग ड्राइव्हवर निघालो. बराच वेळ त्याच्याशी बोलत होतो. कौन्सिलिंग करत होतो; पण उपयोग होत नव्हता. म्हणता म्हणता आम्ही शहापूरला पोचलो. तरीही प्रवीण तोंड उघडायला तयार नव्हता. शेवटी एका ढाब्यावर आम्ही थांबलो आणि जेवण केले. परतीच्या प्रवासात माझे प्रयत्न पुन्हा एकदा सुरू झाले आणि घाटनदेवी, इगतपुरी येईपर्यंत आमचा प्रवीण ओक्साबोक्शी रडायला लागला. खूपच रडणे चालू होते. मी शांतपणे गाडी एका बाजूला लावली. त्याला आधी भरपूर रडू दिले आणि मग प्रवीणला बोलता केला. मला एकामागोमाग आश्चर्याचे प्रचंड धक्के बसायला लागले. आम्ही रात्री अंदाजे साडेबारा-पाऊणच्या सुमारास गाडी थांबविली होती आणि एकाच ठिकाणी आम्ही तब्बल अडीच तास थांबलो होतो. साधारणतः सव्वादोनच्या सुमारास आम्ही तेथून निघून नाशिकला तीनच्या सुमारास पोचलो होतो. थांबलेलो अडीच तास आणि पुढचा पाऊण तासाचा प्रवास असे एकूणच सव्वातीन-साडेतीन तास आमचे बोलणे झाले होते. सव्वातीन तासांचे बोलणे म्हणजेच प्रकरण नक्कीच गंभीर असणार याची खात्री आपणा सर्वांना एव्हाना झाली असेलच. रात्रीचे तीन वाजून गेलेले असल्याने, फक्त प्रवीणचे ऐकून आणि त्याला एका वाक्यात फक्त उत्तर देऊन आम्ही आपल्या घरी जाऊन झोपलो होतो. आपणा सर्वांना आता उत्सुकता लागली असेल, की एक तर एवढा वेळ प्रवीण काय बोलला आणि त्याला एका वाक्यात काय उत्तर दिले. पहिले मी काय उत्तर दिले ते सांगतो. कारण ते एका वाक्यातच आहे, ते म्हणजे, ‘‘बस्स एवढंच ना, २४ तासांच्या आत आपण हे प्रकरण निपटून टाकू, हे माझे वचन आहे. तू आता सर्व जबाबदारी माझ्यावर टाकून निवांत झोप.’’
हे माझे उत्तर होते आणि आपणा सर्वांना आश्चर्य वाटेल, खरोखरच ते प्रकरण २४ तासांच्या आत आम्ही सोडविलेही.

Life
वेश्या व्यवसायाला हवी समाजमान्यता

आता आपण थोडक्यात आधी प्रकरण काय होते आणि मग थोडक्यात ते प्रकरण कसे निपटवले, हे बघूया. प्रवीणने जेव्हा बोलायला सुरवात केली, तेव्हा त्याच्या पहिल्याच वाक्याने मीदेखील प्रचंड हादरलो. त्याचे पहिले वाक्य होते, ‘आम्हाला पूर्ण कुटुंबाला आत्महत्या करावीशी वाटते.’ होय. तुम्ही वाचतायत ते खरे आहे. आता विचार करा, जो माणूस २५-२७ वर्षांपासून तुमचा अत्यंत जवळचा मित्र आहे आणि त्याला असे काही संकट आले आहे, की आत्महत्या तेही एकट्याने नव्हे, तर संपूर्ण कुटुंबाने करावीशी वाटते; किती गंभीर असेल घटना ती... काही मिनिटे तर मलाही काय बोलावे ते सुचेना. काही मिनिटे आम्ही दोघेही शांत होण्यासाठी घेतले. मी तर शांत झालो; परंतु प्रवीणचे रडणे काही थांबायचे नावच घेत नव्हते. काही मिनिटांनी प्रवीण बोलता झाला आणि मग एकेक बाँब फुटायला लागला. घटना चक्रावणारी, विचार करायला लावणारी होती. आता सुरवातीपासून आपण बघूया.

अंकुर मुंबईला एका चांगल्या कंपनीमध्ये जॉबला होता. त्याचे पहिले पॅकेज प्रतिवर्ष चार लाखांचे होते आणि आत्ता अंकुर दुसऱ्या अजून एका चांगल्या कंपनीमध्ये लागला होता, जेथे त्याचे पॅकेज प्रतिवर्ष साडेसहा लाख रुपयांपर्यंत गेले होते. गोष्ट अंकुरचीच होती. एके दिवशी संगमनेरचे एक गृहस्थ आमच्या प्रवीणला शोधत सायंकाळी त्याच्या घरी गेले. प्रवीण त्यांना ओळखतही नव्हता. अत्यंत चांगल्या सकारात्मक पद्धतीने त्यांनी बोलण्याची सुरवात केली. सुरवातीला त्यांनी स्वतःची ओळख करून दिली. त्या गृहस्थाचे नाव रमाकांत देशमुख होते. जवळपास तेही प्रवीणच्याच वयाचे होते. रमाकांत काय बोलले होते, हे त्यांच्याच शब्दात सांगतो. ‘प्रवीणजी, आपण मला ओळखत नाहीत हे मला चांगलं माहीत आहे. आपला मुलगा अंकुर आणि माझा मुलगा निशिकांत हे दोघे मुंबईला एकाच कंपनीत कामाला आहेत. ते दोघेही चांगले मित्र आहेत. अंकुरचं सध्या काय चालू आहे?’ सुरवातीला प्रवीणला काहीच वाटले नाही. उलट बरेच वाटले, की आपल्या मुलाच्या मित्राचे वडील आपल्याला सहज भेटायला आले आहेत. प्रवीणने त्यांना उत्तरही दिले, की अगदी सर्व काही व्यवस्थित चालले आहे, मजेत आहे. यानंतर काही मिनिटे रमाकांतही थोडे गोंधळून गेले, की प्रवीणशी आता काय आणि कसे बोलावे? थोडा वेळ रमाकांतनी इकडच्या-तिकडच्या गप्पा मारल्या आणि पुन्हा एकदा ते अंकुरच्या मुद्द्यावर आले. पहिले तर त्यांनी प्रवीणला बसणाऱ्या धक्क्यासाठी छानशी वातावरणनिर्मिती करायला सुरवात केली. ‘प्रवीणजी, मला तुमच्याशी काही वेगळे आणि महत्त्वाचे बोलायचे आहे. त्याचसाठी मुद्दामहून मी इथे आलो आहे; परंतु मी जे काही बोलेन, त्यावर कुठलाही राग न धरता, संताप न करता शांतपणे घ्यावयाचं आहे.’ अशा प्रकारची वातावरणनिर्मिती करण्याचे काम त्यांनी सुरू केले होते. जसजसे रमाकांत बोलत होते, तसतसा प्रवीणचा धीर संपून डोक्यामध्ये तणाव वाढायला सुरवात झाली होती. रमाकांत अजून बोलतच होते.

‘चालायचंच. मुलं आहेत, या वयामध्ये सगळ्यांकडूनच अनेक प्रकारच्या चुका होतच असतात. आपण नाही सांभाळून घ्यायचं, तर कोण घेणार! आपल्या लेकरांच्या चुका आपल्यालाच पदरात घ्यायला लागतील ना!’ इत्यादी इत्यादी. खूपच चांगले वडीलधाऱ्या माणसाला शोभेल अशा पद्धतीने रमाकांत बोलत होते. आता मात्र प्रवीणचा संयम सुटला होता. थोडेसे चिडूनच त्याने रमाकांतला सांगितले, ‘‘अहो, ते सगळं ठीक आहे, परंतु काय झालं हे तर सांगाल ना!’’ ‘‘सांगतो, सांगतो,’’ रमाकांत. एक दीर्घ श्वास घेऊन रमाकांतने बोलायला सुरवात केली. ‘‘बघा काही कारणांनी तुमचा अंकुर कर्जबाजारी झाला आहे. त्याच्यावर काही लाखांचं कर्ज आहे.’’ प्रवीणला आणि श्रद्धाला आश्चर्याचे धक्के नव्हे, तर ४४० व्होल्टचा करंट बसायला सुरवात झाली होती. ‘‘साधारणतः तीन महिन्यांपासून माझी स्कॉर्पिओ गाडी जी निशिकांत वापरत होता, जिला घेऊन साधारणतः फक्त सहा महिने झाले आहेत. ती स्कॉर्पिओ अंकुरने येथेच नाशिकला कुणाकडे तरी गहाण ठेवली आहे. कोणाकडे ठेवली आहे हे मात्र मला माहीत नाही. पाच रुपये शेकडा व्याजाने त्याच्याकडून अंकुरने सात लाख रुपये घेतले आहेत आणि आता त्याच्या व्याजाची रक्कमदेखील खूप वाढत आहे. अंकुर त्याच्या परीने खूप काही प्रयत्न करत आहे; परंतु हे सर्व काही त्याच्या आटोक्यात आहे, असे वाटत नाही. त्याने कंपनीमध्येदेखील काही लोकांकडून पैसे उसनवार घेतलेले दिसतात.’’ हे ऐकता-ऐकताच श्रद्धाचा आणि खासकरून प्रवीणचा खूपच प्रचंड संताप झाला होता. दोघेही संतापाने लालबुंद झाले होते.

Life
पालकांनी सोडवावं असं महत्त्वाचं कोडं!

खरोखरच रमाकांत हे अतिशय चांगले गृहस्थ होते. त्यांनी परत एकदा प्रवीण आणि श्रद्धाशी बोलायला सुरवात केली. ‘‘तुम्ही माझ्या गाडीची चिंता करू नका. सगळ्यात पहिले आपण सर्व मिळून ही सगळी काय भानगड आहे ती समजावून घेऊ आणि नंतर त्यातून अंकुरला आपण सहीसलामत बाहेर काढू. राग, संताप, खंत या कुठल्याही गोष्टींनी हा प्रॉब्लेम सुटणार नाही, तर आपल्या सगळ्यांना व्यवस्थित शांतपणे समजून घेऊन मग सुटकेचा ‘प्लॅन ऑफ ॲक्शन’ तयार करायला लागेल.’’ अशा पद्धतीचे रमाकांत बराच वेळ बोलले. प्रवीणला आणि श्रद्धाला शांत केले. दोघेही शांत तर झाले होते; पण डोक्यामध्ये प्रचंड टेन्शन तर होतेच, की नेमके काय झाले आहे? काय घटना घडली आहे? त्यांनी रात्रीच्या रात्री अंकुरला फोन केला आणि त्याला काही समजू न देता लगेच घरी म्हणजे नाशिकला बोलावले. निदान तीन दिवसांची रजा टाकून ये, असेही सांगितले. लगोलग दुसऱ्या दिवशी सकाळी दहा-साडेदहाच्या दरम्यान तो नाशिकला पोचला. रमाकांतच्या सुंदर समुपदेशनामुळे आल्या आल्या प्रवीण-श्रद्धाने कुठलाही विषय काढला नाही. आक्रस्ताळेपणा केला नाही. आधी अंकुरला जेऊखाऊ दिले. फ्रेश होऊ दिले आणि मग शांतपणे त्याच्याशी बोलायला सुरवात केली. त्यांनी अंकुरला सांगितले, ‘‘निशिकांतचे वडील रमाकांतजी आम्हाला भेटून गेले. आम्हाला अर्धवट माहीत पडलेलं आहे. तू काहीही न घाबरता, कुठल्याही प्रकारचं टेन्शन न घेता आम्हाला सर्व सविस्तर सांग. काहीही असू दे, कितीही मोठं असू दे, आपण सर्व मिळून जो काही प्रॉब्लेम असेल तो सोडवूया.’’ दोघांनी मिळून अंकुरला चांगल्यापैकी विश्वासात घेऊन आश्वस्त केले आणि बघता बघता अंकुरचा बांध फुटला. अंकुर ओक्साबोक्शी रडायला लागला. कितीतरी वेळ अंकुर हमसाहमशी रडत होता. अर्थातच प्रवीण आणि श्रद्धालाही अश्रू अनावर झाले. बघता बघता सारे घरच रडायला लागले आणि मग रडत रडतच अंकुरने कर्मकहाणी सांगायला सुरवात केली. अंकुरच्या कंपनीतील त्याचा एक मित्र शेअर मार्केटमध्ये छोटे-मोठे ट्रेडिंग करत होता. बऱ्यापैकी पैसाही कमवत होता. दोन-चार वेळा अंकुरची आणि त्याची भेट झाली आणि अंकुरलाही आपणही भरपूर पैसा कमवायचा, असे वाटू लागले. अंकुरने त्याच्याकडून शेअर मार्केटमधील काही जुजबी ज्ञान घेतले. काही ज्ञान द्यायला गुगल महाराज होतेच आणि अशा रीतीने तटपुंज्या ज्ञानावर अंकुरने आपला शेअर मार्केटमधील व्यापार सुरू केला. त्या वेळी तेजी जोरदार असल्याने सुरवातीच्या दिवसांमध्ये अंकुरला बऱ्यापैकी फायदाही झाला. जसजसा फायदा होऊ लागला तसतशी अंकुरची अजून जास्त नवा पैसा गुंतवणूक करण्यामागची हिंमत वाढायला लागली. (पूर्वार्ध)

(लेखक नाशिकमधील सुयश या प्रथितयश हॉस्पिटलचे संचालक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com