1948 पूर्वी गांधी हत्येचे झाले पाच प्रयत्न! कागदोपत्री आहे नोंद

सूरज यादव
Friday, 2 October 2020

30 जानेवारी 1948 ला गांधीजींची नथुरामने हत्या केली. पण त्याआधी १९३४ पासून गांधीहत्येचे अनेक प्रयत्न झाले.

महात्मा गांधी यांची आज जयंती. अहिंसेचा पुरस्कार करणाऱ्या या महात्म्याची अखेर हिंसक वृत्तींनी केली. 30 जानेवारी 1948 ला गांधीजींची हत्या केली. पण त्याआधी 1934 पासून गांधीहत्येचे अनेक प्रयत्न झाले होते. भारत-पाक फाळणी, ५५ कोटी, मुस्लीम अनुनय अशी काही कारणं सांगून त्यांच्याबद्दल द्वेषाची बिजे पेरण्याचे प्रयत्न केले गेले. या कारणांनाच पुढे करून आजही गांधीहत्येचं समर्थन केलं जातंय हे दुर्दैव.  

30 जानेवारी 1948 पर्यंत गांधीहत्येचा सातवेळा प्रयत्न केला गेला. त्यातील 5 प्रयत्नांची नोंद कागदोपत्री आहे. गांधीहत्या करणाऱ्या नथुराम गोडसेनं न्यायालयात हे कृत्य आपण एकट्यानं केल्याचं सांगितलं असलं तरी ते वास्तव नाही. न्यायलयाने हा एका टोळीळीचा मोठ्या कटाचा भाग होता, हे पुराव्यानिशी सिद्ध केलं होतं. 

1934 मध्ये पहिला प्रयत्न

गांधीजींवर पहिला प्राणघातक हल्ला पुण्यात 25 जून 1934 ला झाला. गांधीजी हरिजन कार्यासाठी देशव्यापी दौरा करत असताना पुण्यात आले होते. त्यावेळी ब्रिटीश सरकारच्या विरोधाला न जुमानता पुणे मुन्सिपाल्टीने गांधींना मानपत्र द्यायचं ठऱवलं होतं. ते घेण्यासाठी जात असताना गांधींच्या गाडीवर बॉम्ब फेकण्यात आला होता. सुदैवाने त्यावेळी चुकीच्या गाडीवर बाँम्ब फेकला गेला आणि ते बचावले. 

हे वाचा - 5 वेळा नामांकन होऊनही गांधीजींना का नाही मिळाला नोबेल?

नथुराम सुरा घेऊन धावला

गांधीहत्येचा पहिला प्रयत्न फोल ठरल्यानंतर दहा वर्षांनी जुलै 1944 मध्ये पाचगणीत नथुराम गोडसेनं दुसरा प्रयत्न केला होता. पाचगणीत आंदोलन करणाऱ्या गटाचा नेता असलेल्या नथुरामला गांधीजींनी चर्चेसाठी बोलावलं होतं. पण तेव्हा चर्चेला जाताना सुरा घेऊन निघालेल्या नथुरामला दोघांनी पकडल्याने अनर्थ टळला होता. गांधीजींचे पणतु तुषार गांधी यांनी या हत्येच्या कटातील सहभागींबद्दल माहिती दिली आहे. ज्या भिलारे गुरुजींनी नथुरामला सुरा घेऊन जाताना अडवलं होतं त्यांनी नथुरामच्या सहकाऱ्यांची नावे सांगितली होती. त्यात विष्णू करकरे, गोपाळ गोडसे, ल. ग थत्ते आणि बडगे यांचा समावेश होता. 

नथुरामकडून पुन्हा हत्येचा प्रयत्न
पाचगणीत झालेल्या प्रयत्नानंतर दोन महिन्यांनी सप्टेंबर महिन्यात गांधी हत्येचा तिसरा प्रयत्न झाला. गांधीजी जिनांशी बोलणी करण्यासाठी सेवाग्राम इथून मुंबईला जाणार होते. त्यावेळी हिंदुत्त्ववाद्यांचा या भेटीला विरोध होता. चर्चेतून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या गांधींना होत असलेला हा विरोध अनाठायी होता. गांधी - जिन्ना भेट होऊ द्यायची नाही यासाठी नथुराम गोडसे आणि ल. ग. थत्ते आदल्या दिवशीच सेवाग्रामला पोहोचले होते. ज्यावेळी गांधीजी जायला निघाले तेव्हा त्यांच्याजवळ जात असलेल्या नथुरामला आश्रमवासियांनी पकडलं. त्यावेळी पोलिसांनी नथुरामकडून जांबिया जप्त केला. गांधी हत्येच्या तिसऱ्या प्रयत्नातही नथुराम होता. 

हे वाचा - भारतीय नोटेवर गांधीजींचा फोटो का? जाणून घ्या

गांधीजी प्रवास करत असलेल्या ट्रेनच्या अपघाताचा प्रयत्न
भारत स्वातंत्र्य होण्याच्या वर्षभर आधीही गांधीहत्येचा प्रयत्न झाला होता. 29 जून 1946 ला गांधीजी मुंबईहून पुण्याला जात असताना ट्रेनच्या रुळावर दरडी टाकल्या होत्या. तेव्हा ड्रायव्हरने सतर्कतेनं इमर्जन्सी ब्रेक मारले. तरीही इंजिन दरडीवर जाऊन आदळले. यात इंजिनचं नुकसान झालं तरी मोठा अपघात टळला होता. त्या ट्रेनच्या आधी किंवा नंतर कोणतीच ट्रेन जाणार नव्हती. त्यामुळे गांधींजी प्रवास करत असलेल्या ट्रेनचा अपघात करून घातपातासाठीच हा प्रकार केल्याचं तपासात स्पष्ट झालं होतं. 

गांधीहत्येच्या आधी 10 दिवस अयशस्वी प्रयत्न
गांधीहत्येच्या 10 दिवस आधीही एक अयशस्वी प्रयत्न करण्यात आला होता. या प्रयत्नामागे पार्श्वभूमी होती ती फाळणी आणि 55 कोटी रुपये देण्याच्या निर्णय़ाची. 20 जानेवारी 1948 ला गांधीजींच्या प्रार्थना सभेत बाँब फेकण्यात आला होता. मदनलाल पहावा नावाच्या शरणार्थ्याने फेकलेला बाँब गांधीजींपासून थोड्याच अंतरावर फुटला होता. यामुळे कोणाला दुखापत झाली नव्हती पण सभेत गोंधळ उडाला. मदनलाल शरणार्थी होता आणि त्यानं चिडून गांधीजींवर बाँब फेकला असाही समज होऊ शकतो पण मदनलालने दिलेल्या कबुलीजबाबावरून तो कट होता हे समोर आलं होतं. कटात सहभागी असलेल्यांची नावे त्याने सांगितली होती. नथुराम गोडसे आणि नारायण आपटे कटाचे सूत्रधार होते तर विष्णू करकरे, शंकर किश्तया आणि दिंगबर बडगे यांचाही सहभाग होता असं मदनलालने सांगितलं होतं. याशिवाय ऐनवेळी गँगचा बेस्ट शूटर बडगे याच्यामुळे हत्येचा प्लॅन कसा फसला, त्याआधी कट कसा शिजला, कुठे तयारी केली याबाबतची माहिती कबुलीजबाबात मदनलालने दिली होती.

30 जानेवारी 1948 
20 जानेवारीचा कट अयशस्वी झाल्यानंतर नथुराम गोडसेने इतर गटातील सहकाऱ्यांना सांगितलं की कोणाच्याही मदतीशिवाय मी गांधीहत्या करणार. दरम्यान, यासाठी एक दिवस आधी नथुराम आणि आपटे 29 जानेवारीला दिल्लीत पोहोचले होते. 30 जानेवारीला प्रार्थनेसाठी येत असलेल्या गांधीजींवर गोडसेनं गोळ्या झाडल्या. यातच गांधीजींची प्राणज्योत मालवली. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

गांधीहत्येच्या कटातील आरोपी
आधीचा प्रयत्न फसल्यानंतर आपण एकट्यानेच हे कार्य करणार असं म्हणत नथुराम गोडसेनं गांधीहत्या केली. आधीच्या कटात थेट सहभाग असलेल्या इतर सहकाऱ्यांचा यावेळी मात्र प्रत्यक्ष सहभाग नव्हता. नथुराम गोडसेनं न्यायालयात जरी आपण एकट्यानेच हे केलं असं सांगितलं तरी या कटात अनेक आरोपी होते. त्यामध्ये नारायण आपटे, मदनलाल पहावा, गोपाळ गोडसे, विष्णू करकरे, दिगंबर बडगे, दत्तात्रय परचुरे, शंकर किश्तय्या आणि विनायक सावरकर हे आरोपी होती. यातील दिगंबर बडगे हा माफिचा साक्षीदार बनला. यातील विनायक सावरकर यांच्याविरोधात कटात सामील असण्याविषयी कसलेही पुरावे न सापडल्याने न्यायलयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gandhi jayanti more than 5 attempts to kill him