

Golden Bhelpuri House
esakal
चांगल्या आरोग्यासाठी रस्त्यावरचे पदार्थ न खाण्याचा सल्ला अनेकदा दिला जातो. जगभरातील लोक मात्र सर्व सल्ल्यांकडे कानाडोळा करून स्ट्रीट फूडवर ताव मारताना दिसतात. कारण, हटके पदार्थ खाण्यासाठी प्रत्येकवेळी मोठ्या रेस्टॉरंटमध्ये जाण्याची किंवा ते बनविण्यासाठी प्रशिक्षित शेफची आवश्यता असते, असं नव्हे. रस्त्यावर खाद्यपदार्थ विकणाऱ्या अनेक छोट्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलवरदेखील तितकेच वेगळे, चविष्ट आणि खिशाला परवडणारे पदार्थ मिळतात. काही वेळेस तर मोठ्या रेस्टॉरंटमधील शेफ नवीन पदार्थांच्या शोधात स्ट्रीट फूडची चव चाखायला निघतात आणि त्यात आपली कलाकारी वापरून नवीन पदार्थ तयार करतात. अशाच एका पदार्थाचा, खरंतर घटकाचा शोध आठ दशकांपूर्वी लावला गेला आणि आजही त्याला बोलबाला कायम आहे.
मूळचे राजस्थानचे असलेले बद्रीनारायण शर्मा रोजगाराच्या शोधात स्वातंत्र्यपूर्व काळात मुंबईत आले. सुरुवातीला काही ठिकाणी छोटीमोठी कामं केल्यानंतर त्यांनी गिरगावातील विठ्ठलभाई पटेल रोडवरील श्री फडके गणपती मंदिराच्या परिसरातील नाथालाल भुवन इमारतीच्या बाहेर रस्त्यावरच भेळेचा ठेला लावायला सुरुवात केली. लोकवस्ती, कार्यालये, व्यावसायिक याच भागात असल्याने सकाळपासून रात्रीपर्यंत या परिसरात लोकांचा राबता असायचा. बाहेरचं खाणं हे मर्यादित होतं. कष्टकरी लोकांसाठीची ती एक सोय होती. भरपूर श्रमामुळे या कष्टकरी लोकांचं खाणं व्यवस्थित असायचं. शिवाय त्यांना तिखट चवीचे पदार्थ आवडत. बद्रीनारायण यांची जीभदेखील तिखट चवीला चांगली सोकावलेली. त्यातूनच त्यांनी एका भन्नाट गोष्टीचा शोध लावला - ज्याचं नाव होतं गोल्डन चटणी.
तब्बल चौदा घटकपदार्थांपासून तयार झालेली गोल्डन चटणी, झणझणीतपणा आणि चवीचं आगळंवेगळं मिश्रण आहे. पोह्याचा चिवडा, गोल्डन चटणी, बारीक चिरलेला कांदा आणि वर भुरभुरलेली कोथिंबीर एवढ्याच गोष्टींपासून तयार ही भेळ मुंबईत किंवा इतर कुठेही मिळणाऱ्या भेळेपेक्षा वेगळी होती आणि आजही आहे. बद्रीनारायण यांच्या पुढील तीन पिढ्यांनी हे वेगळेपण व्यवस्थित जपलं. गेल्या सहा-सात दशकांमध्ये याच चटणीपासून अनेकांनी प्रेरणा घेऊन स्वत:ची वेगळ्या चवीची चटणी बनवण्याचा प्रयत्न केला असला तरी या चटणीची सर त्याला येऊ शकलेली नाही.