अखेरच्या क्षणापर्यंत शिकण्याची ऊर्मी हवी (हेमंत पेंडसे)

हेमंत पेंडसे
रविवार, 17 जून 2018

ख्यालाची बंदिश सुरू होती. अंतऱ्याची जेव्हा वेळ आली, तेव्हा अभिषेकीबुवांनी केवळ थोडी मान वळवली व वरचा ‘सा’ लावण्याची खूण मला नजरेनं अचानकपणे केली. मी क्षणाचाही विलंब न लावता वरचा षड्‌ज लावला. अनपेक्षितपणे वरचा ‘सा’ लावण्याच्या परीक्षेत मी उत्तीर्ण झालो होतो!

माझा जन्म धुळ्याचा असला, तरी माझं बालपण भुसावळमध्ये गेलं. वडिलांच्या नोकरीच्या निमित्तानं आई-वडील (रेखा आणि गणेश पेंडसे) धुळ्याहून भुसावळ इथं स्थायिक झाले होते. मला तीन थोरल्या बहिणी व एक थोरला भाऊ. मी शेंडेफळ.

आमच्या घरात गेल्या पिढीत शास्त्रीय संगीताशी कुणाचा संबंध नव्हता; पण मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा या माफक अपेक्षेनं आई-वडिलांनी थोरल्या बहिणीला (सुहासिनी) संगीताची शिकवणी लावली होती इतकंच. बहीण मनूमास्तरांकडं (चंद्रकांत ऊर्फ मनोहर बेटावदकर) संगीत शिकायची. अखिल भारतीय पातळीवर ‘विशारद’ या परीक्षेत ती प्रथम क्रमांकानं उत्तीर्ण झाली होती. ती गायला बसली की माझं लक्ष तिच्या गाण्याकडंच असायचं. मी तिला ताल धरण्याची लुडबुड करायचो. हे पाहून वडिलांनी मला तबल्याच्या क्‍लासला घातलं. भुसावळमध्ये वसंत यशवंत बापट हे तबलावादक होते. त्यांच्याकडं मी तबला शिकायला सुरवात केली. सहावीत असताना बहीण मला कौतुकानं तबलासाथीला घ्यायची.  

भुसावळ या गावाचं नाव घेतलं तर या गावात शास्त्रीय संगीत कुठलं असणार, असं वाटू शकतं; परंतु माझ्या लहानपणी अनेक मान्यवर गायकांचं गायन भुसावळमध्ये व्हायचं. या सगळ्यांच्या बहुतेक सगळ्या मैफली ऐकायला मी आवर्जून जायचो. 

भुसावळमध्ये शिवराम भानगावकर नावाचे एक संगीतप्रेमी गृहस्थ राहायचे. मनूमास्तरांचे ते मित्र होते. त्यांच्याकडं कधीतरी टांग्यातून एक गवई यायचे. आले की सात-आठ दिवस मुक्कामाला असायचे. ते गवई आले की मनूमास्तर त्यांच्याकडं तानपुरे घेऊन जात. मनूमास्तरांनी तानपुरे जुळवले, की ते गवई ‘वा...वा...’ म्हणायचे. त्यांच्यापुढं मनूमास्तर अगदी आदरपूर्वक व अदबीनं वागायचे. हे पाहून मला थोडं आश्‍चर्य वाटायचं. 

पुढं मी सातवीत असताना संगीतस्पर्धेची तयारी करताना मनूमास्तरांच्या पत्नी कुंदावहिनी यांनी माझं गाणं ऐकलं. त्या मला म्हणाल्या : ‘‘अरे, तू छान गातोस. तू गाणं का शिकत नाहीस?’’ 

त्यांनी माझ्या गाण्याविषयी मनूमास्तरांना सांगितलं. गुरुजींना सर्वजण मनूमास्तरच म्हणायचे.

मग माझंदेखील मनूमास्तरांकडं गाणं शिकणं सुरू झालं. टांग्यातून येणाऱ्या त्या गवयांविषयीचा उलगडा मला या वेळी मनूमास्तरांकडून झाला. ते गवई म्हणजे साक्षात पंडित कुमार गंधर्व...!

मनूमास्तरांनी मला संगीत विद्यालयाप्रमाणे कधीच शिकवलं नाही. शिकवणी झाली की ते मला एकट्याला थांबवून घ्यायचे. कारण, इतर शिकणाऱ्यांमध्ये सर्व मुलीच होत्या. मनूमास्तरांनी मला प्रथम तानपुरा लावायला शिकवण्यास सुरवात केली. तानपुऱ्यावर मधल्या दोन तारांवर ते मला ‘सा’ लावून द्यायचे. दोन्ही ‘सा’ एकमेकांत मिसळून एकजीव झाल्यावर काय घडतं याचं डोळ्यांनी व कानांनी निरीक्षण करायला ते मला सांगत. उन्हाळ्यात मरणाचं उकडायचं; परंतु पंखा लावता यायचा नाही. स्वरसाधनेच्या एकाग्रतेच्या दृष्टीनं पंख्याच्या आवाजानं व वाऱ्यानं स्वर हलतो, असं मनूमास्तर म्हणायचे. काही दिवसांनी मला तानपुरा बरा लावता  येऊ लागला. यावर गाणं शिकवताना फक्त सा नी सा, सा नी ध नी सा, सा नी ध प ध नी सा असं हळूहळू मध्य सप्तकाच्या ‘सा’पासून मंद्र सप्तकाच्या ‘सा’पर्यंत घेऊन जायचं. एवढ्याच स्वरांच्या साथीत त्या स्वरात एकजीव होऊन गायला शिकवलं. सहा महिने झाले, आठ महिने झाले...मला वाटलं, मनूमास्तर आता माझ्या कल्पनेतलं गाणं शिकवतील. पण छे... कुठलं काय! तरीदेखील मी मात्र चिकाटी सोडली नाही. एक वर्षानंतर त्यांनी मला तानपुऱ्यावरच वरचा षड्‌ज लावायला शिकवलं. हा रियाजदेखील दोन महिने चालला. माझी गाण्यातली आवड आता पूर्ण संपून जाईल की काय असं वाटत असतानाच मनूमास्तरांनी मला ‘काळी दोन’मध्ये ‘यमन’मधली ‘ए री आली पियाबिन’ ही पारंपरिक बंदिश शिकवायला सुरवात केली; पण आपण ती जशी ऐकत असतो, तशी मात्र नव्हे! मनूमास्तरांनी ही बंदिश शिकवताना ‘लय’ जवळजवळ गाडून टाकली व ती एकदम ‘ठाय’ लयीत शिकवायला घेतली. ही बंदिश ते मला ‘मिंड’मध्ये गायला लावत. एका स्वरावरून दुसऱ्या स्वरावर अतूट स्वरानं जायची उत्तम तालीम त्यांनी मला दिली. किराणा व ग्वाल्हेर या घराण्यांचा व शैलींचा त्यांचा अभ्यास होता. चार वर्षांत मनूमास्तरांनी मला ‘यमन’, ‘मुलतानी’, ‘तोडी’, ‘मारवा’ व ‘दरबारी’ हे खास राग शिकवले.

दरम्यान, मी दहावीत असताना भुसावळमध्ये पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे ज्येष्ठ शिष्य राजा काळे यांची एक मैफल झाली. या गाण्यानं मी फारच प्रभावित झालो. ‘आपणसुद्धा असंच गाणं शिकायचं,’ अशी खूणगाठ मी मनाशी बांधली. या मैफलीत मी तानपुऱ्याच्या साथीला बसलो होतो. तबल्यावर अभिषेकीबुवांचे भाचे मंगेश मुळ्ये हे होते. याच टप्प्यावर मी दहावीदेखील उत्तम गुणांनी उत्तीर्ण झालो. मला इंजिनिअरिंगच्या डिप्लोमासाठी मुंबईला माटुंग्याच्या नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. मुंबईत आल्यावर मी मंगेश यांची मदती घेतली व त्या मदतीच्या आधारे एके दिवशी सायंकाळी चार वाजता अभिषेकीबुवांच्या घराची बेल वाजवली. बुवांच्या मातु:श्रींनी दार उघडलं. मी माझा परिचय देऊन ‘बुवांना भेटायला आलो आहे,’ असं सांगितलं. त्यांनी मला आत घेतलं. त्या वेळी बुवा चार-पाच शिष्यांना शिकवत होते. थोड्या वेळानं त्यांनी मला विचारलं : ‘‘काय हो, तुम्ही कुणाकडून आलात?’’ मी माझा परिचय देऊन, मंगेश यांचा संदर्भ दिला. यासंदर्भाच्या आधारे त्यांनी मला विचारलं : ‘‘तुम्ही तबला वाजवता का?’’ म्हटलं : ‘‘वाजवतो; पण फार अनुभव नाही.’’ ते मला ‘अहो’ का म्हणायचे, ते आजतागायत मला समजलं नाही! त्यांचे नेहमी येणारे तबलावादक त्या दिवशी नेमके आले नव्हते. बुवांनी माझ्या हातात डग्गा दिला व ताल धरायला सांगितलं. नेमकी तीन तालातली बंदिश सुरू होती; त्यामुळं मी साथ करू शकलो.  ...

तर बुवांकडं माझी पहिली ओळख ‘तबलावादक’ म्हणून झाली. पुढं बुवांकडं माझं येणं-जाणं सुरू झालं; पण गाणं शिकण्याचा विषयच निघत नव्हता. मी श्रवणभक्तीवरच समाधान मानत होतो. थोड्याच दिवसांनी बुवांची भुसावळला मैफल ठरली होती. त्यांनी मलाही बरोबर घेतलं. बुवांबरोबर मी आलेला पाहून सर्वाधिक आनंद मनूमास्तरांना झाला. माझ्या गाण्याविषयीही ते बुवांशी बोलले. याचा परिणाम पुढं त्यांच्या मैफलीत झाला व बुवांच्या मैफलीत मी तानपुरासाथीला बसलो! ख्यालाची बंदिश सुरू होती. अंतऱ्याची जेव्हा वेळ आली, तेव्हा बुवांनी केवळ थोडी मान वळवली व वरचा ‘सा’ लावण्याची खूण मला नजरेनं अचानकपणे केली. मी क्षणाचाही विलंब न करता वरचा षड्‌ज लावला. अनपेक्षितपणे वरचा ‘सा’ लावण्याच्या परीक्षेत मी उत्तीर्ण झालो होतो. माझ्या नजरेसमोर आता मला फक्त माझे गुरू मनूमास्तर दिसत होते. त्यांनी माझ्यावर जी मेहनत घेतली होती, तिचं हे फळ होतं. या प्रसंगानंतर बुवांनी मला गाणं शिकवण्यासाठी मूक होकार दिला. मग पुढं मुंबईला तबल्याऐवजी तानपुरा घेऊन माझं गाणं शिकणं सुरू झालं. 

या गाण्याच्या उद्योगात माझ्या वाढत्या दांड्यांमुळं कॉलेजनं मला दरवाजे बंद केले. आमच्या घरात धरणीकंप झाला! ‘इंजिनिअरिंगचं शिक्षण आधी पूर्णत्वाला न्या,’ असं या वेळी बुवांनी मला सांगितलं. पुन्हा भुसावळला येऊन जळगाव इथं इंजिनिअरिंगच्या पदविकेसाठी नव्यानं प्रवेश घेतला. एक सेमिस्टर झालं की मला दोन महिने सुटी असायची. या वेळी बुवांच्या मुंबईच्या घरी राहून मी गाणं शिकायचो. सन १९८२ मध्ये इंजिनिअरिंगच्या डिप्लोमात उत्तम गुण मिळवून मी मुंबईला कायमचा बुवांच्या घरी आलो. बुवांच्या मार्गदर्शनानं मुंबईत अध्यापकाची नोकरी करू लागलो. त्या वेळी बुवांकडं माझ्याव्यतिरिक्त आणखी चार शिष्य घरी राहूनच गाणं शिकायचे. शौनक त्या वेळी सातवीत होता. गुरुपत्नी विद्याताईंना आम्ही वहिनी म्हणायचो. बुवा पहाटे पावणेचार वाजता उठायचे. साडेचार वाजता रियाज सुरू व्हायचा. साडेसात वाजता बुवा शिवाजी पार्कला चालत फिरायला जायचे. -मी नोकरीला जायचो. सकाळी नऊ ते १२ बुवा पुन्हा गाण्यासाठी बसत. सगळ्यांसाठीचा स्वयंपाक वहिनी स्वत: करायच्या. सगळ्यांची जेवणं झाली, की वहिनी माझी वाट पाहत थांबलेल्या असायच्या. मी दुपारी दीड वाजता नोकरीहून आलो की वहिनी आणि मी दोघं एकत्र जेवायचो. असं प्रेम व असे संस्कार वहिनींनी आम्हा सगळ्याच शिष्यांना दिले. या आठवणींच्या केवळ स्मरणानंही डोळ्यांच्या कडा पाणावतात. थोड्याशा विश्रांतीनंतर दुपारी तीन वाजता पुन्हा गाणं, तालीम वा रियाज सुरू होत असे. या वेळी राजा काळे, सुधाकर देवळे, अर्चना कान्हेरे, देवकी पंडित हे बुवांचे शिष्य यायचे. सायंकाळी साडेसातपर्यंत ही तालीम चालायची. यादरम्यान बुवा स्वत: रामाश्रय झा यांच्या ‘अभिनव गीतांजली’चा व्यासंगी भूमिकेतून अभ्यास करायचे. या वेळी रामरंग यांच्या बऱ्याच बंदिशी त्यांनी आम्हाला शिकवल्या. मुंबईतल्या मुक्कामात बुवांनी आम्हाला ‘भैरव’पासून ‘भैरवी’पर्यंतच्या दहा थाटांतल्या आणि बऱ्याच रागांतल्या बंदिशी शिकवल्या. मुंबईतल्या घरी एके दिवशी माझं पोट अचानक बिघडलं, इतकं की उभं राहण्याचीही ताकद माझ्यात नव्हती. घरात फक्त बुवा आणि आजी (बुवांच्या मातु:श्री) होत्या. बुवा टॅक्‍सी घेऊन आले. स्वत: हात धरून त्यांनी मला डॉक्‍टरांकडं नेलं. अशा प्रसंगातून गुरू आणि शिष्य यांच्यात नेमकं नातं कसं होतं, हे अधोरेखित होतं. कुणाच्याही मदतीविना अखंडपणे चाललेलं हे दुनियेतलं आगळंवेगळं असं गुरुकुल होतं. बुवांनी आणि वहिनींनी मला पुत्रवत्‌ प्रेम दिलं.  

सन १९८५ मध्ये बुवांनी मुंबई सोडून पुण्यात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. मीही मुंबईतली नोकरी सोडून बुवांबरोबर त्यांच्या पुण्यातल्या नव्या बंगल्यात राहायला आलो. इथं आल्यावर पुन्हा नव्यानं अध्यापकाची नोकरी करू लागलो. एक प्रसंग सांगावासा वाटतो...एकदा पुण्यात सकाळी व रात्री अशा दोन मैफली झाल्या. दुसऱ्या दिवशी प्रवासानंतर रात्री दोनपर्यंत कोल्हापुरात मैफल झाली. बुवांच्या तिन्ही मैफली जोरदार झाल्या होत्या. आम्ही कोल्हापुरात सुधाकर डिग्रजकरांच्या वाड्यात मुक्कामाला होतो. रात्री अडीच वाजता झोपूनही बुवा नेहमीप्रमाणे पहाटे सहा वाजता उठले. सकाळी लवकरच त्यांनी मला बरोबर घेतलं. गाडीनं आम्ही बाबांकडं (बाबा म्हणजे उस्ताद अजीजुद्दीन खाँ. उस्ताद अल्लादिया खाँ यांचे नातू) यांच्या घरी गेलो. त्यांना आधीच निरोप देण्यात आलेला असावा. कारण, सकाळी खाँसाहेबही तयार होते. बुवांनी मला पुन्हा डिग्रजकरांच्या वाड्यात जायला सांगितलं. ‘दोन-तीन तासांनी या,’ म्हणाले. मात्र, मी चार-पाच मिनिटं तिथंच रेंगाळलो. तर बुवा हे बाबांचं व आपलं आसन घालून विद्यार्थ्यासारखे बसलेले मी पाहिले. पुढं त्यांच्यात काय संवाद झाला, मला माहीत नाही. मैफलींच्या वलयांकित वातावरणात राजमान्यतेची आणि लोकमान्यतेची मोहोर उमटूनही कलाकारामध्ये शिकण्याची ऊर्मी शेवटच्या क्षणापर्यंत असायला हवी, ही बुवांनी आम्हाला यातून नकळत दिलेली महत्त्वाची शिकवण!

सन १९९० मध्ये संजीव अभ्यंकरनं व त्याच्या आईनं (शोभाताई अभ्यंकर) माझं लग्न जुळवून आणलं. पत्रकार प्रभाकर गोखले यांची मुलगी मधुरा हिच्याशी माझं लग्न झालं. तीदेखील अभिषेकीबुवांच्या गाण्याची निस्सीम चाहती होती, हा एक योगायोगच.

मी सन १९९८ नंतर काही अल्बमनाही संगीत दिलं. आकाशवाणीवर संगीतकार म्हणून अलीकडं मला टॉप ग्रेड मिळाली. सन १९९८ नंतर बुवांच्या पश्‍चात मी पंडित बबनराव हळदणकर यांच्याकडं मार्गदर्शन घेतलं. सध्या मी डॉ. विकास कशाळकर यांच्याकडून सांगीतिक मार्गदर्शन घेतो आहे. 

...आणि मी ऐनवेळी दुसरा राग गायलो 
सन १९९४ मध्ये मला सवाई गंधर्व महोत्सवात गाण्याची संधी मिळाली. यासाठी ‘शामकल्याण’ राग मी अभिषेकीबुवांना गाऊन दाखवला होता. सनईवादनानं महोत्सवाचा प्रारंभ झाला. सनईवादन संपण्याच्या १० मिनिटं आधी मला ग्रीनरूममध्ये समजलं, की सनईवरही ‘शामकल्याण’ हाच राग सुरू आहे. तोच राग मी गायलो असतो तर ‘अभिषेकीबुवांचा शिष्य’ या नात्यानं वेगळीच चर्चा रंगली असती; परंतु मग मी ऐनवेळी राग बदलला. मी ‘पूरिया कल्याण’ गायलो. दोन्ही रागांचं चलन पूर्णत: भिन्न आहे. मला श्रोत्यांनी ‘वन्स मोअर’च्या रूपानं दाद दिली. 
 

(शब्दांकन : रवींद्र मिराशी)

'सप्तरंग'मधील लेख वापरण्यासाठी क्लिक करा

Web Title: hemant pendse about his journey in Classical Music