अजून शोध सुरूच...

एक दिवसीय संघातून खेळताना सलामीच्या जोडीसाठी तब्बल ९ खेळाडूंना अजमावण्याचा प्रयत्न झाला
ICC Men’s Cricket World Cup 2023
ICC Men’s Cricket World Cup 2023sakal

दोन महिन्यांवर एक दिवसीय विश्‍वकरंडक स्पर्धा येऊन ठेपली असताना भारतीय संघाच्या योग्य समीकरणाची शोधाशोध अजून चालूच आहे. जेव्हा खराब कामगिरीनंतर भारतीय क्रिकेट संघावर टिका होते तेव्हा, बाहेर काय बोलले लिहिले जाते याकडे आम्ही लक्ष देत नाही, असे ठासून उत्तर देणार्‍या संघ व्यवस्थापनाने काही आकडे जरा तपासून बघणे गरजेचे आहेत.

२०१३ चँम्पियन्स करंडक स्पर्धेतील विजेतेपदानंतर भारतीय संघाला गेल्या दहा वर्षात आयसीसीने आयोजित केलेल्या विविध स्पर्धांमधील एकही विजेतेपद पटकावता आलेले नाही. भारतीय संघ सातत्याने उपांत्य किंवा अंतिम फेरी गाठत आहे याचाच अर्थ प्राथमिक कामगिरीत सातत्य आहे हे नाकारून जसे चालणार नाही तसेच निखळ यश मिळवता आलेले नाही हे सत्य नाकारून चालणार नाहीये. ते वादविवाद बाजूला ठेऊयात आणि एका वेगळ्याच आकडेवारीकडे नजर वळवूयात.

२०१९ च्या जुलै महिन्यात झालेल्या मागील विश्‍वकरंडक स्पर्धेपासून बरोबर चार वर्षात भारतीय संघाने ५७ एक दिवसीय सामने खेळले आहेत आणि त्यात ४९ खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. अजून एक भयानक गोष्ट म्हणजे त्यातील १३ खेळाडू फक्त १ किंवा २ एक दिवसीय सामने खेळले आहेत.

एक दिवसीय संघातून खेळताना सलामीच्या जोडीसाठी तब्बल ९ खेळाडूंना अजमावण्याचा प्रयत्न झाला आहे. आणि २३ खेळाडूंना मधल्या फळीतील फलंदाजीसाठी संधी देण्यात आली आहे.

ही आकडेवारी एकच सांगते की एक दिवसीय विश्‍वकरंडक स्पर्धा दोन महिन्यांवर आलेली असताना योग्य संघ काय असावा, नक्की कोणाला अंतिम संघात जागा द्यावी याची शोधाशोध अजून चालूच आहे. हीच गोष्ट पचनी पडायला जरा कठीण जात आहे. या स्पर्धेसाठी १५ जणांच्या भारतीय संघातील निम्मे खेळाडू यादीत पक्के आहेत आणि अजून निम्म्या जणांची चाचपणी चालू आहे.

२०१५ मधल्या संघात रवींद्र जडेजा सोडून बाकी कोणी खरा अष्टपैलू खेळाडू नव्हता. तसेच वेगवान गोलंदाजीतील पर्याय चांगलेच कमजोर झाले, ज्याने नको त्या वेळी भारतीय संघाला फटका सहन करावा लागला. २०१९ या वर्षात तीच चूक झाली.

मधल्या फळीत चौथ्या क्रमांकावर जेव्हा अंबाती रायुडूला बाजूला सारून विजय शंकरची निवड झाली तेव्हाच समर्थ पर्याय भारतीय संघाकडे नसल्याचे स्पष्ट झाले. त्यात भरीत भर म्हणून धोनीसह रिषभ पंत आणि दिनेश कार्तिक यष्टिरक्षक म्हणून नव्हे तर मधल्या फळीतील फलंदाज म्हणून संघात खेळले.

संघाचा समतोल योग्य नसल्याची ती निशाणी होती. मग काय, त्याच तिकिटावर तोच शो झाला. सलग दुसऱ्या विश्‍वकरंडक स्पर्धेत भारतीय संघाला उपांत्य सामन्यात योग्य कामगिरी करता आली नाही.

प्रमुख विश्‍वकरंडक स्पर्धा तोंडावर आली असल्याने भारतीय संघाची योग्य घडी बसवायला अगदीच कमी वेळ राहिला आहे. रोहित शर्मासह सलामीला शुबमन गिल येणार का डावखुऱ्या ईशान किशनला संधी मिळणार मधल्या फळीत विराट कोहलीला साथ द्यायला कोणाला घेणार आणि वेगवान गोलंदाजीत शमी, बुमरा आणि सिराजला समर्थ पर्याय कोण निर्माण करणार हा कळीचा मुद्दा आहे.

यष्टिरक्षक म्हणून ईशान किशनने आपली बाजू पक्की केली असताना आशा आहे की के एल राहुलचा पर्याय निवडण्याचा हट्ट बाजूला ठेवला जाईल. फिरकी गोलंदाजीच्या प्रांतात भारतीय संघाला भरपूर आणि चांगले पर्याय आहेत यात शंका नाही.

२०१९ ला विश्‍व करंडक स्पर्धेसाठी संघ निवड केली गेली असताना निवड समितीपेक्षा संघ व्यवस्थापनाचा जोर जास्त वाटत होता. विराट कोहली आणि रवी शास्त्रीने आपली बाजू लावून धरत आपल्याला वाटेल तसा संघ निवड समितीकडून मान्य करून घेतला होता.

अजित आगरकरच्या अध्यक्षतेखालची निवड समिती विचार करून ती दादागिरी जागेवर ठेवेल अशी आशा आहे. कोणताही काळातील असो, संघ व्यवस्थापन नेहमीच काही ठरावीक खेळाडूंवर विश्वास ठेवत त्यांनाच प्राधान्य देण्याची चूक करते. निवड समितीला सारासार विचार करून संघ व्यवस्थापनाच्या मागणीतील तथ्य काय आहे आणि हट्ट कोणता आहे याचे वर्गीकरण करता येणे गरजेचे आहे.

सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या आशिया करंडक स्पर्धा विश्वकरंडक स्पर्धेची रंगीत तालीम ठरणार आहे. भारतीय संघ व्यवस्थापनाला योग्य योजना आखून आणि चांगली संघ निवड करून आशिया करंडक स्पर्धेत चमकदार कामगिरी करण्यावाचून पर्याय नाहीये.

भारतीय संघ पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश संघांसमोर कशी कामगिरी करतो या कडे बारीक लक्ष द्यावे लागणार आहे. अगदी खरे सांगायचे तर आशिया करंडक जिंकला तरच अपेक्षित आत्मविश्वास भारतीय संघाला लाभणार आहे. त्याकरता संघाची योग्य घडी बसवायला रोहित शर्मा आणि राहुल द्रविडकडे जास्त अवधी नाहीये.

आशिया करंडक आणि ऑस्ट्रेलियासमोरचे तीन एक दिवसीय सामने कामी येणार आहेत. सर्व सामने भारतीय उपखंडात होणार असल्याने विश्‍व करंडक स्पर्धेची खरी पूर्व तयारी होणार आहे. चाचपणी थांबवून यशाची पेरणी चालू करायला शेवटची संधी रोहित शर्मा आणि राहुल द्रविडला मिळणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com