राजानं सावध राहण्याचा काळ

देशातले ९७ कोटी मतदार आपले लोकप्रतिनिधी निवडणार आहेत. त्या लोकप्रतिनिधींच्या बळावर भविष्यातल्या भारताची दिशा ठरणार आहे.
Loksabha Election
Loksabha Electionsakal

वर्तमानाविषयी सतत नकारात्मक राहण्याची मानवी मानसिकता असावी. इतिहासाची आठवण काढून ‘ते दिवस...’ म्हणून अश्रू ढाळणारे चार चार पावलांवर आढळतात. भविष्याकडं पाहताना इतिहासाविषयी नेमकी जाणीव असली तर वर्तमानातल्या कृतींची संगतवार मांडणी करता येते. बदल नेमके कुठं होताहेत हे पाहून वर्तमान समजून घेता येतो आणि भविष्याचा अंदाज बांधता येतो.

अगदी राजकारणही त्याला अपवाद नाही. सध्या देशभर लोकसभेच्या निवडणुकीचं वातावरण आहे. भविष्यात काय होणार याची उत्सुकता ठायी ठायी आहे. राजकारणी नेतेमंडळी, पक्ष, त्यांची भाषाधोरणं, आश्वासनांचा पाऊस अशी सारी मांडामांड सुरू आहे.

देशातले ९७ कोटी मतदार आपले लोकप्रतिनिधी निवडणार आहेत. त्या लोकप्रतिनिधींच्या बळावर भविष्यातल्या भारताची दिशा ठरणार आहे. त्यामुळं, वर्तमानाकडं स्वच्छ आणि तटस्थ नजरेनं पाहायला हवं. त्यासाठी इतिहासात डोकावायला हवं आणि मग भविष्याचा अंदाज बांधायला हवा.

उदाहरण म्हणून १९६७ मधली लोकसभेची निवडणूक घेऊ. हीच निवडणूक का, यामागं विशेष कारण आहे. चीन-पाकिस्तानबरोबरच्या युद्धाची आठवण ताजी होती. अर्थव्यवस्था कमालीची मंदावली होती. सन १९५१-५२ च्या निवडणुकीपासून सत्तेत असलेल्या काँग्रेसमध्ये फाटाफुटी होत होत्या.

मात्र, जिचा परिणाम साऱ्या जनमतावर व्हावा अशी अत्यंत धक्कादायक किंवा अपूर्व अशी कोणतीही घटना-घडामोड निवडणुकीच्या आधी घडलेली नव्हती. पक्षीय पातळीवर नसली तरी राजकीय व्यवहारांच्या पातळीवर समतल अशी रचना अस्तित्वात होती.

अशा काळातल्या निवडणुकीत डोकावलं तर काय दिसतं... जानेवारी १९६७ च्या बातम्या सांगतात की, राष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी इंदिरा गांधी येत होत्या... बिहारमध्ये पक्ष फुटले होते... नागालँडमध्ये निवडणूकयंत्रणेवर बंडखोर हल्ला करत होते... निवडणुकीच्या तोंडावर स्वतःच्या कर्मचाऱ्यांना खूश ठेवण्यासाठी सरकार महागाईभत्ता वाढवत होतं... उमेदवारांच्या प्रचारसभांमध्ये दगडफेकीच्या घटनाही होत्या...गोरक्षेसाठी सर्वात मोठं आंदोलन या निवडणुकीच्या काळात सुरू होतं... भ्रष्टाचाराचे आरोप होत होते.

ढोबळमानानं पाहता आजच्या निवडणूककाळात आणि सहा दशकांपूर्वीच्या निवडणुकीत आमूलाग्र बदल जाणवणारही नाही. संवादाची साधनं आणि पद्धत या दोन घटकांचा अपवाद. प्रचारात तंत्रज्ञान अल्पसं होतं आणि भाषा कमालीची संयमी होती हा तीव्र आणि उठून दिसणारा फरक.

लक्ष्याधारित प्रचार

आजच्या निवडणूकप्रचारात काय दिसतं...? आंदोलनं, आश्वासनं आणि पक्षफुटी ही साम्यस्थळं पटकन दिसतात. लोकशाहीव्यवस्थेत निवडणूककाळ हा आपले प्रश्न, मुद्दे आग्रहानं आणि ठासून मांडण्याचा काळ म्हणून सहा दशकांपूर्वीही आपण पाहत होतो आणि आजही हाच काळ महत्त्वाचा ठरतो आहे.

एरवी, एखाद्या प्रश्नाकडं लोकप्रतिनिधी, राजकीय पक्ष ‘नंतर बघू’ म्हणू शकतात; तोच प्रश्न निवडणूककाळात मांडला तर सोडवण्यासाठी पावलं उचलतात किंवा किमान त्यासाठी प्रयत्न तरी करतात हा भारतीय जनतेचा १९६७ चा अनुभव आहे आणि आजचाही. त्यामुळं, निवडणूक जवळ आली की सर्वात आधी आंदोलनांना सुरुवात होते हे एक ठळक निरीक्षण नोंदवता येतं.

प्रश्न सोडवण्यासाठीची आश्वासनं, विकासाची आश्वासनं यांसाठी आधीही आणि आजही निवडणूक हा सुगीचा काळ. चार वर्षं, दहा महिने जमेल तसं जुळवून घेणारे नेते शेवटच्या दोन महिन्यांत पक्षांवरच दबाव आणतात, याची उदाहरणं प्रत्येक निवडणुकीत आढळतात.

एकविसाव्या शतकापर्यंत, म्हणजे २००४ च्या निवडणुकीपर्यंत, कमी-अधिक प्रमाणात निवडणुकीचं ढोबळ वातावरण कायम दिसतं. बदल होत गेला तो संवादाच्या तंत्रज्ञानात. सभा-बैठका, झेंडे, भिंती रंगवणं, हँडबिलं छापणं यातून २००४ पासून भारतीय निवडणुका झपाट्यानं तंत्रज्ञानाकडं वळल्या. कमीत कमी वेळात अधिकाधिक मतदारांपर्यंत थेटपणे पोहोचण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर वाढला.

सन २००४ ला मोबाईल फोनकॉलवरून प्रचार हे कमालीचं नावीन्य होतं, तर २००९ मधलं नावीन्य होतं वेबसाईट-ब्लॉग. सन २०१४ च्या निवडणुकांपासून समाजमाध्यमांचा आणि डिजिटल मीडियाचा वापर सुरू झाला आणि त्याबद्दल आतापर्यंत भरपूर बोललं-लिहिलं गेलं. सन २०१४ नंतर मतदारांपर्यंत पोहोचण्याच्या पद्धतीत झालेल्या बदलांमध्ये महत्त्वाचा प्रकार अस्तित्वात आला व तो म्हणजे लक्ष्याधारित प्रचार.

इंग्लिशमध्ये याला ‘टार्गेटेड कॅम्पेन’ असं म्हटलं जातं. ठरावीक लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्याकडेच आपला प्रचार करायचा असेल तर सहा दशकांपूर्वी किंवा अगदी दोन दशकांपूर्वी प्रत्यक्ष जाऊन भेटण्याशिवाय पर्याय नव्हता. आता, तंत्रज्ञानाच्या मदतीनं, अगदी व्हॉट्सअॅपसारख्या लोकप्रिय मोबाईल अॅप्लिकेशनच्या साह्यानं लक्ष्याधारित प्रचार शक्य झाला.

अतिप्रगत तंत्रज्ञानाची जोड

भरभरून आश्वसनं, भांडण-तंटे, पक्षफुटी असे प्रकार लोकशाहीबरोबरच अस्तित्वात आले असताना तंत्रज्ञानानं संवाद अधिक सोपा केल्यानं निवडणुकांच्या प्रचाराचं स्वरूप आता बदलतं आहे. सन २०१४ मध्ये समाजमाध्यमांवर प्रचार झाला, २०१९ मध्ये समाजमाध्यमांद्वारे थेट प्रक्षेपण करून प्रचार झाला. या दोन्ही निवडणुकांमध्ये अपप्रचाराचे आणि गैरप्रचाराचे आरोप सर्वपक्षीय सर्वच स्तरांतून झाले.

त्यापुढची पायरी २०२४ चा प्रचार गाठू शकेल असं तंत्रज्ञान कोट्यवधी लोकांच्या मोबाईलवर सहजपणे उपलब्ध होतं आहे. ते तंत्रज्ञान ‘एआय अॅप’च्या द्वारे पसरतं आहे आणि संभाव्य शक्यतांमध्ये त्याचा परिणाम येत्या काळात दिसू शकतो. तंत्रज्ञानदृष्ट्या २०१४ आणि २०१९ पेक्षा २०२४ ची निवडणूक स्वाभाविकपणे अधिक प्रगत आहे. याचा अर्थ दहा वर्षांपूर्वीचं तंत्रज्ञान प्रचारात असणारच आहे, त्यात पाच वर्षांपूर्वीच्या बदलांची भर आहेच आणि आजच्या ‘एआय’ची जोडही असणार आहे.

उदाहरण म्हणून १९६७ ची निवडणूक घेऊ. तेव्हा इंदिरा गांधी आणि त्यांचे विरोधक त्यांची बाजू गाव-शहरांमध्ये सभा घेऊन मांडायचे. त्यांचे पक्ष भिंती रंगवून, मेळावे घेऊन, हँडबिलं वाटून आपला प्रचार करायचे. इंदिरा गांधी एका वेळी एकाच ठिकाणी असू शकत होत्या. सन २०१९ पासून समाजमाध्यमांवरच्या थेट प्रक्षेपणाद्वारे नेता एका प्रचारसभेतून अनेक ठिकाणी प्रभाव टाकू शकतो आहे. नेत्याच्या सभेला गर्दी किती याइतकंच, थेट प्रक्षेपणाला प्रतिसाद किती, हेदेखील महत्त्‍वाचं ठरतं आहे.

विरोधी उमेदवारावर जाहीर टीका किंवा तोंडी-लेखी अफवा पसरवणं हा प्रचाराचा जुना फंडा आहेच. आजच्या ‘एआय’अॅपद्वारे विरोधी उमेदवाराच्या आवाजात, त्याच्याच व्हिडिओत त्यानं न बोललेली वाक्यंही घालणं सोपं आहे. इंदिरा गांधी असोत, अटलबिहारी वाजपेयी असोत किंवा नरेंद्र मोदी-राहुल गांधी असोत, यांपैकी कोणत्याही नेत्याच्या आवाजाशी, व्हिडिओशी छेडछाड करून पूर्णतः अपप्रचारी निर्मिती सहज होऊ शकते आहे.

नेत्यांची सार्वजनिक भाषा नवा तळ गाठत असण्याचा आजचा काळ आहे. त्यातून आधीच मतदारांमध्ये पूर्वग्रह निर्माण झालेले असतात. अशा परिस्थितीत तंत्रज्ञानाच्या साह्यानं त्यात भर पडण्याचा धोका २०२४ च्या निवडणुकीत आहे.

निवडणूकप्रचाराला अपप्रचाराची जोड तंत्रज्ञानाद्वारे मिळवून देण्याचा अवकाश...की सारं वातावरण बदलू शकतं.

याची जाणीव असलेले राजकीय पक्ष, नेते यांची वानवा आहे. त्याबद्दल मतदारांना सतत इशारा देणाऱ्या यंत्रणेचाही अभाव आहे. परिणामी, मतदार म्हणून आपल्यालाच अधिक सजगपणानं, उघड्या डोळ्यांनी, खुल्या कानांनी तपासणी करूनच व्हिडिओ-ऑडिओ-फोटोंकडं पाहावं लागणार आहे.

‘आमच्या काळात असं नव्हतं...’ असं म्हणणाऱ्यांना इतिहासात रमू द्या... इतिहासातून शिकून आणि वर्तमानातले कल समजून घेऊन मतदाराला आजच्या प्रचाराकडं पाहावं लागेल. ही नजर आत्मसात करणं मतदार म्हणून सर्वोच्च प्राधान्य असावं लागेल. मतदारराजाला नुसतं जागं राहून चालणार नाही; सावधही राहावं लागेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com