भारतीय वास्तुशास्त्राची वाया गेलेली नक्कल

राजाच्या तुघलकी कारभारामुळे बांधण्यात आलेला ‘रॉयल पव्हेलियन’ राणी विक्टोरिया यांना अजिबात आवडला नाही. त्यांनी हा राजवाडा स्थानिक नगरपालिकेला विकला.
indian architecture royal pavilion england Queen Victoria gave municipality
indian architecture royal pavilion england Queen Victoria gave municipalitysakal

- वैभव वाळुंज

दक्षिण इंग्लंडमधील ब्रायटन शहरांमध्ये पूर्णतः भारतीय वास्तूंचीच नक्कल करण्याचा प्रयत्न केला गेला होता. येथील राजाच्या तुघलकी कारभारामुळे बांधण्यात आलेला ‘रॉयल पव्हेलियन’ राणी विक्टोरिया यांना अजिबात आवडला नाही. त्यांनी हा राजवाडा स्थानिक नगरपालिकेला विकला. एकेकाळी लोकांनी मूर्खाचं घर म्हणून हिणवलेल्या या जागेला आता पर्यटनस्थळाचं स्वरूप आलं आहे.

अनेकदा प्रगत व विकसित देशांमधील गोष्टींची नक्कल विकसनशील व अविकसित देश करतात, असा आपला समज असतो. भारतावर दीर्घकाळ साम्राज्य गाजवल्यानंतर येथे इंग्लंडमधील भरपूर गोष्टींची नक्कल करण्यात आली, असं म्हटलं जातं.

भारतातील व अनेक ब्रिटिश वसाहतींमधील गोष्टींची नक्कल इंग्लंडमध्ये करण्यात आली होती. अनेकदा इंग्लंडमधील नोकरशाहीचे निर्णय प्रायोगिक तत्त्वावर तेथील वसाहतींमध्ये घेतले जात व ते यशस्वी झाल्यास इंग्लंडमध्ये राबविण्यात येत; पण दक्षिण इंग्लंडमधील ब्रायटन शहरांमध्ये पूर्णतः भारतीय वास्तूचीच नक्कल करण्याचा प्रयत्न केला गेला होता.

येथील राजाच्या तुघलकी कारभारामुळे भारतीय वास्तू बनवण्याचा घाट घातल्यानंतर उभी राहिलेली इमारत आजही नक्कल करणं न जमल्यास काय होतं, याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. ब्रिटिशांचं भारतप्रेम अठराव्या शतकात इतकं वाढलं होतं की, भारतातील काही वास्तू इंग्लंडमध्ये आणण्याचा घाट घालण्यात आला होता.

१७५० दरम्यान येथील समुद्रकिनाऱ्यावरील गावांचे रिसॉर्ट आणि सहलीच्या ठिकाणांमध्ये रूपांतर झाले होते. या काळात ब्रिटिश राजघराण्यातील अनेक व्यक्ती दक्षिण भागामध्ये येत. आपल्या शानशौकीसाठी आणि वायफळ खर्चासाठी प्रसिद्ध असणारा राजा जॉर्ज चौथा या ठिकाणी अनेकदा येई.

संधीरोग झाल्यानंतर तो उपचारासाठी दीर्घकाळ या गावांमध्ये राहिला होता. तेव्हाच त्याने आपल्या विलासासाठी येथे भारतीय शैलीतून, त्यातही उत्तरेकडील मुघल शैलीच्या मशिदी, ताजमहाल व तत्सम इमारतींमधून प्रेरणा घेऊन आपल्यासाठी नवा राजवाडा बांधण्याची योजना आखली. सुरुवातीला भारतीय पद्धतीची पागा बांधण्यात आली.

यामध्ये एका वेळी ६० घोडे राजाच्या दिमतीसाठी असायचे. १८१५ ते १८२२ या काळात जॉन नॅश नावाच्या वास्तुरचनाकाराने त्याच्या येथे असणाऱ्या छोट्याशा महालाचे रूपांतर एका भारतीय शैलीच्या राजवाड्यामध्ये करायला सुरुवात केली.

ताजमहालापासून प्रेरणा घेऊन त्या पद्धतीचे घुमट आणि मिनार राजवाड्याच्या आजूबाजूला बनवण्यात आले; पण यामध्ये एक मूळ फरक होता की येथे बनवण्यात आलेले घुमट आणि मिनार मुख्यतः लोखंडाच्या फ्रेममध्ये बनले होते. त्यामुळे त्यांचं मूळ स्वरूप व आकार ठेवून आतून पोकळ भागात अजून नक्षीकाम करता येणे शक्य होतं.

याचाच फायदा घेऊन घुमटामध्येही काचा बसवण्यात आल्या व त्यांना वेगवेगळे आकार देण्यात आले; पण जेव्हा पूर्ण राजवाडा बांधून तयार झाला तेव्हा त्याचे हे घुमट आकर्षक वाटण्याऐवजी कांद्याच्या आकाराचे दिसले.

अर्थातच प्रत्यक्ष घुमट न पाहिलेल्या लोकांसाठी ही आश्चर्याची घटना होती आणि या वास्तूची कीर्ती सर्वदूर इंग्लंडमध्ये पसरली. या जागेला रॉयल पव्हेलियन असं नाव देण्यात आलं. या काळातील रचना, फॅशन आणि राहणीमान या दृष्टीने तयार झालेली शहरे रेजन्सी कालखंड म्हणून ओळखली जातात.

या काळाचे सर्वात मोठे मूर्तिमंत उदाहरण म्हणून या फसलेल्या राजवाड्याकडे पाहिले जाते. बाहेरून भारतीय पद्धतीची रचना झाल्यानंतर ते कमी म्हणून की काय, राजाने आतील सर्व बांधकाम व सजावट चिनी स्थापत्यशास्त्राच्या पद्धतीने करण्याचा हुकूम दिला. आतमधून राजवाड्याच्या मध्यभागी ड्रॅगन व तत्सम गोष्टी टांगण्यात आल्या.

लाल रंगाचे मखमली कापड लावून राजवाडा सजवण्यात आला. फक्त राजाच्या खासगी इमारतीच नाही, तर अगदी किचनदेखील याच पद्धतीने बनवण्यात आले. या वास्तूची गणना अनेक जण इतिहासामध्ये ब्रिटिश राजघराण्याची महत्त्वाचे ठिकाण म्हणून करत असले, तरी अनेक नागरिकांसाठी इंग्लंडमधील एक कुरूप वास्तू म्हणूनही प्रसिद्ध आहे.

यानंतर काही राजांनी येथे वास्तव्य केले; मात्र राणी विक्टोरिया हिला अशी चमचमीत इमारत अजिबात आवडली नाही. ‘‘आतून आणि बाहेरून विचित्र पद्धतीने चिनी दिसणाऱ्या या वास्तूला स्वतःचं धड रंगरूप नाही.

आतील खोल्या अशा जागी बनवल्या आहेत की तिथल्या एकाही खिडकीतून समुद्राचा एकही भाग दिसत नाही.’’ त्यामुळे तिने इमारत स्थानिक नगरपालिकेला विकण्याचा निर्णय घेतला. तत्कालीन किमतीनुसार त्रेपन्न हजार पाऊंड इतक्या किमतीला इमारत विकण्यात आली.

अर्थात इमारत नगरपालिकेला विकण्यापूर्वी त्यातील किमती सामान व फर्निचर लंडनला नेण्याची व्यवस्था राणीने केली. तेव्हापासून आजतागायत या जागेची व्यवस्था महानगरपालिका पाहत आहे. सुरुवातीला खासगी असणारी ही जागा आता पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहे.

एकेकाळी लोकांनी मूर्खाचं घर म्हणून हिणवलेल्या या जागेला आता पर्यटनस्थळाचं स्वरूप आलं आहे. अनेकदा उन्हाळ्याच्या दिवसात पर्यटक या राजवाड्याबाहेर ऊन खात असतात. महानगरपालिकेकडून राजवाड्यामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते; तसेच महत्त्वाच्या दिवशी त्यावर आकर्षक रंगाची सजावटही करण्यात येते. शेवटी नक्कल करायची तरी त्यासाठी योग्य ती काळजी घ्यायला हवी, याचे मूर्तिमंत उदाहरण यानिमित्ताने इंग्लंडच्या इतिहासात कायमस्वरूपी नमूद झाले आहे.

या इमारतीचं मी वर्णन करायचं तर करू तरी कसं? मुरीश, तुर्की, भारतीय, चिनी, मुस्लिम, गॉथिक अशा सर्व स्थापत्यशैलींचं मिश्रण करून राजाने ही इमारत बनवली आहे. तिच्यावर आधीच सात लाख पौंडहून जास्त खर्च झालाय आणि तरीही येत्या काही काळात ही इमारत राहणे योग्य होईल, असं वाटत नाही.’’

- ऑस्ट्रेलियन प्रवाशाने केलेले ब्राईटन पव्हेलियनचे वर्णन.

vaiwalunj@gmail.com (लेखक इंग्लंडमध्ये युके सरकारच्या शिष्यवृत्तीअंतर्गत नीती व धोरण या विषयावर संशोधन करत आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com