‘आयपीओं’ची कमाल, गुंतवणूकदार मालामाल

चालू २०२३ या वर्षात जगातील इतर देशांच्या तुलनेत, भारतात सर्वांत जास्त प्राथमिक समभाग विक्रीच्या ऑफर (आयपीओ) बाजारात आल्या.
Ipo Investment
Ipo Investmentsakal

चालू २०२३ या वर्षात जगातील इतर देशांच्या तुलनेत, भारतात सर्वांत जास्त प्राथमिक समभाग विक्रीच्या ऑफर (आयपीओ) बाजारात आल्या. म्हणजेच इथंही आपण जगामध्ये अग्रणी आहोत. एकूण २०० च्या वर ‘आयपीओ’ बाजारात आले; ज्यांनी तब्बल ५० हजार कोटी रुपये गोळा केले.

त्यापैकी ५० आयपीओ ‘मेन बोर्ड’वर होते, ज्यांनी ४५ हजार कोटी रुपये, तर १६० आयपीओ ‘एसएमई’ (स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस) विभागातील होते, ज्यांनी पाच हजार कोटी रुपये गोळा केले.

महत्त्वाचे म्हणजे यापैकी बहुतेकांनी म्हणजेच तब्बल ८० टक्के ‘आयपीओं’नी नोंदणीच्या (लिस्टिंग) दिवशीच गुंतवणूकदारांना भरघोस नफा मिळवून दिला.

मेन बोर्डवरच्या ५० आयपीओंपैकी ४० आयपीओ हे ‘लिस्टिंग’लाच इश्यू किमतीच्या वरच सुरु झाले, तर १६० ‘एसएमई’पैकी ११७ आयपीओ हे ‘लिस्टिंग’ला इश्यू किमतीच्या वर सुरु झाले.

‘लिस्टिंग’च्या पहिल्याच दिवशी सर्वांत जास्त फायदा ‘गोयल सॉल्ट’ या कंपनीने मिळवून दिला, जो २५८ टक्के इतका प्रचंड होता. म्हणजेच जर तुम्ही एक लाख रुपये गुंतविले असतील, तर केवळ १० दिवसांतच (कायदेशीररीत्या) ते २,५८,००० रुपये इतके झाले.

सोने, चांदी, रिअल इस्टेट किंवा इतर कोणता मालमत्ता विभाग इतका परतावा मिळवून देतो? या ‘आयपीओं’नी गुंतवणूकदारांना पहिल्याच दिवशी सरासरी ३० टक्के फायदा मिळवून दिला.

मागील ११ महिन्यांमध्ये सर्वांत मोठ्या ‘आयपीओ’मध्ये ‘मॅनकाइंड फार्मा’चा ४३२६ कोटी रुपये, तर त्याखालोखाल सध्या गाजत असलेला ‘टाटा टेक्नॉलॉजीज’चा ३०४३ कोटी रुपये हे ‘आयपीओ’ येतात. तिसरा ‘जेएसडब्ल्यू इन्फ्रा’ हा आयपीओ २८०० कोटी रुपयांचा होता. परंतु, या वर्षी सर्वांत धमाल उडवून दिली ती ‘एसएमई’ आयपीओंनी. हे वर्ष त्यांचेच होते असे म्हणावे लागेल.

म्हणजेच १६० ‘एसएमई’ आयपीओ बाजारात आले. त्यापैकी बहुतेकांनी लिस्टिंगच्याच दिवशी दिलेला परतावा पाहून थक्क व्हायला होते. सर्वांत जास्त परतावा देणाऱ्या पहिल्या १० कंपन्या सोबतच्या तक्ता क्र. १ व २ मध्ये पाहा.

तक्ता क्र. १ सर्वोच्च परतावा दिलेले ‘एसएमई’ आयपीओ

कंपनी - लिस्टिंग तारीख - आयपीओ किंमत - लिस्टिंग किंमत - २२ नोव्हेंबर २०२३ चा भाव - नफा (टक्के)

आरबीएम इन्फ्राकॉन - ४ जानेवारी २०२३ - रू. ३६ - रू. ५२ - रू. २७४ - ६६१

एक्‍झिकॉन इव्हेंट्स मीडिया - १७ एप्रिल २०२३ - रू. ६४ - रू. ६७ - रू. ३९८ - ५२३

बोंडादा इंजिनिअरिंग - ३० ऑगस्ट २०२३ - रू. ७५ - रू. १५० - रू. ४३३ - ४७६-

गायत्री रबर्स - ७ फेब्रुवारी २०२३ - रू. ३० - रू. ३५ - रू. १६५ - ४५०

वासा डेंटिसिटी - २ जुलै २०२३ - रू. १२८ - रू. २२२ - रू. ६०५ - ३७३

तक्ता क्र. २ सर्वोच्च परतावा दिलेले ‘मेन बोर्ड’ आयपीओ

कंपनी - लिस्टिंग तारीख - आयपीओ किंमत - लिस्टिंग किंमत २२ - नोव्हेंबर २०२३ चा भाव - नफा (टक्के)

सिएंट डीएलएम - १० जुलै २०२३ - रू. २६५ - रू. ४२१ - रू. ६४८ - १४५

सेन्को गोल्ड - १४ जुलै २०२३ - रू. ३१७ - रू. ४०५ - रू. ७४३ - १३५

ईएमएस लिमिटेड - २१ सप्टेंबर २०२३ - रू. २११ - रू. २८० - रू. ४५७ - ११७

विष्णू प्रकाश - ५ सप्टेंबर २०२३ - रू. ९९ - रू. १४६ - रू. २१३ - ११५

प्लाझा वायर्स - १२ ऑक्टोबर २०२३ - रू. ५४ - रू. ८० - रू. ११२ - १०७

महत्त्वाची कारणं

अलीकडच्या काळात इतक्या मोठ्या संख्येने ‘आयपीओ’ बाजारात येण्याची काही प्रमुख कारणे पाहू या.

१. पहिले कारण म्हणजे बाजारामध्ये गेल्या वर्षभरापासून असलेले ‘पॉझिटिव्ह सेंटिमेंट’ अर्थात बाजारामध्ये असलेले अतिशय सकारात्मक वातावरण व भावना. का बरे ते असे झाले? मागील आकडे असे दर्शवितात, की जेव्हा लोकसभा निवडणूक असते,

तेव्हा त्या निवडणुकीच्या आधीच्या सहा महिन्यांमध्ये बाजार मोठ्या प्रमाणात वर जातो. (प्री-इलेक्शन रॅली) अशा वेळी बाजारभावना सकारात्मक असतात. एप्रिल २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमुळे त्याआधी तयार होणाऱ्या वातावरणाचा फायदा घेण्यासाठी सध्या अनेक कंपन्या त्यांचे ‘आयपीओ’ बाजारात आणण्यासाठी धडपडत आहेत. परंतु, जसजशी निवडणूक जवळ येईल, तसतसे पुढील दिवसांमध्ये या ‘आयपीओं’चे प्रमाण कमी होताना दिसेल आणि बाजार स्थिर होईल.

२. चीन, युरोप, अमेरिका आदी देशांची अर्थव्यवस्था संकटात सापडल्याने परकी गुंतवणूकदारांचे भारतासाठीचे पैशांचे वाटप अथवा हिस्सा वाढला आहे. विविध ‘इंडेक्स’मध्ये भारताचा समावेश होत आहे.

३. आपल्या नियामक संस्थांनी वेळेवर योग्य निर्णय घेतल्याने इतर देशांच्या तुलनेत आपला देश ‘कोविड’च्या संकटातून लवकर सावरला; ज्यामुळे आपली अर्थव्यवस्था चांगले काम करीत आहे. वस्तू आणि सेवा यांची मागणी वाढत आहे.

आज तुम्ही बाहेर पाहिले, तर सर्व मॉल, दुकाने, विमानतळे, रेल्वे स्टेशन, हॉटेल, रिसॉर्ट आदी ठिकाणी प्रचंड गर्दी दिसते. नव्या चारचाकी; तसेच दुचाकी घेण्यासाठी ‘वेटिंग’ काळ आहे. यामुळे अनेक कंपन्या त्यांच्या कामाचा विस्तार आणि विकास करीत आहेत, ज्यासाठी त्यांना भांडवल अर्थात पैसे लागत आहेत.

४. मागील दहा वर्षांतील अनेक नवी धोरणे; जसे की नोटाबंदी, जीएसटी, रेरा, पीएलआय योजना आदींचे फायदे आता ठळकपणे दिसायला लागले आहेत.

५. चलनवाढ नियंत्रणात आहे, बँकांचे ताळेबंद सुदृढ होत आहेत, त्यांची थकीत कर्जे कमी झाली आहेत, कर्जाचा हप्ता चुकविण्याचे प्रमाण मागील १० वर्षांमध्ये सर्वांत कमी आहे.

६. सेवा क्षेत्रातील प्रावीण्यानंतर आता आपला देश उत्पादन क्षेत्रातसुद्धा दमदार वाटचाल करीत आहे. मोबाईल, कार, टीव्ही, वॉशिंग मशिन, रस्ते, बंदरे, निवासी; तसेच व्यावसायिक इमारती, स्टार्ट-अप, स्टँड-अप या सर्वांमध्ये प्रचंड वाढ होताना दिसत आहे, ज्यामुळे रोजगार वाढत आहे.

७. वित्तीय; तसेच चालू खात्यावरील तूट आणि रुपया नियंत्रणात आहे.

८. आपल्या देशात साधारण १० कोटी लोकांनी ऑनलाईन जुगारामध्ये पैसे घालविले आहेत, १८ कोटी लोकांना क्रिप्टो करन्सीमध्ये तोटा झाला आहे. काही महिन्यांपूर्वी ‘सेबी’ने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार डेरिव्हेटिव्हजमध्ये ९० टक्के ट्रेडरना तोटा होतो. या सर्वांमुळे ‘आयपीओं’कडे थोडा जास्त ओघ वळला आहे.

९. मागील काही वर्षांत देशातील तरलता वाढते आहे आणि त्याचा ओघ शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडांमध्ये सतत वाढतो आहे. आज देशामध्ये ११ कोटी डी-मॅट खाती आहेत, १७,००० कोटी रुपये फक्त म्युच्युअल फंड ‘एसआयपी’द्वारे बाजारात येत आहेत, बाजारामध्ये रिटेल गुंतवणूकदार झपाट्याने वाढत आहेत.

१०. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे एलआयसी, पेटीएम, नायका आदी कंपन्यांच्या ‘आयपीओं’नी गुंतवणूकदारांच्या केलेल्या घोर निराशेमुळे धडा घेऊन आता कंपन्या त्यांच्या आयपीओ शेअरची किंमत अतिशय वाजवी ठेवत आहेत, ज्यामुळे गुंतवणूकदार आकर्षित होत आहेत.

११. शेवटचे पण महत्त्वाचे, ‘सेबी’ सातत्याने करीत असलेल्या सुधारणांमुळे लोकांचा शेअर बाजारावरील विश्वास वाढला आहे. ‘टी+१’ सेटलमेंट, ‘आयपीओ’मधील ‘टी+३’ पद्धत, जी डिसेंबर २०२३ पासून अनिवार्य होणार आहे.

‘सेबी’ची करडी नजर

मागील काही वर्षांपासून ‘आयपीओं’मध्ये होत असलेला प्रचंड भरणा पाहून, ‘सेबी’ची नजर आता या विभागाकडे वळली आहे. मागील काळात, काही एनबीएफसी कंपन्या श्रीमंत गुंतवणूकदारांना ‘आयपीओं’मध्ये पैसे लावण्यासाठी भरमसाठ कर्जे देत होत्या;

ज्यामुळे ‘आयपीओं’मध्ये प्रचंड भरणा होत असे. त्याचे वाईट परिणाम ओळखून, ‘सेबी’ने एक एप्रिल २०२२ पासून एका गुंतवणूकदाराला एका ‘आयपीओ’साठी फक्त एक कोटी रुपयांचे कर्ज देण्याचा नियम केला आहे. एचएनआय विभागातील एक तृतीयांश हिस्सा हा २ ते १० लाख रुपये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवला गेला आहे.

तसेच, ‘सेबी’ने काही शेअरचे ‘अप्पर व लोअर सर्किट’ कमी केले आहे. ‘एसएमई’ विभागातील ‘आयपीओं’चे वाढलेले प्रमाण, तसेच त्यांनी दिलेला सर्वाधिक परतावा पाहून ‘सेबी’ या विभागावर बारीक लक्ष ठेवून आहे. या सर्वांचा रिटेल गुंतवणूकदारांना फायदा होऊन त्यांचा बाजारातील सहभाग वाढला आहे व वाढणार आहे आणि ही एकूणच बाजारासाठी चांगली गोष्ट आहे. यामुळे बाजारातील अस्थिरता कमी होईल.

प्री-आयपीओ खरेदी

अनेक गुंतवणूकदारांची तक्रार असते, की ‘आयपीओ’च्या काळात अर्ज करूनसुद्धा त्यांना शेअरची ‘ॲलॉटमेंट’ मिळत नाही. कारण या ‘आयपीओं’मध्ये कित्येक पटीने जास्त भरणा होतो. यामुळे काही गुंतवणूकदार ‘आयपीओ’ येण्याअगोदरच हे शेअर ‘प्रायव्हेट प्लेसमेंट’ पद्धतीने खरेदी करतात. परंतु, त्यामध्ये मोठी जोखीम आहे.

जोखीम किती असते?

प्रत्येक आयपीओ तुम्हाला चांगला परतावा देईल, याची खात्री नाही. चांगल्या कंपन्यांच्या ‘आयपीओं’चे लिस्टिंग तोट्यामध्ये झालेली अनेक उदाहरणे आहेत; जसे की एलआयसी, अपडेटर सर्व्हिसेस, वृंदावन प्लांटेशन, आयआरएम एनर्जी, यात्रा ऑनलाईन आदी.

बहुतेक मोठे गुंतवणूकदार आयपीओ येण्याआधीच कंपनीमध्ये गुंतवणूक करतात आणि आयपीओ आल्यावर ती माळ सर्वसामान्य गुंतवणूकदारांच्या गळ्यात घालून बाजूला होतात. शेअरचा भाव वाढल्यावर शेअर विकून बाहेर पडतात आणि सर्वसामान्य गुंतवणूकदार त्यांच्याकडून ते जास्त भावाला खरेदी करून अडकताना दिसतात.

शेअर बाजार हा अनेक घटकांवर अवलंबून असतो. ज्या कंपनीने आयपीओ आणला आहे, तिची कामगिरी कितीही चांगली असली तरीसुद्धा विभाग आकर्षक पाहिजे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्यांनी ठरविलेली किंमत वाजवी असणे आवश्यक आहे. ‘एसएमई’ शेअरमध्ये तरलता अर्थात लिक्विडीटी अतिशय कमी असते. जेमतेम १० ते १२ लाखांचे व्यवहार होतात, हे लक्षात घेतले पाहिजे.

तात्पर्य काय?

शेअर बाजाराचा आणि कंपनीचा सखोल अभ्यास नसेल, तर ‘आयपीओ’ काळात शेअरखरेदी करण्यापूर्वी वरील जोखीम लक्षात घेऊन, तज्ज्ञ आणि अनुभवी सल्लागारांची मदत घेणे योग्य ठरते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com