

JRD Tata Sports Complex
esakal
आपल्या मुलाला पत्र लिहून मनातील स्वप्नाची कल्पना देणारे सर जमशेदजी टाटा. त्यांनी बघितलेले स्वप्न दोराबजी टाटा आणि नंतर जेआरडी टाटांनी सत्यात उतरवले. हे स्वप्न होते खेळांच्या मैदानाचे. जमशेदपूरमधील जेआरडी टाटा स्पोर्टस् कॉम्प्लेक्सच्या रूपाने ते साकार झाले आहे.
कहाणी मोठी अजब आहे. एक पिता १९०२ मध्ये आपल्या ला पत्र लिहून मनातील स्वप्नाची कल्पना देतो. दूरदृष्टी असलेल्या पित्याला भला मोठा स्टीलचा कारखाना उभारायचा असतो. कारखाना कसा असावा याची कल्पना देताना ते त्यासोबत बऱ्याच बाकी महत्त्वाच्या गोष्टी पत्रात सविस्तर नमूद करतात. नवीन कारखाना आणि नवीन शहर वसवताना रस्ते मोठे असावेत आणि दुतर्फा देशी मोठ्या पानांची झाडे भरपूर प्रमाणात लावली जायला हवी. शहरात सर्व धार्मिक प्रार्थनास्थळांसाठी जागा ठेवली जावी. इतकेच नाही तर फुटबॉल हॉकी खेळांच्या मैदानांच्या उभारणीसह सामान्य जनतेसाठी मोठी सार्वजनिक उद्याने असावीत, या सर्व गोष्टी पत्रात तो माणूस जाणतेपणाने लिहितो. पत्र लिहिणारा दूरदृष्टी माणूस १९०४ मध्ये देवाघरी जातो; पण त्यांचा मुलगा १९०७ मध्ये आपल्या वडिलांनी दिलेल्या सूत्रांनुसार तसाच कारखाना उभारतो आणि पत्रात मांडून ठेवलेल्या सर्वच्या सर्व गोष्टींचा समावेश करून नवीन कारखाना आणि शहर वसवतो. ही कहाणी आहे जमशेदपूरची. ही कहाणी आहे टाटा उद्योगसमूहाची. ही कहाणी आहे जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या मोठ्या आणि आशिया खंडातील सर्वात मोठ्या स्टील कारखान्याची. ही कहाणी आहे खेळावर मनापासून प्रेम करणाऱ्या जाणत्या उद्योगपतींची.