

Joseph Vijay First Budget
esakal
वॉल्टर स्कॉट - saptrang@esakal.com
आपले पूर्वसूरी एमजीआर आणि जयललिता यांच्याप्रमाणेच जोसेफ विजयदेखील स्वतःला ज्येष्ठांसाठी मुलगा, तरुणांसाठी मित्र, बालकांसाठी मामा आणि स्त्री-पुरुषांसाठी भाऊ अशी भावनिक ओळख निर्माण करू इच्छितात. तमिळनाडू सरकारने आपल्या पहिल्या अर्थसंकल्पात निवडणुकीतील आश्वासनांची पूर्ती करण्याचा संकल्प केलाय.
राजकीय अनुभव आणि प्रशासकीय कौशल्ये अत्यल्प असलेल्या व ‘अभिनेता ते राजकारणी’ असा प्रवास केलेल्या सी. जोसेफ विजय यांनी बुधवारी या वर्षासाठीचा आपल्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. ‘तमिळगा वेत्री कळघम’ (टीव्हीके) पक्ष स्थापन केल्यानंतर अवघ्या दोन वर्षांच्या कालावधीत सत्तेकडे झेपावलेल्या विजय यांनी निवडणूकपूर्व आश्वासनांची पूर्ण पूर्तता करणाऱ्या योजना जाहीर केल्या नसल्या, तरी माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या शैलीत एक मजबूत भावनिक आणि राजकीय ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला दिसतो.
आपल्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत जयललिता यांनी स्वतःला ‘अम्मा’ म्हणून सादर करून जनसामान्यांशी भावनिक नाते जोडण्याचा प्रयत्न केला. विजय यांच्या कल्याणकारी योजनांपैकी एक मामाच्या नावाने, तर दुसरी भावाच्या नावाने आहे. तमिळनाडूतील सरकारी रुग्णालयांमध्ये जन्मलेल्या बाळांना सोन्याची अंगठी देण्याच्या योजनेस त्यांनी ‘थाई मामन थंगा मोधिरम तिट्टम’ (नवजात बालकांसाठी ‘मामाची सोन्याची अंगठी’ योजना), तर विवाहसाह्य योजनेस ‘अण्णन सीर’ (‘भावाची भेट’) म्हटले आहे. या योजनेअंतर्गत वधूंना ८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे नाणे आणि एक रेशमी साडी दिली जाणार आहे. यावरून दिसते, की आपले पूर्वसूरी एमजीआर आणि जयललिता यांच्याप्रमाणेच विजयदेखील स्वतःला ज्येष्ठांसाठी मुलगा, तरुणांसाठी मित्र, बालकांसाठी मामा आणि स्त्री-पुरुषांसाठी भाऊ अशी भावनिक ओळख निर्माण करू इच्छितात.