दो पाटन के बीच में साबुत बचा न कोए

kabir.jp
kabir.jp

कबीरजींचा एक प्रसिद्ध दोहा आहे,
चलती चक्की देख कर दिया कबीरा रोए ।
दो पाटन के बीच में साबुत बचा न कोए ।।
जात्यावर गहू दळताना बघून कबीरजींचे निरीक्षण आहे हे. जात्याला दोन दगडं असतात. खालचा असतो "तळी' आणि वरच्याला म्हणतात "पाऊ'. जात्याच्या दोन्ही दगडांमध्ये दाणे टाकल्यावर त्यांचं पीठ होतं. गहू असो वा डाळ, ज्वारी असो की बाजरी, दगडांमधील घर्षणाला समोर जाऊनच त्याच पीठ बाहेर निघते. तसेच आपण सगळेही या दोन दगडांमध्ये जगत असतो. तळी सुखाची तर पाऊ दुःखाचा. तळीला हर्ष, तर पाऊ शोकाचा. ही दोन्ही दगडं अशाच परस्परविरोधी परिस्थिती आणि भावनांचे प्रतीक आहेत. कुठलीही परिस्थिती किंवा भावना एकटी नसते. तिला परस्परविरोधी पूरक अशी परिस्थिती असतेच. न्यूटन यांचा तिसरा नियम पण यासंदर्भात बघितला तर असाच अर्थ निघतो. "प्रत्येक क्रियेला तितकीच, पण विरुद्ध दिशेची प्रतिक्रिया असते.'
प्रकृतीतसुद्धा आपल्याला हा द्वित्व भाव दिसून येतो. दिवस आहे, तर रात्र पण आहे. ऊन आहे, तर सावली पण आहे. उन्हाळ्याच्या गरम झळा आहेत, तर पावसाच्या सुखकारक सरी पण आहेत. उष्म्याच्या तोडीला थंडी, तर चांगल्याच्या जोडीला वाईट पण आहेच. फुलं आहेत, तर त्यांच्या सोबतीला काटे पण आहेत. या क्षणाला प्रकाश आहे, तर फिरून अंधार येणारच. मायेचं फसवं जग आहे, तर मोक्ष पण आहे. एकीकडे देव आहे, चांगुलपणाची व दयेची मूर्ती, तर दुष्टतेचा कळस गाठणारा सैतान पण आपल्या मनात घर करून आहे.
रामायण ही श्रीरामचंद्रांच्या आदर्श वागणुकीची कथा आहे. परंतु, त्यांच्यातील आदर्शत्वाचा प्रत्यय यायला रावणाच्या धर्माविरुद्धच्या आचरणाची गरज आहे. रामायण फक्त प्रभू रामचंद्राच्या गुणांची गोष्ट असती, तर कदाचित जनमानसात एवढी लोकिप्रय झाली नसती. त्यांच्या सद्गुणांना अधोरेखित करायला रावणाचे दुर्गुण आवश्‍यक आहेत. कृष्णाच्या चरित्रात कंसाचा दुष्टपणा नसता, तर त्याच्या जन्माची विलक्षण कथा कशी लिहिल्या गेली असती? पूतना, यमलार्जुन, धेनुकासुर इत्यादी मंडळींमुळे कृष्णाच्या अंगी असलेली असाधारण शक्ती लक्षात आली. एकप्रकारे या तथाकथित दुष्ट मंडळींचे दुर्गुणसुद्धा गुणंच ठरतात, कारण त्यामुळे गोष्टं पुढे सरकते, त्यातले संदर्भ कळतात. महाभारतात जर दुर्योधन नसता तर कुरुक्षेत्रावर युद्ध झालंच नसतं. मग महाभारत एक साधी सरळ पाच राजकुमारांची गोष्ट असती, तिला वाचण्यात कुणालाच रस राहीला नसता. धर्मक्षेत्रात कृष्णाने रथ मध्यभागात आणल्यावर अर्जुनाच्या मनात "युद्ध करू की निघून जाऊ', हा दुहेरी भाव निर्माण झाला नसता, तर भगवत गीतेचा जन्म झाला नसता. मनात आलेल्या दोन परस्परविरोधी भावना, लढणे की न लढता पळून जाणे, त्याच्या मनात प्रश्न निर्माण करतात.
या मनात आलेल्या प्रश्नांमुळे त्यांची उत्तरे शोधण्यास कराव्या लागणाऱ्या प्रयत्नांमुळे जीवनाला गती मिळते आणि जगण्यात रस निर्माण होतो. हा द्वित्व भाव जगात नसता, तर जीवन किती विरस व एकसुरी झालं असतं नाही? जीवनातल जे संगीत आहे, ते या वेगवेगळ्या सुरांच्या मिश्रणानेच तयार होते. ताटात वाढलेल्या जेवणात जर सगळे पदार्थ गोडच असले, तर त्या गोडपणाला पण चव राहणार नाही. डावीकडच्या झणझणीत ठेच्यामुळे पुरणाच्या पोळीची लज्जत आणखीच वाढते. पावसाच्या सरींमध्ये भिजायला कुणाला आवडत नाही? परंतु, थोड्या वेळाने थंडी वाजते आणि अंग कोरडे करून उबदार पांघरुणात शिरावसं वाटतं. कोवळ ऊन्ह असले की त्याची ऊब हवीहवीशी वाटते, पण जरावेळाने त्याचाच त्रास होतो व आपण सावली शोधतो. सावलीत आल्यावर त्याचा गारठा पण तेवढाच सुखावतो. दोन्ही परस्परविरोधी गोष्टी करण्यामध्ये मजा आहे, परंतु कुठली वाईट व कुठली चांगली, हे ठरवता येणं अशक्‍य आहे. एका क्षणाला जी गोष्ट सुख जेते, तीच पुढच्या क्षणाला दु:खदायी ठरते.
म्हणून चांगलं किंवा वाईट, सुख किंवा दु:ख, आनंद किंवा शोक, बरोबर किंवा चूक या सर्व भावना सापेक्ष असू शकतात. एकच गोष्ट कुणासाठी चांगली, तर कुणासाठी वाईट ठरू शकते. माझ्या मतानुसार ज्या कृती चुकीच्या आहेत, त्या दुसऱ्या कुणाच्या मताने बरोबर ठरू शकतात. आज आपण ज्यांचा स्वातंत्र्यवीर म्हणून सन्मान करतो, ते इंग्रजांच्या दृष्टीतून क्रांतिकारी होते. आपल्यासाठी आदर्श, तर त्यांच्यासाठी वाईट होते. तसेच प्रत्येकाच्या सुखदुःखाच्या व्याख्यासुद्धा वेगळ्या असतात. कुणी व्यक्ती एकाला कुरूप भासते, तर तीच व्यक्ती दुसऱ्याला सुंदर वाटू शकते. मनातले भाव कसे आहेत, त्यावरून या द्वित्वाचा निकाल लागतो.
द्वित्व हे प्रत्येक क्षणाला, प्रत्येक अनुभवात असतं. परंतु, यांच्या जोडतोडीनेच, कमी जास्त प्रमाणात असण्याने जीवनाची कथा तयार होते. कंप्युटर अर्थात संगणक, त्याच्यासमोर कितीही मोठा प्रश्न मांडला, तरी ते निमिषमात्रात उत्तर देते. आश्‍चर्याची बाब अशी की त्याला फक्त दोन अक्षरांचीच भाषा समजते शून्य आणि एक. जटिलम प्रश्नाचं रूपांतरण ते आधी या "बायनरी' भाषेत करतं, मग उत्तर काढून आपल्याला समजेल अशा भाषेत रूपांतरण करून आपल्यासमोर प्रस्तुत करतं. या दोन अंकांमध्ये संपूर्ण जगातली प्रश्नोत्तरे मांडता येतात. परंतु, प्रत्यक्ष जीवनातली भाषा एवढी सरल नसते. कुठल्याही भावनांची किंवा कृतीची वर्गवारी करता येत नाही. सगळ्याच कृती परस्परविरोधी भावनांच्या कमी अधिक प्रमाणात मिश्रण असतात. व्यासजी म्हणतात,
अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनद्वयम्‌ ।
परोपकार: पुण्याय पापाय परपीडनम्‌ ×
सगळ्या अठराही पुराणांचे सार या दोन ओळींमध्ये आहे. परोपकार हे पुण्य व परपीडा हे पाप. परंतु, आपण जे काही वागतो, बोलतो व दिवसभरात कार्य करतो, ते पाप व पुण्याचे मिश्रणच असते. कधी पापाचा भाग कमी, तर कधी पुण्याचा भाग. एक सरळ रेष आखून वर्गवार मांडणी करता येणे कठीण आहे. या सर्व दुहेरी भावनांच्या पलीकडे जो पोहोचला, तो श्रीकृष्णाने सांगितलेल्या स्थितप्रज्ञ स्थितीला पावतो. तोपर्यंत आपण सर्व सामान्यजन "दो पाटन के बीच में', अर्थात "तळी' व "पाऊ' यांच्यामध्ये कुठे तरी जगण्याची धडपड करीत असतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com