मानुस हो को वही रसखान, बसौं मिली गोकुल गॉंव के ग्वारन

raskhan
raskhan

काही दिवसांपूर्वी रेडिओवर प्रख्यात सिनेमा व टीव्ही कलाकार अन्नू कपूर यांचा कार्यक्रम ऐकला. या कायर्क्रमाच्या एका भागात ते श्रोत्यांशी संवाद साधतात. अशाच एका श्रोत्याशी दूरध्वनी संभाषण करत असताना त्यांनी फार सुरेख ओळी उद्‌धृत केल्या
मानुस हो को वही रसखान, बसौं मिली गोकुल गॉंव के ग्वारन
जो पसु हो तो कहा बस मेरो, चरौ नित नंद की धेनु मॅंझारन
पाहन हौं तो वही गिरी को, जो धयोर कर छत्र पुरंदर धारन
जो खग हौं तो बसेरो करौं म्मिल कालंदी कूल कदम्ब की डारन
पुढचा जन्म जर मनुष्याचा मिळाला, रसखान तर गोकुळातल्या गवळ्याचा मिळो. पशूचा मिळाला तर नंदाच्या गायीचा. दगडाचा मिळाला तर त्याच पवर्ताचा मी दगड झालो पाहिजे जो कृष्णाने आपल्या तर्जनीवर धरला होता. जर मी पक्षी झालो तर मला यमुनेच्या काठावर कदम्बाच्या झाडावर आसरा मिळायला हवा.
श्रीकृष्णाविषयीच्या भक्ती आणि प्रेम, याने ओथंबलेली ही कविता आहे भक्त रसखान यांची. रसखान यांचा जन्म 1548 मध्ये पिहानी या गावात झाला. यांच मूळ नाव सैयद इब्राहिम. पठाण कुळात जन्म झालेल्या सैयद यांना आईवडिलांचा भरपूर स्नेह मिळाला. घरात सुखाची व ऐश्वर्याची काही कमी नव्हती. भक्तिमय वातावरणाच्या प्रभावाखाली एके दिवशी भागवत कथा ऐकण्याचे प्रयोजन झाले. तिथे श्रीकृष्णाची तसबीर बघून त्यांच्या मनात अनंत प्रेमाच्या भावना उत्पन्न झाल्या.
देख्यो रुप अपार मोहन सुंदर स्याम को
वह ब्रज राजकुमार हिय जिय नैनिन में बस्यो
जेव्हापासून या अपार सुंदर रूप असलेल्या मोहनाला बघितले आहे. मनात, हृदयात व डोळ्यांत या ब्रजच्या राजकुमाराचं रूपच वास्तव्य करीत आहे.
त्यांच्या कृष्णभक्तीची ही सुरुवात होती. पुढे गोस्वामी विठ्ठलनाथ यांची दीक्षा घेऊन ते ब्रजभूमीलाच वास्तव्यास आले. रसखान या टोपण नावाने भक्ती व शृंगार रसाने ओतप्रोत उत्तमोत्तम रचना त्यांनी केल्या. यात दोहे, पद व सवैये यांचा समावेश आहे. रसखान अर्थात रसाची खाण. खरोखरच त्यांच्या कविता रसाने परिपूर्ण आहेत. कृष्णाच्या सगुण व निर्गुण, दोन्ही रूपांची भक्ती त्यांच्या रचनांमध्ये दिसून येते. त्यांच्या सगुण कृष्ण बाललीला, फागलीला, कुंजलीला व प्रेम वाटिका इत्यादींमध्ये दिसून येतो. काव्याच्या सीमित परिघात त्यांनी कृष्णावरचं असीमित प्रेम बांधलं आहे. कृष्णाच्या सहज स्वरूपाचे वर्णन करताना ते म्हणतात-
सेस गनेस महेस दिनेस सुरसेहु जाहि निरंतर गावै
जाहि अनादि अनंत अखंड अछेद अभेद सुबेद बतावैं
नारद से सुक व्यास रहे पिचहारे तू पुनि पार न पावैं
ताही अहीर की छोहरियॉं छछिया भरि छाछ पे नाच नचावे
ज्याचे गुणगान ब्रह्मा, शिव, विष्णू, शेष व देवराज इंद्रसुद्धा करतात, जो अनादी अनंत अखंड व निराकार आहे, नारद व शुकदेवसारखे ज्ञानीजनसुद्धा ज्याला पार करू शकले नाही, त्याला गवळ्यांच्या मुली थोड्याशा लोण्यासाठी नाचवतात. हा त्याचा मोठेपणा आहे. भक्ती व प्रेमाची ही या कविहृदयाची पराकाष्ठा आहे. एवढेच नव्हे, रसखान यांनी भागवत कथेचा अनुवाद हिन्दी व फारसी भाषेत केला. वृंदावनात वास्तव्य करून त्यांचा मृत्यू तेथेच झाला. मथुरा जिल्ह्यात महाबनी येथे त्यांची समाधी आहे.
भारतेन्दु हरीशचन्द्रांनी ज्या मुसलमान संतासाठी "इन मुसलमान हिरजनन पर कोटिन हिंदू वारिए' असे उद्गार काढले होते, त्यात रसखान यांचं नाव सर्वोपरी आहे. रसखान हे कृष्ण भक्त असलेले एकमेव मुसलमान संत नाहीत. अकराव्या शतकानंतर भारतात इस्लाम धर्म खूप वेगाने पसरला. सुफीवाद व भक्तिवाद यांचा मेळ व्हायला अधिक काळ लागला नाही. सुफीवाद परमेश्वर व भक्ताचे नाते प्रियकर व प्रेमिका यांचा नात्यासम मानत. मग श्रीकृष्णापेक्षा अधिक लोकप्रिय प्रियकर कुठे? चैतन्य महाप्रभू यांचे बरेच अनुयायी मुसलमान होते, ते याच कारणामुळे. त्यांची पण कृष्णावर प्रेममयी भक्ती होती.
याच काळात बरेच इस्लाम धर्म स्वीकारणारे, परंतु कृष्णप्रेम व भक्तीचे गीत गाणारे संत होऊन गेले. त्यात उल्लेखनीय अशी काही नावे आहेत सईद सुल्तान, अली रज़ा व सुफी कवी अकबर शाह. यांनी कृष्णावर भक्तीपर खूप रचना केल्या. बंगालचे पठाण शासक सुल्तान नाजीर शाह व सुल्तान हुसैन शाह यांनी महाभारत व भागवत पुराण यांचे बंगाली भाषेत अनुवाद करवून घेतले. अमीर खुसरो यांनी आपली प्रसिद्ध रचना "छाप तिलक सब छीनी..' कृष्णाला समर्पित केली आहे.
भक्तिकाळात रसखान यांच्या व्यतिरिक्त आलम खान यांचेही नाव कृष्णभक्तांमध्ये घेतले जाते. त्यांचा "आलम-केली' हा रचना संग्रह फार प्रसिद्ध झाला. या कडीतील शेवटचे कवी होते नझीर अकबराबादी. यांनी कृष्णलीलेवर असंख्य कविता रचल्या. तसेच बलराम यांच्यावर पण भक्तीपर काव्य केले. फैजाबादच्या नवाबाचे शेवटचे वारस. परंतु, लखनऊ येथे वास्तव्य असलेले वाजिद अली शाह हेही परम कृष्णभक्त होते. त्यांनी स्वत:ला दिलेल्या अनेक नावांपैकी कन्हैया त्यांच आवडत नाव होत.
वाजिद अली शाहनंतर भारतात इंग्रजांचा प्रवेश झाला व त्यांनी हिंदू मुसलमान द्वेष निर्माण करून वैराच्या भावनेला खतपाणी द्यायला सुरुवात केली. हिंदू व मुसलमान यांच्यातली एकी जाऊन परस्पर शत्रुत्व निर्माण झाले. स्वातंत्रोत्तर काळात राजा मेहदी अली खान, शकील बादायुनी इत्यादी शायरांनी हिंदी सिनेमासाठी सुरेख भक्तिगीते लिहिली. निदा फाझली यांचं एक गीत आहे-
फिर मूरत से बाहर आकर तारो ओर बिखर जा
फिर मंदिर को कोई मीरा दीवानी दे मौला
भगवत प्रेम हे कुठल्या एका धर्म किंवा संप्रदायाची सत्ता होऊ शकत नाही. परमेश्वर हा सर्वधर्म, संप्रदाय व मतांच्या पलीकडे श्रद्धेचा विषय आहे. ईश्वराची भक्ती त्याच्या कुठल्याही रूपावर करता येते. कुणाच्या मनावर त्याच कुठलं रूप गारूड घालेल, सांगता येत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com