

Leopard-Human Conflict
esakal
बिबट्यांच्या हल्ल्यांत माणसांनी जीव गमावण्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर अनेक उपाय सुचवले जात आहेत. बिबट्यांना पकडा, निवारा केंद्रात ठेवा, दूर नेऊन सोडा, ‘वनतारा’ला पाठवा, निर्बीजीकरण करा, या उपायांपासून दिसताक्षणी गोळ्या घाला, इथपर्यंतची ही सारी चर्चा आहे. परंतु बिबट्यांच्या प्रश्नावर कायमस्वरूपी उत्तर शोधायचे असेल, तर केवळ तात्कालिक वा भावनिक उपाय कामी येणार नाहीत.
मानव आणि बिबट्या संघर्षात मानवाचा संयम संपला असल्याचे सध्याचे चित्र आहे. ते समजण्यासारखेच आहे. घरातील व्यक्ती बिबट्याच्या हल्ल्यात मरण पावल्यानंतर कुटुंबीयांचे दु:ख, संताप आणि गावकऱ्यांत पसरणारी घबराट साहजिक आहे. शासन-प्रशासनावरचा दबाव दिवसेंदिवस वाढतो आहे. परंतु बिबट्यांचे हल्ले थांबवण्यासाठी सध्या चर्चेत असलेले बरेचसे उपाय व्यावहारिक नाहीत. सनसनाटीच्या पलीकडे जाऊन व सातत्याने केलेल्या मूलभूत उपाययोजनाच हा प्रश्न सोडवू शकतील.