अभिमन्यूचं लखलखतं यश

महाराष्ट्राचा ग्रँडमास्टर व पुणेकर अभिमन्यू पुराणिकनं नुकतीच स्पेनमधील सिटजेस या ठिकाणी झालेली प्रख्यात आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा जिंकली आणि भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला.
Abhimanyu Puranik
Abhimanyu Puraniksakal

- रघुनंदन गोखले, saptrang@esakal.com

महाराष्ट्राचा ग्रँडमास्टर व पुणेकर अभिमन्यू पुराणिकनं नुकतीच स्पेनमधील सिटजेस या ठिकाणी झालेली प्रख्यात आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा जिंकली आणि भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला. जगभरातून आलेल्या ३५ ग्रँडमास्टर्सच्यावर क्रमांक मिळवणं ही काही सोपी गोष्ट नाही पण सतत आक्रमक खेळून अभिमन्यूनं हा बहुमान खेचून आणला. याच स्पर्धेतील विजयामुळं त्याला जागतिक क्रमवारीत पहिल्या शंभर खेळाडूंमध्ये प्रवेश करता आला आहे.

मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, ही म्हण खरी असावी. २००७ मधली गोष्ट असेल. माझा शिष्य जयंत गोखले यांच्याकडं मी गेलो असताना तेथे मी सात वर्षांच्या एका चुणचुणीत मुलाला बुद्धिबळ खेळताना पाहिलं. मी घातलेली कोडी तो पटापट सोडवत होता. ते पाहून माझ्या मनात आलं, की या मुलाला मी जागतिक शालेय अजिंक्यपद स्पर्धांत का उतरवू नये? जयंतनं त्याची तयारी करवून घ्यायचं कबूल केलं आणि मी माझ्या इतर शिष्यांसोबत अभिमन्यूला ग्रीसला घेऊन गेलो. तिथं या पठ्ठ्यानं नऊ पैकी नऊ डाव जिंकून सात वर्षांखालील मुलांचं जागतिक शालेय अजिंक्यपद मिळवलं.

लेव्हिन डॅनियल नावाचा एक इस्रायली मुलगा पहिला येईल अशी त्या वेळी खूप हवा होती पण अभिमन्यूनं त्या इस्रायली मुलाला जराही टिकू दिलं नाही. लेव्हिनची आई मला स्वत: येऊन भेटली आणि तिनं सांगितलं, की एक भारतीय मुलगा इतका छान खेळेल याची त्यांना अपेक्षाच नव्हती.

अशी लहानपणी चुणूक दाखवणारी कितीतरी मुलं आपण विविध क्षेत्रांत बघतो. पण दहा वर्षांनंतर त्यांच्या प्रतिभेला न्याय देऊन किती जण पुढं येतात? अभिमन्यूची विलक्षण प्रतिभा, त्याचे पालक समीर आणि स्नेहा यांचा पाठिंबा आणि जयंत गोखलेंचं मार्गदर्शन यामुळं अभिमन्यूनं यशाची एक एक पायरी पार करून आजपर्यंतचं यश मिळवलं आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर अभिमन्यूची नोंद घेण्यात आली ती २०१८ मध्ये. तुर्कस्थानमध्ये झालेल्या जागतिक ज्युनियर अजिंक्यपद स्पर्धेत अभिमन्यूनं दुसरा क्रमांक पटकावून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला. कारण त्याचं सुरुवातीचं सीडींग २४ होतं. लवकरच त्याला ग्रँडमास्टर किताबानं सन्मानित केलं गेलं.

युरोपात जाऊन खेळायला सुरुवात केल्यावर अभिमन्यूचा खेळ बहरला आणि त्यानं सातत्यानं बक्षिसाच्या मानकऱ्यांमध्ये स्थान मिळवण्यास सुरुवात केली. अनेक वेळा त्यानं दुसरे-तिसरे बक्षीस कमावलं पण पहिला क्रमांक त्याला त्यावेळी हुलकावणी देत होता.

अखेर लॅटव्हियाची राजधानी रीगा येथील जलदगती सामन्यात बुद्धिबळाची देवता मानली गेलेली कैसा देवी त्याच्यावर प्रसन्न झाली. गुकेश, अर्जुन इरिगेसी, निहाल सरीन, नारायणन, अरविंद चिदंबरम अशा भारतीय ताऱ्यांसह अनेक परदेशी ग्रँडमास्टर्स भरलेल्या या स्पर्धेत अभिमन्यूनं पहिला क्रमांक मिळवला आणि त्या नंतर मागं वळून पाहिलेच नाही.

२०२३ हे वर्ष अभिमन्यूच्या लक्षात राहील ते त्यानं साधलेल्या एका बरोबरीमुळं. कतारची राजधानी दोहा इथं एक मोठी आंतरराष्ट्रीय स्पर्धा झाली होती आणि जगातील सर्वोत्तम खेळाडू मानला जाणारा मॅग्नस कार्लसन त्याचा प्रतिस्पर्धी होता. अनेक खेळाडू तर एखाद्या वाघासमोर उभ्या राहिलेल्या हरणानं गर्भगळीत व्हावं, असं बलाढ्य मॅग्नस समोर नांगी टाकतात आणि जराही लढत न देता पराभूत होतात.

उदाहरण घ्यायचे तर गॅविन जोन्स या ब्रिटिश ग्रँडमास्टर्सचे घ्या. गॅविन विरुद्ध मॅग्नस कार्लसन यांचा हा डाव टाटा स्टील या नेदरलँड्स मधील प्रख्यात स्पर्धेत २०१८ मध्ये खेळला गेला होता आणि सुरुवातीलाच गॅविनला एक घोडा मॅग्नसच्या घोडचुकीमुळं मिळाला होता. पण गॅविनला त्याचा फायदा घेता आला नव्हता.

या पार्श्वभूमीवर कोणत्याही जगज्जेत्याशी आधी न खेळलेला अभिमन्यू सहजी पराभूत झाला असता तर कोणाला आश्चर्य वाटले नसतं. पण त्या भारलेल्या वातावरणात आणि जो डाव जगातील अनेक देशांमध्ये टेलिव्हिजन आणि युट्युब वर प्रत्यक्ष दाखवला जात होता, त्यामध्ये अभिमन्यूनं जराही न डगमगता मॅग्नसच्या हल्ल्यास प्रतिहल्ल्यानं तोंड दिलं आणि जगातील सर्वोत्तम खेळाडूला जिंकू दिलं नाही.

आपल्या भात्यातील सर्व शस्त्रं वापरून झाल्यावरही हा भारतीय मुलगा आपल्या जाळ्यात अडकत नाही म्हटल्यावर अखेर मॅग्नस हसला आणि त्याने स्वतः बरोबरीचा प्रस्ताव पुढं केला. अभिमन्यूनं कतार स्पर्धेआधी अर्मेनियातील निसर्गरम्य सागकाझर या गावी झालेल्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावला होता.डिसेंबरमध्ये आपल्या स्पॅनिश दौऱ्यात अभिमन्यू एल अब्रोगत येथील स्पर्धेत दुसरा आला आणि नंतर युरोपातील महत्त्वाची मानल्या गेलेल्या सिटजेस या स्पर्धेत तब्बल ३५ ग्रँडमास्टर्सच्या वर त्यानं पहिला क्रमांक मिळवला.

पुढं काय? हा प्रश्न अभिमन्यूपुढं मोठा आहे. एकीकडं वाणिज्य शास्त्रातील मास्टर पदवी घेऊन अभिमन्यू आता बुद्धिबळात सर्वस्व झोकून देण्यास तयार झाला आहे. राज्‍य सरकारनं तर त्याचा शिवछत्रपती पुरस्कारानं गौरव केला आहेच. महाराष्ट्राचा सुपर ग्रँडमास्टर विदित गुजराथीप्रमाणे अभिमन्यू गेल्या वर्षीच्या विश्वचषक सामन्यात खेळलेला दुसरा महाराष्ट्रीय खेळाडू होता.

२०२२ मध्ये चेन्नई येथे झालेल्या ऑलिम्पियाडमध्ये भारताच्या ‘क’ संघाचं प्रतिनिधित्व करण्याचा मान त्याला मिळाला. नुकतंच विश्वनाथन आनंदनं त्याला आपल्या वेस्टब्रिज आनंद चेस अकादमीमध्ये शिकण्यासाठी आमंत्रित केलंय. या अकादमीचं वैशिष्ट्य म्हणजे इथं आनंदनं स्वतः आमंत्रित केल्याशिवाय प्रवेश नाही.

भारतातील फक्त प्रतिभावान खेळाडू जगातील आघाडीच्या प्रशिक्षकांकडून इथं प्रशिक्षण घेतात - आणि ते पण विद्यार्थ्यांकडून कोणताही मोबदला न घेता. प्रज्ञानंद, गुकेश, अर्जुन इरिगेसी असे आघाडीचे भारतीय खेळाडू तिथं शिकतात. परंतु एवढ्यावर तुम्हाला प्रगती करता येत नाही. तुम्हाला खास वैयक्तिक प्रशिक्षण मिळणं गरजेचं असतं. त्यासाठी पैशाची गरज असते आणि प्रायोजकांशिवाय ते शक्य नसतं. कोणत्याही विशेष मदतीशिवाय आतापर्यंत अभिमन्यूनं हा पल्ला गाठला आहे.

(लेखक हे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे बुद्धिबळ प्रशिक्षक आणि द्रोणाचार्य पुरस्कारानं सन्मानित आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com