अजूनही गांधींवरच राग का?

gandhi and bhagatsingh
gandhi and bhagatsingh

भगतसिंग यांना फाशी देऊन आज जवळपास 90 वर्षांचा काळ उलटला. तरी आजही त्यांना देण्यात आलेल्या फाशीला कोणत्याही भारतीय पुढाऱ्याने विरोध का केला नाही, असा प्रश्न आजही अधूनमधून विचारला जात असतो. हा प्रश्न विचारणाऱ्यांचा रोख विशेषत: गांधींकडे असतो. महात्मा गांधी हे त्यावेळी देशातील सर्वोच्च नेते होते. इंग्रज अधिकाऱ्यांबरोबरच अनेक भारतीयांवरही त्यांचा प्रभाव होता. मात्र, समाजातील थोडे लोक असे होते जे गांधींना नेहमी कोणत्याही कारणासाठी  बदनाम करण्याचा प्रयत्न करत होते. मग त्यात फाळणीचा मुद्दा असो अथवा भगतसिंग यांना दिलेल्या फाशीबद्दलचा विषय असो. मात्र, इतिहासात डोकावून पाहिले तर वास्तव हे नसून भगतसिंग यांची फाशी रोखण्यात अगदी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केलेले  एकमेव नेते गांधीच होते.  

ब्रिटीश सरकारने 1928 साली सर जॉन सायमन यांच्या नेतृत्वाखाली एक कमिशन  नेमले होते. 'इंडियन स्टॅच्यूटरी कमिशन' ऊर्फ सायमन कमिशन हे  ब्रिटिश भारताच्या वसाहतीत घटनात्मक सुधारणा राबवण्याच्या दृष्टीने पूर्वाभ्यास करत होते.  यात सात ब्रिटिश संसदसदस्यांचा मिळून एक आयोग होता. आयोगाच्या भारतातील आगमनापासून त्याला लोकांच्या विरोधाला सामोरे जावे लागले होते. या आयोगात एकाही भारतीयाचा सामावेश नव्हता. यामुळे भारतातील सर्व पक्षांनी या आयोगावर बहिष्कार घातला होता. कमिशन जेथे-जेथे जाईल तेथे देशभर हरताळ पाळण्यात येऊन निषेधाच्या प्रचंड मिरवणुका निघत होत्या.  कमीशनला जातील तिथे 'सायमन गो बॅक'च्या  घोषणा ऐकाव्या लागत होत्या. 

सँडर्सचा खून आणि अटक
हे कमिशन 31 ऑक्टोबर 1928 मध्ये लाहोर येथे गेले होते. त्यावेळेस लाहोरवासियांनी लाला लजपतराय यांच्या नेतृत्वाखाली मोठे निदर्शन केले. त्यावेळी पोलिसांनी केलेल्या लाठीमारात लाला लजपतराय यांना मार लागल्याने काही दिवसांनी त्यांचे निधन झाले होते. त्यावेळेस लाठीचार्ज करण्याचा आदेश सँडर्स या पोलिस अधिकाऱ्याने दिला होता. लाठीमारामुळे झालेल्या लालाजींच्या मृत्यूमुळे देशभर संतापाची लाट पसरली होती. त्यामध्ये क्रांतीकारक भगतसिंग यांनाही या लाठीमाराबद्दल प्रचंड राग होता, यामुळे लालाजींच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या सँडर्सला यमसदनी धाडल्याशिवाय  स्वस्थ बसायचे नाही असं ठरवलं. भगतसिंगांना या कामात  चंद्रशेखर आझाद, सुखदेव व राजगुरू यांची साथ लाभली.  

17 डिसेंबर 1928 रोजी सँडर्स हा पोलीस ठाण्यातून बाहेर पडत असताना राजगुरू यांनी पुढे उडी मारून त्यांच्या मानेवर गोळी झाडली. त्यानंतर भगतसिंगही यांनी आणखी चार-पाच गोळ्या झाडून सँडर्सला यमसदनास धाडण्याचे काम पूर्ण केले. त्यानंतर भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर खटला भरवला.  खटल्याच्या अखेरीस भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आणि 23 मार्च 1931 रोजी त्यांना फाशी दिली.

गांधी-आयर्विन भेट...
'माझ्या अहिंसेच्या तत्त्वात चोर, दरोडेखोरच नाही तर खुन्यांनाही फाशी देणे बसत नाही. कोणालाही सुळावर चढविणे हे मला अजिबात पटत नाही. अशा पार्श्वभूमीवर, भगतसिंगांसारख्या वीर क्रांतीकारकाला फाशी देणे, ही कल्पनाच सहन होत नाही.' असं गांधीजी एका भाषणात म्हणाले होते. भगतसिंग व त्यांच्या सहकार्‍यांची फाशीच्या शिक्षेतून सुटका व्हावी म्हणून 19 मार्च रोजी गांधींनी दिल्लीत व्हाइसरॉय लॉर्ड आयर्विन यांची भेट घेतली. पण गांधींच्या प्रयत्नांचा उपयोग झाला नाही. परंतु गांधीजींच्या या मागणीची बातमी पंजाबच्या तत्कालीन गव्हर्नरना मिळाली. ही रदबदली कदाचित यशस्वी होईल, असे त्यांना वाटलं. त्यामुळे 24 मार्च हा फाशीचा दिवस ठरला असूनही, आदल्या दिवशीच त्यांना फाशी देण्याचं अघोरी कृत्य तत्कालिन पंजाबच्या गव्हर्नरने केले.

अगदी 23 मार्चला सकाळीच गांधींनी आयर्विन यांना पत्र देऊन भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांची फाशीची शिक्षा रद्द करण्याविषयी कळकळीचे आवाहन केले. पण त्याचा आयर्विनवर काहीही परिणाम झाला नाही आणि ते आपल्या निर्णयावर ठाम होते. गांधीजी कराचीच्या काँग्रेस अधिवेशनात 26 मार्च 1931 बोलताना म्हणाले होते की, 'मी व्हाइसरॉयना समजावण्याचा खूप प्रयत्न केला. माझी बाजू परिणामकारकपणे मांडण्याची मी शिकस्त केली होती. भगतसिंगांच्या नातेवाईकांबरोबर माझी शेवटची मुलाखत 23 मार्चला ठरली होती. त्या दिवशी व्हाइसरॉयना लिहिलेल्या पत्रात मी माझे अंतःकरण ओतले होते.'  या तीन देशभक्तांना वाचविण्यासाठी आपण कसे प्रयत्न केले हे गांधींनी भाषणात विशद केले होते. आपण ज्या वाटाघाटी व बोलणी केली, त्यामुळे भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांचे प्राण वाचतील, अशी आपल्याला आशाही त्यांना वाटू लागली होती अशी माहितीही दिली. 

नेहरू म्हणतात..
भगतसिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांची फाशीची शिक्षा टाळण्यासाठी गांधीजींनी कसे प्रयत्न केले यावर जवाहरलाल नेहरुंनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहलं आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, 'भगतसिंगांची फाशी रद्द व्हावी म्हणून गांधींनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती, पण सरकारने आपला हट्ट सोडला नाही. गांधी- आयर्विन कराराशी वस्तुतः या प्रयत्नांचा संबंध नव्हता. परंतु या प्रश्नाबद्दल देशात किती प्रखर भावना आहेत, हे लक्षात घेऊन गांधींनी त्यासंबंधी स्वतंत्रपणे प्रयत्न केले, पण त्याचा काही उपयोग झाला नाही.'
भगतसिंगांना नको होती शिक्षेत सूट

भगतसिंगांनी आपली अटक ही विचारपूर्वक करवून घेतली होती. अटक झाल्यानंतर इंग्रज सरकार आपल्याला फाशी देणार याची त्यांना खात्री होतीच. मात्र आपल्या मरणाने अनेक तरुणांच्या मनात स्वातंत्र्यासाठी आणि क्रांतीसाठी स्फूरण निर्माण होईल, हा विचार करुनच त्यांनी अटकेचा निर्णय घेतला होता. त्यांना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर भगतसिंगाच्या कुंटुंबियांनी शिक्षेत सुट मिळावी, अशी विनंती केल्याचे समजल्यावर भगतसिंहांना ते बिलकूल आवडले नव्हते. त्यांनी आपली नाराजी स्पष्ट कळवली देखील होती. आपली फाशी टळावी, असं ज्या भगतसिंगांनाच वाटत होतं, त्यांना पुढे करुन गांधींवर निरर्थक आरोप करणे, इतिहासाशी न्यायोचित होणार नाही. 

भगतसिंगच नव्हे तर सावकरांच्या सुटकेसाठीही गांधीचे प्रयत्न
गांधी आणि सावरकर यांचे वैचारिक मतभेद अखेरच्या काळात वाढत गेले. सावरकरांना 13 मार्च 1910 रोजी राजद्रोहाच्या आरोपाखाली अटक करुन त्यांना अंदमानला काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली होती. मात्र, सावरकरांची सुटका करा, म्हणून 1917 मध्ये मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीमध्ये गांधीनी स्वतः ठराव मांडला होता. त्यानंतर 1919मध्ये काकीनाडाला अखिल भारतीय काँग्रेस समितीची सभा भरली होती, त्यातही गांधीनी असाच ठराव मांडला होता.
                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                           
  संदर्भ : 
1. महात्मा - डी. जी. तेंडूलकर
2. शहिद - कुलदिप नय्यर 
3. गांधीजी आणि त्यांचे टिकाकार - सुरेश द्वादशीवार 
4. लोकमान्य ते महात्मा - सदानंद मोरे - राजहंस प्रकाशन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com