esakal | गांधी आणि सावरकर : विरोधी प्रवृत्तींचं चिरंतन द्वंद्व...
sakal

बोलून बातमी शोधा

Gandhi & Sawarkar

गांधीचा खून सावरकरांच्या शिष्यानेच केला आणि या खुनाच्या आरोपात सावरकरांचेही नाव आले होते.

गांधी आणि सावरकर : विरोधी प्रवृत्तींचं चिरंतन द्वंद्व...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

महात्मा गांधी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर या दोघांचेही विचार एकमेकांच्या विचारांच्या अगदी परस्परविरोधी होते, हे आपल्याला माहीत असेलच. गांधींनी आयुष्यभर सत्य आणि अहिंसेचा जयघोष केला तर सावरकर हे आयुष्यभर अतिजहाल क्रांतीचे समर्थन करत राहिले. गांधी आणि सावरकर यांचे एकूण राजकारण हे परस्परविरोधी राहिलेलं असलं तरीही त्यांच्या या टोकाच्या भूमिकेमुळेच त्या दोघांचेही आपापले एक वेगळे अस्तित्व दिसून येते.

गांधी आणि सावरकर पहिली भेट...

गांधी आणि सावरकर 1909 साली लंडनमधल्या इंडिया हाऊसमध्ये पहिल्यांदा आमनेसामने आले होते. गांधी दक्षिण आफ्रिकेतल्या आपल्या वर्णद्वेषाविरोधातील लढ्यासंदर्भात लंडनला आले होते. इंडिया हाऊसमध्ये आयोजित केलेल्या विजयादशमीच्या दिवशीच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष गांधी होते. त्यावेळी सावरकर आणि गांधी दोघांनीही भाषण केलं. दोघांनीही आपापल्या कल्पनेतला आणि त्यांना पटलेला 'राम' मांडला होता. सावरकरांनी रामाच्या ‘आक्रमक’ असण्याचा मुद्दा अधोरेखित केला तर अध्यक्षीय भाषणात गांधीनी ‘प्रजाहितदक्ष’ रामाची मांडणी केली. तेंव्हाच या दोन्ही व्यक्ती या राजकीय क्षितिजावरचे दोन विरोधी ध्रुव आहेत, हे इतिहासाला माहीत झालं होतं. 

हेही वाचा - 1948 पूर्वी गांधी हत्येचे झाले पाच प्रयत्न! कागदोपत्री आहे नोंद​
गांधींकडे देशाचे नेतृत्व आणि सावरकरांना काळ्या पाण्याची शिक्षा 

या नंतर सावरकरांना जॅक्सन खून खटला, देशद्रोह अशा आरोपांखाली अटक झाली. सावरकर अंदमानच्या कोठडीतून सुटले ते ६ जानेवारी १९२४ साली. त्यांनी इंग्रजांना विनंती करून आपली सुटका करून घेतली. मात्र त्यांची अंदमानातून सुटका झाल्यावरही त्यांना रत्नागिरीला स्थानबद्ध करण्यात आलं होतं. या काळात ते राजकीय चळवळ ते करू शकत नव्हते. १० मे १९३७ साली पूर्ण मुक्तता झाल्यावर त्यांनी हिंदू महासभेचे नेतृत्व स्वीकारले. दुसऱ्या बाजूला गांधी १९१५ साली दक्षिण आफ्रिकेतील यशस्वी लढ्याचं वलय घेऊन भारतात आले. टिळकांच्या मृत्यूनंतर १९२० साली गांधी देशाचे नेते झाले. त्यानंतर त्यांनी असहकार आंदोलन, सविनय कायदेभंग आणि चले जाव अशी मोठी आणि निर्णायक आंदोलने केली.

हेही वाचा - भारतीय नोटेवर गांधीजींचा फोटो का? जाणून घ्या​


गांधीहत्येतले आरोपी सावरकर...

गांधीहत्या हे कृत्य आपण एकट्यानेच पार पाडल्याचे नथुरामने न्यायालयातील आपल्या वक्तव्यात किती जरी ठामपणे सांगितलं असलं तरी न्यायालयाने सिद्ध केलेल्या कटानुसार ही खुनी टोळी होती. या कटातील आरोपी होते नथुराम गोडसे, नारायण आपटे, मदनलाल पहावा, गोपाळ गोडसे, विष्णू करकरे, दिगंबर बडगे, दत्तात्रय परचुरे, शंकर किस्तय्या आणि विनायक सावरकर. यातील दिगंबर बडगे हा माफीचा साक्षीदार बनला तर विनायक सावरकर यांच्याविरोधात जाणारा कसलाही ठोस पुरावा न्यायलयाला मिळाला नसल्याने त्यांची निर्दोष मुक्तता झाली. मात्र, गांधींचा खून करणारा नथुराम हा सावरकरांचा अनुयायी होता.

गांधी आणि सावरकर : द्वंद्व अधोरेखित करणाऱ्या काही बाबी 

१. पहिल्या जाहीर कार्यक्रमात दोघांनीही आपापल्या रामाची मांडणी केली. गांधी स्वतःला सनातनी हिंदू म्हणवून घेत सतत रामनाम जपायचे. त्यांना मारणारा हिंदू धर्माभिमानी नथुराम हादेखील सावरकरांचा शिष्य होता, असं त्यांच्या भावाने म्हणजेच गोपाळ गोडसे यांनी आपल्या 'गांधीहत्या आणि मी' या पुस्तकात म्हटलं आहे. 

२. आयुष्यभर क्रांतीची भाषा सांगणाऱ्या सावरकरांचा मृत्यू हा आत्मर्पण (अन्न-पाणी त्याग) करून झाला. तर आयुष्यभर उपोषणासारख्या स्वपीडा देणाऱ्या मार्गाचा सतत शस्त्र म्हणून उपयोग करणाऱ्या गांधींचा मृत्यू रक्त सांडून झाला.

३. हा खून सावरकरांच्या शिष्यानेच केला आणि गांधींनी मरताना 'हे राम' शब्द उच्चारले होते. या खुनाच्या आरोपात सावरकरांचेही नाव आले. मात्र त्यांचा सहभाग सिद्ध होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.


संदर्भ : 
1. लोकमान्य ते महात्मा - सदानंद मोरे - राजहंस प्रकाशन
2. गांधीजी आणि त्यांचे टिकाकार - सुरेश द्वादशीवार - साधना प्रकाशन
3. नथुरामायण - य. दि. फडके - अक्षर प्रकाशन
4. लेट्स किल गांधी - तुषार गांधी - मेहता पब्लिशिंग हाऊस
5. ओह माय गोडसे - विनायक होगाडे - विश्वकर्मा प्रकाशन
6. गांधीहत्या आणि मी - गोपाळ गोडसे - रिया पब्लिकेशन