‘संवादां ’ तील वादाच्या पलीकडे...

भारतीयांच्या मनावर ‘रामायण’, ‘महाभारत’ या महाकाव्यांचा मोठा पगडा आहे आणि त्याबाबतीत कुठलीही चूक झाल्यास ती त्यांना सहन होत नाही.
adipurush movie
adipurush moviesakal

भारतीयांच्या मनावर ‘रामायण’, ‘महाभारत’ या महाकाव्यांचा मोठा पगडा आहे आणि त्याबाबतीत कुठलीही चूक झाल्यास ती त्यांना सहन होत नाही. त्यात रामानंद सागर यांनी ‘रामायण’ आणि बी. आर. चोप्रा यांनी ‘महाभारत’ या दूरचित्रवाणी मालिकांतून भारतीयांच्या मनातील राम, लक्ष्मण, सीता, रावण यांपासून भगवान श्रीकृष्ण, अर्जुन, पितामह भीष्म यांच्या प्रतिमा दृढ करून ठेवल्या आहेत.

अत्यंत मृदू चेहऱ्याचे, चेहऱ्यावर एकच स्मितहास्य ठेवत शिष्यांच्या स्तुतीपासून दूर राहणारे, रावणाशी युद्ध करणारे मर्यादा पुरुषोत्तम राम लोकांना प्रिय आहेत. श्रीकृष्णाच्या बाबतीतही हीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. ‘रामायण’ या मालिकेतील संवादही तुम्ही आठवून पाहा.

एखाद्या शिष्याने रामाला, ‘प्रभू आप महान है...’ असं म्हटल्यानंतर राम, ‘आपने मुझे महान कहा यह आपकी महानता है...’ असं उत्तर द्यायचे... त्यामुळे एका पिढीला, म्हणजे जे सध्या तिशी-चाळिशीच्या पुढं आहेत अशा भारतीयांना, रामायण घडलं ते असंच होतं आणि त्यातील प्रत्येक पात्राची देहबोली आणि भाषा अशीच असावी असं वाटतं.

रामायण आणि महाभारताचं हेच गेल्या काही पिढ्यांचं इंटरप्रिटेशन होतं आणि त्याला ओम राऊतच्या ‘आदिपुरुष’ या चित्रपटातून धक्का पोचल्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटणं साहजिकच होतं.

ओम राऊत हा तरुण दिग्दर्शक. ‘लोकमान्य’ या मराठी चित्रपटातून त्यानं लोकमान्य टिळकांचा जीवनपट सादर केला होता. इतिहासातील व्यक्तिरेखांची ओळख नव्या पिढीला करून देण्याचा सातत्यानं प्रयत्न करणाऱ्या ओमनं ‘तानाजी’ या चित्रपटातून तानाजी मालुसरे या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सरदाराचं आयुष्य भव्य-दिव्य पद्धतीनं उभं केलं.

या चित्रपटात वापरलेल्या ‘व्हीएफएक्स’ तंत्रज्ञानाची मोठी चर्चा झाली होती. एका हिरव्या रंगाच्या पडद्याच्या समोर उभं राहून मोठाल्या डोंगरदऱ्यांचा आभास निर्माण करीत दाखवलेले युद्धाचे प्रसंग प्रेक्षकांना अचंबित करतात. असं तंत्रज्ञान वापरून कोणत्याही भव्य विषयावर चित्रपट बनवणं सोपं, सहजसाध्य आहे.

‘तानाजी’मध्ये उदयभानसिंग राठोडची भूमिका साकारणाऱ्या सैफ अली खाननं या चित्रपटातील कामाबद्दल प्रतिक्रिया देताना, ‘अशा प्रकारचं तांत्रिक काम करणं फारच कंटाळवाणं ठरतं,’ अशा आशयाची प्रतिक्रिया दिली होती. अर्थात, ‘आदिपुरुष’मध्ये त्यानं रावणाची भूमिका साकारलीच. असो.

तर, ‘आदिपुरुष’ची प्रेरणा ओम राऊतनं १९९२मध्ये प्रदर्शित जपानी चित्रपट ‘रामायण - द लिजंड ऑफ प्रिन्स राम’पासून घेतली. अर्थात, ऐंशीच्या दशकातील रामानंद सागर यांचं ‘रामायण’ आणि या जपानी चित्रपटानंतरच्या काळात चित्रपट निर्मितीच्या तंत्रज्ञानात खूप क्रांतिकारी बदल झाले आहेत. ‘लोकमान्य’ आणि ‘तानाजी’च्या अनुभवाच्या जोरावर ओमनं २०२० मध्ये या ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या, रामायणावर आधारित ‘आदिपुरुष’ची घोषणा केली.

ओमचं दिग्दर्शन, मनोज मुन्तशीर यांची कथा आणि अजय-अतुल यांचं संगीत, त्याच्या जोडीला ‘रामा’च्या भूमिकेत ‘बाहुबली’ फेम अभिनेता प्रभास, क्रिती सेनन ‘सीते’च्या, तर सैफ अली खान ‘रावणा’च्या भूमिकेत अशी स्टारकास्ट नक्की झाली. चित्रपटाचे टिझर आणि ट्रेलर सोशल मीडियावर तुफान गाजले. अर्थात, त्यामागं प्रभासच्या करिष्म्याबरोबरच ‘रामा’बद्दल देशवासीयांचं प्रेमही कारणीभूत असावं.

चित्रपटाचा ‘थ्री-डी’मधील ट्रेलर मोठ्या पडद्यावर पाहिल्यावर या चित्रपटातून काही भव्य-दिव्य समोर येणार याची खात्री पटत होती. भारतीयांबरोबरच सर्वच जगाला भुरळ घालणारी रामाची कथा, हाताशी अद्ययावत तंत्रज्ञान, नावाजलेले कलाकार असताना दिग्दर्शक कथेचं सादरीकरण कसं करतो, हेच महत्त्वाचं होतं.

रामानंद सागर यांच्या रामायणातील सेट (आजच्या तुलनेत) फार भव्य नव्हते व युद्धाच्या प्रसंगातील मॉब सीन आजसारखं तंत्रज्ञान उपलब्ध नसल्यानं पुरेसे परिणामकारक ठरले नव्हते. युद्धाच्या प्रसंगांतील बाण एकमेकांवर आदळून, काही क्षण वेल्डिंगसारखा जाळ काढीत लुप्त होत. मात्र, हे सर्व श्रीरामाची प्रेरणादायी कथा, तिचं सादरीकरण आणि कलाकारांच्या अभिनयामुळे प्रेक्षकांनी आनंदानं स्वीकारलं होतं.

लोकांच्या मनावर शतकानुशतकं राज्य करणाऱ्या रामायणासारख्या कथेवर चित्रपट काढताना कथेशी प्रामाणिक राहणं गरजेचं होतं. या बाबतीत चित्रपटाचे कथाकार व संवाद लेखक मनोज मुन्तशीर यांनी अनेक घोळ घातले. त्यांनी सुरुवातीला ‘आमची कथा हुबेहूब रामायण आहे, त्यात आम्ही काहीही फेरफार केले नाहीत,’ असं स्पष्ट केलं.

मात्र, प्रोमोज पाहून प्रतिक्रिया यायला लागताच त्यांनी आपलं वक्तव्य बदलून ‘आम्ही रामायणापासून केवळ प्रेरणा घेऊन ही कथा लिहिली आहे, तिचा रामायणाशी काहीही संबंध नाही,’ असंही सांगून टाकलं. यातील पात्रांची नावंही थेट राम, सीता, लक्ष्मण, हनुमान, रावण अशी न ठेवता राघव, जानकी, शेष, बजरंग, लंकेश अशी घेतली गेली.

खरंतर, रामायणासारखी भव्य कथा तीन तासांच्या वेळेत सांगणं केवळ अशक्य आहे, त्यासाठी मोठी मालिका किंवा वेबसीरीज हाच पर्याय असू शकतो. मात्र, लेखक-दिग्दर्शकानं ती चित्रपटाच्या मर्यादेत बसवण्याचा प्रयत्न केला आणि याचा सर्वाधिक फटका त्यांना बसला. अनेक प्रसंग केवळ रामचरित्रात महत्त्वाचे होते, म्हणून येऊन गेल्यासारखे वाटतात.

चित्रपटाच्या सुरुवातीलाच ‘रामायण’ हे महाकाव्य अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारे सांगितलं आहे आणि आमचाही असाच प्रयत्न आहे, याचा थेट रामायणाशी संबंध नाही, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. राम वनवासात आहेत आणि रावणाला शूर्पणखाकडून जानकीबद्दल समजतं.

जानकीला आवडलेल्या मायावी सुवर्णमृगाच्या मागं राघवाला पाठवत रावण साधूचं रूप घेऊन जानकीचं अपहरण करतो. (हे अपहरण व जटायूच्या संघर्षाचा प्रसंग थरारक करण्यासाठी दिग्दर्शकाला शंभर टक्के गुण.) मात्र, बजरंगाचा प्रवेश व त्याच्या तोंडचे संवाद यांपासून चित्रपट वाहवत जातो.

कथेत थोडा विनोद आणण्यासाठी बजरंगाच्या तोंडचे संवाद हलके-फुलके घेतले आहेत. केवळ हे तीन-चार संवाद सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं अनेकांनी चित्रपटावर टीका आणि बंदीची भाषा सुरू केली.

चित्रपटातील काही संवाद खटकतातही. ‘सत्य परेशान हो सकता हे, पराजित नहीं,’ हे वाक्य आपण एका ज्येष्ठ नेत्याच्या तोंडी संसदेतील भाषणात ऐकलं आहे, ते इथं रामाच्या तोंडी आहे. समुद्रदेवता रामाला प्रसन्न होऊन ‘तुझं नाव घेऊन दगड पाण्यात टाकल्यास ते तरंगतील,’ असं सांगते.

सिनेमात रामाचं नाव राघव असल्यानं दगडांवर ‘श्रीराघव’ हवं होतं, तिथं ‘श्रीराम’च लिहिलंय. या चुका ढोबळ आणि सहज लक्षात येतील अशा आहेत, मात्र त्या नक्कीच (मर्यादा पुरुषोत्तम रामाच्या आदर्श व्यक्तीच्या व्याख्येत ‘क्षमा’ असल्यानं) माफ करता येण्यासारख्या आहेत.

चित्रपटावर शेलक्या भाषेत टीका करणाऱ्यांनी आधी संपूर्ण चित्रपट पाहून आपलं मत मांडावं, हेच योग्य वाद चित्रणाचा चित्रपटाची कथा ‘लॉर्ड ऑफ द रिंग्ज’, ‘हॅरी पॉटर’, ‘ॲव्हेंजर्स’ या प्रकारच्या फॅन्टसी चित्रपटाच्या अंगानं सादर करण्यात आली आहे. इथं रावणानं पाळलेला उडणारा महाकाय पक्षी त्याच्या महालाच्या ‘हेलिपॅड’वर उतरतो आणि तिथं चक्क ‘फ्लुरोसंट’ पट्ट्याही लावलेल्या दिसतात!

रावणाच्या महालाच्या बाजूला टोलेजंग इमारती दिसतात, त्यानं विकसित केलेली महाकाय आयुधं एकविसाव्या शतकाला लाजवतील इतक्या सफाईदारपणे काम करतात. हे सर्व ऐंशी-नव्वदच्या दशकातील प्रेक्षकांना पटत नसलं, तरी वर उल्लेख केलेल्या चित्रपट मालिका पाहिलेल्या आजच्या प्रेक्षकांना यात काहीही वावगं वाटणार नाही.

चित्रपटाच्या शेवटी एक तास चालणारं राघव व रावणाचं युद्ध तंत्रज्ञानाची कमालच आहे. ‘बाहुबली’ चित्रपटाप्रमाणे अतिभव्य, घनघोर युद्ध दाखवत दिग्दर्शक आजच्या पिढीला खिळवून ठेवण्यात नक्कीच यशस्वी ठरतो. यात रावणाची उंची, त्याची चालण्याची पद्धत, केसांचा ‘स्पाइक’, ‘साइड कट’ आणि टी-शर्ट नक्कीच खटकू शकतात; मात्र त्याच्या दहा डोक्यांचा अत्यंत योग्य अर्थ सांगण्यात आला आहे.

रावण एकाच गोष्टीचा दहा विविध प्रकारे विचार करून कृती करायचा, म्हणूनच तो खूप विचार करताना सर्व डोकी अवतरतात. ही डोकी एका सरळ रेषेत नाहीत, तर पाच पुढं आणि पाच मागं आहेत.

रावणाची ही काही सेकंदांची क्लिप पाहताना हे खटकतं, मात्र संपूर्ण चित्रपट पाहताना नाही. लेखक-दिग्दर्शकाला रावण अत्यंत क्रूर आणि बलशाली रंगवायचा आहे व त्यासाठी रावण अजगरांकडून मसाज करून घेतो, असा कल्पनाविलास केला गेला.

हे स्वातंत्र्य या दोघांना द्यायला काही हरकत नसावी. अर्थात, आपण देवाचं स्थान दिलेला राम (इथं राघव) रावणाशी द्वंद्व युद्ध करताना अनेक वार सहन करतो, हे पाहताना काही तरी चुकतंय असं वाटतंच, मात्र राघवच्या विजयाचा प्रसंग छान चितारण्यात आल्यानं हा दोष दूर होतो.

वादाच्या पुढे...

चित्रपट समीक्षक ‘आदिपुरुष’ची कथा, मांडणी, परिणाम याआधारे चर्चा करतील, त्यातील त्रुटी दाखवून देतील, देत आहेत. इतिहास व पुराणाचे अभ्यासक त्यातील संदर्भाच्या चुकाही अधोरेखित करतील. मात्र, एखाद्या निर्माता-दिग्दर्शकाला आपल्या मनातील रामायण प्रेक्षकांसमोर सादर करावंसं वाटल्यास त्याला पायबंद घालणं योग्य नाही.

हे रामायण पाहायचं की नाही, हा अधिकार प्रेक्षकांना नक्कीच आहे. मात्र, दूरचित्रवाणीवरील रामायणानंतर ३० ते ३५ वर्षांनंतर आजच्या पिढीला रामायणातील कथा सांगण्याच्या प्रयत्नाला बजरंगाच्या तोंडी असलेल्या दोन संवादांमुळं थेट नाकारणं, त्याच्यावर बंदीची भाषा करणं कलाविष्कारावरील हल्ला ठरतं.

रामायण संस्कृतसह विविध प्रादेशिक भाषांत लिहिलं गेलं आहे आणि प्रत्येक कथेत तेथील संस्कृतीनुसार काही वेगळेपण आहे. त्याचबरोबर वाचन व श्रवणाव्यतिरिक्त ते ‘रामलीलां’सारख्या माध्यमांतून दृश्य स्वरूपातही सादर झालं आहे.

हनुमानानं आपल्या शेपटीला लावलेल्या आगीतून लंकेचं दहन केलं याची नोंद प्रत्येक कथेत आहे, फक्त हे दाखवताना बजरंगबली शत्रूंवर नक्की कोणत्या भाषेत बरसले असतील, याचा विचार करण्याचा हक्क लेखकाला नक्कीच आहे. त्यात चूक झाली असल्यास ती दुरुस्त केली जाऊ शकते, केलीही आहे.

मात्र, तेवढ्यासाठी संपूर्ण चित्रपटच नाकारल्यास नव्या पिढीला नव्या पद्धतीच्या सादरीकरणातून रामाचं चरित्र, त्याचा त्याग, लढाऊ बाणा, सीतेचं विपरीत परिस्थितीत रामाला साथ देणं, लक्ष्मणाचं बंधुप्रेम, हनुमानाची रामावरील भक्ती अशा अनेक गोष्टी सांगणार कशा? एखादी कलाकृती फसते, टाकाऊही ठरू शकते, मात्र ती सादर करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवरचे हल्ले भविष्यातील नवनिर्मितीला बाधक ठरू शकतात, हे टाळायला हवं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com