

Why Chambal for a Marathi Film
esakal
डॉ. मिलिंद शिंदे - saptrang@esakal.com
या सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान अनेक माणसे, व्यक्तिमत्त्व, नमुने पाहायला मिळाले. पुढे त्यातले काही वापरलेही... हे सगळं नेपथ्य कामाला येतंय. काहीतरी मांडणी करण्यासाठी. चित्रीकरण संपवून पुन्हा मुंबईला, महाराष्ट्रात यायला निघालो त्याच चंबळच्या पुलावरून गाडी निघाली, हा पूल १८७० मध्ये पोलिसांनी बांधलेला दक्षिणोत्तर जोडणारा...
चंबळ? ते खोरं...? इतक्या लांब का...? समीर पाटील नावाचा एक नवा दिग्दर्शक एक सिनेमा दिग्दर्शित करत होता आणि त्याच्या सिनेमासाठी त्याला चंबल अर्थात मराठीत चंबळ आणि त्याच्या आसपासचा परिसर त्याच्या सिनेमाची पृष्ठभूमी म्हणून योग्य वाटला आणि आपण तिकडं शूटिंग करतोय म्हटल्यावर मला पडलेले वरील प्रश्न...
मराठी सिनेमा फारतर तर पुणे, सातारा, कोल्हापूर, औरंगाबाद किंवा नागपूर यापलीकडे फारसा चित्रित केला जात नाही. समीरला त्याचा सिनेमा मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या सीमांना लागून असलेल्या चंबळच्या खोऱ्यात चित्रित करायचा होता.
‘‘इतकं काय आहे समीर...?’’
‘‘सर, क्राइम स्टोरी आहे. पोलिस क्राइम स्टोरी आहे. कॅनव्हास मराठीच आहे. पण लोकेशन म्हणून मला चंबळ खुणावतं आहे... ’’