संलीभयांचि - एक महानाट्य 

पद्मावती
पद्मावती

'पद्मावती'च्या निमित्ताने सुरू असलेला गोंधळ पहाता आपल्याला चित्रपटाकडे कला म्हणून बघता येतं की नाही असा संशय येतो. या निमित्ताने पुन्हा एकदा महानाट्याचा प्रयोग सुरू आहे. 

भारतात दर दोन वर्षांनी 'संजय लीला भन्साळी यांचा चित्रपट' हे एक उत्स्फूर्त महानाट्य ('संलीभयांचि') सादर होते. पडदा हळूहळू वर जातो आणि अंधारात हे नवे नाटक येते आहे, अशी जाहिरात सुरू होते. कुणाचा तरी नवा 'लुक' यावर कौतुकाचा वर्षाव सुरू होतो. मग उजव्या विंगेतून इतिहासाची तोडमोड अशी कुजबुज सुरू होते; तर डाव्या विंगेतून अभिव्यक्ती स्वातंत्र्य याविषयीची चर्चा प्रेक्षकांना ऐकू येते. अजून स्टेजवर मात्र कुणी कलाकार दिसत नाही. फक्त कुजबूज! हळूहळू रंगमंचावर प्रकाश येऊ लागतो आणि चित्रपटाचा ट्रेलर दिसू लागतो. अचानक डाव्या-उजव्या विंगेमधून सर्व पात्रे एकदमच रंगमंचावर अवतीर्ण होतात.

या कलाकारांना एन्ट्रीबिन्ट्रीच्या सूचना नसतात. कारण या नाटकाला एक असा कुणी दिग्दर्शक नाही. आपल्या मनाने हवे तसे पुढे न्यायचे हे एक 'डंडार' आहे! पात्रे आपापल्या परीने संवाद सुरू करतात आणि प्रेक्षक आपल्याला सोयीचे तेवढेच संवाद ऐकून त्याला दाद देतात! हे नाटक रंगतंय, असं लक्षात आलं की आणखी नवे नवे स्वयंघोषित नटसम्राट रंगमंचावर एन्ट्री घेतात आणि प्रेक्षकांमधून जल्लोष होतो. या नाटकाचा क्‍लायमॅक्‍स भन्साली यांच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाने होतो. तो दोन दिवसांत सुपरहिट होतो. प्रेक्षकांकडून त्यालाही दाद मिळवण्यात येते. (तसंही सध्या 'दाद' ही गोष्ट उत्स्फूर्तपणे देण्याची नसून 'यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत', अशी भिकेसारखी मागण्याची झालेली आहेच.) ज्या हातांनी सोशल नेटवर्किंगवर चिखल उडवला तेच हात चित्रपटाच्या भव्यतेच्या आरत्या ओवाळू लागतात. वर्षाअखेरीस सर्व महत्त्वाचे पुरस्कार त्यालाच मिळतात. आणि दिग्दर्शक महोदय नव्या उत्साहाने नव्या चित्रपटाच्या तयारीला लागतात. 

'देवदास' आणि 'बाजीराव मस्तानी'च्या प्रदर्शनाच्या वेळी या महानाट्याचा प्रयोग आपण पाहिला होता. आता 'पद्मावती'हा नवा चित्रपट प्रदर्शित होताना त्याच महानाट्याचा प्रयोग सध्या भारताच्या रंगमंचावर सुरू आहे. 'पद्मावती'च्या निमित्ताने सुरू असलेला गोंधळ पहाता आपल्याला चित्रपटाकडे कला म्हणून बघता येतं की नाही असा संशय येतो. चित्रपट म्हणजे इतिहास नव्हे. पण ऐतिहासिक चित्रपट सादर करताना इतिहासात जे घडलेच नाही ते दाखवणे म्हणजे कला नव्हे. आणि ऐतिहासिकच कशाला, आजकाल चरित्रपटांचे जे उदंड पीक आलेले आहे त्याविषयीसुद्धा हेच म्हणता येईल. एखाद्या व्यक्तीवर आपण चित्रपट काढतो आहोत, तर चित्रपटातला कलाकार किमान त्या व्यक्तीसारखा दिसायला हवा, वागायला- बोलायला हवा एवढी साधी गोष्ट जिथे पाळली जात नाही तिथे अधिक काय बोलायचे? जिवंत व्यक्तीवरच्या चित्रपटातला कलाकार जिथे त्या व्यक्तीसारखा दिसावा, याची काळजी घेतली जात नाही तिथे शे-दोनशे वर्षांपूर्वीच्या पात्राविषयी आनंदीआनंदच असतो. आणि तसंही प्रेक्षकांना खरी पद्मावती किंवा मस्तानी कशी दिसत असेल हे बघण्यात रस नसतो तर त्यांना त्यांच्या लाडक्‍या दीपिकाला मस्तानी किंवा पद्मावतीच्या भूमिकेत बघायचे असते. मग सिनेमात मस्तानी, काशीबाई किंवा पद्मावती चारचौघांपुढे नाचल्या तरी त्यांना चालतं. नृत्यशिवाय जगात कुणाला काही व्यक्तच होता येत नाही का, हा प्रश्न संजय लीला भन्सालीला विचारणारे आपण कोण बापडे? शिवाय विचारला तर गल्लीतली नृत्यांगनासुद्धा 'नृत्याचा अपमान' असं म्हणत रागावून अंगावर येते. दुष्मनची 'वाट लावली' असं म्हणत जर बाजीराव पेशवे नाचणार असतील आणि प्रेक्षकांना ते आवडणार असेल तर मग चित्रपट, त्यातली पात्रं, त्यांची भाषा, त्यांची देहबोली यांचा एकमेकांशी काही तार्किक संबंध असतो हे म्हणणारे मूठभर लोक महामूर्खच ठरतात. ते असो. पण हा विषय आहे तो समीक्षेच्या अंगणातला. सर्वसामान्य रसिकही आपापल्या परीने ती करतील किंवा चित्रपट डोक्‍यावरही घेतील; पण चित्रपटाच्या प्रदर्शनास बंदीची मागणी घेऊन रस्त्यावर जेव्हा झुंडी उतरविणे हा प्रकार भीषण आहे आणि मग कलेच्या प्रांतात चबढब करण्याची आयती संधी सत्तेत बसलेले तरी कशाला सोडतील? सध्या आपल्याकडे चालू आहे ते हेच. 

या सगळ्या पार्श्वभूमीवर जर भाषिक, प्रांतिक, जातीय आणि अशाच काही आणखी 'ईय' अस्मिता लक्षात घेतल्या तर 'संजय लीला भन्साली यांचा चित्रपट' हे द्विवार्षिक महानाट्य आणखीनच रंगते! काही वर्षांपूर्वी बोलणारे लोक कमी होते. चर्चा आपापल्या कट्ट्यावर होत असत. पण समाज माध्यमांमुळे आता सगळेच बोलणारे झाले आहेत. ऐकणारे फार कमी. कारण प्रत्येकालाच बोलण्याची घाई आहे. त्यामुळे या नाटकात अनेकदा रंगमंचावरचे कलाकार कोण आणि नाट्यगृहातले प्रेक्षक कोण हेच कळत नाही. 'डंडार' या झाडीपट्टीतल्या नाट्यप्रकारात नाटक सुरू असतानाच प्रेक्षक त्या नाटकात सहभागी होऊ शकतो, अशी परंपरा आहे. त्यामुळे प्रेक्षक आणि पात्रं यांच्यामधलं अंतर कमी होतं. ज्यांनी 'डंडार' अनुभवलं नाही, त्यांनी 'संलीभयांचि' या महानाट्याचा लाभ घ्यावा! 

हे द्विवार्षिक महानाट्य जर नको असेल तर एक उपाय करून पहाण्यासारखा आहे. यापुढचा या दिग्दर्शक महोदयांचा जो कुठला चित्रपट असेल तो त्यांना करू द्यावा. त्याच्या सेट्‌सची चर्चा करू नये. भुवया जोडलेल्या आहेत, तोडलेल्या आहेत की भुवयाच नाहीत, हा जीवनमरणाचा प्रश्न करू नये. सर्व पात्रांना हवं तसं नृत्य करू द्यावं. काही काळापुरत्या सर्वांनी आपापल्या अस्मिता बाजूला ठेवाव्यात. माध्यमांनी यापासून दूर रहावं. (पैसे घेऊन चर्चा करणाऱ्या माध्यमांकडे प्रेक्षकांनी दुर्लक्ष करावं.) चित्रपटात दम नसेल तर तो आपटेल आणि असेल तर तो चालेल. आहे तयारी? 
असं होऊ शकत नाही. कारण अशा गोष्टीला मुळात आपलीच तयारी नाही. आणि हेच तर 'संलीभयांचि' या महानाट्याच्या यशाचं गमक आहे. 
(लेखक चित्रपट दिग्दर्शक आहेत.) 

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com