स्वप्रतिमेचे कैदी (डाॅ. केशव साठ्ये)

डाॅ. केशव साठ्ये
रविवार, 16 जुलै 2017

नागपूरमधल्या वेणा तलावात गेल्या आठवड्यात आठ तरुणांचा मृत्यू झाला. हे तरुण ‘फेसबुक लाइव्ह’ करणं आणि सेल्फी काढणं यांच्यात मग्न होते. त्यातून घडलेल्या अपघातानं बघताबघता ही तरुणाई काळाच्या पडद्याआड गेली. अशा अनेक घटना हल्ली घडत आहेत. समाजमाध्यमांचा एकीकडं सकारात्मक उपयोग होत असतानाच दुसरीकडं त्यांच्या अतिरेकाची बळी ठरणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. काय आहे नेमकं हे ‘सेल्फी’ प्रकरण? समाजमाध्यमांचा वापर कशा प्रकारे करायला हवा? त्यांच्यात कशामुळं इतकं गुंतलं जातं आणि तो अतिरेक कुठपर्यंत जाऊ शकतो? या अतिरेकाला पायबंद कशा प्रकारे घालता येईल?....या सर्व प्रश्‍नांचं विविध अंगांनी विश्‍लेषण.

क्षणिक आनंदाची जीवघेणी किंमत काय असते, याची गंभीर जाणीव आपल्याला होत नाही, तोपर्यंत या सेल्फीच्या माध्यमातून जगभर घडणाऱ्या या ‘आत्म’हत्या कशा थांबवणार, हा जटिल प्रश्न कायम राहील. हे सेल्फीचं जगभर घोंघावणारं वादळ कसं शमवायचं, हा प्रश्न आता समाजशास्त्रज्ञांनी, सरकारी यंत्रणांनी, सामाजिक संस्थांनी अग्रक्रमानं हाती घ्यायला हवा. नवी पिढी या अतिरेकी माध्यमप्रपाताची बळी ठरेल, ही धोक्‍याची घंटा आता ठणाठणा वाजायला लागलेली आहे. 

ज्येष्ठ शास्त्रज्ञ आइनस्टाइन याची बीबीसीवर एक मुलाखत झाली होती. ती मी एका प्रशिक्षण कार्यक्रमाच्या निमित्तानं पाहिली होती. त्यात त्यांना विचारण्यात आलं ः ‘‘अणुबॉम्बमुळं एवढ्या मोठया प्रमाणात मनुष्यहानी झाली- त्यात तुमच्या शोधाचाही वाटा आहे, तुम्हाला हा शोध लावल्याचा पश्‍चात्ताप होत नाही का?’’ तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव त्या कार्यक्रमात सलग दोन मिनिटं समीपदृश्‍यातून दाखवले गेले होते. त्यांत त्यांचा अपराधी आणि विमनस्क चेहरा सगळं काही सांगून गेला. हे आठवलं, ते नागपूरजवळच्या वेणा तलावात पिकनिकला गेलेली आठ तरुण मुलं बुडून मरण पावली ही बातमी वाचल्यावर. त्या दुर्दैवी प्रसंगानं हळहळ वाटलीच; पण अधिक वाईट वाटलं, ते हा अपघात का घडला हे वाचून. ही मुलं सेल्फी काढण्यात मग्न होती आणि बघताबघता ही तरुणाई काळाच्या पडद्याआड गेली.  

डिजिटल तंत्रज्ञानाचे असे जीवघेणे धोके हे सेल्फीचं तंत्रज्ञान विकसित करताना त्या संशोधकाच्या लक्षात आले नसतील का? आज त्याची मुलाखत घेतली, तर त्याला याची खंत वाटेल का? मला उत्तर माहीत नाही; पण प्रत्येक उपयुक्त शोधाला काळी बाजूही असते, यावर या घटनेनं शिक्कामोर्तब झालं.

...अन्‌ अर्ध्यावरच तुटली ‘दोस्ती’

हे केवळ एक उदाहरण नाही. डोंगराच्या कड्यावरून, समुद्रात खोल जाऊन, गगनचुंबी इमारतीच्या टेरेसवरून ‘लाइव्ह’ सेल्फी पाठवतपाठवत अनेक जण  गंभीर जखमी झाले आहेत. अनेकांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला आहे. आग्र्याला ताजमहाल पाहत सेल्फी काढत असताना पायऱ्यांवरून घसरून जपानी पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे याचे धोके आणि क्षणिक आनंदाची जीवघेणी किंमत काय असते, याची गंभीर जाणीव आपल्याला होत नाही, तोपर्यंत या सेल्फीच्या माध्यमातून जगभर घडणाऱ्या या ‘आत्म’हत्या कशा थांबवणार, हा जटिल प्रश्न कायम राहील.   

हे सेल्फीचं जगभर घोंघावणारं वादळ कसं शमवायचं, हा प्रश्न आता समाजशास्त्रज्ञांनी, सरकारी यंत्रणांनी, सामाजिक संस्थांनी अग्रक्रमानं हाती घ्यायला  हवा. आपल्या देशात तर ही लागण मोठ्या प्रमाणात झालेली दिसते. अगदी आकड्यांत सांगायचं झालं, तर जगभरात सेल्फी घेताना झालेल्या मृत्यूंपैकी निम्मे मृत्यू आपल्या भारतात झाले आहेत. गाडी चालवताना फोनवर बोलणं, संदेश पाठवणं, पाहणं यांतही अनेकांना आपला जीव  गमवावा लागला आहे.

स्वप्रतिमेचं प्रेम 
अर्थात याचा अर्थ असाही नव्हे, की सेल्फी हद्दपार व्हावी आणि ते शक्‍यही नाही. कारण स्वप्रतिमेचं प्रेम जगात अनादी अनंत काळापासून सुरू आहे. आता डिजिटल तंत्रज्ञान आलं म्हणून सेल्फी सहज शक्‍य होते, हे खरं; पण हे तंत्रज्ञान नव्हतं, तेव्हा म्हणजे १८३९मध्ये रॉबर्ट कॉर्निलस यांनी फोटोग्राफिक सेल्फ पोर्ट्रेट काढून याचा श्रीगणेशा केला आहे. कॅमेराच्या लेन्सचं झाकण काढून लगेच समोर जाऊन उभं राहून त्यांनी आपलीच छबी आपल्या कॅमेऱ्यात टिपली. आरशात बघून फोटो काढण्याला तर गेल्या शे-सव्वाशे वर्षांची परंपरा आहे. आपल्याकडचे राजकीय नेते, अगदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षही या सेल्फीच्या प्रेमात पडल्याचं आपण पाहतो आहोत. अंतराळात जाणाऱ्या शास्त्रज्ञांनाही हा मोह आवरत नाही. इतकंच काय, २०११मध्ये इंडोनेशियाच्या जंगलात एका छायचित्रकारानं लावून ठेवलेला कॅमेरा घेऊन माकडांनीही सेल्फी काढल्याच्या घटनेची नोंद आपल्याकडं आहे. तुसाँच्या संग्रहालयातले पुतळे, स्वतःवरच्या आत्यंतिक प्रेमातून वृत्तपत्रांत झळकणाऱ्या छबी आणि फ्लेक्‍सवरची छायाचित्रं ही याच सेल्फीची विविध रूपं आहेत. माणसाच्या याच आवडीचा फायदा घेण्याची संधी मोबाईल कंपन्या आणि समाजमाध्यमं मोठ्या प्रमाणात घेऊ लागली आहेत. आज भारतात स्मार्टफोनधारकांची संख्या तीस कोटीच्या घरात पोचली आहे आणि हा खप वाढत राहावा म्हणून अशा अनेक ‘मयसभा’ ते तयार करत राहणारच. त्यात किती अडकायचं, हे आपलं आपल्याला ठरवावं लागणार आहे.

‘सेल्फी’ची लोकप्रियता  
सोनी एरिक्‍सन झेड १०१० नं २००३ मध्येच हा समोरचा कॅमेरा आपल्या मोबाईलच्या माध्यमातून बाजारात आणला आणि फेसबुक येण्यापूर्वी ‘माय स्पेस’ या समाजमाध्यमात ही सेल्फी तुफान लोकप्रिय झाली होती. त्याचाच परिणाम म्हणून की काय, २०१२ च्या ‘टाइम’ मासिकाच्या संशोधन अहवालात ‘सेल्फी’ हा शब्द जगातल्या दहा लोकप्रिय शब्दांच्या मांदियाळीत जाऊन बसला. २०१३ च्या संशोधन अहवालानुसार, ऑस्ट्रेलियातल्या १८ ते ३५ वयोगटातल्या एक तृतीयांश महिला फेसबुकवर टाकण्यासाठी सेल्फी घेतात, असं आढळून आलं. 

याचाच परिपाक म्हणून की काय, २०१३ मध्ये सेल्फी हा शब्द ऑक्‍स्फर्ड शब्दकोशात दिमाखानं विराजमान झाला आणि या शब्दाचं मूळ ऑस्ट्रेलियात असल्याचं या कोशात नमूद करण्यात आलं. १८ ते २४ या वयोगटातल्या मंडळींनी काढलेल्या फोटोंपैकी तीस टक्के सेल्फी असतात, असं सॅमसंग आणि स्मार्टफोन यांनी संयुक्तपणे केलेल्या एका संशोधनचाचणीत आढळून आलं.

जत्रेचा अनुभव
जत्रेत फिरण्याचा आनंद ज्यांनी घेतला असेल, त्यांना त्यातल्या काही गोष्टी नक्की आठवत असतील. त्यातलाच एक असतो आरशांचा खेळ. त्यात असंख्य आरसे लावलेले असतात. बहिर्गोल, अंतर्गोल... नाना प्रकारचे आरसे. आपण त्यांत इतक्‍या असंख्य रूपांत स्वतःला दिसू लागतो, की आपला आपल्या डोळ्यावर विश्वास बसत नाही. आपण जाडे होतो, हडकुळे होतो, विदूषकासारखे दिसू लागतो...आणि आपण हसतहसत तिथून बाहेर पडतो. मग आपल्याला आपल्याच ‘डबल रोल’बरोबर फोटो काढण्याची हुक्की येते आणि काही क्षणांत आपण आपला ‘डबल रोल’सकटचा फोटो घेऊन बाहेर पडतो. शेजारच्या तंबूतून गरगर फिरणाऱ्या मोटारसायकलचा आवाज आपल्याला साद घालायला लागतो, आणि मग ‘मौत का कुंवा’ या नावानं प्रसिद्ध असलेला विहिरीसारख्या दिसणाऱ्या गोलाकार लाकडी ठोकळ्यावरून हात सोडून वेगानं खालून वर येणारा आणि तेवढ्याच चपळाईनं खाली जाणारा मोटारसायकलस्वार आपल्याला अद्‌भुत दुनियेत घेऊन जातो. 

हे सगळं मला या आधुनिक समाजमाध्यमाशी साम्य दर्शवणारं वाटतं. आजही आपल्यातले असंख्य जण या जत्रेचा अनुभव हातात असलेल्या स्मार्टफोनद्वारे- या उपकरणामध्ये असलेल्या सेल्फी काढण्याच्या कॅमेरानं- रोज घेत आहेत. स्वतःची प्रतिमा पाहणं, आपलाच फोटो विविध कोनांतून काढणं आणि स्वतःत मश्‍गूल होऊन जाणं. मग ते फोटो फेसबुकवर, इन्स्टाग्रामवर, व्हॉट्‌सॲपवर टाकून मित्रमैत्रिणींच्या सकारात्मक प्रतिसादाची वाट बघत बसणं, हा आज अनेक जणांचा दिनक्रम झालेला आहे आणि या जत्रेतला ‘मौत का कुंवा’ही या व्यसनानं पीडित झालेल्या तरुणांच्या नशिबी येत आहे. ‘नार्सिसस’ मनोवृत्तीतून ही स्वप्रतिमेच्या प्रेमात पडण्याची मानसिकता वाढीस लागल्याचं आपण आज पाहत आहोत.  

हा सेल्फीचा सुळसुळाट हे नेमकं कशाचं लक्षण आहे? जगभरातील सर्वसामान्य माणसांना या सेल्फींनी चेहरा दिला का? न्यूनगंड आणि सेल्फीचं व्यसन  यांचा काही थेट संबंध आहे का, असे अनेक प्रश्न आज आपल्यासमोर आहेत आणि त्याची उत्तरं शोधल्याशिवाय अशा व्यसनांना पायबंद घालता येणार नाही. 

शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमांत ‘समाजमाध्यमं’ हा विषय तातडीनं समाविष्ट करण्याची गरज आहे. केवळ सेल्फीच नव्हे, तर ‘फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्‌सॲपचा वापर’ यांवर विशेष अभ्यासक्रम आखायला हवा. शाळेतल्या शिक्षकांना समाजमाध्यमांच्या समुपदेशनाचं प्रशिक्षण त्यांच्या शिक्षणशास्त्राच्या अभ्यासक्रमातूनच दिलं गेलं पाहिजे. नवी पिढी या अतिरेकी माध्यमप्रपाताची बळी ठरेल, ही धोक्‍याची घंटा आता ठणाठणा वाजायला लागलेली आहे. अपघात झाला, की थोडे दिवस चर्चा करायची, तात्पुरती मलमपट्टी करायची आणि मग पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’ हे असंच चालणार असेल, तर काही खरं नाही...एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे, की दिखाऊपणात पहिला बळी विवेकाचा जातो आणि मग माणसाचा!

'सप्तरंग'मधील इतर लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Web Title: Marathi News Sakal saptranga esakal Selfie addiction Keshav Sathye