वंचितांच्या वास्तवाचा आरसा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वंचितांच्या वास्तवाचा आरसा
वंचितांच्या वास्तवाचा आरसा

वंचितांच्या वास्तवाचा आरसा

प्रा. हरीश वानखेडे


तमिळ चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार सूर्याचा ‘जय भीम’ सिनेमा देशभर चर्चेचा विषय ठरला आहे. दलित समूहातील सर्जक व्यक्ती सांस्कृतिक क्षेत्रावरील आपला अधिकार सांगण्यासाठी सिनेमाचा खुबीने वापर करत आहेत. अशा वंचितांची पात्रे आणि दलित तंत्रज्ञ व कलाकार यांना मुख्य प्रवाहात आणल्यामुळे सिनेमावरील अभिजनांची पकड सैल होण्यास मदत होईल. यामुळे इतर वंचित समूहांचा मार्गही थोडासा सोपा होईल. ऐतिहासिकदृष्ट्या वंचित घटक अभिजन वर्गाने काबीज केलेल्या सांस्कृतिक अवकाशावर आपला हक्क सांगू पाहत आहेत... काळ बदलतो आहे...

भारतीय सिनेमाच्या मुख्य प्रवाहात सध्याच्या काळात दलित भूमिका आणि प्रतीकांची उपस्थिती लक्षणीय वाढली आहे. २०२०च्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात दोन प्रादेशिक भाषांतील सिनेमांनी आपली मोहोर उमटवली. ज्यात वंचित समूहाच्या समस्या आणि त्यांच्या महत्त्वाकांक्षा चित्रित करण्यात आल्या होत्या. ते चित्रपट होते दिग्दर्शक वेतेरिमारन यांचा तामिळ भाषेतील ‘असुरन’ आणि राज मोरे यांचा मराठी लघुचित्रपट ‘खिसा’... ‘असुरन’मध्ये तमिळमधला स्टार अभिनेता धनुषला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. ‘खिसा’ने पदार्पणातील सर्वोत्कृष्ट लघुचित्रपटाचा पुरस्कार मिळवला. दोन्ही चित्रपटांनी नव्या पिढीच्या दलित समूहातून आलेल्या कलाकार आणि तंत्रज्ञांचे प्रशंसनीय कलाकौशल्य आणि गोष्टीचे निवेदन करण्याच्या उच्चकोटीच्या प्रतिभेचा परिचय करून दिला. त्याच्या जोडीला मारी सेल्वराज यांचा ‘कर्णन’ समीक्षकांच्या स्तुतीस पात्र ठरला. ज्यातील दलित नायक जातिव्यवस्थेचा अतुलनीय धैर्याने धिक्कार करतो आणि शोषक शक्तींचा आपल्या ताकदीच्या जोरावर पाडाव करतो.

हेही वाचा: अपमानाचे हलाहल पचवणे शिका

तमिळ सुपरस्टार सूर्याचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘जय भीम’ सिनेप्रेमी प्रेक्षक आणि समीक्षकांनी डोक्यावर घेतला आहे. समाजाच्या अतिवंचित घटकात समाविष्ट असलेल्या आदिवासींच्या जगण्याला मुख्य प्रवाहात आणल्याबद्दल आणि त्याला आंबेडकरवादाच्या परिप्रेक्ष्यातून सादर केल्याबद्दल सिनेमाचे अभिनंदनपर परीक्षणांनी स्वागत होत आहे.

दलित सिनेमाच्या प्रवाहाची पायवाट प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘फॅण्ड्री’ आणि ‘सैराट’ने पाडली, असे म्हणता येईल. दोन्ही सिनेमांतून जात, अस्पृश्यता आणि सरंजामी शोषणाचा नाजूक विषय सादर केला गेला आहे. तेही मुख्य प्रवाहातील सर्जक कौशल्याचा आधार घेत. त्यामुळे दोन्ही चित्रपटांनी चांगला गल्ला जमवला. त्यासोबतच दिग्दर्शक पा. रंजित यांनी ‘कबाली’ आणि ‘काला’सारख्या तमिळ सिनेमांतून दलित समूहातील मुख्य पात्राच्या माध्यमातून संवेदनशील वास्तववादी नाट्य सादर केले. रंजित आणि नागराज यांच्या यशस्वी चित्रपटांनी हिंदी सिनेसृष्टीलाही प्रभावित केले. त्यानंतर हिंदीत ‘न्यूटन’, ‘आर्टिकल १५’, ‘मसान’ आणि ‘मॅडम चीफ मिनिस्टर’सारखे चित्रपट पाहायला मिळाले. ज्यात जातीय अत्याचार, शोषितांच्या महत्त्वाकांक्षा आणि सामाजिक न्यायाचे चित्रण आहे.

विशेष म्हणजे सध्या ओटीटीवर असणाऱ्या अनेक वेबसीरिजमध्ये जातीचे आणि वंचित समूहाशी निगडित मुद्दे संवेदनशीलपणे हाताळले जात आहेत. सुधीर मिश्रांच्या ‘द सिरीयस मॅन’चे उदाहरण घेता येईल. त्यात नवाजुद्दीन सिद्दिकीने मुख्य पात्र साकारले आहे. वंचित समूहाचे प्रतिनिधित्व तो करतो. या सिनेमात शहरातील वंचितांच्या तिसऱ्या पिढीच्या संगोपनातील व्यामिश्रता आणि विरोधाभास दाखवण्यात आला आहे. ‘पाताल लोक’ वेबसीरिजमध्ये एका शोषित मुलाचे उपकथानक आहे. तो छळ आणि हिंसेचा बळी आहे. त्याचप्रमाणे ‘मिर्जापूर’मध्ये राम मौर्य नावाचे एका पोलिसाचे पात्र आहे. तो एकीकडे आपले कर्तव्य आणि दुसरीकडे त्या भागातील गुंडांच्या अपमानजनक वागणुकीच्या कात्रीत सापडला आहे. ‘नेटफ्लिक्स’वरील तेलगू नाट्यमालिका ‘पावा कदैगल’ आपल्यासमोर ग्रामीण भागातील दलितांच्या स्थानाचा आणि जातिसंस्थेचा लेखाजोखा मांडते. ‘नेटफ्लिक्स’वरच ‘डॉटर ऑफ डेस्टिनी’ नावाची चार भागांची सीरिज आहे, ज्यात शाळेत जाणाऱ्या मुलांची गोष्ट सांगितली आहे. या मुलांना शिक्षण घेण्यासाठी कशा प्रकारच्या छळ आणि भेदभावयुक्त सामाजिक वातावरणाचा सामना करावा लागतो हे या सीरिजमधून दाखवले आहे. त्याचप्रमाणे ‘आश्रम’ वेबसीरिजमधून वेगवेगळ्या वंचित पात्रांची कहाणी सांगण्यात आली आहे. झी टीव्हीवर ‘एक महानायक ः डॉ. आंबेडकर’ आणि ‘हॉटस्टार’वर ‘एका महामानवाची गौरवगाथा’ अशा दोन मालिका दाखवल्या जात आहेत. त्यांना प्रेक्षक आणि समीक्षकांची पसंतीही मिळत आहे.

वंचित समूहाचे सिनेमे आणि वेबसीरिजमधील चित्रण प्रभावी आहे. त्यामुळे मनोरंजन विश्वाला प्रगतिशील आणि लोकशाहीवादी रूप येण्यास मदत होईल. त्यांचे जगणे, त्यांची पात्रे आणि त्यांच्यातील तंत्रज्ञ अन् कलाकारांना मुख्य प्रवाहात आणल्यामुळे सिनेमावरील अभिजनांची पकड सैल होण्यास मदत होईल. त्यामुळे इतर वंचित समूहांचा मार्गही थोडासा सोपा होईल.

हेही वाचा: कृत्रिम बुद्धिमत्ता भविष्यातील अत्याधुनिक यंत्रणा

वंचित समाजाचे प्रश्न आणि जातीपलीकडचे वास्तव मांडणाऱ्या अशा सर्व सिनेमांचा चित्रपटसृष्टीवर अलीकडे प्रभाव पडताना दिसत आहे. हिंदी सिनेमा सातत्याने जातीचे प्रश्न किंवा आंबेडकरवादी विचारांपासून दूर राहिला आहे. सामाजिकदृष्ट्या शोषित घटकांना रोजच्या जीवनात अनेक प्रकारच्या भेदभावांशी झगडावे लागते. हिंसेचा सामना करावा लागतो. हे करत असताना तुरळक ठिकाणी या दमनाच्या विरोधात ते संघर्षरत असतात. या सर्व गोष्टींचे प्रतिबिंब हिंदी सिनेमात पडत नाही. मानवी सन्मान आणि सामाजिक न्यायाच्या मुद्द्यांना हिंदी सिनेमात फारसे स्थान मिळत नाही.

१९५०-६५ च्या सिनेमावर पुरोगामी प्रवाहाचा प्रभाव होता; पण तेव्हादेखील जातीचे प्रश्न आणि दलित प्रतीकांना वरवर हाताळले गेले.

उदा., बिमल रॉय यांचा ‘सुजाता’ हा सिनेमा. समांतर सिनेमाने हे प्रश्न दाखवण्याचे काही प्रयत्न नक्कीच केले; पण त्यातील वंचित समाजाच्या पात्रांवर पूर्वग्रहांचा प्रभाव होता. दलित म्हणजे गरीब, दुःखी असेच चित्रण त्यात होते. १९८०-९० च्या सिनेमाला तर कुठलेही सामाजिक भान नव्हते. कलात्मकदृष्ट्यासुद्धा ते हीन दर्जाचे होते.

उदारीकरणानंतरच्या काळात सिनेमातील वंचित पात्रांच्या चित्रीकरणात बदल होत आहेत, असे म्हणता येईल. पण, आता शोषित पात्रे, त्यांचे विविध गुणधर्म, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील त्यांची कार्यप्रवणता सिनेमे घेऊन येत आहेत. महत्त्वाचे म्हणजे, अशी पात्रे ही मोजक्याच मराठी, तामिळ, हिंदी सिनेमांतून मुख्य पात्राच्या रूपात येत आहेत. तसेच सिनेनिर्मात्यांनाही वंचित व्यक्ती नायक-नायिका होऊ शकते, असे वाटू लागले आहे.

सिनेमातील बदललेले स्वरूप उदारीकरणानंतरच्या काळातील वंचितांच्या बदललेल्या आर्थिक आणि सामाजिक स्थितीचाच परिणाम आहे. सांप्रत काळातील वंचितांकडे अनेक प्रकारचे राजकीय, वर्गीय आणि सांस्कृतिक गुणधर्म आहेत. तो नव्याने निर्माण झालेल्या शहरी मध्यमवर्गात महत्त्वाची भूमिका पार पाडू इच्छितो. दलितांचे वाढते प्रतिनिधित्व हिंदी सिनेमातील वैविध्य अधोरेखित करत असले तरी, ते अजूनही तसा नायक स्वीकारत नाहीत. सिनेमातील दलित पात्रांची उपस्थिती सिनेमाला लोकशाहीवादी बनवत असली तरी, अजूनही त्यांची ओळख समाजातल्या अभिजन वर्गाच्या प्रभावाखालीच दाखवली जाते. सिनेमातील वंचित पात्र बेधडक, स्वतंत्र आणि नायकाच्या रूपात दाखवण्यासाठी अजून तरी दिग्दर्शक, निर्माते तयार आहेत, असे दिसत नाहीत. दलित नायक हा इतर नायकांसारखाच प्रेमात पडतो. गाणी गातो, नृत्य करतो, मारामारी करतो या अपेक्षा अजून तरी पूर्ण झालेल्या नाहीत. असा नायक/नायिका जी सर्वसामान्य प्रेक्षकांच्या कौतुकास पात्र ठरेल याची सिनेजगत वाट पाहत आहे. अजूनही समाजातील अभिजन वर्गातील नायकालाच प्रेक्षकांचे प्रेम मिळत आले आहे. दलित समूहातील जास्तीत जास्त कलाकार, तंत्रज्ञांनी या क्षेत्रात येणे गरजेचे आहे. जेणेकरून सिनेसृष्टी अधिकाधिक बहुविध, स्वतंत्र आणि अर्थपूर्ण होत जाईल.

नवीन येऊ घातलेले अनेक सिनेमे शोषित-आदिवासींच्या जगण्यावर आधारित आहेत हे महत्त्‍वाचे आहे. स्वातंत्र्यसैनिक बिरसा मुंडा यांच्या जीवनावर पा. रंजितने सिनेमा बनवण्याची घोषणा केली आहे. त्यासोबतच त्याने ‘नीलम प्रॉडक्शन’ नावाने एक ट्रेनिंग सेंटर सुरू केले आहे. ज्यात तो महत्त्वाकांक्षी दलित तंत्रज्ञ, कलाकारांना प्रशिक्षण देणार आहे. हिंदीत ‘भीमा कोरेगाव’च्या लढाईवर आधारित भव्य चित्रपटाची घोषणा झाली आहे. ज्यात अर्जुन रामपाल मुख्य भूमिकेत आहे, तर रमेश थेटे यांचे दिग्दर्शन आहे. दलित समूहातील सर्जक व्यक्ती सांस्कृतिक क्षेत्रावरील आपला अधिकार सांगण्यासाठी सिनेमाचा खुबीने वापर करत आहेत. त्याचप्रमाणे शैलेश नरवाडे याचा मराठी चित्रपट ‘जयंती’ नुकताच आला आहे. ज्यात आंबेडकर आणि शिवाजी महाराज यांच्या विचारांवर चर्चा करण्यात आली आहे. ऐतिहासिकदृष्ट्या वंचित घटक अभिजन वर्गाने काबीज केलेल्या सांस्कृतिक अवकाशावर आपला हक्क सांगू पाहत आहे... हा भारतीय सिनेमासाठी अत्यंत महत्त्वाचा काळ आहे.

enarish@gmail.com

(लेखक जवाहरलाल नेहरू विद्यापीठात राज्यशास्त्राचे प्राध्यापक आहेत)

loading image
go to top