कृत्रिम बुद्धिमत्ता भविष्यातील अत्याधुनिक यंत्रणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कृत्रिम बुद्धिमत्ता भविष्यातील अत्याधुनिक यंत्रणा

कृत्रिम बुद्धिमत्ता भविष्यातील अत्याधुनिक यंत्रणा

अणुबॉम्ब बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने हिरोशिमा आणि नागासाकीचा विद्ध्वंस पाहिल्यावर आपण हा शोधच लावला नसता तर किती बरे झाले असते, असे उद्गार काढल्याचे जगविख्यात आहे. यंत्रमानवाला मानवी बुद्धिमत्ता दिली गेली तर ते आपल्याला अपेक्षित कामे करतील शिवाय आपली बुद्धी चालवून आपल्याला नको असलेली कामेही करू शकतील, हे स्पष्ट आहे.

कृत्रिम बुद्धिमत्तेवरचे संशोधन मानवी मती गुंग करणारे संशोधन म्हणून ओळखले जाते. मानवी कल्याणासाठी हे संशोधन रोखले पाहिजे, असे ठामपणे सांगणारा संशोधकांचा एक गट आहे. मानवी बुद्धीची झेप म्हणून त्याकडे पाहिले पाहिजे, त्याचा मानवी जीवनाला कसलाच धोका नाही, असे सांगणारा दुसरा गट आहे. अर्थातच याविषयी कोणीही छातीठोकपणे भाकित करू शकत नाही. सध्या तरी हे संशोधन अत्यंत जलद गतीने सुरू आहे

अनेक इंग्रजी चित्रपटांमधून आणि आपल्याकडच्या ‘रोबोट’ या हिंदी चित्रपटामधूनही मानवी बुद्धी असलेले रोबोट किंवा यंत्रमानव हा विषय हाताळला गेला. सहसा असे रोबोट मानवाला डोईजड होतात आणि हाहाकार माजवतात. अखेरीस मानव त्यांच्यावर नैसर्गिक बुद्धिकौशल्याने मात करतो, असा शेवट दाखवला जातो. परंतु आता संशोधक या विज्ञानकथा सत्यात उतरवण्याचे प्रयत्न करत आहेत. रोबोंना मानवी बुद्धिमत्ता बहाल करण्याचे औदार्य आपल्या अंगलट येण्याची शक्यता अनेक बुद्धिवंत, विचारवंतांनी व्यक्त केली असली तरी अखेरीस त्यांची बुद्धी आपल्या काबूत ठेवली जाईल, असा विश्‍वास संशोधकांना आहे.

हेही वाचा: कोल्हापूर : फुटबॉल हंगाम किक ऑफच्या दिशेने

अणुबॉम्ब बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने हिरोशिमा आणि नागासाकीचा विद्ध्वंस पाहिल्यावर आपण हा शोधच लावला नसता तर किती बरे झाले असते, असे उद्गार काढल्याचे जगविख्यात आहे. मात्र त्यावेळी त्याला भविष्यातील विद्ध्वंसाचा अंदाज नव्हता. यंत्रमानवाला मानवी बुद्धिमत्ता दिली गेली तर ते आपल्याला अपेक्षित कामे करतील शिवाय आपली बुद्धी चालवून आपल्याला नको असलेली कामेही करू शकतील, हे स्पष्ट आहे. वर्चस्व गाजवण्याची प्रवृत्ती हा मानवी बुद्धिमत्तेचा अविभाज्य भाग असल्याने असे यंत्रमानव विकसित करू नये, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आपल्याच हाताने अकारण भस्मासुर निर्माण करण्यात काय हशील, असा प्रश्‍न हे तज्ज्ञ विचारत आहेत. खुद्द बिल गेट्स यांनीही यामुळे मानवजातीचा अंत होईल, असा इशारा दिला होता.

तंत्रज्ञानात वापर संशोधकांच्या एका गटाला मेंदू हे निव्वळ जैविक स्वरूपाचे यंत्र असल्याने असे होऊ शकेल असे वाटत असले तरी दुसऱ्या गटाच्या मतानुसार, मेंदूच्या प्रक्रिया अत्यंत अवघड जैविक गुंतागुंतीच्या असतात. मानवी मेंदूसारखा मेंदू तयार करणे केवळ अशक्य आहे. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेला मानवी बुद्धिमत्तेवर मात करणे शक्यच नाही. या दोन्ही मतांचा विचार मात्र जरूर केला गेला पाहिजे. कारण या क्षेत्रातील प्रगती झपाट्याने होत आहे. सध्या मानवी मेंदूप्रमाणेच स्वतः शिकू शिकणारे संगणक बनवण्याचा विचार संशोधक करत आहेत.

हेही वाचा: नाशिक : सप्तशृंगीमातेच्या दर्शनासाठी मंदिर रात्री दहापर्यंत खुले

अलीकडे अनेक क्षेत्रांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा सर्रास वापर केला आहे. अद्याप ही यंत्रे ठरावीक कामेच करू शकतात. ती आजूबाजूच्या परिस्थितीचा अंदाज घेतात आणि त्यानुसार योग्य कृती करतात किंवा तसा निर्णय घेतात. या यंत्रांनी करावयाची कामे लक्षात घेऊन त्यानुसार निर्माण होणारे प्रश्‍न कोणते असतील, त्यावर संभाव्य उत्तरे काय असतील, प्रश्‍न निर्माण होण्याची कारणे काय असतील याचा विचार केला जातो. याबरोबरच ज्ञान, नियोजन, अभ्यास, माहिती, संवाद प्रक्रिया, नियंत्रण क्षमता आदी घटकांचा विचारही केला जातो आणि या सर्वांवर आधारित तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कृत्रिम बुद्धिमत्ता तयार केली जाते. सध्या रुग्णालये, कृषी, हवाई वाहतूक, बंदरे, वीजनिर्मिती, खाणकाम, औषधनिर्मिती, हवामान आणि अवकाशशास्त्र, वाहन उद्योग, खाद्यप्रक्रिया उद्योग, दळणवळण अशा अनेक क्षेत्रांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या या तंत्रज्ञानाचा उपयोग केला जात आहे.

सध्या स्मार्टफोन, संगणक यांमुळे व्यक्तींमधील संबंधांमध्ये दुरावा वाढला आहे. अशा यंत्रमानवांमुळे तो आणखी वाढेल. अर्थातच नेमकं काय घडेल हे सांगणे कोणालाही शक्य नाही. मानवी मेंदूची प्रचंड सर्जनशीलता आणि तर्क बांधण्याची क्षमताही इथे थिटी पडत आहे. त्यामुळेच हे महासंगणक तयार होतील. ते व्यक्तींशी संवाद साधतील, त्यांची गुपिते जपतील. भावना विकसित झाल्या तर आपली काही गुपिते सांगून त्यांचे चांगले मित्र बनतील किंवा त्यांना ब्लॅकमेलही करू लागतील आणि त्यांना आपला गुलाम बनवतील. भविष्याच्या पोटातील हे ज्ञान अद्याप तरी मानवी बुद्धिमत्तेसाठी अगम्यच आहे.

- प्रा. मधुकर चुटे,नागपूर

loading image
go to top