संगीत मनमोही रे....! (शिल्पा पुणतांबेकर)

शिल्पा पुणतांबेकर 
रविवार, 5 ऑगस्ट 2018

पंडित भास्करबुवा बखले यांनी संगीतातला कुठलाच प्रकार वर्ज्य मानला नव्हता; त्यामुळं तीच परंपरा सांभाळून संगीतक्षेत्रात नवनवीन काही करत राहावं, गायनप्रकारातलं उत्तम आहे ते गावं, हा मंत्र मी मनात जपला आहे. खरं गाणं आत्ता कुठं सुरू झालंय, अजून खूप काही करायचंय, त्यासाठी ‘गानसाधक’ याच भूमिकेत राहायला मला आवडेल.

ज्या  घरात तंबोरे सतत लागलेले असायचे, गायनक्षेत्रातल्या अनेक दिग्गजांचे स्वर ज्या वास्तूनं ऐकले, अशा घरात माझा जन्म झाला, हे माझं मोठंच भाग्य. घरात केवळ गाणं आणि गाण्याचेच संस्कार माझ्यावर झाले. 

माझे वडील सुधीर दातार आणि आई शैला दातार याचं मी ज्येष्ठ अपत्य. 

आणखी थोडी कौटुंबिक पार्श्‍वभूमी सांगायलाच हवी. वडील हे गायनाचार्य, देवगंधर्व पंडित भास्करबुवा बखले यांचे नातू आणि राम मराठे यांचे शिष्य, तर आई ही मनोहर आणि लीला सरदेसाई या संगीतकार आणि संगीतशिक्षणाचं व्रत घेतलेल्या दांपत्याची मुलगी. आईला भास्करबुवांची नातसून होण्याचं भाग्य लाभलं. वसंतराव देशपांडे, माणिक वर्मा, गजाननबुवा जोशी यांची तालीम तिला मिळाली. 

अशा या गाण्याच्याच वातावरणात माझं बालपण गेलं. गाणं कानात रुजत होतं. त्या नकळत्या वयातही उत्तम काव्य, संगीत यांचे संस्कार होत गेले. मला आठवतं, पुण्यात प्रभात रस्त्यावरच्या त्या वेळच्या आमच्या छोट्याशा घरात गजाननबुवा मुक्कामाला असायचे. 

छोटा गंधर्व, माणिक वर्मा, राम मराठे, मल्लिकार्जुन मन्सूर, ज्योत्स्ना भोळे यांचा सतत राबता असायचा. पंडित भीमसेन जोशी यांचेही आमच्याशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. या सगळ्या थोर कलाकारांबरोबरच ज्येष्ठ साहित्यिक श्री. ना. पेंडसे, विंदा करंदीकर, व. पु. काळे, अभिनेते चंद्रकांत गोखले, चित्तरंजन कोल्हटकर यांचाही आमच्याशी घरोबा होता. त्यामुळं त्या वयात नाही कळलं तरी आत्ता जाणवतं की या सगळ्यांच्या सहवासातून, स्वरविहारातून मला ‘संगीत मनमोही रे...’ हे कळायला लागलं होतं. 

मग शालेय स्पर्धेत सहभाग, बक्षिसं, त्यासाठी आईनं तयारी करून घेणं ही मजा अनुभवली. सन १९८३-८४ मध्ये मुंबई दूरदर्शन नवीन असताना मी कृष्णाच्या वेशात ‘सौभद्र’ नाटकातली दोन पदं ‘लाईव्ह’ सादर केली होती. प्रसिद्ध ऑर्गनवादक विष्णुपंत वष्ट यांनी ही पदं माझ्याकडून बसवून घेतली होती. हे सादरीकरण झाल्यानंतर राम मराठे यांनी मला १०० रुपये बक्षीस दिलं होतं. हा खूप मोठा आशीर्वाद मला मिळाला होता. मी साधारणतः सहा-सात वर्षांची असताना ‘मंतरलेल्या चैत्रबनात’ या कार्यक्रमाच्या तालमी घरी व्हायच्या. हे सगळं मी केवळ ऐकलं नव्हतं, तर निवेदनासह संपूर्ण कार्यक्रम माझा तोंडपाठ होता, असं म्हटलं तरी चालेल. कॉटवर चढून माईकची ॲक्‍शन घेऊन ‘चैत्रबन’ सादर करणं, हा माझ्या खेळाचा एक भाग असायचा. 

दहावीनंतर एसएनडीटी महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि खऱ्या अर्थानं वडिलांकडं तालीम सुरू झाली. बाबांची कडक शिस्त असायची. पहाटे उठावं लागायचं. रोज घरात तंबोरा वाजलाच पाहिजे, हा त्यांचा कटाक्ष. नुसतं गाणंच नव्हे तर तंबोरा उत्तम कसा लागला पाहिजे, बसायचं कसं, बोलायचं कसं याचीही त्यांनी कसून तालीम दिली. राग ‘भैरव’, ‘मुलतानी’, तसंच कितीतरी बंदिशींचा खजिना मिळाला. 

चलन, अस्ताई-अंतरे, पलटे हे सगळं त्यांनी घोटून पक्कं करून घेतलं. आई-वडील हेच माझे संगीतक्षेत्रातले गुरू आणि दैवत. माझे मोठे काका सुहास दातार  मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांचे पट्टशिष्य - यांच्याकडूनही मला अेक बंदिशी मिळाल्या. 

बीएसाठी एसपी कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर ‘मूड इंडिगो’, ‘कल्याणी करंडक’, ‘फिरोदिया करंडक’ ही सगळी मजा अनुभवली. भरपूर स्पर्धा जिंकल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं सुगम संगीताचं, नाट्यसंगीताचं दालन खुलं झालं. शास्त्रीय संगीताचा पाया भक्कम होत असतानाच ‘हेसुद्धा मी गाऊ शकते,’ याचा मला शोध लागला. गजाननबुवा जोशी यांच्या कन्या डॉ. सुचेता बिडकर - स्वतः उत्तम गायिका आणि बंदिशकार - या एसएनडीटीला विभागप्रमुख होत्या; त्यामुळं तिथे प्रवेश घेऊन एमए (संगीत)  केलं. कॉलेजला दुसरी आले. सन १९९४ मध्ये प्रसिद्ध संगीतकार आनंद मोडक यांच्या संगीतदिग्दर्शनात ‘दोघी’ चित्रपटासाठी पार्श्‍वगायन केलं. 

सन १९९८ मध्ये जोडीदार समीर पुणतांबेकर याच्याशी सहजीवनाची सुरवात झाली. तो उत्तम तबलावादक. सूर आणि ताल एकत्र येणं हासुद्धा जीवनातला अपूर्व योगच! कलेविषयी अपार प्रेम असलेल्या सासू-सासऱ्यांचं प्रोत्साहन आणि समीरची साथ मिळाल्यानं पुन्हा एकदा त्या भारलेल्या दिवसांनी ‘संगीत मनमोही रे’ याचाच अनुभव दिला. काका, आई-वडिलांकडं शिक्षण सुरूच होतं. 
‘संगीत’ नावाच्या महासागरातले मोती वेचणं ही जीवनभराचीच प्रक्रिया आहे, हे पटलंय आता. 
सन २००९ पासून ज्येष्ठ संगीतकार-गायक श्रीधर फडके यांच्याबरोबर कार्यक्रम करू लागले आणि इथं मला गाण्यातला वेगळा मार्ग सापडला. भावगीतगायनाच्या त्यांच्या कार्यक्रमात, त्यांनी

स्वरबद्ध केलेली शास्त्रीय संगीताचा बाज असलेली ‘ताने स्वर रंगवावा,’ ‘संगीत मनमोही रे’, ‘माता भवानी’ यांसारखी गीतं मी गाऊ लागले. श्रीधरजींबरोबर कार्यक्रम केल्यानं एक वेगळी भरारी मला घेता आली. स्वतंत्र ओळख, स्वतंत्र गायनसंधी चालून आली. 

उत्तम गायिका आणि अभिनेत्री असलेली माझी चुलतबहीण सावनी दातार-कुलकर्णी माझ्या गानप्रवासातली जोडीदार आहे. भास्करबुवा बखले यांनी स्थापन केलेल्या ‘भारत गायन समाजा’ची धुरा दातार कुटुंबीय अतिशय आस्थेनं सांभाळत आहे. त्यांचा भार आपल्या परीनं आपणही उचलावा, अशी माझी इच्छा आहे म्हणूनच, मास्टर कृष्णराव यांनी भारत गायन समाजासाठी तयार केलेल्या पहिल्या तीन वर्षांच्या अभ्यासक्रमाच्या व्हीसीडी मी आणि सावनीनं माझी आई शैला दातार हिच्या मार्गदर्शनाखाली तयार केल्या आहेत. या व्हिडिओ-सीडींद्वारा विद्यार्थ्यांना संगीतशिक्षण सहज घेता येऊ लागलं. भारत गायन समाजात संगीतविषयक कार्यशाळा, नाट्यसंगीत स्पर्धा असे उपक्रम राबवताना वेगळा आनंद, समाधान मिळतं. मी अनेक मैफली करतेय; पण ‘सवाई गंधर्व-भीमसेन महोत्सवा’त सादर केलेलं माझं आणि सावनीचं गाणं म्हणजे आम्ही आई-वडिलांना दिलेली एक गुरुदक्षिणाच होती. 

विस्मरणात चाललेला संगीताचा सुवर्णकाळ ‘जागा’ ठेवण्यासाठी ‘विरासत ः एक परंपरा’ हा दृक्‌-श्राव्य कार्यक्रम मी आणि सावनी सादर करतो. भास्करबुवांनी संगीतातला कुठलाच प्रकार वर्ज्य मानला नव्हता; त्यामुळं परंपरा सांभाळून संगीतक्षेत्रात नवनवीन काही करत राहावं, गायनप्रकारातलं उत्तम आहे ते गावं, हा मंत्र आम्ही मनात जपला आहे. खरं गाणं आत्ता कुठं सुरू झालंय, अजून खूप काही करायचंय, त्यासाठी ‘गानसाधक’ याच भूमिकेत राहायला मला आवडेल. संगीत मन मोहून टाकणारं आहेच; त्यासाठी साधना करत राहणं हेच योग्य होय.

'सप्तरंग'मधील लेख वाचण्यासाठी क्लिक करा

Web Title: Musical journey of Shilpa Puntambekar