सह्याद्रीचा माथा : दुष्काळ, पाणीप्रश्नी वेळीच हवी सावधानता! उन्हाबरोबरच पाणीप्रश्नाची वाढणार तीव्रता

Water Crisis : उत्तर महाराष्ट्रातील कळवण, शिरपूर, रावेर, चोपडा अशी काही मोजकी शहरे सोडली, तर इतरत्र पिण्याच्या पाण्याची स्थिती अतिशय गंभीर झालेली आहे.
Dr. Rahul Ranalkar
Dr. Rahul Ranalkar esakal

उत्तर महाराष्ट्रातील कळवण, शिरपूर, रावेर, चोपडा अशी काही मोजकी शहरे सोडली, तर इतरत्र पिण्याच्या पाण्याची स्थिती अतिशय गंभीर झालेली आहे. फेब्रुवारी संपेपर्यंत नाशिक जिल्ह्यातील धरणांत जेमतेम ४४ टक्के, जळगाव जिल्ह्यात ५७ टक्के, धुळे जिल्ह्यात ५६, तर नंदुरबार जिल्ह्यात ५५ टक्के एवढा साठा शिल्लक राहिला आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत तो किमान १५ टक्के कमी आहे, यावरून यंदाच्या उन्हाळ्यात (Summer) पिण्याच्या पाण्याचा प्रश्न किती उग्र रूप धारण करेल, याची प्रचीती यावी. मुळात यंदा पाऊस अडखळत कधी कमी, तर कधी जास्त धो-धो कोसळला. त्यामुळे तो धरणात साठला, तरी त्यामुळे भूजल पातळी वाढण्यास फारशी मदत झालेली नाही.

दुसरीकडे बहुतांश धरणे ‘ओव्हरफ्लो’ झाली होती; पण पाटबंधारे विभागाच्या निकषानुसार ते पाणी ऑक्टोबरपर्यंत अडविता आले नाही. बेमोसमी पावसाच्या भरवशावर राहिलेली यंत्रणा पाण्याचे पुरेसे नियोजन करू न शकल्याने आज पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती सुरू झाली आहे.

जनावरांसाठी पाणी कसे उपलब्ध होणार? हा आणखी वेगळा प्रश्न. एकूणात एप्रिल आणि मेमध्ये पाण्यासाठी जीवघेण्या कसोटीचे राहतील, हे पाहून आता तरी तातडीने नियोजन करण्याची गरज आहे. (nashik jalgaon saptarang latest article on water crisis in summer marathi news)

मॅगसेसे पुरस्कारप्राप्त पी. साईनाथ यांनी पाणीटंचाई, कारणे, प्रशासकीय दिरंगाई आणि राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असला की दुष्काळाची भीषणता कशी वाढत जाते, याचे विवेचन ‘दुष्काळ आवडे सर्वांना’ या त्यांच्या पुस्तकात केले आहे. दुष्काळ आणि पाणीटंचाई ही जणू काही प्रशासनालाच हवी असते इथपासून ते नियोजनाअभावी परिस्थिती हाताबाहेर कशी जाते, याचे विवेचन त्यात केलेले आहे.

हे सारांशाने सांगायचे कारण, की आज संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात पिण्याच्या पाण्याची समस्या अतिशय गंभीर वळणावर येऊन पोहोचली आहे. उत्तर महाराष्ट्रातील प्रकल्पांत आजमितीस सरासरी जेमतेम ४० ते ४५ टक्के जलसाठा राहिला आहे. उन्हाळ्याचे मार्च, एप्रिल आणि मे व अर्धा जून महिना जायचा आहे.

या काळात पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई भासेल, हे उघड आहे. मात्र, त्याचा सामना करण्यासाठी प्रशासकीय तयारी मात्र ‘पाहू, अजून कुठे एवढी झळ बसत आहे’ या धर्तीवर कासवगतीनेही म्हणता येणार नाही, अशा स्थितीत आहे. उत्तर महाराष्ट्रात फेब्रुवारीअखेरचा शिल्लक धरणसाठा पाहिला, तर सध्या नंदुरबार जिल्ह्याला तेवढी झळ बसलेली नाही.

तेथे टॅंकर सुरू झालेले नाहीत, मात्र नाशिकमध्ये १७४ गावे आणि ३२५ वाड्या व जळगाव जिल्ह्यात १६ गावांना आणि धुळे जिल्ह्यात एका गावाला एकूण १८८ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू झालेला आहे. नंदुरबार जिल्ह्यात पाणीटंचाई नसली, तरी खुद्द नंदुरबार शहरालाच चार ते पाच दिवसांनी पाणीपुरवठा होत असून, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वीरचक धरणात केवळ ५० टक्के साठा राहिला आहे.

जळगाव जिल्ह्यासाठी असलेल्या सर्वांत मोठ्या गिरणा धरणातील साठा यंदा अवघा ४० टक्क्यांवर आलेला आहे. ‘कसमादे’त समाधानकारक पाऊस झाल्याने गेली सलग चार वर्षे हे धरण १०० टक्के भरले होते. यंदा मात्र पावसाने हात दाखविल्याने गिरणा धरण भरले नाही.

त्याचा फटका यंदा जळगाव जिल्ह्याला बसेल. जिल्ह्यातील इतर वाघूर ८०, हतनूरमध्ये ७८ टक्के साठा आहे, ही तेवढीच जमेची बाजू. जिल्ह्यात १७ गावांना १६ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. उन्हाळा वाढत जाईल, तशी टँकरची संख्या वाढत जाईल.

नाशिक जिल्ह्यातील लघु आणि मध्यम अशा २२ प्रकल्पांत केवळ ४४ टक्के जलसाठा शिल्लक आहे. हा साठा येत्या ३१ जुलैपर्यंत पुरवावा लागेल. उन्हाळा तीव्र असल्याने पाण्याचे बाष्पीभवनही मोठ्या प्रमाणात होणार आहे. ‘कसमादे’तील चणकापूर, हरणबारी, केळझर, नाग्यासाक्या, गिरणा, पुनंद व माणिकपुंज या धरणांमधील संपूर्ण पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. (Latest Marathi News)

Dr. Rahul Ranalkar
रडायचं नाही, लढायचं!

विविध पाणीपुरवठा योजनांना चार ते आठ दिवसांआड पाणीपुरवठा करून पाणी पुरवावे लागेल. गेल्या वर्षी कमी पाऊस झाला असला, तरी धरणे भरली होती. यंदा स्थिती उलट असूनही विविध धरणांमधून सिंचनासाठी एक आवर्तन देण्यात आले. ते दिले नसते तर रब्बी हंगामातील शेतीसह कांदा आणि भाजीपाल्याची पिके वाया गेली असती.

अन खरिपापेक्षा रब्बीला मोठा फटका बसला असता. आता मात्र सर्वच पाणी पिण्यासाठी प्राधान्याने राखीव ठेवावे लागणार आहे. ग्रामीण भागात विहिरींनी तळ गाठण्यास सुरवात केली. त्यामुळे काही भागात आताच शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने लावलेला कांदा सोडून देण्याची वेळ आली. जिल्ह्यातील नांदगावला आजच २० दिवसांनी पाणी येत आहे. मनमाड, येवला, सिन्नर, इगतपुरी येथील स्थितीही थोड्याफार फरकाने अशीच आहे.

गिरणा पट्टा दुष्काळाच्या छायेत

जळगाव जिल्ह्यात धरणांमध्ये सद्यस्थितीत केवळ ५७ टक्के उपयुक्त साठा राहिला आहे. अतिशय कमी पावसामुळे चाळीसगाव तालुका शाासनाने दुष्काळी घोषित केला आहे. अमळनेर, पारोळा, चाळीसगाव, भडगाव या शहरांत आताच पाण्याची समस्या बिकट होऊ लागली. प्रशासनाने दुष्काळास तोंड देण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत; परंतु त्या अपुऱ्या पडत आहेत. चाळीसगावातील मन्याड मध्यम प्रकल्प कोरडा आहे.

एरंडोलमधील अंजनी, पाचोऱ्यातील बहुळा, अग्नावती या प्रकल्पांतही जलसाठा जेमतेम आहे. सर्वांत मोठ्या गिरणा धरणात साठाही ४० टक्क्यांवर आला. यामुळे गिरणा पट्टा दुष्काळाच्या छायेत आहे. जिल्ह्यातील सर्वच नगरपालिका क्षेत्रांत किमान दोन ते आठ दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे. (Latest Marathi News)

Dr. Rahul Ranalkar
‘माया’ची आई ‘लीला’

जनावरांचे काय होणार..?

एकीकडे मानवाच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाची जेवढी धग जाणवते, तेवढीच मुक्या जनावरांची असते. जिथे माणसाला पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागेल, तिथे जनावरांना किती प्राधान्य असेल? दुभत्यांसह भाकड जनावरांना चारा आणि पाण्यासाठी शेतकरी प्रसंगी स्वतःचे पाणी वापरेल; पण प्रशासनाने आजच दुष्काळी भागात चारा छावण्या उभारून जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे.

टॅंकरच्या फेऱ्या वाढतील, हे गृहीत धरून आताच नियोजन करणे, टॅंकरसाठी आलेल्या प्रस्तावांची वेळीच छाननी करणे व तत्काळ मंजुरीची व्यवस्था करणे, शहरी भागात पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी काही निर्बंध घालणे आणि वेळ कमी करणे यासह अनेक गोष्टी वेळीच कराव्या लागणार आहेत. पुढील दोन महिने निवडणुकीचे अन आचारसंहितेचे असतील. या काळात पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाची धग वाढू नये, हीच अपेक्षा..

Dr. Rahul Ranalkar
सिनेमा-नाटकांचे आधेअधुरे जग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com