पावसातील एका सभेने बदलले राज्याचे राजकारण

Sharad Pawar
Sharad Pawar

यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारांमध्ये चर्चेत राहिलेला एकमेव चेहरा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार. शरद पवारांनी साताऱ्यात भर पावसात घेतलेल्या सभेने राज्यातील राजकीय चित्र बदलल्याचे चित्र आज निकालातून दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या निवडणुकीत मिळालेल्या 42 जागांपेक्षा अधिक जागा जिंकल्याचे आज चित्र आहे. 

पक्षाने अनेक पदे व संधी देऊनही केवळ सत्तेसाठी राष्ट्रवादी पक्ष सोडलेल्या मोठमोठ्या नेत्यांनाही फटका बसल्याचे दिसत आहे. याउलट शरद पवारांचे लहानपणीचे मित्र असलेल्या श्रीनिवास पाटलांसाठी भरपावसात घेतलेली सातारची सभा त्यांच्यासाठी फायद्याची ठरलीच, पण राष्ट्रवादीलाही नवसंजीवनी देणारी ठरली हे नक्की.

निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शरद पवार यांच्या दररोज साधारण तीन ते चार सभा होत होत्या. प्रत्येक सभेत त्यांचा उत्साह आणि सत्ताधाऱ्यांना सडेतोड उत्तर देण्याची क्षमता हे विधानसभेचा प्रचार सुरु झाला तेव्हापासून पाहत आलोय. पण, कहर झाला, हो कहर झाला असेच म्हणावे लागेल. कारण, धो-धो मुसळधार पाऊस पडत होता आणि उपस्थितांचा उत्साह पाहून हा 79 वर्षांचा तरुण आपल्यावर होत असलेल्या टीकेला तेवढेच जोमाने उत्तर देत होता.

शरद पवार यांनी प्रत्यक्षात सात तारखेपासून खऱ्या अर्थाने सुरु झालेल्या प्रचाराचा सभांचा धुराळा उडवून दिला. त्यांनी अगदी कोल्हापूरपासून नागपूरपर्यंत, तर सोलापूरपासून मुंबईपर्यंत सभांचा धडाका लावला. ईडीसारख्या ब्यादेला शिंगावर घेतलेल्या पवारांचे नाव निवडणुकीच्या आगोदरपासूनच चर्चेत राहिले. प्रचाराचा अखेर होत असतानाही तेच नाव पुन्हा चर्चेत आले. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुंबईत सभा सुरु असताना त्याचवेळी साताऱ्यात भर पावसात शरद पवार उपस्थितांना संबोधित करत होते. पवारांची ही जिद्द पाहून वाहिन्यांनीही त्यांच्या या भाषणाचे कौतुक करण्यावाचून राहता आले नाही.

काँग्रेससारखा सर्वांत जुना पक्ष राज्यात महाआघाडीत लढत असताना सत्ताधाऱ्यांकडून या निवडणुकीत फक्त राष्ट्रवादी आणि शरद पवारांना लक्ष्य करण्यात आले होते. दिल्लीतून येणाऱ्या भाजप नेत्यांनी पवारांनी काय केले असाही  प्रश्न निवडणुकीत विचारला. निवडणुकीत मिळालेल्या जनाधाराकडे बघता जनतेनेच त्यांना उत्तर दिले आहे असे म्हणता येईल. यामुळे पुन्हा एकदा हेच अधोरेखित झाले कि  पवारांचे नाव घेतल्याशिवाय आजही महाराष्ट्रातील निवडणुकीचे पान हालू शकत नाही. निवडणुकीचे निकालाचे कल बघता शरद पवार आणि महाराष्ट्र हे समीकरण कधीच कोणी नाकारू शकणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com