बहुआयामी संगीत मार्तंड

pandit jasraj
pandit jasraj

पं. जसराज हे राग संगीताचा खूप मोठा काळ जगलेले एक महात्मा होते. सुरवातीपासूनच ते मैफली गाजवत राहिले. बहुआयामी असं त्यांचं व्यक्तिमत्व होते. विशाल ह्रदय असलेले ते महान गुरू होते. शिष्यांनी सोबत मैफलीत गावे आणि त्यानेही मैफल गाजवावी, असे त्यांना वाटत असे. शिष्याला ते संगीतविद्या देण्याबरोबरच त्याच्या भवितव्याचा विचार करून, त्यांना मदत करणारे ते सह्रदयी होते. ते यापुढेही गातच राहतील. त्यांचा स्वर अमर आहे. 

माझ्या आयुष्यात त्यांचे स्थान खूप महत्त्वाचे आहे. मी आज जे गात आहे, त्यात सर्वच मोठ्या कलाकारांचे योगदान आहे. त्याच पं. जसराज यांचे स्थान वरचे आहे. एनसीपीएची शिष्यवृत्ती असो की गायन स्पर्धा; अनेक ठिकाणी ते माझ्या लहानपणासून परीक्षक असत. साधना सरगम या त्यांच्या शिष्या. आम्ही दोघी एकाच वयाच्या. अगदी वयाच्या बाराव्या वर्षापासून आम्ही मुंबईत गायनाचे कार्यक्रम करत असू. त्यातील अनेक कार्यक्रमांना पंडितजी स्वत: उपस्थित राहून दाद द्यायचे. शाबासकी द्यायचे, प्रोत्साहन द्यायचे. एवढ्या मोठ्या कलाकाराने तुम्हाला ऐकणे आणि शाबासकी देणे ही खूप मोठी गोष्ट आहे. आता यापुढच्या पिढीला असं काही मिळणं जरा अवघड वाटतंय.

तुम्ही काय करायचे, याचे मार्गदर्शनही ते नेहमी करत. ते शिवाजी पार्कला राहात. माझा क्‍लासही जवळच होता. त्यामुळे दुर्गा आणि सारंग आम्ही एकत्र वाढलो. ते खूप चैतन्यदायी, खूप सकारात्मक होते. शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक शक्ती त्यांच्याकडे होती. त्यामुळेच वयाच्या नव्वदीतही ते मैफली करीत असत. ते आवाज असा लावायचे की सगळं विसरून जावं आणि त्यांना  ऐकावं. एखादा राग गायला सुरवात केली, त्यात रमायचे. पुढच्या पिढीला त्यांनी संगीत खूप भरभरून दिले आहे. त्यांचा सूर हा अमर आहे. ते संगीत प्रेमींच्या मनात व्यापून राहिले आहेत, यापुढेही त्यांचे अस्तित्व राहील. 

मेवाती घराण्याचे ते असले, तरी त्यांनी स्वत:चा आवाज ओळखून वेगळी गायकी रुढ केली होती. त्यांचा ध्वनिक्षेपकाचा अभ्यासही खूप होता. पूर्वी आता सारखे प्रगत तंत्रज्ञानाचे ध्वनिक्षेपक नव्हते. पण त्यावेळीदेखील त्याचा विचार करून, त्याचा ते सुंदर वापर करून गात असत. त्यांची आवाज लावण्याची पद्धत, हळुवार गायकी आणि तीनही सप्तकांतील लिलया फिरत, अशी अनेक वैशिष्ट्ये त्यांच्याविषयी सांगता येतील. मैफलीची सुरूवात एखाद्या श्‍लोकाने ते करायचे. विद्यादानाचे मोठे काम त्यांनी केले. गरजू मुलगा असेल, तर ते स्वत:च्या घरी ठेवून त्याला शिकवत. त्याला त्याच्या पायावर उभे देखील करायचे, असा महान गुरू लाभणे याला भाग्य लागते. वयाच्या नव्वदीतही त्यांना गाताना पाहिले, तर आम्हालाही हुरूप यायचा, असा हा संगीत मार्तंड आपल्यातून गेला. ही शास्रीय संगीताची खूप मोठी हानी आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com